किटकनाशकांची फवारणी करताना काळजी घ्यावी
· दाटलेल्या पिकात एकेरी नोझल पंपाचा वापर करावा
· दाणेदार प्रकारची औषधी पाण्यात विरघळु नये
· कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा,
दि. ६- किड व रोग नियंत्रणासाठी रासायनिक
किटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. किटकनाशकांची फवारणी करताना
तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक आहे. फवारणी करणारी व्यक्ती पीक हंगामात दीर्घकाळ
किटकनाशकांची फवारणी केल्यामुळे सतत किटकनाशकांच्या संपर्कात येते. दाटलेल्या पिकांमध्ये
शेतमजुर दिवसभर फवारणी करीत असल्याचे दिसुन येते. अशा व्यक्तींमध्ये त्वचेची
ॲलर्जी, खाज, सतत डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ, चक्कर येणे, दृष्टी कमी होणे आदी
प्रकारची लक्षणे दिसण्याची शक्यता असते. किटकनाशक हाताळणी, साठवणूक व फवारणी
करताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
फवारणीचे द्रावण तयार करताना अशी घ्यावी
काळजी : दाटलेल्या पिकात फवारणी करताना एकेरी नोझल असलेला पंप वापरावा, नेहमी
स्वच्छ पाणी वापरावे, गढुळ पाणी अथवा साचलेल्या पाण्यात फवारणी करू नये, हातमोजे,
मास्क, टोपी, ॲप्रान, पुर्ण पँट, गॉगल हे संरक्षण साहीत्य वापरल्याशिवाय द्रावण
तयार करू नये, किटकनाशक शरीराच्या कुठल्याही भागावर पडणार नाही
याची काळजी घ्यावी, नाक, कान, डोळे व हात फवारणी होत असलेल्या औषधापासून संरक्षित
राहतील, याची संपूर्ण काळजी घ्यावी, किटकनाशक यांच्या लेबलवरील सुचना समजून
घ्याव्यात, गरजेनुसार व गरजे इतकेच द्रावण तयार करावे, दाणेदार प्रकारची औषधे तशीच
वापरावीत, त्यांना पाण्यात विरघळू नये, स्प्रे पंपाची टाकी भरताना औषधे सांडणार
नाही याची काळजी घ्यावी, फवारणी संपल्यावर आंघोळ करावी व कपडे स्वच्छ धुवावे, फवारणी
करताना खाणे,पिणे, धुम्रपान करणे, तंबाखू खाणे आदी प्रकार अजिबात करू नये, शिफारस
केलेल्या तिव्रतेच्या औषधांचा वापर करावा, अतितीव्रतेची औषधे वापरले म्हणजे किडरोग
नियंत्रणात होतो असे नाही किंबहुना त्यायोगे पर्यावरण व पिकांच्या स्वास्थ्यावर परीणाम
होवू शकतो.
हाताळणी करताना घ्यावयाची काळजी :
वाहतूक करताना कीटकनाशके
स्वतंत्र पिशवीत ठेवावी, बाजारहाट करताना अन्नपदार्थ, जनावरांची वैरण अथवा
खाद्यपदार्थ बरोबर घेवून जावू नये, मोठ्या प्रमाणावर किटकनाशकांचे पॅकींग डोक्यावर, खांद्यावर अथवा पाठीवर वाहुन
नेवू नये,
साठवणूक करताना घ्यावयाची काळजी : किटकनाशके
कुलुपबंद ठेवावी, लहान मुलांपासून दूर ठेवावी, सुर्यप्रकाश, पावसाचे पाणी व हवेची
झुळुक यांचे संपर्कात किटकनाशक येणार नाही याची काळजी घ्यावी, किटकनाशके व तणनाशके
यांची वेगवेगळी साठवणूक करावी, औषधे मुळ पॅकींगमधून इतर पॅकींगमध्ये ओतून घेवू
नये, औषधे त्यांचे मूळ पॅकींग अथवा वेस्टनात ठेवावी, राहत्या घरामध्ये किटकनाशके
ठेवू नये,
बाधित व्यक्तिची घ्यावयाची काळजी: विषबाधा
झाल्यास बाधीत व्यक्तीस अपघात स्थळापासून दूर न्यावे, त्याच्या अंगावरील कपडे बदलावे,
व्यक्तीला घाम येत असल्यास टॉवेलने पुसून काढावा, श्वासोच्छवास योग्य रितीने सुरू
आहे की नाही याची खात्री करावी, व्यक्तीला झटके येत असल्यास त्याच्या दातामध्ये मऊ
कापडाची छोटी गुंडाळी ठेवावी, बेशुद्धावस्था असल्यास काहीही खाऊ घालण्याचे प्रयत्न
करू नये, थंडी वाजत असल्यास पांघरून द्यावे, व्यक्तीला पिण्यासाठी दुध तसेच विडी,
सिगारेट व तंबाखु देवू नये, शरीर अथवा
बाधित भाग साबणाने ताबडतोब स्वच्छ करावा, असे
आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.
*******
मुद्रा बँक कर्ज वितरणाचे
उद्दिष्ट पूर्ण करावे
-
जिल्हाधिकारी
· मुद्रा बँक समन्वय समिती बैठक
बुलडाणा,
दि. ६ - मुद्रा योजनेतून शिशू, किशोर व तरूण या वयोगटात
कर्ज देण्यात येते. अनेक तरूण स्वयंरोजगार उभारण्यासाठी बँकाकडून कर्ज मिळण्यासाठी
धडपड करीत असतात. मुद्रा बँक योजना त्यांच्यासाठी अत्त्यंत लाभकारी आहे. या
योजनेतंर्गत राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी
सर्व बँकांनी काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या
आहेत.
मुद्रा बँक
योजना प्रचार प्रसार समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनात आज 6 ऑक्टोंबर
2017 रोजी करण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हा
नियोजन अधिकारी विवेक कुळकर्णी, कौशल्य विकास व रोजगार विभागाचे सहायक संचालक
श्री. चिमणकर, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुभाष बोंदाडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक
प्रभाकर श्रोते आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुद्रा बँक योजनेचा मोठ्या
प्रमाणावर प्रचार-प्रसार करण्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, मुद्रा योजनेतून युवकांनी
स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळवावे. बँकांनी होतकरू तरूणांना मुद्रा योजनेतून कर्ज वितरणाचे
प्रकरणे मंजूर करावे. तसेच तरूण गटातील प्रकरणांनाही मोठ्या प्रमाणावर मंजूरात
द्यावी. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी यांनी मुद्रा योजनेची माहिती दिली.
********
जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची ‘आएसओ’ भरारी...!
· 21 पशुवैद्यकीय
दवाखान्यांना आएसओ प्रमाणपत्र
· मोताळा
तालुक्यातील सर्व दवाखाने आएसओ
बुलडाणा,
दि. ६ - कामाचा दर्जा हा कुठल्याही आस्थापना अथवा विभागाचे नाव लौकीकास
नेत असतो. त्यामुळे यंत्रणेमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांची जबाबदारी
निश्चितच वाढत असते. दर्जा उच्च असला म्हणजे, प्रशासनाची कामकाजाची गती व विभागाची
प्रतिमा चांगली बनते. पशुसंवर्धन विभाग.. हा शेतकरी, पशुपालक व ग्रामीण भागातील
नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असलेला विभाग. या विभागातील योजनांचा संबंध
प्रत्यक्षरित्या शेतकरी व पशुपालक यांच्या कल्याणाकरीता महत्वाच्या असतात. पशुसंवर्धन
विभागाचे कार्य पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 1 व श्रेणी 2 या माध्यमातून चालत असते.
जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाचे कार्य गतीमान असून या विभागाने ‘आएसओ’ भरारी घेतली
आहे.
जिल्ह्यात
श्रेणी 1 मधील दवाखान्यांमध्ये मोताळा, तपावन ता. मोताळा, पिंपळगांव देवी ता.
मोताळा, धामणगांव बढे ता. मोताळा, दे.राजा, पाडळी ता. बुलडाणा, किन्होळा ता.
चिखली, किनगांव राजा ता. सिं.राजा यांचा समावेश आहे. अशा एकूण 7 दवाखान्यांना कामाचा
दर्जा, औषध वितरण, वैरण विकास, नागरिकांचे होणारे समाधान, कार्यतत्परता याबाबत ‘आएसओ’
दर्जा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे श्रेणी-2 दवाखान्यांमध्ये शेलगांव बाजार ता. मोताळा, शेलापूर ता. मोताळा,
तरोडा ता. मोताळा, राजूर ता. मोताळा, रोहीणखेड ता. मोताळा, एकलारा ता. चिखली, पेठ ता. चिखली, नांद्राकोळी ता. बुलडाणा, भरोसा ता. चिखली, उंद्री
ता. चिखली, किनगाव जट्टू ता. लोणार, शेंदुर्जन ता. सिं.राजा, मलकापूर पांग्रा ता.
सिं.राजा यांचा समावेश आहे. असे एकूण 14 दवाखाने आएसओ दर्जाप्राप्त केलेले आहेत.
जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्यांची ही आएसओ भरारी 21 पर्यंत जावून पोहोचली आहे.
जिल्ह्यात येत्या एक ते दोन महिन्यामध्ये आयएसओ
झालेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांची आणखी भर पडणार आहे. त्यामध्ये भादोला, म्हसला
बु, येळगांव ता. बुलडाणा, साखरखेर्डा ता. सिं.राजा, बोरजवळा, पिंपळगांव राजा ता.
खामगांव, देवधाबा ता. मलकापूर, नांदुरा, जानोरी ता. शेगांव, डोणगांव, दे.माळी ता.
मेहकर, पिं. काळे ता. जळगांव जामोद आणि वकाणा ता. संग्रामपूर आदींचा समावेश आहे.
आएसओ
प्राप्त पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये गुरांसाठी लसीकरण, सेवा हमी कायद्याद्वारे मिळणाऱ्या
सेवा, औषधांचे सुरळीत वितरण, नागरिकांचे समाधान, म्हणींचा वापर केलेला आढळतो. अशा
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पशुंचा आजारही निश्चितच लवकर बरा होतो. जिल्ह्यात संपूर्ण पशुवैद्यकीय दवाखाने आएसओ दर्जा प्राप्त
करण्याचा जि.प पशुसंवर्धन सभापती दिनकर देशमुख,
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त श्री. जायभाये, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पसरटे आदींसह
यंत्रणेचे प्रयत्न असणार आहेत.
******
शिकावू
उमेदवारी योजनेतंर्गत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
बुलडाणा,दि.६ -शिकावू उमेदवारी योजनेतंर्गत 106 वी अखिल भारतीय व्यवसाय
परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये 22 नोव्हेंबर ते
30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगांव येथे परीक्षा होणार
आहे. खामगांव येथील आयटीआय येथे परीक्षेचे वेळापत्रक सुचना फलकावरसुद्धा लावण्यात आलेले
आहे. या वेळापत्रकानुसार ट्रेड थेअरी, एम्प्लॉयमेंट स्कील आणि डब्ल्यूएससी या
विषयांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणा आहे. याबाबत सर्व शिकावू उमेदवारांनी नोंद
घ्यावी, असे अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्र, खामगांव
यांनी कळविले आहे.
*****
जिल्ह्यात जीवन प्राधिकरणाच्या 9
पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर
· 13 योजनांची
कामे मंजूर
· योजनांच्या
कामांत कुठलाही भ्रष्टाचार झाल्याची तक्रार नाही
बुलडाणा,दि.६ – महाराष्ट्र
जीवन प्राधिकरणाच्या बुलडाणा विभागातंर्गत विविध कार्यक्रमान्वये 13 पाणीपुरवठा योजनांची
कामे मंजूर आहे. त्यामध्ये ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची 10, तर नागरी पाणीपुरवठा योजनांची
3 कामे आहेत. त्यापैकी ग्रामीण 7 व नागरी
2 पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. या योजनांमध्ये कुठल्याही प्रकारच्या
भ्रष्टाचाराची तक्रार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयास
प्राप्त झालेली नाही. त्यामुळे जीवन प्राधिकरणाच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार व कार्यालयातून
चुकीची माहिती देण्याबाबत प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
कार्यालयाच्यावतीने करण्यात आला आहे.
जिल्ह्यात ग्रामीण, नागरी व पुर्णठेव
तत्त्वावरील पाणी पुरवठा, मलनिसा:रण योजनेची विविध कामे करण्यात येत आहे. राष्ट्रीय
ग्रामीण पेयजल कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील 6 ग्रामीण प्रादेशिक पाणी पुरवठा
योजना असून त्यामध्ये 186 गावांचा समावेश आहे. सुजल निर्मल अभियानातंर्गत 2 नागरी
पाणी पुरवठा योजना, जळगांव जामोद व दे. राजा या पाणी पुरवठा योजनांची कामे प्रगती
पथावर आहेत. नगरोत्थान महाअभियानानुसार बुलडाणा शहर या नागरी पाणीपुरवठा योजनेचे
काम प्रगतीपथावर आहेत. पुर्ण ठेव तत्त्वावरील कामांमध्ये राहेरा पुनर्वसन पाणी
पुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.
जलस्वराज्य टप्पा दोनमध्ये तीन ग्रामीण पाणी
पुरवठा प्रस्तावित आहेत. यामध्ये एकूण 4 गावांचा समावेश आहे. मुख्यमंत्री ग्रामीण
पेयजल कार्यक्रमतंर्गत उंद्री प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पुनरूज्जीवन करण्याचे
काम प्रस्तावित आहे. जळगाव जामोद शहर वप 140 गावांची पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत
होत आहे. यामध्ये 11 एप्रिल 2017 पासून 32
गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल
कार्यक्रमानुसार उंद्री, हरणी, वैरागड, किन्ही सवडत, तोरणवाडा, ढासाळा, टाकरखेड
हेलगा ता. चिखली या गावांसाठी पा्रदेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात येणार
आहे, कार्यकारी अभियंता गजानन रबडे यांनी कळविले आहे.
******
राष्ट्रीय
ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या 685 योजनांची कामे पूर्ण
· सन 2016-17
मध्ये पाणी पट्टीची वसुली 68 टक्के
- जिल्हा परिषद मार्फत 13 प्रादेशिक
पाणी पुरवठा योजनांचे कार्यान्वयन
बुलडाणा,दि.६ - जिल्ह्यात
एकूण 1360 गावे, वाड्या, वस्त्या आहेत. शासनाने मागणी आधारीत लोकसहभागाचे धोरण स्वीकारल्यानंतर
नळ पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी ग्रामसभेद्वारे
निवडलेल्या पाणी पुरवठा व स्वच्छता समितीद्वारे करण्यात येते. तसेच 100 टक्के देखभाल
दुरूस्तीची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपविण्यात आलेली आहे. सन 2005 पासून जलस्वराज्य
1, भारत निर्माण कार्यक्रम, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम अंतर्गत 756 पाणी पुरवठा योजनांची
कामे हाती घेण्यात आली आहे. त्यापैकी 685 कामे पुर्ण करण्यात आली आहेत. सदर
कामांची अंदाजपत्रकीय किंमत 480.64 कोटी रूपये असून झालेला खर्च साधारणत: 394.63 कोटी
रूपये आहे. त्यामुळे या योजनांच्या कामांमध्ये 2000 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा
आरोप निराधार आहे, असा खुलासा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि.प
बुलडाणा यांनी केला आहे.
जिल्ह्यात
सन 2016-17 ची पाणीपट्टी वसूली 68 टक्के आहे. या वसूलीचा अर्थ असा की गावांना पाणी
पुरवठा योजनेद्वारा शुद्ध पाणी मिळत असल्यामुळे पाणीपट्टीची वसूली गावकरी देत आहेत.
त्यामुळे जिल्हाभर नळपाणी पुरवठा योजनेमार्फत पिण्याच्या पाण्याचा कडकडीत ठणठणाट
हा आरोपसुद्धा निराधार आहे. तसेच जिल्हा परीषद मार्फत 13 पा्रदेशिक पाणी पुरवठा योजना
चालविण्यात येतात. यापैकी 12 प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा पाणीपुरवठा सुरू आहे. बंद
असलेल्या उंद्री प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पुनरूज्जीवनाचे काम मुख्यमंत्री
पेयजल योजनेतंर्गत प्रस्तावित आहे. त्यामुळे सामुदायिक नळ योजना पुर्णपणे बंद आहे,
हा आरोप चुकीचा आहे.
आजपर्यंत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे एकूण
82 तक्रारी प्राप्त असून चौकशीअंती 22 योजनांमध्ये वसुल पात्र रक्कम 38.51 लक्ष
रूपये एवढी आहे. यापैकी 4 गावांच्या कामात समितीकडून त्रुटी पुर्तता करून घेण्यात आलेली
आहे. तसेच 9 गावातील योजनांची रूपये 6.85 लक्ष रक्कम संबंधीतांकडून वसूल करण्यात आलेली
आहे व 6 गावांच्या कामातील वसुलीची कार्यवाही सुरू आहे. त्याचप्रमाणे तीन गावातील
योजनेबाबत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेले असून प्रकरण न्यापप्रविष्ट आहे. यामध्ये
11.70 लक्ष रूपयांची वसूली प्रलंबित आहे. त्यामुळे याबाबत केलेले सर्व आरोप निराधार आहेत,
असे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा यांनी कळविले आहे.
*********
जिल्ह्यात
आज ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान
· सरपंच
पदासाठी 257 ग्रामपंचायतीमध्ये, सदस्य पदासाठी 251 ग्रामपंचायतीमध्ये मतदान
· मतदानासाठी
निवडणूक होत असलेल्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर
बुलडाणा,दि.६ – जिल्ह्यामध्ये
उद्या 7 ऑक्टोंबर 2017 रोजी सरपंच पदाकरीता 257 आणि ग्रामपंचायत सदस्य पदाकरीता
251 ग्रामपंचायतीमध्ये मतदान होत आहे. जिल्ह्यात एकूण 279 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक
निवडणूका होत आहे. यावेळेस सरपंच प्रत्यक्ष मतदारांमधून निवडल्या जाणार आहे. सरपंच
पदाकरीता एकही वैध नामनिर्देशन प्राप्त न झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या 5 असून 17
ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध सरपंच निवडून आलेले आहेत. त्यामुळे 257
ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाकरीता निवडणूक
होत आहे. तर 251 ग्रा.पं मध्ये सदस्यांकरीता मतदान पार पडणार आहे.
या निवडणूकांमध्ये मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी शासनाच्या
परिपत्रकानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी
यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही निवडणूकीच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment