गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2019-20
खातेदार शेतकरी व कुटुंबातील एका सदस्यास योजनेचा लाभ
बुलडाणा, दि. 23 : अपघातग्रस्त शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस आर्थिक लाभ देण्याकरिता गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येते. सन 2019-20 मध्ये या योजनेची व्याप्ती वाढवून योजनेमध्ये सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या कोणत्याही एका सदस्यासह, कुटुंबातील 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांना गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभ देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी दिली.
या योजनेनुसार खातेदार शेतकऱ्यांकरिता शासन स्वत: विमा हप्ता भरणार असून अपघातग्रस्त कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता सुमारे 19 लाख 13 हजार वहिती खातेदार शेतकरी व वहिती खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयातील सुमारे 38 लाख 26 हजार लाभार्थ्यांच्या या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या अधिक माहिती करिता जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे विभागीय कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांनी कळविले आहे.
**********
कोरोना अलर्ट : प्राप्त 19 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह
बुलडाणा,(जिमाका) दि.23 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 20 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 19 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हा मोमीनपुरा, मलकापूर येथील 55 वर्षीय महिलेचा आहे. सदर महिलेचा आज 23 जुन रोजी मृत्यू झाला आहे. तसेच काल 22 जुन रोजी कोरोनाबाधीत काळीपूरा, मलकापूर येथील 70 वर्षीय महिला उपचारादरम्यान रूग्णालयात मरण पावली.
तसेच आतापर्यंत 2273 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 166 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी 10 मृत आहे. आतापर्यंत 122 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 122 आहे. सध्या रूग्णालयात 34 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
तसेच आज 23 जुन रोजी 20 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 01 पॉझीटीव्ह, तर 19 निगेटीव्ह आहेत. आज रोजी 44 अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2273 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
******
महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांचा दौरा
बुलडाणा,(जिमाका) दि.23 : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर दि. 24 जुन रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दि. 24 जुन रोजी सकाळी 9.45 वाजता नांदुरा येथे आगमन व मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेश पंडीतराव एकडे यांचे वडीलांचे दु:खद निधन झाल्यामुळे त्यांच्या निवासस्थानी भेट, सकाळी 10.45 वा नांदुरा येथून खामगांव-चिखली-दे.राजा- मार्गे मुंबईकडे प्रयाण करतील.
कुशल व अकुशल कामगारांनी नाव नोंदणी करावी
- जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व मार्गदर्शन केंद्राचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.23 : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातून मजूर व कामगार वर्ग औद्योगिक आस्थापनेवरून स्वत:च्या गावी परतला आहे. त्यामुळे औद्योगिक आस्थापनांवरील मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी गरजू बेरोजगार उमेदवारांनी रोजगारासाठी आपली नाव नोंदणी तातडीने विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर करावी. उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता व अनुभवानुसार उमेदवाराला नोकरीची संधी मिळेल. कुशल व अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता असलेल्या आस्थापनाचे व्यवस्थापक किंवा संचालक आवश्यक मनुष्यबळाची मागणी संकेतस्थळावर किंवा ॲपवर नोंदवू शकतात. तरी उमेदवारांनी तातडीने नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सु. रा. झळके यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment