जिल्हा पोलीस दलाच्यावतीने ‘सायबर सेफ वुमेन’ कार्यक्रमाचे आज आयोजन
· महिलांमध्ये सायबर क्राईमबाबत जनजागृती करण्याचा उद्देश
बुलडाणा, दि. 2 : महिला व बालकांच्या सुरक्षीततेच्यादृष्टीने नागरीकांमध्ये नाराजीचा सूर आहे. यापूर्वी घडलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांमुळे जनभावना प्रक्षोभित होवून वातावरण चिघळलेले आहे. त्यामुळे महिला व बालकांना त्यांच्यावर होणाऱ्या सायबर गुन्हे, अत्याचाराबाबत जागरूक करणे आवश्यक आहे. त्यांना असलेले कायद्याचे संरक्षणाबाबत माहिती, सायबर गुन्हेविषय जनजागृती करण्याच्या उद्देशाने बुलडाणा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने 3 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता सायबर सेफ वुमेन या कार्यक्रमाचे आयोजन प्रभा भवन, पोलीस मुख्यायलय, बुलडाणा येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून शाळा – महाविद्यांलयांमधील शिक्षक, शिक्षीका, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, खाजगी शिकवणी वर्गाच्या विद्यार्थीनी, रोटरी व लॉयन्स क्लबचे पदाधिकारी, एनजीओचे महिला प्रतिनिधी, पोलीस ठाण्याच्या महिला दक्षता समितीच्या महिला सभासद, महिला, पालक आदींची उपसिथती राहणार आहे. तरी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील – भुजबळ यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात
6 जानेवारी रोजी लोकशाही दिन
बुलडाणा, दि. 2 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन यावेळी सोमवार दि. 6 जानेवारी 2020 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे. अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत.
तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
********
बाल न्याय मंडळाच्या बैठकीचे 4 जानेवारी रोजी लोणार येथे आयोजन
बुलडाणा, दि. 2 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील अधिकारान्वये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील नियमानुसार मंडळाची फिरती बैठक आयोजित करण्यात येते. येत्या शनिावार, 4 जानेवारी 2020 रोजी आशा बालकाश्रम, हिवरखेड रोड, लोणार येथे मंडळाच्या फिरत्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मंडळासमोर त्या- त्या भागातील विधी संघर्षग्रस्त बालकांची प्रकरणे सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे. तरी या बैठकीला संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह अधिक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
सैन्यदलातील सेवारत सैनिकांची मतदार नोंदणी करण्यात येणार
· सेवारत सैनिकांच्या कुटूंबियांनी 20 जानेवारी पर्यंत माहिती सादर करावी
बुलडाणा, दि. 2 : जिल्ह्यातील सैन्यदलातील म्हणजेच आर्मी, नेव्ही व एअर फोर्समधील सेवारत सैनिकांची मतदार नोंदणी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सैन्य दलात सेवारत सैनिकांच्या कुटूंबियांनी सेवारत सैनिकाची त्यांच्याकडे उपलब्ध असलेली माहिती व संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांकाची नोंदणी 20 जानेवारी 2020 पर्यंत करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स. ह केंजळे यांनी केले आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारासाठी प्रवेशिका आमंत्रित
- 31 जानेवारी 2020 शेवटी मुदत
- 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2019 कालावधीतील प्रकाशित पुस्तक असावे
बुलडाणा, दि.2 - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार योजेनतंर्गत सन 2019 चे राज्य वाङमय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2019 दरम्यान प्रकाशित झालेले प्रथम आवृत्तीचे पुस्तक ग्राह्य धरण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी 31 जानेवारी 2020 पर्यंत प्रवेशिका आमंत्रित करण्यात आल्या आहेत. अर्जदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखा अथवा सर्वसाधारण शाखेत सदर प्रवेशिका सादर कराव्यात. सदर प्राप्त प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ, मुंबई यांचेकडे पाठविण्यात येणार आहे. कालमर्यादेनंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारण्यात येणार नाहीत.
तसेच लेखक/प्रकाशक यांना पुरस्काराबाबत नियमावली व प्रवेशिका www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेश या सदरात उपलब्ध आहे. तसेच https://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावरही नियमावली व प्रवेशिक उपलब्ध आहे. प्रवेशिका पुर्णत: भरून आवश्यक कागदपत्रांसह तसेच पुस्तकाराच्या देान प्रतींसह पाठवावी, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ यांनी केले आहे.
· कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 2 : यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे सध्याही जमीनीत ओल आहे. त्यामुळे तूरीचे पीक चांगले आहे काही ठिकाणी फुलोऱ्यावर तर काही ठिकाणी शेंगा धरलेल्या आहेत. शेतकरीबंधुना तूर पिकापासून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे मात्र मागील दोन-तीन दिवसापासून असणारे ढगाळ वातावरण तसेच रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे. अश्या वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यापासून नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधूनी आपल्या पिकाची पाहणी करुन वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करणे आवश्यक आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांमध्ये खालील प्रकारच्या अळ्यांचा समावेश होतो.
शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोवर्पा) - या कीडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते, अंड्यातून निघालेल्या अळ्या तूरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पुर्ण वाढ झालेली अळी 30 ते 40 मि.मि. लांब पोपटी रंगाची असून पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठ्या अळ्या शेंगांना छिद्र करुन आतील दाणे पोखरुन खातात.
पिसारी पतंग - या पतंगाची अळी 12.5 मि.मि. लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते. व बाहेर राहून दाने पोखरते
शेंगे माशी - या पतंगाची अळी बारीक गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाने अर्थवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकनी होते.
असे करा एकात्मिक व्यवस्थापन
या तिन्ही किडी कळ्या, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरीता जवळ जवळ सारखेच उपाय योजावे लागतात. प्रति हेक्टर 20 पक्षीथांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडींच्या अळ्या खाऊन फस्त करतात. तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतील त्या गोळा करुन नष्ट कराव्यात. शेंगापोखणाऱ्या अळ्यांसाठी वेळीच नियंत्रणाचे उपाय योजना न केल्यास तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पहिली फवारणी उपाय योजना न केल्यास तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पहिली फवारणी निम किटकनाशकाची (ॲझाडिरेक्टीन 300 पीपीएम,50 मिली/10 लिटर पाणी) करावी म्हणजे या किडीचे शत्रू किटकांना अपाय होणार नाही व नैसर्गिक संतूलन राखले जाईल. तसेच या कीडी निम किटकानांशकाचा फवारलेल्या तूरीवर अंडी घालण्यास प्राधाण्य देणार नाही.
तूरी वरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठ्ल्यानंतर (10 टक्के शेगांचे नुकसान किंवा 1 अळी प्रति झाड ) आढळल्यास क्निालफॉस 20 टक्के प्रवाही 20 मिली/10 लिटर पाणी फवारणी करावी. त्यानंतर खालील सुचविलेल्या कोणत्याही दोन किटकनाशकांच्या 15 दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या 10 लिटर पाण्यात मिसळून कराव्या. इमामेक्टिन बेंझोएट 5 टक्के 3 ग्रॅम, लॅब्डा सायहॅलोमेथ्रीन 5 टक्के प्रवाही 10 मिली, क्लोरॅट्रॅनिलीप्रोल 18.5 टक्के प्रवाही 2.5 मिली फवारण्यात यावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
हिरा ग्रुप ऑफ कंपनीकडून गुंतवणूकदारांची लाखो रूपयांची फसवणूक
· गुंतवणूकदारांना पैशांची परतफेड नाही
· या कंपनीच्या नावाने फसवणूक झाली असल्यास नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा
बुलडाणा, दि. 2 – हैदराबाद येथील हिरा ग्रुप ऑफ कंपनीने गुंतवणूकदारांना आश्वासनाप्रमाणे केलेल्या गुंतवणूकीचा परतावा न देता गुंतवणूकदारांची लाखो रूपयांची फसवणूक केली आहे. याबाबत शेख नईम शेख अब्दुल रहीम रा. सागवन यांनी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. फिर्यादीनुसार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नोहेरा शेख हैदराबाद व शेख निजाम हाफीज रा. तेलगु नगर, बुलडाणा यांनी कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वारंवार आमिष दाखविले. कंपनीने फिर्यादी व त्यांच्या पत्नीकडून 18 लक्ष रूपयांची गुंतवणूक करवून घेतली. मात्र आश्वासनाप्रमाणे परतावा न देता आर्थिक फसवणूक केली. या रिपोर्टवरून बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला कलम 420 व 34 भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ दिलीप पाटील- भुजबळ व अप्पर पोलीस अधिक्षक संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली पेालीस अधिक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक डी. बी तडवी करीत आहे. हिरा ग्रुप ऑफ कंपनी, हैदराबाद या कंपनीच्या नावाने अशाप्रकारचे आमिष दाखवून कुणाची आर्थिक फसवणूक झालेली असल्यास अशा व्यक्तींनी त्यांचेकडे उपलब्ध असलेल्या या कंपन्यांच्या कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, बुलडाणा येथे संपर्क साधावा. तक्रार दाखलक करावी, असे आवाहन पोलीस उप अधीक्षक डी. बी तडवी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment