अल्पसंख्याक
बहुल शासनमान्य शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना जाहीर
·
18 सप्टेंबर 2017 पर्यंत अर्ज सादर करावे
बुलडाणा,दि. 31 : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून
अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ
महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण व अपंग शाळा यांना पायाभूत सोयी-सुविधांसाठी
अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे. या अनुदान योजनेतंर्गत कमाल 2 रूपये लाख अनुदान
उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल खाजगी शासन मान्यताप्राप्त इच्छुक
शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण
संस्था, अपंग शाळा व न.प शाळा यांनी शासननिर्णयामध्ये नमूद कागदपत्रांची पुर्तता
करून परिपूर्ण अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे 18 सप्टेंबर 2017 पर्यंत
सादर करावे.
योजनेच्या लाभासाठी शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व न.प शाळांमध्ये
अल्पसंख्याक समाजाचे (मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख व पारशी) मिळून किमान 70
टक्के विद्यार्थी शिकत असावे. तसेच शासन मान्यताप्राप्त अपंग शाळांमध्ये किमान 50
टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. या योजनेतंर्गत शाळेच्या
इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, शुद्ध पेयजलाची व्यवस्था करणे, ग्रंथालय अद्यावत
करणे, प्रयोगशाळा उभारणे किंवा अद्ययावत करणे, संगणक कक्ष उभारणे किंवा अद्ययावत
करणे, प्रसाधन गृह/स्वच्छतागृह उभारणे किंवा डागडुजी करणे, शैक्षणिक कार्यासाठी
आवश्यक फर्निचर घेणे, वर्ग खोल्यांमध्ये आवश्यकतेनुसार पंख्यांची व्यवस्था करणे,
इन्व्हर्टरची सुविधा निर्माण करणे, अध्यापनाची साधने एलसीडी प्रोजेक्टर किंवा
विविध सॉफ्टवेअरची खरेदी, इंग्रजी भाषा लॅब आणि संगणक हार्डवेअर / सॉफ्टवेअर खरेदी
करण्यासाठी अनुदान देय असणार आहे. तरी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.
**********
शेंदरी
बोंड अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन करावे
बुलडाणा,दि. 31 : शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव मलकापूर,
मोताळा तालुक्यांमध्ये दिसून येत आहे. शेंदरी बोंडअळी सुरूवातीला पाते, कळ्या,
फुलांवर उपजिविका करते. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळी
सारख्या दिसतात. अशा कळ्यांना डोमकळ्या म्हणतात. प्रादुर्भावग्रस्त पाते व बोंडे
गळुन पडतात किंवा परिपक्व न होताच फुटतात. अळी बोंडातील बिया खात त्याचबरोबर रूई कातरून
नुकसान करतात. त्यामुळे रूईची प्रत खालावते व सरकीतील तेलाचे प्रमाणपही कमी होते. याकिडीच्या
नियंत्रणाकरीता एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
किडीच्या व्यवस्थापनाकरीता कपाशीच्या सभोवती बिगर बी.टी
कपाशीची लागवड करावी. नैसर्गिक मित्र किटकांचे कपाशीमध्ये संवर्धन होण्यासाठी मका,
चवळी, उडीद, मुंग, झेंडू व एरंडी या मिश्र सापळा पिकांची एक ओळ लावावी. माती
परीक्षणाच्या आधारावर खतांच्या मात्रेच्या अवलंब करावा, नत्र खताचा जास्त वापर
झाल्यास अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, डिसेंबर/जानेवारी दरम्यान कपाशीचे पीक
पुर्णपणे काढून टाकावे व पुढे खोडवा घेवू नये, कपाशीच्या शेतात पक्षांना बसण्यासाठी
हेक्टर किमान 10 पक्षी थांबे उभे करावे म्हणजे पक्षी त्यावर बसून शेतातील अळ्या
टिपुन खातील, कापूस मिल व व्यापार संकुलाच्या ठिकाणी जेथे कपाशीचा वापर होतो, अशा
ठिकाणी प्रकाश सापळे लावावेत. तसेच कापसाच्या शेतात ऑक्टोंबर पासून पुढे हेक्टरी 4
ते 5 कामगंध सापळे लावावेत व दोन सापळ्यांमध्ये अंतर 50 मीटर ठेवावे, सापळ्यात
अडकलेले पतंग वेळच्या वेळी नष्ट करावेत. शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच
5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी अथवा ॲझेडिरेक्टीन 10 हजार पीपीएम 1 मि.ली प्रती
लिटर किंवा 1500 पीपीएम 1 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे उपविभागीय
कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी कळविले आहे.
********
पोर्टलवर
गाव, बँक शाखेचे नाव नसल्यास
जिल्हा
उपनिबंधक कार्यालयास कळवावे
बुलडाणा,दि. 31 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत शेतकरी
बांधव, केंद्र चालक कर्जमाफीचे अर्ज ऑनलाईन सादर करीत आहे. मात्र ज्या गावांचे, बँक
शाखांचे, विकास संस्थांचे नाव संबंधित पोर्टलवर दिसत नसतील त्याबाबत ddr_bud@rediffmail.com या ईमेल आयडीवर आणि
9923049253 , 9822744607 क्रमांकावर कळविण्यात यावे. त्याचप्रमाणे जिल्हा उपनिबंधक
कार्यालयात माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले
आहे.
अशाप्रकारे पोर्टलवर नसलेली नावे कळविल्यास जेणेकरून
त्यांची नावे पोर्टलवर उपलब्ध करण्यासाठी आवश्यक कारवाई करता येईल. तरी अशी नावे
तात्काळ उपरोक्त मोबाईल क्रमांकावर व मेलवर द्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले
आहे.
***********
Comments
Post a Comment