आयकरास पात्र असलेल्या निवृत्तीवेतन धारकांनी कागदपत्रे सादर करावीत
· 5 फेब्रुवारी 2020 अंतिम मुदत
· जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन
बुलडाणा, दि. 24 : राज्य शासनाकडून जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारक किंवा कुटूंब निवृत्ती वेतनधारक यांना वित्तीय वर्ष 2019-20 मध्ये आयकर भरण्यास पात्र असल्यास त्यांनी संबंधित कागदपत्रे सादर करावीत. त्यामध्ये बचतीचा तपशील, अपंग प्रमाणपत्र, पॅन कार्ड याव्यतिरिक्त आयकराचा भरणा केला असल्यास गणनापत्रक, चलान आदी संपूर्ण तपशील 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत जिल्हा कोषागार कार्यालय, बुलडाणा येथे सादर करावा. जेणेकरून आयकर भरण्यास पात्र असलेले निवृत्ती वेतन धारक अथवा कुटूंब निवृत्ती वेतन धारक यांचे निवृत्ती वेतन आहरीत करून अदा करणे सोयीचे होईल. तसेच निवृत्ती वेतन अदा करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, याची नोंद घ्यावी. तरी आयकर भरणा करण्यास पात्र असलेल्या निवृत्तीवेतन धारकांनी कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांनी केले आहे.
000000
चिखली येथे अवैधरित्या साठा केलेला गुटखा जप्त
· 1 लक्ष 24 हजार 720 रूपये किमतीचा साठा जप्त
बुलडाणा, दि. 24 : शासनाने राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखु व तत्सम अन्न पदार्थांना राज्यात विक्री, साठा, वाहतुक व वितरणावर प्रतिबंध घातलेला आहे. गुप्त माहिती मिळाल्यावरून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अमरावती विभागातील अधिकारी व पोलीस अधिक्षक, बुलडाणा यांच्या चमुने चिखली येथे दोन ठिकाणी गुटख्याचा अवैधरित्या केलेला साठा जप्त करण्यात आला. त्यामध्ये मे. के. जी. एन पान मटेरीयल, बाबुलाल चौक, चिखली आणि पंकज जोशी यांचे राहते घर, गांधी नगर, चिखली या ठिकाणांचा समावेश आहे. मे. के.जी.एन पान मटेरीयल यांच्याकडून 94 हजार 950 आणि पंकज जोशी यांचेकडून 29 हजार 777 रूपये असे एकूण 1 लक्ष 24 हजार 720 रूपये किमतीच्या साठा आढळून आला. सदर साठा अन्न सुरक्षा अधिकारी, नितीन नवलकार यांनी पुढील कार्यवहीकरीता जप्त केला. सदर साठ्यातुन प्रयोगशाळा पडताळणीकरीता नमुने विश्लेषणात्मक घेण्यात आले असून नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्तीनंतर पुढील कार्यवाही घेण्यात येईल.
सदर मोहिमेत सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन, अमरावती सु. ग अन्नापुरे व जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप पाटील – भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल राठोड, अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे, गोपाल माहोरे, संदीप सुर्यवंशी यांनी सहभाग घेतला, असे सहाय्यक आयुक्त अनिल राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
क्रीडा विभागाचे जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर
· 26 जोनवारी रोजी होणार वितरण
बुलडाणा, दि. 24 : क्रीडा धोरण 2012 अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनलाय, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा क्रीडा क्षेत्रामध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शक व संघटक / कार्यकर्ता यांना त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने दरवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा मार्फत जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती, बुलडाणा मार्फत सन 2019-2020 या वर्षाकरीता गुणवंत क्रीडा कार्यकर्ता अथवा संघटक पुरस्कार राजेश्वर गोविंदराव खंगार व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी वैभव शेषनारायण लोढे यांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्काराचे स्वरुप 10 दहा हजार रूपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असुन, दि. 26 जानेवारी 2020 या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे वेळी पोलीस कवायत मैदान, बुलडाणा येथे पालकमंत्री यांचेहस्ते व जिल्हाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. गुणवंत क्रीडा कार्यकर्ता अथवा संघटक पुरस्कासर प्राप्त राजेश्वर गोविंदराव खंगार यांनी जिल्ह्यात विविध खेळांच्या संघटना स्थापन करणे, विविध खेळांचे प्रात्यक्षीके, इत्यादी संघटनात्मक कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव होण्याचे दृष्टीने त्यांना गुणवंत क्रीडा कार्यकर्ता/संघटक हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी निवड झालेले वैभव शेषनारायण लोढे यांनी तलवारबाजी या खेळात जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना मार्गदर्शन करुन, पदक विजेते खेळाडू घडविले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव होण्याचे दृष्टीने त्यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी परिपत्रकान्वये कळविले आहे.
No comments:
Post a Comment