Thursday, 25 June 2020

DIO BULDANA NEWS 25.6.2020



पोलीस दलाच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन
  • गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्हिसीद्वारे केले मार्गदर्शन
बुलडाणा,(जिमाका) दि.25 : जिल्हा पोलीस दलाच्यावतीने कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय यांच्या तातडीच्या वैद्यकीय औषधोपचारासाठी स्व. दिपक जोग स्मृती भवन येथे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेंटरचे फित कापून उद्घाटन आज 25 जुन रोजी जानेफळ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस काँन्स्टेबल पुजा राजपूत यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार संजय गायकवाड, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप पखाले, पोलीस उपअधिक्षक (गृह) बळीराम गिते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंके, पोलीस कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक  गिरीष ताथोड आदींची उपस्थिती होते.  
    तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी येथे व्हिसीच्या माध्यमातून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी कोविड केअर सेंटरविषयी माहिती दिली. सेंटरचे चित्रीकरणही यावेळी दाखविण्यात आले. दरम्यान, गृहमंत्री यांनी पॉस्को अंतर्गत दाखल असलेल्या केसमध्ये दोन वेळा अकोला सामान्य रूग्णालयात जावून आलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल पुजा राजपूत यांच्याविषयी चौकशी केली. त्यांच्या धाडसाचे त्यांनी कौतुक केले. त्यांच्याचहस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्याच्या सूचना देत त्यांच्यासमोर त्यांनी ऑनलाईन उद्घाटन करायला लावले.  त्यानुसार महिला काँन्स्टेबल पुजा राजपूत यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
  त्यानंतर रविकांत तुपकर यांच्याहस्ते कोविड केअर सेंटरच्या पलिकडील भागात असलेल्या उपहारगृहाचे भूमिपुजन करण्यात आले. तसेच कोविड केअर सेंटरसाठी घेण्यात आलेल्या विंधन विहीरीच्या पाण्याचे जलपूजनही करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
                                                                                                ******
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध
  • दोषींवर कायदेशीर कारवाई
बुलडाणा,(जिमाका) दि.25 : साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदींच्या अधिन राहून कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास, थुंकण्यास व ई सिगारेटसह धुम्रपानास प्रतिबंध करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व थुंकण्यामुळे सार्वजनिक मालमत्ता विद्रुप होते व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. तसेच यामुळे कर्करोग, पुनरूत्पादन संस्थेचे आजार, पचन संस्थेचे आजार, क्षयरोग, न्युमोनिया यांसारख्या प्राणघातक आजारांचा फैलाव होतो. आता तर कोविड महामारीचा संसर्ग हा थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धुम्रपान करणे कटाक्षाने टाळावे.
   तरी जिल्ह्यातील सर्व इन्सीडेंटर कमांडर, सर्व नायब तहसिलदार, सर्व नगर पालिका, नगर पंचायत चे मुख्याधिकारी, सर्व पोलीस उपनिरीक्षक व सर्व पोलीस अधिकारी, सर्व कार्यालयांचे कार्यालय प्रमुख यांना दंडनीय कारवाई करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांनी घोषीत केले आहे. कुणीही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धुम्रपान करताना आढळल्यास त्याविरूद्ध कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेशान्वये कळविले आहे.

                                                                   असा आहे दंड
मुंबई पोलीस अधीनियम, 1951 चे कलम 116 नुसार दंड : पहिला गुन्हा केल्यास 1000 रूपये दंड व 1 दिवस सार्वजनिक सेवा, दुसरा गुन्हा केल्यास 3000 रूपये दंड व 3 दिवस सार्वजनिक सेवा, तिसरा व त्यानंतर गुन्हा केल्यास 5000 रूपये दंड व 5 दिवस सार्वजनिक सेवा. भारतीय दंडसंहीता 1860 चे कलम 268,270,272 व 278 नुसार दंड : कलम 268 नुसार दंड, कलम 269 नुसार 6 महिने शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही, कलम 270 नुसार 2 वर्ष शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही, कलम 272 नुसार 6 महिने शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही, कलम 278 नुसार 500 रूपयापर्यंत दंड. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहीरात प्रतिबंध, व्यापार विनियमन आणि वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण) कायदा 2003 नुसार दंड : कलम 4 अन्वये 200 रूपयापर्यंत दंड, कलम 5 अन्वये पहिला गुन्हा 1000 रूपये दंड किंवा 2 वर्ष शिक्षा किंवा दोन्ही, दुसरा गुन्हा 5000 रूपयापर्यंत दंड किंवा 5 वर्ष शिक्षा किंवा दोन्ही, कलम 6 अ, 6 ब अन्वये 200 रूपये दंड, कलम 7 अन्वये उत्पादकाचा पहिला गुन्हा असल्यास 5000 रूपये दंड किंवा दोन वर्ष शिक्षा किंवा दोन्ही, दुसरा गुन्हा असल्यास 10000 रूपये दंड किंवा 5 वर्षाची शिक्षा, विक्रेत्याचा पहिला गुन्हा असल्यास 1000 रूपये पर्यंत दंड किंवा 1 वर्ष शिक्षा, दुसरा गुन्हा असल्यास 3000 रूपयापर्यंत दंड किंवा 2 वर्ष शिक्षा.
********
हाराष्ट्र जमिन महसूल नियम 1971 च्या कलम 11 मध्ये होणार सुधारणा
  • राजपत्र प्रसिद्ध, हरकती व सुचना असल्यास 30 जुनपर्यंत सादर करण्याचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.25 : महाराष्ट्र जमिन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम 1971 च्या नियम 11 मध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले आहे.  सदर राजपत्राद्वारे  महसूल व वन विभागाच्या अंतर्गत अधिसूचना प्रकाशित केली आहे. या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यात येणाऱ्या नियमांचा मसुदा देण्यात आला आहे. त्यानुसार या नियमांना ‘महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) (द्वितीय सुधारणा) नियम, 2020’ असे म्हणावे आणि महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, 1971 मधील नियम 11 च्या पोट नियम (5) मध्ये शब्द आणि अंकात ‘रूपये 35,000’ या मजकुराऐवजी ‘रूपये 8,00,000’ हा मजकूर दाखल करण्यात येईल, असा मसुदा आहे.
  तरी या सुधारणांच्या अनुषंगाने काही हरकती व सुचना असल्यास सदर हरकती व सुचना जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे 30 जुन 2020 पर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व विभागाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.
                                                                                *******
जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या सभेचे आयोजन
बुलडाणा,(जिमाका) दि.25 : जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या सभेचे आयोजन 30 जुन 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे. ज्या व्यक्तींना भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारी व गाऱ्हाणी दाखल करावयाच्या असतील त्यांनी प्रतिज्ञापत्रावर तक्रार स्पष्ट शब्दात सबळ पुराव्यानिशी समितीसमोर दाखल कराव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                            *******
कोरोना अलर्ट : प्राप्त 27 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह
बुलडाणा,(जिमाका) दि.25 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 28 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 27 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हा मंगलगेट मलकापूर येथील 67 वर्षीय महिलेचा आहे. सदर महिला काल 24 जुन रोजी मृत पावली असून या महिलेचा अहवाल आज पॉझीटीव्ह आला आहे.
     तसेच आतापर्यंत 2353 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत 135 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 135 आहे.  तसेच आज 25 जुन रोजी 28 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 1 पॉझीटीव्ह, तर 27 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी 53 अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2353 आहेत.
      जिल्ह्यात आजअखेर एकूण 170 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 135 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 24 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 11 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment