बळीराजाच्या कल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी
-
पालकमंत्री
पांडुरंग फुंडकर
- भारतीय
स्वातंत्र्याचा 70 वा वर्धापन दिन थाटात साजरा
- पालकमंत्री
यांच्याहस्ते ध्वजारोहण
- कृषी
सन्मान योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ
- जिल्ह्यातील
शेतकऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य अभियानातंर्गत सर्वाधिक लाभ
- कर्जमाफी
योजनेचे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज भरावे
बुलडाणा दि. 15 - राज्याच्या संपन्नतेमध्ये शेती
क्षेत्राचा वाटा बहुमोल आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखी व समाधानी असायला
पाहीजे. बळीराजाच्या कल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठल्याही संकटामध्ये शासन शेतकऱ्यांना
वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री
पांडुरंग फुंडकर यांनी आज दिली.
भारतीय स्वातंत्र्याचा 70 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय
सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय आवारात
आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधित करताना
पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार राहूल बोंद्रे,
जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार
धृपदराव सावळे, नगराध्यक्ष श्रीमती नजमुन्नीसा मो. सज्जाद, जि.प सभापती श्रीमती
श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी
एस. षण्मुखराज, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना आदींची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजना अंमलात आणून शासन शेतकऱ्यांच्या
कल्याणासाठी काम करत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, या योजनेनुसार दीड लाख
रूपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले आहे. या योजनेचा सर्वात जास्त लाभ बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला आहे. जिल्ह्यात दीड
लाखापर्यंत पीक कर्ज असलेल्या 1 लक्ष 70 हजार 850
शेतकऱ्यांच्या 913.27 कोटी रूपयांच्या कर्जाला माफी मिळाली
आहे. तसेच दीड लाखावर कर्ज असलेल्या 4 हजार 980 शेतकऱ्यांना 118.61 कोटी रूपयांची
कर्जमाफी एकरकमी भरणा केल्यानंतर मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी
शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने अर्ज भरावे. अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन
असून 31 ऑगस्ट 2017 पर्यंत अर्ज भरावे. राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा
देण्यासाठी हमीभावाने तुर खरेदीचा निर्णय घेतला. भाव स्थिरता आणि बाजार हस्तक्षेप
योजना अंमलात आणली. या योजनेतंर्गत जिल्ह्यात 13 खरेदी केंद्रावर 49 हजार 811
शेतकऱ्यांची एकुण 8. 89 लक्ष क्विंटल तुर खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 428.38
लक्ष रूपयांचे चुकारे जमा करण्यात आलेले आहे.
मोठ्या प्रमाणावर
संरक्षित सिंचन उपलब्ध करून देण्यासाठी शासन
महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान राबवित असल्याचे प्रतीपादीत करीत पालकमंत्री
श्री. फुंडकर म्हणाले, या अभियानातंर्गत जिल्हाभरात सन 2016-17 साठी
दुसऱ्या टप्प्यात 245 गावांची निवड करण्यात आली. या गावांच्या शिवारात जलसंधारण व
मृदसंधारणाची 4 हजार 908 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच 172 कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांमुळे 1.71 लक्ष टीसीएम पाणीसाठा
निर्माण झाला आहे. तसेच 7 हजार 241 हेक्टर क्षेत्रावर दोन वेळच्या संरक्षीत
सिंचनाची व 12 हजार 625 हेक्टर क्षेत्रावर एक वेळच्या संरक्षीत सिंचनाची सुविधा
उपलब्ध झाली आहे. शासनाने ठिबक व तुषार सिंचनाच्या संचावरील अनुदानही दिले आहे.
त्यामुळे या सिंचन पद्धतीला हातभार मिळणार आहे. जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत शेततळ्यासाठी पात्र
ठरलेल्या 6 हजार 836 अर्जांपैकी 3 हजार 982 शेततळ्यांना
कार्यारंभ आदेश दिले आहे. त्यापैकी 2098 शेततळी पुर्ण झालेली आहेत. तसेच जिल्ह्यात जलपूर्ती धडक सिंचन
विहीर योजनेतंर्गत 9 हजार 21 विहीरी सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 8 हजार 924
विहीरी पूर्ण झालेल्या आहेत.
ते पुढे म्हणाले, पिकांचा सर्वंकष विमा उतरविण्यासाठी
प्रधानमंत्री कृषि पिक विमा योजना अंमलात आहे. या योजनेत खरीप व रब्बी
हंगामातील सर्व पिकांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सन 2016-17 मध्ये खरीप
हंगामात 3.87 लक्ष शेतकऱ्यांनी 3.26 लक्ष हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा
उतरविला आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत सर्वांसाठी घर उपक्रम राबविण्यात येत
आहे. कुठल्याही बेघराला हक्काचा निवारा मिळाला पाहिजे, असा शासनाचा मानस आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागात या योजनेतून 7 हजार 83 घरकूलांचे कामे सुरू असून 2 हजार
720 घरकूलांना दुसरा हप्ता देण्यात आला आहे. जिल्ह्यात यासोबतच रमाई घरकूल व शबरी
घरकूल योजनाही राबविण्यात येत आहे. कृषि व संलग्न क्षेत्राला समृद्ध करणारा ‘समृद्धी
महामार्ग’ जिल्ह्यात 4 तालुक्यांच्या 49 गावांजवळून जात आहे. या महामार्गावर
जिल्ह्यात दोन ठिकाणी स्मार्ट शहरांची निर्मिती केल्या जाणार आहे. महामार्गामुळे
जिल्ह्यातील मेहकर, सिंदखेड राजा, लोणार व देऊळगांव राजा तालुक्यांसोबतच
संपूर्ण जिल्ह्याचा विकास होणार आहे.
जिल्ह्यात महात्मा
फुले जनआरोग्य अभियानातंर्गत गतवर्षी 24
हजार 519 रूग्णांना 10 रूग्णालयांच्या माध्यमातून लाभ देण्यात आला आहे. मराठवाडा व
विदर्भातील 14 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
त्यानुसार जिल्ह्याने या 14 जिल्ह्यांमध्ये 10 हजार 254 शेतकऱ्यांना लाभ देवून
अव्वल क्रमांक पटकाविला आहे. शासनाने
गतवर्षी राज्यात महाअवयवदान अभियान राबविले. यावर्षीसुद्धा सदर अभियान राबविण्यात
येणार आहे. या अभियानात सहभाग घेवून अवयवदान करण्याचे आवाहन याप्रसंगी पालकमंत्री
पांडुरंग फुंडकर यांनी केले.
ते
पुढे म्हणाले, पंचायत समिती मलकापूर व शेगांव हगणदारीमुक्त झाली असून 285
ग्रामपंचायती हगणदारीमुक्त ठरल्या आहेत. जिल्ह्यात 3.62 लक्ष कुटूंबांपैकी 2.36
लक्ष कुटूंबाकडे शौचालय आहेत. जिल्ह्याने यामध्ये 65.19 टक्के काम केले आहे. उर्वरित
1.26 लक्ष कुटूंबांमध्ये शौचालय बांधकाम करण्याचे कार्य प्रशासनाकडून सुरू आहे. नागरिकांना जलद व तात्काळ शासनाच्या सेवा
मिळाव्यात यासाठी ऑनलाईन सेवा देण्यात येत आहे. त्यामध्ये 7/12 चा सुद्धा समावेश
आहे. बिनचूक ऑनलाईन 7/12 असण्याचे जिल्ह्याचे काम 99.61 टक्के असून यामध्ये जिल्हा
राज्यात पाचवा आहे. जिल्ह्यात 5.40 लक्ष 7/12 ऑनलाईन बिनचूक करण्यात आलेले
आहे. तलाठी एस.पी श्रीनाथ, व्हि.पी मोरे,
किशोर कऱ्हाळे, व्हि. एस शिंदे व विनोद चिंचोले यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.
त्यांचे अभिनंदन याप्रसंगी पालकमंत्री यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन नरेंद्र
लांजेवार यांनी केले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, समाज भूषण
पुरस्कार प्राप्त, विविध विभागांचे
अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
होती.
विविध पुरस्कारांचे वितरण व सन्मान
कार्यक्रमादरम्यान
पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड व बिज संकलन केलेल्या विद्यार्थ्यांचा
प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. त्यामध्ये पंचतारांकित शाळा पुरस्कार प्रबोधन
विद्यालय, जिजामाता नगर यांना देण्यात आला. तसेच विद्यार्थी कु. पुजा भावलाल
शिंगणे, ओम अनिल इंगळे, शरद गजानन पाटील यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. त्याचप्रमाणे
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता 10 वीमध्ये राष्ट्रीय स्तरावर शिष्यवृत्तीस
पात्र ठरलेल्या शेगांव येथील साक्षी विलासराव मिरगे, गुंजन अतुल गट्टाणी, जळगांव
जामोद यांचा सत्कार करण्यात आला. तर इयत्ता 8 वीतील स्वराज नारायण फाळके, मलकापूर यांचा सन्मान
करण्यात आला. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 2016-17 मध्ये हगणदारीमुक्त
झालेल्या पंचायत समिती मलकापूरचे सभापती श्रीमती संगीता तायडे, उपसभापती श्रीमती
सीमा बगाडे, गटविकास अधिकारी अशोक तायडे, शेगांवचे सभापती विठ्ठलराव पाटील, गटविकास
अधिकारी श्रीकृष्ण सावळे यांचा सन्मान करण्यात आला. संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानात
विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त ग्रामपंचायत पांगरखेड, ता. मेहकर व तिसरा
क्रमांक प्राप्त अजिसपूर, ता. बुलडाणा यांचा गौरव करण्यात आला. विभागीय स्तरावर सन
2016-17 महाराजस्व अभियानातंर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे
प्रकाशन यावेळी करण्यात आले.
लोणारचे तहसिलदार
सुरेश कव्हळे यांचा उत्कृष्ट तहसीलदार म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव करण्यात
आला. पोलीस दलाचे दैनंदिन कामकाज सांभाळून विनामूल्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर
चालविणारे दिगंबर कन्हैयालाल कपाटे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हा उद्योग
केंद्राकडून दे.राजा येथील होमीओपॅथीक औषधीचे उत्पादन करणारे नंदकिशोर श्रीनिवास
देशपांडे, चिखली येथील ॲटो स्पेअर पार्टचे उत्पादक परवेज गुलाम गौस देशमुख यांना
अनुक्रमे प्रथम व द्वितीय पुरस्कार देण्यात आला. सर्वधर्मीय सामुहिक विवाह चळवळ राबविणारे शिवाजीराव नवघरे,
मंगरूळ नवघरे, ता. चिखली यांचा सन्मान करण्यात आला.
जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी
वेतनाचा धनादेश कर्जमाफी निधीला दिला
स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा
उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी आपल्या एका महिन्याचे वेतन 45 हजार 365 रूपयांचा
धनादेश छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेला दिला. सदर धनादेश याप्रसंगी
पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे सुपूर्द केला. यामागे शेतकऱ्यांच्या ऋणातून
मुक्त होण्यासाठी संधी मिळाल्याची प्रतिक्रया त्यांनी दिली.
****************
No comments:
Post a Comment