Friday, 11 August 2017

शासकीय अध्यापक महाविद्यालयातील बंद पडलेल्या एम.एड अभ्यासक्रमांचे पुनरूज्जीवन

     बुलडाणा, दि.11: येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात शैक्षणिक सत्र 2017-18 पासून एम.एड अभ्यासक्रमाला एनसीटीई व संतगाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांनी प्रथम वर्षाला एकूण 50 विद्यार्थी प्रवेशित करण्यासाठी शिफारस केलेली आहे. त्यामुळे 2014 मध्ये बंद पडलेल्या एम.एड अभ्यासक्रमाचे पुनरूज्जीवन झाले आहे. या अभ्यासक्रमाला पुनरूज्जीवीत करून सर्व प्राधिकरणाच्या मान्यता प्राप्त करून बुलडाणा शहरातील व जिल्ह्यातील शिक्षणशास्त्र पदव्युत्तर पदवी पुर्ण करण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांना ही महत्वपूर्ण संधी आहे. एम.एड अभ्यासक्रम सुरू करण्याचे यश महाविद्यालयाचे प्राचार्य  तथा उच्च शिक्षण विभागाचे माजी संचालक, बुलडाणा जिल्ह्याचे सुपूत्र डॉ. पी. आर गायकवाड यांच्यामुळे प्राप्त झाले आहे.
  तरी एम.एड प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व सोयींनी युक्त व तज्ज्ञ अनुभवी प्राध्यापक सुसज्ज ग्रंथालय, आदी सोयींनी युक्त अशा नॅक ‘अ’ दर्जा प्रमाणित केलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पसंतीक्रम भरताना कॉलेज कोड क्रमांक 10211001 यावर प्रथम पसंती दर्शवावी. तसेच या महाविद्यालयात प्रवेशित व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. पी. आर गायकवाड यांनी केले आहे. या विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून डॉ. रोहीणी तडस यांच्या 9403084660 क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात येत आहे.
                                                                        ******
डीएलएडच्या प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने
·        www.mscert.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे
·        शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी 12 ते 16 ऑगस्ट  दरम्यान विशेष फेरी
बुलडाणा, दि‍.11 -  शैक्षणिक वर्ष 2017-18 साठी डी.एल.एड प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण पाच फेऱ्या घेण्यात आल्या. तथापि अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेश देण्यात येईल.  इच्छूक विद्यार्थी प्राधिकरण, पुणे यांच्या www.mscert.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात.
    या प्रवेशाची शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून खुल्या संवर्गासाठी 49.5 व मागासवर्गीय संवर्गाकरीता 44.5 टक्के गुण असावे. प्रवेश अर्ज 12 ते 16 ऑगस्ट 2017 दरम्यान भरल्या जाणार आहे. पडताळणी केंद्रावर मूळ कागदपत्रे 12 ते 17 ऑगस्ट 2017 दरम्यान पडताळणी करून देण्यात येणार आहे. प्रवेश  अर्ज शुल्क खुल्या संवर्गासाठी 200 रूपये व मागासवर्गीय संवर्गाकरीता 100 रूपये ऑनलाईन भरावयाचे आहेत.
   यापूर्वी अर्ज भरून ज्यांनी ॲप्रोव घेतला आहे. परंतु प्रवेश घेतला नाही, असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरूस्तीमध्ये आहे. तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेण्यास इच्छूक असलेले विद्यार्थी अर्ज पुर्ण भरू शकतात. पडताळणी केंद्रावर अर्ज ऑनलाईन ॲप्रोव्ह केल्याशिवाय उमेदवाराचा प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याने स्वत:च्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाच्या अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करून लगेचच प्रवेशपत्र स्वत:च्या इमेल/लॉगीनमधूनच काढून घ्यावे. तसेच ही प्रत घेवून चार दिवसाच्या आत महाविद्यालयात प्रवेश घ्यावा. यानंतर प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिल्या जाणार नाही. उमेदवारांना प्रवेश अर्ज भरतांना तांत्रिक अडचणी आल्यास त्यांनी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, चिखली रोड, बुलडाणा येथे व 8421003146 क्रमांकावर संपर्क साधाव, असे प्राचार्य शिवशंकर मोरे यांनी कळविले आहे.
                                                                        *****             




स्पर्धा परीक्षेतील उज्ज्वल यशासाठी उर्दू लोकराज्य उपयुक्त
-         प्राचार्य जावेद इस्माईल
·        उर्दू माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात उर्दू लोकराज्य विद्यार्थी वाचक मेळावा
·        लोकराज्यमुळे विविध शासकीय योजनांची माहिती मिळते
बुलडाणा, दि‍.11 -  सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या युगामध्ये स्पर्धेत आपले स्थान घट्ट करण्यासाठी वाचन आवश्यक आहे. विद्यार्थी दशेतच वाचनाची सवय लागावी. वाचनातूनच भविष्य घडत असते. त्यामुळे करिअरच्या वाटा शोधणे सोयीचे जाते.  अशाचप्रकारे स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने प्रकाशित होणारे उर्दू लोकराज्य उपयुक्त आहे, असे प्रतिपादन  उर्दू माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जावेद इस्माईल यांनी केले.
   उर्दू माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, जोहर नगर, बुलडाणा येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने उर्दू वाचक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माहिती सहायक निलेश तायडे, उपप्राचार्य सय्यद दाऊद, शिक्षक रईस काझी, जुबेर काझी आदी उपस्थित होते.
  सर्वप्रथम निलेश तायडे यांनी लोकराज्यविषयी माहिती दिली. ते म्हणाले, उर्दू भाषेमध्ये प्रकाशित होणाऱ्या मासिकांमध्ये लोकराज्यचा दर्जा उत्तम आहे. त्याचप्रमाणे लोकराज्यमधून मिळणारा कंटेन्टही तेवढाच उपयुक्त आहे. विविध शासनाच्या विभागांच्या योजना उर्दू भाषेमध्ये मिळत असल्यामुळे लोकराज्यचा प्रतयेक अंक संग्राह्य आहे. आपल्या नियमित पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमासोबतच लोकराज्यच्या वाचनाने अभ्यासाला चालू घडामोडींचे पूरक ज्ञान मिळते. प्रत्येक विद्यार्थ्याने लोकराज्यचा अंक सुरू करून स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आपल्या सजज करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
   यावेळी शिक्षक जुबेर काझी, रईस काझी यांनी विद्यार्थ्यांना लोकराज्यचे महत्व पटवून देत वाचक होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी निलेश तायडे यांनी आभार मानले.
                                                                        *************
निवडणूक विषयक कागदपत्रांची छपाई
करण्याकरीता निविदा आमंत्रित
बुलडाणा, दि. 11 : जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदार संघाकरिता निवडणूक विषयक कागदपत्रांची छपाई करण्याकरीता ई-निविदा प्रक्रिया प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर निविदेत पंजीकृत बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्थांना / लोकसेवा केंद्राना अनामत रक्कमेत सुट देण्यात आलेली नव्हती.  तरी निविदेत पंजीकृत बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्था / लोकसेवा केंद्रांना अनामत रक्कमेत सुट देण्यात आलेली आहे. तरी निवीदा सुचना व सुधारीत कार्यक्रम  http://mahatenders.gov.in व www.buldhana.nic.in या संकेतस्थळावर व जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा यांच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेने कळविले आहे.
******
आदिवासी उपयोजनेतंर्गत दुधाळ जनावरांचा लाभ मिळण्यासाठी अर्ज आमंत्रित
  • 14 ऑगस्ट 2017 पासून अर्ज स्वीकारण्यात येणार
बुलडाणा, दि. 11 -  जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील कुटूंबाकरिता ओटीएसपी योजनेनुसार  75 टक्के अनुदानावर 15 लाभार्थ्यांकरीता दुधाळ जनावरे व शेळी गट वाटप करावयाचा आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रीया पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू झालेली आहे. अर्ज 14 ऑगस्ट 2017 पासून पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात स्वीकारण्यात येणार आहे. अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 13 सप्टेंबर 2017 आहे.  अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध आहे. या अर्जाच्या व्यतिरिक्त कुठल्याही दुसऱ्या नमुन्यातील अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. मागील वर्षी ज्या लाभार्थ्याने अर्ज सादर केलेले आहेत, अशा लाभार्थ्यांनी नव्याने अर्ज सादर करावे.
   दुधाळ जनावरे / शेळी गटासाठी एका कुटूंबातील केवळ एकाच लाभार्थ्यांनी अर्ज करावा, अर्जदार हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील व दारिद्र्य रेषेखालील असावा, अर्जदाराने किंवा त्याच्या कुटूंबातील सदस्याने सदर योजनेचा याआधी लाभ घेतलेला नसावा, ही योजना 75 टक्के शासकीय अनुदान व 25 टक्के बँकेचे अर्थसहाय्य अशा स्वरूपाची असल्यामुळे अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा, अर्जदारास 1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य नसावे याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला अर्जासोबत जोडावा, नुकताच काढलेला पासपोर्ट फोटो अर्जासोबत जोडावा.  
  सदर योजनेचा किंवा तत्सम योजनेचा लाभ घेतला असल्यास अर्ज करू नये. या योजनेमध्ये 3 टक्के अपंग व 30 टक्के महिला अर्जदारांचा समावेश असावा. योजनेच्या लाभासाठी नागरिकांनी कोणत्याही दलालामार्फत किंवा खाजगी व्यक्तीमार्फत संपर्क साधण्याची आवश्यकता नाही. लाभार्थींना या योजनेचा लाभ सन 2017-18 च्या प्राप्त तरतुदीस अधिन राहून देण्यात येईल. तसेच निवड झाल्यापासून ते लाभ मिळाल्यानंतर कोणत्याही क्षणी लाभार्थींच्या अर्जामध्ये किंवा लाभानंतर त्रुटी, गैर प्रकार आढळल्यास निवड रद्द करण्यात येईल. योजनेची आर्थिक वसूली करण्यात येईल. त्याअनुषंगाने योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. तरी या योजनेचा लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती दिनकर देशमुख व पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस.सी पसरटे यांनी केले आहे.
*****
अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता तीन दिवशीय पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षणाचे आयोजन
  • 14 ऑगस्ट 2017 पासून अर्ज स्वीकारण्यात येणार
  • अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 11 -  जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक तीन दिवशीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रीया पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू झालेली आहे. अर्ज 14 ऑगस्ट 2017 पासून पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात स्वीकारण्यात येणार आहे. अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 13 सप्टेंबर 2017 आहे.  अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध आहे. या अर्जाच्या व्यतिरिक्त कुठल्याही दुसऱ्या नमुन्यातील अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
     अर्जदार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील व दारिद्र्य रेषेखालील असावा, अर्जदाराकडे दुधाळ जनावरे, शेळ्या व कोंबड्या असणे आवश्यक आहे, अर्जदारास 1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य नसावे याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला अर्जासोबत जोडावा, नुकताच काढलेला पासपोर्ट फोटो अर्जासोबत जोडावा.  
     या योजनेमध्ये 3 टक्के अपंग व 30 टक्के महिला अर्जदारांचा समावेश असावा. योजनेच्या लाभासाठी नागरिकांनी कोणत्याही दलालामार्फत किंवा खाजगी व्यक्तीमार्फत संपर्क साधण्याची आवश्यकता नाही. लाभार्थींना या योजनेचा लाभ सन 2017-18 च्या प्राप्त तरतुदीस अधिन राहून देण्यात येईल. तरी या योजनेचा लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती दिनकर देशमुख व पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस.सी पसरटे यांनी केले आहे.
*****
राष्ट्रध्वजाचा राखा सन्मान.. वाढेल देशाचा अभिमान !...
·         हँण्ड स्पून राष्ट्रध्वज पायदळी तुडवू नका
 बुलडाणा,दि.11 : दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट व अन्य राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिक प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. सदर कार्यक्रम पार पाडल्यानंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लास्टीकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले दिसतात, असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो.                               
    राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबतच्या तरतुदी आहेत. राष्ट्रध्वज हा हँण्ड स्पून आणि हस्तनिर्मित वूल, कॉटन, सिल्क आदीमध्ये असावा. राष्ट्रध्वजाचा आकार आयाताकृती, त्याची उंची व रुंदी 3:2 असावी. राष्ट्रध्वजाचा आकार 9 प्रकारात पुढीलप्रमाणे असायला पाहिजे. त्याचा आकार प्रकारानुसार लांबी व रुंदी दिली आहे. प्रकार 1 लांबी, रुंदी अनुक्रमे 6300 व 4200 मीटर, प्रकार 2 लांबी, रुंदी अनुक्रमे 3600 व 2400, प्रकार 3 लांबी, रुंदी अनुक्रमे 2700 व 1800, प्रकार 4 लांबी, रुंदी अनुक्रमे 1800 व 1200, प्रकार 5 मध्ये लांबी, रुंदी अनुक्रमे 1350 व 900, प्रकार 6 मध्ये लांबी, रुंदी अनुक्रमे 900 व 600, प्रकार 7 मध्ये लांबी, रुंदी अनुक्रमे 450 व 300, प्रकार 8 लांबी, रुंदी अनुक्रमे 225 व 150, प्रकार 9 लांबी, रुंदी अनुक्रमे 150 व 100 मीटर असावी. राष्ट्रध्वजाचा व्हीव्हीआयपी विमानासाठी आकार 450 बाय 100 मीटर, मोटार कारसाठी 225 बाय 150 मीटर आणि टेबलसाठी 150 बाय 100 मीटर असावा.
     भारतीय ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतूदीनुसार राष्ट्रध्वजाचा वापर करताना खराब झालेल्या, माती लागलेल्या ध्वजाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट व अन्य राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिक प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. याठिकाणी पायदळी तुडविलेले राष्ट्रध्वज गोळा करून तालुका व जिल्हा स्तरावर निर्मित करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहे. त्यांनी असे राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करावे. खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सुर्यास्तानंतर व सुर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक जाळून नष्ट करावे.हे करताना उपस्थितांनी उभे रहावे व जाळून पुर्णपणे नष्ट होईपर्यंत जागा सोडू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. 

                                                                                    *********

No comments:

Post a Comment