Monday, 9 October 2017

NEWS 9.10.2017 DIO BULDANA

किटकनाशकांची फवारणी करताना संरक्षक साहित्याचा वापर करावा
·       कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे आवाहन
·       हवेच्या दिशेने फवारणी करावी, विषबाधेची माहिती शासकीय यंत्रणेस कळवावी
·        शेतमालकांनी प्रथमोपचाराचे साहित्य शेतावर उपलब्ध करावे
बुलडाणा, दि‍. ९- विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कापूस व सोयाबीन पिकावर फवारणी करताना शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषि विभागामार्फत फवारणी करताना घ्यावयाच्या खबरदारीच्या मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. विषबाधेच्या घटना घडू नयेत, यासाठी किटकनाशकांची फवारणी करतेवेळी संरक्षक साहित्य असलेल्या हातमोजे, चष्मा, मास्क, टोपी आदी वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन राज्याचे कृषि व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे.
   शेतमजूर किंवा शेतकरी बांधवांनी फवारणी करताना संरक्षक किटचा वापर करावा, प्रतिबंधात्मक उपाययोजना करून विषबाधा झाल्यास बाधीत व्यक्तीवर तातडीने प्रथमोपचार करावे. तसेच त्वरित शासकीय यंत्रणेला कळविण्यात यावे. फवारणी करताना शेतमुजरांना संरक्षक किट पुरवून त्यांना आवश्यक सूचना देण्याची जबाबदारी शेतमालकाची आहे. फवारणी करतेवेळी शेतमालकाने प्रथमोपचाराचे साहित्य शेतावर उपलब्ध करून द्यावे. पिकावर शक्यतो सकाळच्या सत्रात वारे नसतांना करावी. उष्ण व दमट, प्रखर उन्हामध्ये किटकनाशकाशी संपर्क आल्यास शरीरात विष भिनण्याची प्रक्रिया वेगाने होते. वारे वाहणाऱ्या दिशेने फवारणी करावी. फवारणी करतेवेळी जवळपास अन्य संबधित व्यक्ती अथवा जनावरे असणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, असेही  आवाहन कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे.
    ते पुढे म्हणाले, प्रोफेनोफॉस + सायपरमेथ्रीन यांचे मिश्रण, मोनोक्रोटोफॉस, डायफेन्युरॉन आदी जहाल घटक असल्यामुळे त्यांच्या फवारणीवेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कंपनीकडून प्राप्त झालेल्या माहिती पत्रकातील सुचनांचे काटेकोरपणे फवारणीवेळी पालन करावे. किटकनाशकांच्या पाण्यामध्ये मिश्रण तयार करताना कंपनीने दिलेल्या प्रमाणानुसारच मिश्रण तयार करावे. शेतमालकाने माणुसकी व सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून विषबाधेच्या घटनेची माहिती कृषि सहायक, पंचायत सिमती कृषि अधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन अंमलदार, आरोग्य अधिकारी, कृषि विकास अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी यांना तातडीने कळवावी.
  किटकनाशकांची फवारणी केल्यानंतर शिल्लक राहीलेले किटकनाशक व त्यांचे डब्बे, पॅकिंग बॉक्स आदी साहित्य काळजीपूर्वक नष्ट करावे अथवा सुरक्षीत ठिकाणी ठेवावेत. फवारणी करणाऱ्यांनी फवारणी पुर्ण झाल्यानंतर साबणाने हात व तोंड स्वच्छ धुतल्याशिवाय काहीही खावू अथवा पिवू नये. या सुचनांचे शेतकऱ्यांनी पालन करावे, असेही कृषि मंत्री यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
                                                        **********
माजी राष्ट्रपती स्व. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’
·       15 ऑक्टोंबर रोजी आयोजन
बुलडाणा, दि‍. ९- देशाचे माजी राष्ट्रपती स्व. एपीजे अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोंबर रोजी येणारा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृद्धींगत करण्याच्यादृष्टीने हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी, शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कामकाजाच्या वेळेमध्ये किमान अर्धा तास वाचनासाठी द्यावा. तरी 15 ऑक्टोंबर 2017 रोजी वाचन प्ररेणा दिनाचे आयोजन करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
                                         *****
बियाणे व कीटकनाशक उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांप्रति सामाजिक बांधिलकी दाखवावी
यवतमाळ जिल्ह्यात अप्रमाणित व शिफारस नसलेले किटकनाशक
पुरविणाऱ्या कंपनी आणि वितरकांवर फौजदारी गुन्हा
- कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर
 बुलडाणादि. 9 : यवतमाळ येथील कीटकनाशकाच्या विषबाधेच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे बीटी  बियाणे उत्पादक कंपन्या आणि कीटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधींची समवेत स्वतंत्र बैठका घेतल्या. विषबाधेच्या या घटनेमुळे शेतकऱ्यांना हकनाक आपला जीव गमवावा लागला असून शिफारस नसताना आणि गरज नसतानाही यवतमाळ सारख्या भागात घातक विषारी किटकनाशकांची विक्री झाली. यामुळे किटकनाशक कंपनी आणि वितरकावर कायद्यानुसार फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येत असून शासकीय यंत्रणेतील दोषींवर देखील कारवाई केली जाईल, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
     बियाणे आणि किटकनाशक उत्पादक कंपन्यांनी केवळ नफा कमविणे हा उद्देश न ठेवता शेतकऱ्यांप्रती सामाजिक बांधिलकी दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कृषिमंत्री आणि सचिवांनी कंपन्यांचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
     आपण उत्पादीत केलेल्या कीटकनाशकामुळे शेतकरी, शेतमजूर मोठ्या प्रमाणावर दवाखान्यात दाखल होताहेत याबाबत माहिती घेण्याचीही गरज भासली नाही? असा संतप्त सवाल कृषिमंत्र्यांनी यावेळी केला. फक्त आपला माल विकला गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करता शेतकऱ्यांशी समाजिक बांधिलकीतून संवाद साधत त्यांना कीटकनाशकांच्या वापराबाबत मार्गदर्शन करणेही तितकेच आवश्यक आहे. ज्या किटकनाशकामुळे शेतकरी बांधवांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची त्यांचे सांत्वन करण्याची आवश्यकता कंपनीला भासली नाही. फक्त व्यवसाय डोळ्यासमोर ठेवू नका समाजिक भान देखील जपले पाहिजे, अशा शब्दात श्री. फुंडकर यांनी कंपन्यांच्या प्रतिनिधींची कानउघाडणी केली.
    ज्या भागात शिफारस आणि आवश्यकता नसताना अप्रमाणित कीटकनाशकांची विक्री केली जाते ती तातडीने बंद झाली पाहिजे. वितरकाला आमिषे दाखवून चुकीची माहिती देऊन किटकनाशक विक्रीस भाग पाडले जाते. त्यामुळे शेतकऱ्याची हानी  होते. कृषि सेवा केंद्र, कृषी विभागातील कर्मचारी यांच्या संगनमताने अप्रमाणित कीटकनाशकांची विक्री केली जात असेल तर नुसता दंडात्मक नव्हे तर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल.
     गरज नसताना ज्या भागात गरजेपेक्षा जास्त कीटकनाशकांची विक्री झाली त्याची आता चौकशी करण्यात आहे. कीटकनाशक उत्पादक कंपन्यांनी वेळीच दखल घेऊन प्रशासनाशी संवाद साधला असता आरोग्ययंत्रणेला विषबाधेवर प्रतिकारक औषधाबाबत माहिती दिली गेली असती तर शेतकरी बांधवांचा जीव वाचवण्यात यश आले असते, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
    सप्टेंबरमध्ये बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांबरोबर झालेल्या बैठकीत प्रत्येक तालुक्यात बियाण्यांची माहिती, त्याचा वापर, कीटकनाशकांची फवारणी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रतिनिधी नेमणार होते मात्र अशा प्रकारची कुठलीही नियुक्ती बियाणे कंपन्यांकडून झाली नाही. बियाणे कंपन्यांनी किती ठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या याची माहिती शासनाला सादर करावी, असे निर्देश कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीत कृषिमंत्र्यांनी दिलेले निर्देश
·  कीटकनाशकांच्या किंमतींवर नियंत्रणासाठी कायदा करणारे, कीटकनाशक उत्पादक कंपन्यांच्या संघटनेने जाणिव जागृतीपर मेळावे आयोजित करावे, फवारणी करणाऱ्या मजुराची मोफत आरोग्य तपासणी करून त्याला सुरक्षा किट द्यावे व त्याबाबत त्याला मार्गदर्शन करावे, यवतमाळ जिल्ह्यातील 1400 गावांमधील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांना कीटकनाशक व त्यात वापरलेले रसायन व त्यावरील प्रतिकारक औषध याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे, ग्रामपंचायत, पंचायत समिती येथे फलक लावून फवारणीबाबत जाणीवजागृती करावे, जिल्हा शल्यचिकित्सकांना भेटून कीटकनाशकात वापरलेल्या मोल्युक्युल बाबत माहिती द्यावी, कंपन्यांनी राज्यभर जिल्हानिहाय जबाबदारी घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, बैठकीस कृषी आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, कीटकनाशक तसेत बीटीबियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये
संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील शशिकांत शंकर रोकडे या शेतकऱ्याचा डाळींब फवारणी करतांना मृत्यू झाल्याबाबतच चुकीच्या बातम्या काल काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. सदर वार्ताहराने कुठलीही खातरजमा न करता श्री. रोकडे यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले होते. मात्र श्री. रोकडे हे जिवंत असून काल त्यांच्याशी जिल्ह्याच्या कृषी यंत्रणेने संपर्क साधून विचारपूस केली. चुकीच्या वृत्तामुळे रोकडे कुटुंबियांना मनस्ताप सहन करावा लागला असून माध्यामांनी केवळ सनसनाटी बातमी पेक्षा संवेदनशीलतेने वृत्ताकंन करणे अपेक्षित होते. अशाप्रकारच्या  अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये असे आवाहन करीत श्री. रोकडे यांना दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा कृषिमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
                                                                      ***********
खामगांव येथे रोजगार मेळावा संपन्न
बुलडाणा, दि‍. ९- खामगांव येथील गो. से विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयात जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास व रोजगार मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. एस तळवणकर उपस्थित होते, तर मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अकोला येथील डी. एल ठाकरे उपस्थित होते. मेळाव्यात प्रास्ताविक सहायक संचालक जी.पी चिमणकर यांनी केले. मेळाव्यामध्ये लॉकसेफ सेक्युरीटी लि. औरंगाबाद, नवकिसान फर्टीलायझर्स जळगांव या नामांकित कंपन्यांचा सहभाग होता. सर्व कंपन्यांच प्रतिनिधी यांनी विद्यार्थ्यांना कंपनीची विस्तृत माहिती देवून त्यांच्यासमोर एक रोजगाराची संधी मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. कंपनी पदाच्या पात्रतेनुसार मुलाखत व शारिरीक परीक्षा घेवून यावेळी 67 मुले/मुली यांची प्राथमिक निवड करण्यात आली, असे सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्र यांनी कळविले आहे.
                                         ************
जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन
·       महा ई सेवा केंद्र, जनसुविधा केंद्र, आपले सरकार केंद्र येथे भरावे लागणार अर्ज
·       25 नोव्हेंबर 2017 अंतिम मुदत
बुलडाणा, दि‍. ९- शेगांव येथील नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा 10 फेब्रुवारी 2018 रोजी 11.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेचे अर्ज यावर्षीपासून ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहे. सदर अर्ज गावातील महाईसेवा केंद्र, आपले सरकार व जनसुविधा केंद्रांवर भरल्या जाणार आहे. अर्ज भरण्यासाची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2017 आहे.
   इयत्ता 5 वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांचे अर्ज पालकांनी त्वरित भरून द्यावे. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्याचा जन्‍म 1 मे 2005 ते 30 एप्रिल 2009 कालावधीतील असावा, विद्यार्थी इयत्ता तीसरी, चवथी व पाचवी मान्यता प्राप्त शाळेत सलग शिकत असावा, शिक्षणात खंड नसावा, विद्यार्थ्याचा फोटो , सही, पालकांची सही व शाळेचे प्रमाणपत्र, आधार कार्ड अर्ज भरताना सोबत आणावे. या अर्जासंदर्भात अधिक माहिती www.nvshq.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.
*****
मृतक आरोग्य सहायक प्रकाश अंभोरे यांच्या कुटूंबियांना विमा दाव्याची रक्कम प्रदान
बुलडाणा, दि‍. ९- जिल्हा हिवताप कार्यालयाच्या आस्थापनेवर प्राथमिक आरोग्य केंद्र, जलंब येथे आरोग्य सहायक पदावर कार्यरत असलेले प्रकाश अंभोरे यांचा 15 एप्रिल 2017 रोजी नांदुरा येथे जात असताना अपघाती मृत्यू झाला. राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेतंर्गत मृतक प्रकाश अंभोरे यांच्या कुटूंबियांना विमा दाव्याचे 10 लक्ष रूपयांच्या धनादेशाचे वितरण नुकतेच जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा हिवताप अधिकारी एस. बी चव्हाण आदी उपस्थित होते. राज्य शासनाने अपघात विमा योजनेतंर्गत शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यास अपघाती मृत्यू अथवा कायम अपंगत्व आल्यास, सदर कर्मचाऱ्यास अथवा त्याच्या नामनिर्देशीत वारसांना आर्थिक स्वरूपात  नुकसान भरपाई देण्यासाठी अत्यंत माफक वर्गणीमध्ये विमा संरक्षण देण्यात येते. ही योजना यशस्वीपणे रूजविण्यासाठी, कर्मचारी व त्यांच्या वारसांचे हित संवर्धनाकरीता शासन कटीबद्ध आहे, असे यावेळी जि.प अध्यक्षा श्रीमती तायडे यांनी सांगितले.  याप्रसंगी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                   ******
झेरॉक्स मशीन व मल्टीफंक्शनल प्रिंटर्सच्या खरेदीसाठी निवीदा आमंत्रित
बुलडाणा, दि‍. ९- जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागात झेरॉक्स मशीन व मल्टीफंक्शनल प्रिंटर्सच्या खरेदीकरीता निवीदा आमंत्रित करण्यात आली आहे. त्याबाबतच्या अटी व शर्तीबाबतचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आला आहे. पुरवठाधारकांनी निवीदा मसुदा प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसाचे आत कार्यालयीन वेळेत आपल्या सिलबंद निवीदा तहसीलदार, सामान्य प्रशासन यांचेकडे सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
                                                        ********
तांडा वस्ती सुधार योजनेतंर्गत जिल्हास्तरीय समितीसाठी प्रस्ताव आमंत्रित
बुलडाणा, दि‍. ९- वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजना सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येते. या योजनेनुसार लभाण/बंजारा व इतर विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग वस्त्यांचा विकास करण्यात येतो. या योजनेच्या प्रस्तावास मंजूरी देण्यासाठी बुलडाणा जिल्हा जिल्हास्तरीय समितीवर अध्यक्ष व सदस्य यांची निवड करण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रस्ताव मागविण्यात येत आहे.
      समितीच्या अध्यक्ष पदाकरीता शिक्षण कमीत कमी इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून सदस्य पदाकरीता इयत्ता 10 वी उत्तीर्ण असावे. प्रस्तावासोबत जातीचे दाखले जोडण्यात यावे. यापूर्वी प्रस्ताव सादर केलेल्या व्यक्तीही प्रस्ताव सादर करू शकतात.  परिपूर्ण प्रस्ताव लोकप्रतिनिधींच्या शिफारशीसह सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, अमरावती यांना सादर करावयाचे आहे. त्यानंतर सदर प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. तरी 16 ऑक्टोंबर 2017 पर्यंत सहायकआयुक्त, समाज कल्याण, चिखली रोड, बुलडाणा या कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यात यावे, असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.
                                   ********
विजा चमकत असताना घरातील विद्युत उपकरणे बंद ठेवावी
बुलडाणा, दि‍. ९- प्रादेशिक हवामान पुर्वानुमान केंद्र, नागपूर यांनी दिलेल्या सुचनेनुसार विदर्भात ढगांच्या गडगडाटासह अतिवृष्टी होवून विजा पडण्याची दाट शक्यता आहे. परतीच्या पावसात विजा पडण्याचे प्रमाण जास्त असल्याने जिवीतहानी व वित्तहानी होते.  ही हानी टाळण्यासाठी नागरिकांनी सजग रहावे. विजा चमकत असताना शक्यतोवर घराबाहेर पडू नये, घरातील विद्युत उपकरणे बंद ठेवावी, जनावरे यांना सुरक्षीत स्थळी ठेवावे. घराबाहेर असल्यास विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाजवळ उभे राहू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

                             ******

3 comments: