Friday, 22 April 2022

DIO BULDANA NEWS 22.4.2022

 



आरोग्य यंत्रणेच्या सक्रिय सहभागाने कोविड लसीकरण मोहीम यशस्वी

-केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

धाड येथील ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन व आरोग्य शिबिर

बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : भारतात कोरोनाचे 187 कोटी लसीकरण करण्यात आले आहे. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे. कठीण परिस्थितीवर मात करत मोठ्या प्रमाणावर लसीकरण हे केवळ वैद्यकीय यंत्रणेने सतत घेतलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे लसीकरण मोहिम यशस्वी होऊ शकली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज केले.

   धाड ता. बुलडाणा येथे ग्रामीण रूग्णालयात आयोजित आरोग्य मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार श्वेताताई महाले, सरपंच सावित्री बोर्डे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड यांच्यासह विजयराज शिंदे, देवीदास पाटील आदी उपस्थित होते.

    सुरूवातीला धाड येथील ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.   केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या, देशात चार हजार ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभे राहिले आहेत. त्यामुळे येत्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही. कोरोनाच्या काळात शासनाने कोणालाही वाऱ्यावर सोडले नाही. लॉकडाऊन कालावधीत नागरिकांना घरपोच राशन दिले गेले. जनधन, शेतकरी सन्मान योजना, उज्वला योजना, तसेच आरोग्याच्या विविध योजना राबविल्यामुळे कठीण परिस्थितीतही नागरिकांचे जीवन सुखी झाले.

     त्या पुढे म्हणाल्या, मोफत लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आल्यानंतर आरोग्य यंत्रणा आणि आशा कार्यकर्त्यांमुळे गावापर्यंत शासन पोहोचू शकले. सध्या 12 वर्षावरील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. लसीकरणाचे कार्यक्रम यशस्वीपणे घेऊन आरोग्य सेवा देण्यासाठी यंत्रणेने सतत प्रयत्नशील असावे. आज शासन ई-संजीवनी आणि मोफत औषधांच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा देत आहे. आरोग्य सेवा ही मानवतेची सेवा आहे, ही जाणीव ठेवून कार्य करण्यात येत आहे.  धाड येथील ग्रामीण रुग्णालयात एक्स रेची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पामुळे येथील नागरिकांना सुविधा मिळाली आहे, असेही डॉ. पवार यांनी सांगितले.

आमदार श्वेताताई महाले यांनी आरोग्य यंत्रणेने उत्कृष्ट कार्य केले. त्यामुळे कोरोनाच्या लाटांवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. येत्या काळात महिलांमध्ये वाढीस असलेल्या गर्भाशय कर्करोगावरील लसीकरण अभियान राबविण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी डॉक्टर फोर यू च्या डॉ. वैशाली वेणू, देविदास पाटील, सुनील देशमुख, विजयराज शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच डॉक्टर फोर यू च्या डॉ. वैशाली रेणू आणि साकेत झा यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला धाड भागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

                                                                ***************

 



मातृशक्ती सक्षम करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी

-केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

  • चिखली येथील ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन व गरोदर माता आरोग्य तपासणी शिबिर

बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : मातृत्व हे स्त्रीला लाभलेले वरदान आहे. त्यामुळे गरोदर माता व स्तनदा मातांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सजगतेने काम करीत आहे. देशातील ही मातृशक्ती सक्षम करण्यासाठी शासन पातळीवरून विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून त्याचा निश्चितच लाभ मातांना होत असल्याचा विश्वास केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज व्यक्त केला. चिखली येथील मुकूल वासनिक सांस्कृतिक भवन येथे गरोदर माता तपासणी शिबिर व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यमंत्री डॉ. पवार बोलत होत्या. यावेळी आमदार श्वेताताई महाले, आमदार ॲड आकाश फुंडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन एम राठोड आदींसह मान्यवर उपस्थित होते.

   कार्यक्रमाच्या सुरूवातीला 1 कोटी रूपये खर्च करून निर्मित केलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन राज्यमंत्री डॉ. पवार यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच चिखली मतदार संघातील जलजीवन मिशन, केंद्रीय मार्ग निधी, पंतप्रधान ग्राम सडक योजनेतंर्गत होणाऱ्या 42.12 कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपुजन कार्यक्रमस्थळी करण्यात आले.

  गरोदर मातांनी नियमित आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन करीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या, गरोदर मातांच्या तपासणीचा खर्च व औषधे पुरविण्यासाठी केंद्र शासन प्रधानमंत्री मातृवंदन योजना राबविते. यामध्ये शासन अर्थसहाय करते. तसेच जननी सुरक्षा योजना, बाल सुरक्षा योजना, आयुष्यमान भारत, पंतप्रधान जनआरोग्य योजना राबविते. आयुष्यमान भारत योजनेसाठी लाभार्थी चिन्हीत करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांना वर्षाला पाच लक्ष रूपयांचे आरोग्य विमा कवच देण्यात येते. त्यामुळे आरोग्यावरील खर्च लाभार्थ्याला करण्याची गरज पडत नाही. पॅनलवरील रूग्णालयातून उपचार करण्यात येतात. जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून औषधांवरील खर्चही कमी करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे.  देशात 12 वर्षापुढील बालकांनाही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.    

   आमदार श्वेताताई महाले यावेळी म्हणाल्या, चिखली येथील रूग्णालय 50 बेडचे असून ते 100 बेड करण्यात यावे. तसेच चिखली येथे ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यात यावे. उंद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून अद्ययावत करावे. तालुक्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावाला पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच आमदार ॲड आकाश फुंडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पंडीत देशमुख यांनीसुद्धा आपले विचार यावेळी व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी गरोदर माता तपासणी शिबिर आयोजनामागील भूमिका विषद केली. शिबिरात गरोदर मातांची तपासणी करण्यात येवून त्यांना औषधे देण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, परीसरातील गरोदर मातांची उपस्थिती होती.

                                                            ***********

No comments:

Post a Comment