सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता तपासून बीजप्रक्रिया करावी

 सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता तपासून बीजप्रक्रिया करावी

बुलडाणा, (जिमाका) दि.17: सोयाबीन हे स्वराग सिंचींत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरतांना त्या बियाण्याची उगवणक्षमता तपासून वापर करावा. सर्वप्रथम 100 दाणे ओल्या गोणपाटावर रूजविण्यास ठेवावे. सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता 70 टक्के असल्यास बियाणे पेरणीसाठी वापरावे. तसेच सोयाबीन बियाण्यावर जैविक बिजप्रक्रिया करावी. त्यासाठी 25 ग्रॅम किंवा 6 मि.ली रायझोबीयम 25 ग्रॅम किंवा 6 मि.ली पी.एस.बी व ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम किंवा 6 मि.ली वापरावे. पेरणीपुर्वी दोन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत सुकवून पेरणी करावी. त्याचप्रमाणे रासायनिक बिजप्रक्रिया ही पेरणीपूर्वी दोन महिन्या अगोदर किंवा एक दिवस पेरणी पूर्वी कार्बोक्झीन 37.5 टक्के 3 ग्रॅम अधिक थायरम 3 ग्रॅम / प्रति किलो बियाण्यास लावावे. खोडमाशीकरीता थायोमेथोक्झाम 30 टक्के एफ.एस 10 मि.ली / किलो रस शोषणाऱ्या किडीसाठी इमीडाक्लोप्रीड 1.5 मि.ली / किलो बियाणे लावावे. तरी सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून बीजप्रक्रिया करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

                                                            ***********

मध केंद्र योजनेतंर्गत पात्र व्यक्ती व संस्थाकडून अर्ज आमंत्रित

बुलडाणा,(जिमाका) दि. 17 : राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. या योजनेतंर्गत पात्र व्यक्ती व संस्थांकडून प्रशिक्षणासाठी व उद्योगासाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. योजनेतंर्गत वैयक्तिक मधपाळांसाठी प्रशिक्षण जिल्ह्यामध्ये कुठेही मिळणार आहे. पात्र अर्जदारांना 10 मधपेट्या देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जदार हा साक्षर असावा, तसेच त्याच्याकडे स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. वय 18 वर्षपेक्षा जास्त असावे, प्रशिक्षणापूर्वी 50 टक्के स्वगुंतवणूक मंडळाकडे करावी लागेल. प्रगतशील मधपाळांसाठी 20 दिवस प्रशिक्षण महाबळेश्वर जि. सातारा येथे मिळणार आहे. तसेच 50 मधपेट्या देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जदार किमान 10 वी उत्तीर्ण असावा व वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे. अर्जदाराच्या नावे किंवा कुटूंबातील कुठल्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थीकडे मधमाशा पालन व प्रजनन, मधोत्पादन याबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. प्रशिक्षणापूर्वी 50 टक्के स्वगुंतवणूक भरणे आवश्यक आहे.

    त्याचप्रमाणे केंद्र चालक संस्थेसाठी 20 दिवस प्रशिक्षण महाबळेश्वर जि. सातारा येथे मिळणार आहे. तसेच 50 मधपेट्या मिळणार आहे. या योजनेच्या लाभासाठी संस्था ही नोंदणीकृत असावी, संस्थेचे नावे मालकीची किंवा 10 वर्षासाठी भाडे तत्वावर घेतलेली किमान एक एकर शेती किंवा 1000 चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन, प्रजनन व मधोत्पादनाकरीता लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी. प्रशिक्षणापूर्वी 50 टक्के स्वगुंतवणूक भरणे आवश्यक आहे. मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक ही योजनेची वैशिष्टये आहेत. लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध उद्योग व्यवसाय सुरू करणे बाबत मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य असणार आहे. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील. मधमाशा कॉलनी व मेलीफेरा मधपेट्या भांडवली स्वरूपात मंडळाने निश्चित केलेल्या पुरवठा दाराकडूनच पुरवठा केल्या जाणार आहे.

    अर्जासोबत आधारकार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, शेतीचा 7/12 व नमुना 8 – अ, दोन छायाचित्रे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामेद्योग मंडळ, अरूणोदय बिल्डींग, सुवर्ण नगर, बुलडाणा या कार्यालयाशी तसेच 07262-299076, 8329908470 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                                                ******

Comments