Wednesday, 20 April 2022

DIO BULDANA NEWS 20.4.2022


 किसान भागीदारी प्राथमिकता हमारी अभियानातंर्गत किसान क्रेडीट कार्डचे वितरण

•      24 एप्रिल ते 1 मे दरम्यान राबविले जाणार अभियान

·                     24 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्रालयाच्यावतीने पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्डचे वितरण करण्यासाठी किसान भागीदारी प्राथमिकता हमारी अभियान राबविण्यात येणार आहे. सदर अभियान 24 एप्रिल ते 1 मे 2022 या कालावधीत राबविण्यात येणार असून यासाठी रविवार 24 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजनही करण्यात येणार आहे, अशी माहिती अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी आज दिली. अभियानाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्री. पठारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, जिल्हा उपनिबंधक भुवनेश्वर बदनाळे, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे डॉ. खरात, नायब तहसिलदार संजय बनगाळे आदी उपस्थित होते.

     या अभियानातंर्गत ज्या पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड मिळालेले नाहीत, अशा सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्डचे वितरण करावयाचे आहे. त्यासाठी 24 एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रामसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधीत करणार आहे. सदर अभियान जिल्हा प्रशासन, नाबार्ड, बँका यांच्या सहकार्याने राबवायचे आहे. ग्रामपातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहायक, बँकेचे प्रतिनिधी यांनी ग्रामसभेत उपस्थित राहून पीएम किसानच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड वितरणासाठी सक्रीय सहभाग घ्यावयाचा आहे.  पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी बँकनिहाय उपलब्ध करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. तरी पीएम किसान योजनेच्या ज्या लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड मिळालेले नसेल, त्यांनी या अभियानाच्या माध्यमातून 24 एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रामसभेला उपस्थित रहावे, असे आवानही यावेळी करण्यात आले.

*****

                            चिखली येथे आयोजित जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिर उत्साहात

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या सुचनेनुसार 6 ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताह राबविण्यात आला. सदर सप्ताहात 12 एप्रिल रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बुलडाणा कार्यालयामार्फत श्री. शिवाजी महाविद्यालय, चिखली येथे स 11 ते सायं 5 पर्यंत एकदिवसीय विशेष शिबिर उत्साहात पार पडले. शिबिरात इयत्ता 11 व 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेले तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित असलेले विद्यार्थी, सीईटी परीक्षा देणारे विद्यार्थी, पदविका तृतीय वर्षात शिकत असलेले विद्यार्थी यांना जात प्रमाणपत्र पडताळणी संबंधी परिपूर्ण ऑनलाईन अर्ज करणे व त्यासोबत जाती दाव्यानुसार आवश्यक कागदपत्रे सोबत जोडणे याबाबत माहिती देण्यात आली. तसेच यावेळी ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्यात आले. समितीने निकाली काढलेल्या प्रकरणांच्या जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप समितीचे उपायुक्त तथा सदस्य विजय साळवे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मनोज मेरत यांनी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन केले.

                                                            ***********


चिखली तालुका स्तरीय खरीप पूर्व आढावा बैठक उत्साहात

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : चिखली तालुका स्तरीय खरीप पूर्व आढावा सभा पंचायत समिती सभागृह, चिखली येथे 18 एप्रिल रोजी आमदार श्वेताताई महाले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.  सदर सभेची सुरुवात भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे, तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे उपस्थित होते.

   आमदार श्वेता ताई महाले यावेळी म्हणाल्या,  घरचे बियाणे वापरणे, बीज प्रक्रिया, बीबीएफ पेरणी, पट्टा पद्धतीने पेरणी, टोकण पद्धतीने पेरणी, वाढीच्या अवस्थेत सोयाबीन पिकाला युरिया खत न देणे, तूर पिकाचे शेंडे खुडणे, 10 टक्के खत बचत, खतांचे नियोजन, बियाणे उगवण क्षमता इत्यादी मोहिमा गावा-गावात कृषी सहाय्यक यांनी प्रभाविपणे राबवाव्यात. त्यासाठी त्यांनी गावामध्ये खरीप पूर्व सभा आयोजित कराव्यात त्याच बरोबर शेतकऱ्यांचे खरीप हंगाम चांगला जाण्यासाठी बियाणे खतांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

   तालुका कृषी अधिकारी खरीप हंगाम 2022 मध्ये तालुक्याचे पेरणी, निविष्ठा व विविध मोहिमांबाबत सादरीकरण अमोल शिंदे म्हणाले, खरीप हंगाम 2022 मध्ये एकूण 87 हजार 767 हेक्टर पेरणीचे नियोजन केले असून त्यामध्ये सोयाबीन 68 हजार हेक्टर, तूर 12 हजार हेक्‍टर, कापूस 1200 हेक्टर, मुंग 2300 हेक्टर, उडीद 3500 हेक्टर व इतर पिके असे नियोजन आहे. सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी उपलब्ध असल्याने बियाणे टंचाई राहणार नाही. सदर सभेमध्ये प्रति हेक्‍टरी उत्पादकता लक्षांक सोयाबीन 22 क्विंटल प्रति हेक्‍टर, मुंग 10.50 क्विंटल प्रति हेक्‍टर, उडीद 11 क्विंटल प्रति हेक्‍टर,0कापूस 17.50 क्विंटल प्रति हेक्‍टर व तूर 9.50 क्विंटल प्रति हेक्‍टर असा निश्चित केलेला आहे.

   सदर लक्षांक साध्य करण्यासाठी प्रभावी शेतीशाळा, योग्य पेरणी पद्धत, निविष्ठांचा नियोजन, कीड-रोग नियंत्रण इत्यादी विविध मोहिमा प्रभावी जनजागृती करून साध्य करण्याचे निश्चित केले आहे. महाडीबीटी द्वारे यांत्रिकीकरण, फलोत्पादन, पी एम के एस वाय योजनांमधून सन 2021-22 मध्ये 4.90 कोटी अनुदान वितरित करण्यात आले. तसेच पोकरा योजनेमधून आज पर्यंत 16.38 कोटी अनुदान वितरित केल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले. सदर सभेस विविध विभागांचे तालुकाप्रमुख, कृषी निविष्ठा विक्रेते संघ चिखली चे पदाधिकारी उपस्थित होते.  संचालन श्री. खान यांनी तर आभार प्रदर्शन संदीप सोनुने यांनी केले, असे तालुका कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                        **********

No comments:

Post a Comment