Friday, 19 June 2020

DIO BULDANA NEWS 19.6.2020


प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करावे
-         पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
·        कृषी व महसुल प्रशासनाला दिल्या सुचना
बुलडाणा,(जिमाका)दि. 19 : सिंदखेड राजा तालुक्यामध्ये  नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील अनेक गांवातील शेतकऱ्यांच्या शेडनेटचे नुकसान झाले आहे. तसेच शेडनेटमधील पिकांप्रमाणे इतर पिकांचे तालुक्यात 11.85 हेक्टरवर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिगंणे यांनी  तालुका कृषी अधिकारी व महसुल प्रशासनास दिल्या आहे.
 पालकमंत्री यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील शेलगांव राऊत, विझोरा, उगला पिंपळगांव लेंडी यासह अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष जावुन नुकसानीची पाहणी केली आहे. 
   सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खचून न जाता प्रशासनास सहकार्य करून आपल्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास मदत करावी आणि प्रशासनाने कुणीही नुकसानग्रस्त शेतकरी यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. नुकसानीचे पंचनामे करून शासनास पाठविल्या जाणार आहे.  शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.
    सिंदखेड राजा तालुक्यामध्ये अचानक अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेडनेट मध्ये असलेला पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते आहे. अशा कठीण प्रसंगी शेतकऱ्यांना आधार देणे व त्यांच्या मागे ठामपणे उभं राहणं हे शासनाचे व प्रशासनाचे काम आहे, अशी प्रतिक्रियाही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.  यावेळी उपविभागीय अधिकारी विवेक काळे, तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर , कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांच्यासह मंडळ अधिकारी , तलाठी कृषी सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते.
******
कोरोना अलर्ट : प्राप्त 97 कोरोना अहवाल 'निगेटीव्ह'; तर 6 पॉझीटीव्ह
बुलडाणा,(जिमाका) दि.19 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी तब्बल 103 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 97 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे मलकापूर येथील 60 वर्षीय पुरूष, 38 वर्षीय पुरूष, 23 वर्षीय महिला, जळगांव जामोद येथील 50 वर्षीय पुरूष, शेगांव येथील 58 वर्षीय महिला व नांदुरा येथील 45 वर्षीय पुरूष रूग्णाचे आहे.
   जिल्ह्यात सध्या सिंदखेड राजा, बुलडाणा, मोताळा, चिखली, दे.राजा तालुके कोरोनामुक्त असून या तालुक्यात कोरोनाचा एकही रूग्ण उपचार घेत नाही. आतापर्यंत 95 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 95 आहे.  सध्या रूग्णालयात 48 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.
  तसेच आतापर्यंत 2049 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 148 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी पाच मृत आहे.   तसेच आज 19 जुन रोजी 103 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 6 पॉझीटीव्ह, तर 97 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  98 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2049 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
******

6 वा आंतरराष्ट्रीय योग दिवसाला  घर घर योग साजरा करावा
  • जिल्हा प्रशासनाचे आवाहन
  • 21 जुन रोजी सकाळी 7 ते 7.45 वाजेदरम्यान घरातूनच योग दिन साजरा करावा
 बुलडाणा, (जिमाकादि. 19 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नातुन सन 2015 पासुन 21 जून हा दिवस संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचे निश्चीत केले आहे.   त्याअनुषंगाने भारतातच नव्हे तर संपुर्ण जगात 21 जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दिनांक 21 जुन 2020 रोजी 6 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे “घर घर योग” या घोष वाक्याच्या अनुषंगाने घराघरात साजरा करावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाने केले आहे.
   क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांचे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा भारती, योग भारती,  जिल्हा पतंजली योग समिती, नेहरु युवा केंद्र, शिक्षण विभाग, आर्ट ऑफ लिव्हींग, योगक्षेत्रात कार्यरत विविध क्रीडा मंडळ, महिला मंडळे, विविध संस्था तसेच जिल्हा योग संघटना बुलडाणा, जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना यांचे सहकार्यातुन सदर योग दिवस मोठ्या उत्साहात प्रत्येकाने साजरा करावयाचा आहे. 
    योगदिनाच्या निमित्ताने नियमित योग क्रीयांसोबतच प्राणायाम जे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपयोगी ठरते.  योगनिद्रा (प्रत्याहार) हे रिलॅक्सेशनसाठी उपयोगी ठरते.  ध्यान (मेडीटेशन) जे मन:शांतीसाठी अत्यंत उपयोगी ठरते असे सर्वांगसुंदर शारीरिक व मानसीक व्यायाम व मन:शांतीसाठी योगा ही जीवनशैली बनली पाहिजे. सन 2020 च्या जागतीक योग दिनाचे ब्रिदवाक्य आहे.  घर घर मे योग म्हणजे घरी राहुनच तुम्ही स्वत: तुमच्या कुटूंबासोबत सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन योगा करावयाचा आहे.  घरी राहुनच योगा केल्याने कोरोनाच्या संक्रमणापासुन बचाव तर होईलच त्याच बरोबर योगा केल्याने तुमची व तुमच्या कुटुंबाचे आरोग्य देखील चांगले राहतील.  त्यासाठी रविवार, दिनांक 21 जून, 2020 रोजी सकाळी 7 ते 7.45 या कालावधीत विविध माध्यमांवर उपलब्ध योगा प्रोटोकॉल नुसार, सहकुटूंब आपण सर्वांनी योगा करुन जागतीक योग दिन साजरा करावा. 
माय लाईफ माय योगा व्हीडीओ ब्लॉगींग स्पर्धा
  त्याचबरोबर माय लाईफ माय योगा व्हीडीओ ब्लॉगींग कॉम्पीटीशन अंतर्गत ऑनलाईन योग कॉम्पीटीशन केंद्र सरकारच्या अखत्यारितील आयुष मंत्रालयाने आयोजित केली आहे.  या स्पर्धेची नियमावली http://www. Mylife myyoga 2020. com/home या लिंकवर उपलब्ध आहे.  प्रत्येकाने आपआपल्या घरी राहून सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन, वैयक्तीकरित्या सकाळी 7 ते 7.45 या वेळेत योगाचे प्रात्यक्षीक करुन केलेल्या प्रात्यक्षीकाचे व्हीडीओ  http:// www. My lifemyyoga2020.com/home या लिंकवर डाऊनलोड करावयाचे आहेत.  तसेच युट्युब, फेसबुक आणि इन्स्टाग्राम, ट्विटर यावर सुध्दा अपलोड करावयाचे आहे.  अधिक माहिती करीता वरील लिंकला भेट द्यावी. 
    तरी रविवार, 21 जून, 2020 रोजी जागतीक योग दिन वैयक्तीक रित्या घरातच साजरा करण्यासाठी व ऑनलाईन योग कॉम्पीटीशनमध्ये जिल्ह्यातील सर्व खेळाडू, शिक्षक, संघटक, योगप्रेमी, पालक, नागरीक, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा व जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले आहे.
****

                  कोरेानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 67 बंद्यांना जमानतीवर कारागृहातून सोडले
बुलडाणा,(जिमाका) दि.19 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग जिल्ह्यातील कारागृहात होवू नये तसेच तेथील कैद्यांना कोरोनाची लागण होवू नये म्हणून मा. सर्वोच्च न्यायालयाने Suo Moto Writ Petition (C) No. 1/2020  यात आदेश दिले. या आदेशाप्रमाणे मा. उच्च न्यायालयात उच्चस्तर शक्ती प्रदत्त समिती गठीत करण्यात आली होती.  त्यानुसार कारागृहामध्ये असलेल्या बंदी कच्च्या कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्याचे आदेश प्राप्त झाले. त्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांनी स्वत: बुलडाणा जिल्हा कारागृहात तात्काळ भेट देवून जिल्हा कारागृह अधिक्षक सोबत बैठक घेतली. तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात येणाऱ्या बंदी कैद्यांची यादी तयार करून ती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत सर्व संबंधीत न्यायालयाकडे पाठविली. बुलडाणा कारागृहातून एकूण 67 बंद्यांना जमानतीवर सोडण्यात आले आहे.
   सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सात वर्षाच्या आत शिक्षा असलेल्या गुन्ह्यातील कैद्याची यादी तयार करण्यात आली. अंतरिम जामिनाच्या योग्य त्या आदेशास्तव ते सर्व अर्ज संबंधित न्यायालयाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर उच्चस्तर शक्ती प्रदान समितीच्या आदेशाप्रमाणे संबंधित न्यायबंदी कैद्याची यादी तयार करण्यात आली. योग्य त्या आदेशास्तव संबधित न्यायालयाकडे पाठविण्यात आले. त्यानुसार 23 मार्च ते 15 जुन 2020 पर्यंत एकूण 181 अर्ज अंतरिम जामिनासाठी प्राप्त झाले होते. त्यापैकी 179 अर्ज 15 जुन 2020 च्या आत निकाली काढण्यात आले. बुलडाणा कारागृहातील 67 बंदी जमानतीवर सोडण्यात आले. तसेच 17 मे 2020 पर्यंत 48 कैदी सोडण्यात आले, तर 18 मे ते 21 मे 2020 पर्यंत 9 कैदी सोडण्यात आले. त्याचप्रमाणे 22 मे ते 31 मे 2020 पर्यंत 3 कैदी सोडण्यात आले.
   तसेच 1 जुन ते 15 जुन दरम्यान 7 कैदी जामिनावर सोडण्यात आले. बुलडाणा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव साजिद आरीफ सैय्यद यांनी कारागृह प्रशासन तथा जिल्ह्यातील सर्व न्यायालयांशी वांरवार संपर्क साधून ही प्रक्रिया पुर्ण केली आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
*******
वन महोत्सव कालावधीत सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध
  • वृक्षारोपणासाठी रोपे रोपवाटीकांमधून घेवून जाण्याचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.19 : राज्यात 15 जुन ते 30 सप्टेंबर हा कालावधी वन महोत्सवाचा कालावधी म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. या कालावधीत वृक्ष लागवडीसाठी लोकांना प्रेरीत करण्यासाठी शासनामार्फत सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्यात येत असतो. त्याअनुषंगाने सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये वन महोत्सव कालावधीत 9 महिन्याचे प्रती रोप 8 रूपये तसेच 18 महिन्याचे प्रती रोप 40 रूपये या दराप्रमाणे मिळणार आहे. यामध्ये 9महिन्याचे रोप हे लहान पिशवीत तर 18 महिन्याचे रोप हे मोठ्या पिशवीमध्ये मिळणार आहे. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये रोप वाटीकांमध्ये सागवान, बांबु, फळझाडे, शोभीवंत झाडे आदी प्रजातींची रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.
  तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी, वृक्षप्रेमी, निसर्गप्रेमी, शासकीय यंत्रणा व आस्थापना तसेच निमशासकीय यंत्रणांनी येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी  संबधीत तालुक्याचे वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण यांचेशी साधुन रोपे उपलब्ध करून घ्यावीत, असे विभागीय वनाधिकारी एस.ए पार्डीकर यांनी केले आहे.
                                                                                ******

No comments:

Post a Comment