Saturday, 18 January 2020

DIO BULDANA NEWS 18.1.2020

शरीराच्या तंदुरूस्तीसह पर्यावरण रक्षणासाठी नियमित सायकल चालवावी
                                                                               - जिल्हाधिकारी
·        फिट इंडिया मोहिमेतंर्गत सायकल रॅली
   बुलडाणा, दि. 18  : शरीराच्या तंदुरूस्तीकरीता नियमित्‍ व्यायाम करणे गरजेचे आहे. सायकल चालविणे हा सुद्धा व्यायामच आहे. सायकल केवळ शरीराच्या तंदुरूस्तीकरीताच नाही, तर पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी उपयोगी आहे. त्यामुळे शरीराच्या तंदुरूस्तीसह पर्यावरण रक्षणासाठी नियमित सायकल चालवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज केले.
   भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यानिर्देशानुसार जिल्हा प्रशासन, नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग व जिल्हा सायकलींग असोसिएशन व सायकल प्रेमी नागरिक  यांच्या संयुक्त   विदयमाने  फिट इंडिया मुव्हमेंट तसेच राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे 18 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9 वाजता ‘फिट इंडिया सायकल रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
   यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजयभाऊ गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गिते, पोलीस निरिक्षक श्री. कांबळे उपस्थित होते.  प्रास्ताविकात  जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील म्हणाले,  शारीरिक सुदृढता, पर्यावरण संवर्धन, इंधन बचत, शारीरिक सुदृढता, वाहतूक  नियंत्रण, आर्थीक बचत इत्यादी उद्देश डोळयासमोर ठेवून  या फिट इंडिया सायकल रॅलीचे आयोजन केले आहे.  या प्रसंगी 17 देशांची सायकलवर यात्रा करणारे सायकल पटू संजय मयुरे यांचे  मान्यवरांच्या हस्ते झाडाचे रोपटे देवून स्वागत करण्यात आले.  
   याप्रसंगी श्री.वरारकर, क्रीडा अधिकारी श्री. जाधव, जिल्हा शा.शि. संघटनेचे अध्यक्ष निलेश इंगळे, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था बुलडाणा येथील जयेश जोगदंड, ॲड.राजेश लहाने, आर्कीटेक जयंत सोनुने, आयएमए चे अध्यक्ष डॉ. महेर, श्री शिवाजी विद्यालयाचे शिक्षक श्री. पाटील,  भारत विद्यालयाचे शिक्षक एस.डी. भटकर, एडेड हायस्कूलचे शिक्षक आर.एन. जाधव, शारदा ज्ञानपीठचे शिक्षक श्री. औशाळकर आदी उपस्थित होते.
     तसेच वरील विद्यालयातील व आय.टी.आय. चे विद्यार्थी व इतर सायकलपट्टू, क्रीडा प्रेमी उपस्थित होते.
या वेळी अंदाजे 400 पर्यंत सायकलपटूंनी या रॅलीत आपला सहभाग नोंदविला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीस प्रारंभ
 करण्यात आला. या सायकल रॅलीकरीता पायलट म्हणून निलेश इंगळे, रविंद्र गणेशे, सुरेश मोरे, श्री. औशाळकर,  जयेश जोगदंड, गणेश जाधव, आर.आर. धारपवार आदींनी कामकाज पाहिले. संचलन क्रीडा अधिकारी श्री. धारपवार यांनी तर आभार प्रदर्शन नेहरु युवा केंद्राचे लेखापाल अजयसिंग राजपूत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्या करीता धनंजय चाफेकर, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक भागवत ‍ मोहिते, निलेश लवंगे, साधना मोरे, सिमा सोनोने, जिल्हा सायकल असो.चे पदाधिकारी, जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सुधीर मोरे, गणेश डोंगरदिवे, कृष्णा नरोटे, विनोद गायकवाड, प्रतिक मोरे, भिमराव पवार, कैलास डुडवा, श्री. माकोने, प्रशांत लहासे व प्रदीप डांगे यांनी प्रयत्न केले.  
******

जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलीओचा डोस पाजावा            -         जिल्हाधिकारी
·        पल्स पोलीओ लसीकरण मोहिम जनजागृती                                                      
   बुलडाणा, दि. 18  : जिल्ह्यात येत्या रविवार, 19 जानेवारी 2020 रोजी 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पल्स पोलीओचा डोस पाजण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज केले.
   जिल्हा सामान्य रूग्णालय येथे पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेच्या जनजागृतीसाठी आज रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. रॅलीस हिरवी झेंडी दाखवून सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत,  निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मकानदार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ गायके, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. गोफणे, डॉ. कुटूंबे, डॉ. कुळकर्णी, डॉ. वासेकर, डॉ. कदम, डॉ. जिवने, अधिसेविका श्रीमती राठोड, परिचर्या अधिकारी श्रीमती खेडेकर, श्रीमती कुरसुंगे, श्रीमती साखळीकर व श्रीमती शरीफा शेख उपस्थित होत्या.
   जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, पल्स पोलीओ लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर स्वयंसेवकांनी सहभाग घ्यावा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडीत म्हणाले, जिल्ह्यामध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील अपेक्षीत लाभार्थी एकूण 1 लक्ष 42 हजार 173 बालकांना 19 जानेवारी रोजी पोलीओचा डोस देण्यात येणार आहे. सदर लसीकरण सकाळी 8 ते सायं 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच रेल्वे स्टेशन, बस स्थानके, विटभट्टी, रस्त्यावर काम करणारे व उसतोड काम करणारे यांना पोलीओ डोस देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
  याप्रसंगी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचलन आहारतज्ज्ञ श्री. सोळंकी यांनी केले, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडीत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                            ****
             वैयक्तिक वनहक्क प्राप्त धारकांना ट्युबवेल व पंपसेट मिळणार 
·        28 जानेवारी 2020 पर्यंत स्वत: उपस्थित राहून अर्ज सादर करावे       
   बुलडाणा, दि. 18  : विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतून वैयक्तिक वनहक्क प्राप्त धारकांना ट्युबवेल व पंपसेट मंजूर आहेत. अशा धारकांकडून 28 जानेवारी 2020 पर्यंत प्रकल्प अधिकारी कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला या कार्यालयात अर्ज मागविण्यात आले आहे.
   अर्जासोबत आधार कार्ड, जातीचा दाखला, वनजमिनीचा पट्टा मिळाल्याचे प्रमाणपत्र, शेतात पाण्याचे स्त्रोत विहीर अथवा बोअर असल्याचे प्रमाणपत्र, रहीवाशी दाखला व पापोर्ट आकाराचे फोटो सादर करावे. वरील दस्तऐवजांसह स्वत: उपस्थित राहून सदर कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
--

No comments:

Post a Comment