शासकीय हरभरा खरेदी 29 मे पर्यंत राहणार सुरू
- जिल्ह्यात 10 खरेदी केंद्रांना मान्यता ; 5230 रूपये प्रति क्विंटल हमी भाव
- नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी माल आणावा
बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : जिल्ह्यात रब्बी हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा हमीदर 5230 रुपये प्रती क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येत आहे. त्यासाठी शासकीय हरभरा खरेदी सुरू असून अंतिम मुदत 29 मे 2022 आहे.
हरभरा खरेदीसाठी जिल्ह्यात 10 खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातंर्गत बुलडाणा तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, देऊळगांवराजा तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, लोणार तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, मेहकर तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, संग्रामपूर तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, शेगांव तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, संत गजानन कृषी विकास शेतकी उत्पादन कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोडयुसर कंपनी सुलतानपुर केंद्र साखरखेर्डा ता. सिं.राजा, माँ जिजाऊ फार्मर प्रोडयुसर कंपनी केंद्र सिंदखेडराजा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था चिखली केंद्र उंद्री ता. चिखली, अशी 10 खरेदी केंद्रांना हरभरा खरेदी करीता मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यात 17 मे 2022 पर्यंत हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांची नाव नोंदणी करण्यात आली आहे.
तसेच ज्या शेतकऱ्यांना एसएमएस येतील, त्या शेतकऱ्यांनी आपला माल या खरेदी केंद्रावर विक्रीसाठी घेवून यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
शेळ्यांमध्ये कृत्रिम रेतन तंत्राचा वापर ठरतो फायदेशीर
बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : सिद्ध अथवा सुधारीत परदेशी, इतर उच्च उत्पादन क्षमता असलेल्या बोकडाच्या अनुवांशिक श्रेष्ठत्वाचा फायदा जास्तीत जास्त शेळ्यांसाठी करून घेण्यासाठी कृत्रिम रेतन तंत्राचा वापर केला जातो. बोकडाचे वीर्य नैसर्गिकरित्या फलनासाठी वापरण्याकरीता कित्येक पटीने जास्त शेळ्यांवर संकरण कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून करता येते. जनावरांमध्ये अथवा शेळ्या – मेंढ्यांमध्ये उत्पादन वाढीसाठी केलेली अनुवंशिक सुधारणा जास्तीत जास्त शेळ्या-मेंढ्यापर्यंत व दूर अंतरावर लवकरात लवकर पोहचविण्यासठी कृत्रिम रेतन हा एकमेव मार्ग आहे.
गाईंमध्ये संकरीकरणामुळे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढ होण्यामध्ये कृत्रिम रेतनाचा वापर हेच प्रमुख कारण आहे. शेळ्यांमध्ये मटण उत्पादन वाढीसाठी दक्षिण अफ्रिकेतील बोअर जात, मटण व दुधासाठी मध्यपूर्वेतील सिरीया देशातील व भूमध्य समुद्र किनाऱ्यावरील सायप्रसमधील (दमस्कस) शामी जात व मटणासाठभ् प्रसिद्ध असलेली उस्मानाबादी जात या तीन जातींच्या बोकडांचे गोठवलेले वीर्य कृत्रिम रेतन पद्धतीने वापरण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे यांनी उपलब्ध केले आहे. नैसर्गिक फलनामध्ये बोकडाकडून शेळीपासून बोकडाला प्रजनन संस्थेच्या रोगांची लागण होण्याची शक्यता असते. कृत्रिम रेतनामुळे ही शक्यता टळते.
बोकड घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यापेक्षा द्रवरूप किंवा गोठवलेले वीर्य घेऊन जाणे जास्त सोयीचे आहे. नैसर्गिक पद्धतीने एका वर्षामध्ये जास्तीत जास्त 40-50 शेळ्यांचे फलन होऊ शकते. याउलट वीर्य गोठविल्यास बोकडाचा एका वर्षात 2 ते 3 हजार शेळ्या भरवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. शास्त्रोक्त पद्धतीने व योग्य रितीने कृत्रिम रेतन केल्यास फलिताचे प्रमाण 60 ते 70 टक्के मिळण्यास हरकत नाही, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment