Tuesday, 31 May 2022

DIO BULDANA NEWS 31.5.2022



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लाभार्थ्यांशी
,

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद

  •       विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांचा संवाद कार्यक्रम

  बुलडाणा, (जिमाका) दि. 31 :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आज विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी लाभार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी दुरदृष्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथून राज्यातील निवडक लाभार्थ्यांशी,  तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील शिमला येथून केंद्रीय योजनांच्या देशभरातील निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधला. या लाभार्थी संवाद कार्यक्रमाचे थेट प्रसारण दुरदृष्यप्रणालीद्वारे नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. यावेळी सभागृहात जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदींसह विविध योजनांचे लाभार्थी, विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.  सुरूवातीला सह्याद्री अतिथीगृहातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. यामध्ये नगर, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा समावेश होता.

  त्यानंतर शिमला येथील कार्यक्रमाचे थेट प्रसारण दुरदृष्य प्रणालीद्वारे दाखविण्यात आले. विविध केंद्रीय योजनांवर आधारीत व्हिडीओ संदेश प्रसारीत करण्यात आला. त्यानंतर लद्दाख, बिहार, त्रिपूरा, कर्नाटक, गुजरात राज्यातील लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन प्रसरीत करण्यात आले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जवळपास 200 लाभार्थी उपस्थित होते. अशाचप्रकारे कृषि विज्ञान केंद्र जळगांव जामोद व कृषि विज्ञान केंद्र, बुलडाणा येथेही प्रत्येकी 150 लाभार्थी उपस्थित होते.

                                                                        *******

मोताळा मुलींचे शासकीय वसतिगृह बांधकामाकरीता जागेची आवश्यकता

  • 2 एकर जागा असावी, इच्छूक जागा मालकांनी समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा

बुलडाणा, (जिमाका) दि. 31 :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत मोताळा येथे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह कार्यरत आहे. सदर वसतिगृहात 100 विद्यार्थींनींच्या निवासाची व्यवस्था असून त्यांना शासनामार्फत विनामूल्य सर्व शैक्षणिक सोयी सुविधा पुरविण्यात येतात. या वसतिगृहाच्या इमारत बांधकामाकरीता मोताळा शहर किंवा परीसरात दोन एकर जागेची आवश्यकता आहे.     

            त्याअनुषंगाने आवश्यक तेवढी जागा अथवा दोन एकर जमीन दान देण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी किंवा मालकी हक्काची जागा / जमीन शासनाच्या अटी व शर्तीनुसार विक्री करावयाची असलेल्या व्यक्तींनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, त्रिशरण चौक, चिखली रोड, बुलडाणा किंवा गृहपाल, मुलींचे शासकीय वसतिगृह, स्टेट बँक शखेच्या बाजूला, नांदुरा रोड, मोताळा जि. बुलडाणा या कार्यालयाशी जागा / जमिनीच्या आवश्यक कागदपत्रासह संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल यांनी केले आहे.

                                                            **********

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

बुलडाणा, (जिमाका) दि. 31 :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच उपस्थित निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी पुष्प अर्पण करीत अभिवादन केले. यावेळी सिं.राजा उपविभागीय अधिकारी भुषण अहीरे, सिं.राजा तहसिलदार सुनील सावंत, तहसिलदार शामला खोत आदी उपस्थित होते.

                                                                                ******* 

Monday, 30 May 2022

DIO BULDANA NEWS 30.5.2022,1

 पाडळी शिंदे गावासाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : दे. राजा तालुक्यातील पाडळी शिंदे गावाला पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. पाडळी शिंदे येथील लोकसंख्या 2450 असून येथे दररोज 59 हजार 55 लीटर्स पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी, सिं. राजा यांनी कळविले आहे.

*****

स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटूंबियांसोबत पंतप्रधान आज साधणार संवाद

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 31 मे रोजी शिमला (हिमाचल प्रदेश) येथून आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे राज्य व जिल्हा स्तरावर स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या कुटूंबियांसह निवडक लाभार्थी यांचेशी संवाद साधार आहे.  त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावरदेखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये विविध योजनेचे लाभार्थी, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटूंबीय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अध्यक्ष यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण 31 मे रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे सकाळी 9.45 ते दुपारी 12.10 वाजेदरम्यान करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.            

                                                                        ***********

बुलडाणा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

  • 200 पदांसाठी होणार भरती

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे आयोजित केले जातात. त्यानुसार सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगळवार, दि. 31 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता स्कील पॅरामेडीकल कॉलेज, वेदीका बिल्डींग, वानखेडे ले आऊट, डॉ. मेहेत्रे हॉस्पीटल जवळ, बुलडाणा येथे करण्यात आले आहे.

    बेरोजगार उमेदवारांना ग्रामीण व दुरक्षेत्रातील मेळाव्याबाबत माहिती होवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्याला उमेदवारांनी उपस्थित राहण्यासाठी अवश्यक कागदपत्र सेवायोजन कार्ड, आधारकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रती, 2 पासपार्ट फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. या मेळाव्यात महिंद्रा अँण्ड महिंद्रा लि. चाकण पुणे, बजाज इलेक्ट्रीकल लि. चाकण पुणे कंपन्या 200 पदांसाठी भरती करणार आहे. शैक्षणिक पात्रता इयत्ता 10, 12 वी, आयटीआय, पदविका, पदवीधर असावा. काही अडचण असल्यास दुरध्वनी क्र. 07262-242342 वर संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

*******


माजी सैनिक, विधवा पत्नी यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात धनादेश वितरण

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : ज्या माजी सैनिक, विधवा पत्नी यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, ज्यांना डिफेन्स पेंशन मिळत नाही, ज्यांना मिळते पण काही कारणास्तव त्यांचा उदर निर्वाह होत नाही, अशा जिल्ह्यातील अत्यंत गरजू माजी सैनिक, विधवा पत्नी यांना 11 हजार रूपयांची आर्थिक मदत अदिती अर्बन को- ऑप क्रेडीट सोसायटीचे संस्थापक सुरेश देवकर यांनी दिली आहे. या रकमेच्या धनादेशाचे वितरण आज 30 मे रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे 10 गरजूंना करण्यात आले. यावेळी सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान, वसतिगृह अधिक्षक संजय गायकवाड, अदिती अर्बनचे संस्थापक सुरेश देवकर, दिनकर चिंचोले, सिताराम सोनुने, अशोक शेळके, पुरूषोत्तम जाधव, त्र्यंबक नेमाने, विष्णू गायकवाड, सुधाकर उबरहंडे व माजी सैनिक, विधवा पत्नी उपस्थित होत्या.  अदिती  अर्बनने यापूर्वी 27 मार्च 2022 रोजी डोमरूळ येथे 300 माजी सैनिक, विधवा पत्नी व शहीदांच्या वीरपत्नी, वीरमाता व पिता यांचा सन्मान केला आहे, असे सहाय जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी कळविले आहे.

                                                                        *****  

DIO BULDANA NEWS 30.5.2022

 शासकीय निरिक्षणगृह बालगृहासाठी बुलडाणा शहरात जागेची आवश्यकता

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 :  शासकीय निरिक्षणगृह बालगृह, (मुलींचे कनिष्ठ /वरिष्ठ) बुलडाणा ही शासकीय संस्था प्रथमच बुलडाणा शहरात सुरु करण्यात येत आहे. या संस्थेला शासकीय निरीक्षणगृह, बालगृहासाठी बुलडाणा शहरात प्रशस्त भाडे तत्त्वावर जागेची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वसोयींनीयुक्त अशी 5 हजार स्क्वेअर फुट बांधकाम केलेली, बाजुस मोकळी जागा,  5 शौचालय, 5 स्नानगृहे, किचन, डायनिंग हॉल, कार्यालय, 2 हॉल, 5 बेडरुम, खेळायला अंगण, पिण्याचे व वापराचे मुबलक असलेली सुसज्य इमारत भाडेत्वावर घ्यावयाची आहे.

            सदर सर्वसुविधांनीयुक्त अशी इमारत भाडयाने देवु इच्छिणाऱ्या इमारत मालकाने त्वरीत अधिक्षक शासकीय निरक्षिणगृह बालगृह (मुलींचे कनिष्ठ /वरिष्ठ) बुलडाणा यांच्याशी संपर्क साधावा. तसेच त्यांचे भ्रमणध्वनी क्र. 9049952024 या क्रमांकावर तात्काळ किंवा शासकीय मुलांचे निरीक्षणगृह, बालगृह चिखली रोड हाजी दर्ग्याच्या पाठीमागे शरद कला महाविद्यालय परिसर, बुलडाणा येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन अधिक्षक महेंद्र अष्टेकर यांनी केले आहे.

       *****                                                       


‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’मधून जिल्ह्यातील 15 बालकांना मदत

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुरचित्रवाणी परिषदेच्या माध्यमातून संबोधन

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ या योजनेतंर्गत केंद्र शासन कोविडमुळे दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांना मदत करीत आहे. या योजनेतून अनाथ बालकांना आज लाभ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रवाणी परिषदेच्या माध्यमातून संबोधीत केले. या कार्यक्रमाला एनआयसी दुरचित्रवाणी परिषद कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष उज्ज्वला कस्तुरे, सदस्य सदाशिव मुंढे, ॲड किरण राठोड, आशा सौभागे, बाल संरक्षण अधिकारी श्री. मराठे आदी उपस्थित होते.

    त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांच्याहस्ते पात्र लाभार्थी बालकांना पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेची किट देण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन असलेले संदेश पत्र, जिल्हाधिकारी यांचे स्नेह पत्र देण्यात आले. जिल्ह्यातील एकूण 15 अनाथ बालकांना मदत करण्यात आली.

    सदर योजनेतून अनाथ बालकांच्या बँक खात्यात 10 लक्ष रूपयांची मुदतठेव, प्रती महिना 4 हजार रूपये, उच्च शिक्षणासाठी गरजेनुसार शैक्षणिक कर्ज मिळण्यास प्राधान्य, शैक्षणिक कर्जावरील व्याज माफी, 5 लक्ष रूपयांचे आयुष्यमान भारत योजनेचे हेल्थ कार्ड देण्यात आले. या पाल्यांना 1 ली ते 12 वी इयत्तेपर्यंत वर्षाला 20 हजार रूपयांची शिष्यवृत्तीही देण्यात येणार आहे.  यावेळी अनाथ पाल्यांचे नातेवाईक, संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                            *********

Friday, 27 May 2022

बुलडाणा येथे रोजगार मेळाव्याचे 31 मे रोजी आयोजन

 बुलडाणा येथे रोजगार मेळाव्याचे 31 मे रोजी आयोजन

  • 200 पदांसाठी होणार भरती

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे आयोजित केले जातात. त्यानुसार सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगळवार, दि. 31 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता स्कील पॅरामेडीकल कॉलेज, वेदीका बिल्डींग, वानखेडे ले आऊट, डॉ. मेहेत्रे हॉस्पीटल जवळ, बुलडाणा येथे करण्यात आले आहे.

      बेरोजगार उमेदवारांना ग्रामीण व दुरक्षेत्रातील मेळाव्याबाबत माहिती होवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्याला उमेदवारांनी उपस्थित राहण्यासाठी अवश्यक कागदपत्र सेवायोजन कार्ड, आधारकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रती, 2 पासपार्ट फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. या मेळाव्यात महिंद्रा अँण्ड महिंद्रा लि. चाकण पुणे, बजाज इलेक्ट्रीकल लि. चाकण पुणे कंपन्या 200 पदांसाठी भरती करणार आहे. शैक्षणिक पात्रता इयत्ता 10, 12 वी, आयटीआय, पदविका, पदवीधर असावा.  काही अडचण असल्यास दुरध्वनी क्र. 07262-242342 वर संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

DIO BULDANA NEWS 27.5.2022,1

 पाणी टंचाई निवारणार्थ 25 विंधन विहीरी ; 58 कुपनलिकांना मंजूरात

  • 70 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामध्ये विंधन विहीर घेणे, खाजगी विहीर अधिग्रहण, तातपुरती नळ पाणी पुरवठा योजना, कूपनलिका व टँकर आदींचा समावेश आहे.  या उपाययोजनांमुळे उन्हाळ्यात बसणाऱ्या पाणी टंचाईच्या झळा निश्चितच सौम्य होणार आहे.

   पाणी टंचाई निवारणार्थ शेगांव तालुक्यातील 6, नांदुरा तालुक्यामधील 6, जळगांव जामोद तालुक्यातील 6, संग्रामपूरधील 4 व चिखली तालुक्यातील एका गावासाठी एकूण 25 विंधन विहीरी मंजूर करण्यात आल्या आहेत. तसेच 58 कुपनलिकांची कामेही मंजूर आहेत. एकूण 70 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत. विंधन विहीरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे.

    विंधन विहीरी शेगांव तालुक्यातील जानोरी, जलंब, जवळा बु, टाकळी धारव, तरोडा कसबा व टाकळी विरो, नांदुरा तालुक्यातील खंडाळा, महाळुंगी, वसाडी खु, वसाडी बु, पोटळी, वडाळी, जळगांव जामोद तालुक्यातील निमखेडी, चाळीस टपरी, गोमाळ, वडपाणी, खांडवी, राजुरा बु, संग्रामपूर तालुक्यातील चुनखडी,हडीयामाळ, शिवाजी नगर, चिचारी, चिखली तालुक्यातील मलगी  गावांसाठी विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहे. तर शेगांव तालुक्यातील चिंचखेड, कुरखेड, भास्तन, कठोरा, पहुर पूर्णा, गोळगाव बु, भोनगांव, मनसगांव, माटरगांव बु, पाडसूळ, सगोडा, तरोडा तरोडी, खातखेड, पाळोदी, मानेगांव, झाडेगांव ,नांदुरा तालुक्यातील हिंगणा भोटा,  जळगांव जामोद तालुक्यातील हिंगणा दादगांव, सुनगाव, काजेगांव, गोरखनाथ, जामोद, सातळी, खेर्डा बु, रसुलपूर, ऐनगांव, वडशिंगी, संग्रामपूर तालुक्यातील भोन नवे, आलेवाडी, सायखेड, लाडणापूर, शिवणी, कवठळ, हिंगणा, कुंभारखेड, बावनबीर, एकलारा, कोलद, जस्तगांव, आवार, पळशी झांशी, करमोडा, वकाणा, वडगांव वाण, वानखेड, काटेल, रूधाना  या गावांसाठी कुपनलिका मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

                                                                        ***********

स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटूंबियांसोबत पंतप्रधान 31 मे रोजी साधणार संवाद

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी शिमला (हिमाचल प्रदेश) येथून आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे राज्य व जिल्हा स्तरावर स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या कुटूंबियांसह निवडक लाभार्थी यांचेशी संवाद साधार आहे.  त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावरदेखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये विविध योजनेचे लाभार्थी, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटूंबीय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अध्यक्ष यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण 31 मे रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे सकाळी 9.45 ते दुपारी 12.10 वाजेदरम्यान करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.                                      *********

DIO BULDANA NEWS 27.5.2022

 नाफेडमार्फत वाढीव उद्दिष्टासह हरभरा खरेदीस मुदतवाढ मिळणार

  • खरेदीचा प्रस्ताव केंद्र शासनास सादर

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : केंद्र शासनाच्या आधरभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडच्यावतीने राज्यात हरभरा खरेदी करण्यात येत होती. केंद्र शासनाने नाफेडला 68 लाख क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. हरभरा खरेदीची मुदत 29 मे 2022 पर्यंत निश्चित केली होती. मात्र नाफेडला देण्यात आलेले 68 लाख क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे 23 मे 2022 रोजी हरभरा / चना खरेदी पोर्टल बंद झाले आहे. तरी हरभरा खरेदीस वाढीव उद्दिष्टासह मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे राज्य शासनामार्फत पाठविण्यात आला आहे. त्यानुसार पुढील तीन / चार दिवसात वाढीव उद्दिष्ट व मुदतवाढ मिळणार आहे. हरभरा खरेदीस मुदतवाढ प्राप्त झाल्यानंतर पुर्ववत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडील हरभरा खरेदी करण्यात येणार आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा पणन अधिकारी पी.एस शिंगणे यांनी नाफेडने अचानक शेतकऱ्यांच्या हरभरा मालाची खरेदी बंद केल्याबाबत वृत्ताच्या दिलेल्या तपशसीलात नमूद आहे.

                                                                        *******  

वैद्यकीय उपकरणांची नोंदणी तातडीने करावी

  • अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : वैद्यकीय उपकरणांची व्याप्ती व उपलब्धता विचारात घेता केंद्र शासनाच्या 11 फेब्रुवारी 2020 च्या अधिसूचनेद्वारे जे उत्पादक वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन करतात. त्यांनी त्यांच्या वैद्यकीय उपकरणांबाबत केंद्र शासनाने तयार केलेल्या सुगम पोर्टल www.cdscomdonline.gov.in या संगणक प्रणालीवर ऐच्छिक नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर नोंदणी ही 18 महिन्याच्या आत म्हणजे 30 सप्टेंबर 2021 पर्यंत करणे अपेक्षीत होते. त्यानंतर 1 वर्षासाठी म्हणजे 30 सप्टेंबर 2022 पर्यंत सर्व वैद्यकीय उपकरणांचे उत्पादकांनी त्यांच्याद्वारे उत्पादित वैद्यकीय उपकरणांबाबत केंद्र शासनाच्या संगणक प्रणालीवर नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. तरी वैद्यकीय उपकरणे उत्पादकांनी तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे वतीने करण्यात आले आहे.

    सन 2017 पूर्वी अधिसूचीत वैद्यकीय उपकरणे यांच्यावर नियंत्रण, औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम अंतर्गत केले जात होते. मात्र अधिसूचीत वैद्यकीय उपकरणे यांची यादी अत्यल्प होती. सन 2017 मध्ये केंद्र शासनाने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत वैद्यकीय उपकरणे नियम 2017 पारीत केले आहेत. या नियमानुसार रूग्णांच्या उपचारासाठी व रोग निदानासाठी लागणाऱ्या बऱ्याच वेगवेगळ्या उपकरणांचा त्यामध्ये अंतर्भाव केलेला असून वैद्यकीय उपकरणांचे अ, ब, क व ड अशी वर्गवारी केली आहे. अ व ब प्रवर्गातील वैद्यकीय उपकरणांवर राज्याचे तर क व ड प्रवर्गातील वैद्यकीय उपकरणांवर केंद्र शासनाचे नियंत्रण आहे. तरी ज्यांनी सदर नोंदणी केलेली नाही, त्यांनी ही नोंदणी लवकरात लवकर विहीत मुदतीत पूर्ण करावी. ज्यांची नोंदणी विहीत मुदतीत केली जाणार नाही. त्यांच्याविरूद्ध औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत सक्त कारवाई करण्यात येणार आहे, सहायक आयुक्त अ. तु बर्डे यांनी कळविले आहे.

                                                            *****

                      जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू शनिवार, दिनांक 28 मे 2022 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दिनांक 28 मे रोजी सकाळी 7 वाजता मुक्ताईनगर जि. जळगांव येथून शासकीय वाहनाने  खांडवी मार्गे जळगांव जामोदकडे प्रयाण, सकाळी 8 वाजता धानोरा महासिद्ध ता. जळगांव येथे आगमन व प्रहार जनशक्ती पक्ष शाखा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 8.30 वा गीता भवन जळगांव जामोद येथे स्व. इंदिराबाई कडू स्मृतिप्रित्यर्थ रूग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 9.30 वा संग्रामपूर येथे भेट, सकाळी 11.45 वा चांदूर बाजार जि. अमरावतीकडे प्रयाण करतील.                                                                        

                                                                                       *****   

Wednesday, 25 May 2022

DIO BULDANA NEWS 25.5.2022,2

 जळगांव जामोद मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

• पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.25: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत जळगांव जामोद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह कार्यरत आहे. सदर वसतिगृहाची मान्य संख्या 75 असून सन 2022-23 मध्ये रिक्त हेणाऱ्या जागांवर प्रवर्गनिहाय व गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो. वसतिगृहामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी जे जळगांव जामोद शहरातील शैक्षणिक संस्थेत शिकत आहे व दररोज ये-जा करीत आहेत, अशा गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.

    तसेच अपंग, अनाथ व मेहतर, मातंग समाजातील विद्यार्थ्यांना विशेष राखीव कोट्यातंर्गत प्रवेश देण्यात येत आहे. सदर वसतिगृहामध्ये वर्ग 7, 10 व 12 वी उत्तीर्ण तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. तसेच विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा विनामूल्य शासनामार्फत पुरविल्या जातात. त्यामध्ये दुध, नाश्ता, जेवण, अंथरून, पांघरून, स्टेशनरी, निर्वाह भत्ता, क्रीडा साहित्य, स्वतंत्र अभ्यासिका, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, मनोरंजनाची साधने तसेच व्यायाम साहित्य आदी चांगल्या दर्जाच्या सुविधा विनामूल्य पुरविल्या जातात.

   या सुविधेचा लाभ घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदुरा रोड, सुतगिरणी जवळ, दांडगे ले आऊट पंपाच्यामागे, जळगांव जामोद येथील कार्यालयात विनामूल्य अर्ज कार्यालयीन वेळेत देणे सुरू आहे. अधिक माहितीसाठी गृहपाल, जळगांव जामोद किंवा सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय बुलडाणा येथे संपर्क करावा, असे आवाहन गृहपाल यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

                                                                        *****

मोताळा मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

• पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.25: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत मोताळा येथे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह कार्यरत आहे. सदर वसतिगृहाची मान्य संख्या 100 असून सन 2022-23 मध्ये रिक्त हेणाऱ्या जागांवर प्रवर्गनिहाय व गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो. वसतिगृहामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी जे मोताळा शहरातील शैक्षणिक संस्थेत शिकत आहे व दररोज ये-जा करीत आहेत, अशा गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.

    तसेच अपंग, अनाथ व मेहतर, मातंग समाजातील विद्यार्थीनींना विशेष राखीव कोट्यातंर्गत प्रवेश देण्यात येत आहे. सदर वसतिगृहामध्ये वर्ग 8,9, 10 व 11, 12 वी तसेच बी.ए, बी.कॉम, बी.एस.सी भाग -1,2 व 3 मध्ये विद्यार्थीनींना प्रवेश देण्यात येतो. तसेच मुलींना सर्व सोयीसुविधा विनामूल्य शासनामार्फत पुरविल्या जातात. त्यामध्ये दुध, नाश्ता, जेवण, अंथरून, पांघरून, स्टेशनरी, निर्वाह भत्ता, क्रीडा साहित्य, स्वतंत्र अभ्यासिका, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, मनोरंजनाची साधने आदी चांगल्या दर्जाच्या सुविधा विनामूल्य पुरविल्या जातात.

   या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, भारतीय स्टेट बँकेच्या बाजूला, मोताळा – नांदुरा रोड, मोताळा येथील कार्यालयात विनामूल्य अर्ज कार्यालयीन वेळेत देणे सुरू आहे. अधिक माहितीसाठी गृहपाल, मोताळा किंवा सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय बुलडाणा येथे संपर्क करावा, असे आवाहन गृहपाल यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

                                                                        *****

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमअंतर्गत जिल्हयातील

बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी

         बुलडाणा,(जिमाका) दि.25: ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित  बेरोजगार युवक  युवतीची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेवुन  उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम  शासनाने ऑगष्ट 2019 पासुन  मुख्यमंत्री रोजगार ‍ निर्मिती  कार्यक्रम सुरु केलेला आहे.  CMEGP योजनेस बुलडाणा  ‍जिल्हयात गेल्या तीन  वर्षापासुन अतिशय  चांगल्या प्रकारे  प्रतिसाद मिळत आहे  मोठया प्रमाणात  कर्ज प्रकरणे पोर्टलवर दाखल होत असुन विविध बँक शाखांचे माध्यमातुन कर्जप्रकरणांना मंजुरी मिळत आहे. सन 2022-23 साठी शासनाने  बुलडाणा जिल्हयास गेल्या वर्षापेक्षा चार पट अधिक निधी  उपलब्ध  करुन ‍ दिल्याने  एकुण 2000 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातुन लाभ देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

        या  योजनेतुन  मोठया  प्रमाणात रोजगार निर्मिती  होणार असल्याने मुदतीत लक्षांक पुर्ती  होण्यासाठी  वर्षाचे सुरवातीपासुन प्राधान्य देण्यात येत आहे. या योजनेत लाभ घेण्यासाठी कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी  ज्यांचे वय  18 वर्षे पुर्ण  अधिकतम मर्यादा  45 वर्ष (अनु.जाती /जमाती /महिला/अपंग/माजी  सैनिक  यांना पाच वर्ष   शिथील आहे)  शैक्षणिक पात्रता रु.10 लाखावरील प्रकल्पासाठी  सातवी पास  तसेच रु.25 लाखावरील प्रकल्पासाठी  10 वी पास आहे. या योजनेत सेवा  उद्योग तसे च कृषी पुरक उद्योग/व्यवसायांसाठी  रु.10 लाख तसेच उत्पादन प्रकारच्या प्रवर्गातील प्रकल्पांसाठी रु.50 लाखापावेतो कर्ज  सुविधा उपलब्ध असुन एकुण प्रकल्प किंमतीचे शहरी भागासाठी 25 टक्के व ग्रामीण भागासाठी 35 टक्के पावेतो  मोठया प्रमाणावर अनुदान उपलब्ध होणार आहे .

          ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असुन  आपला उद्यो ग  व्यवसाय  उभारणीसाठी  शासनाच्या https://maha-cmegp.gov.in/homepage संकेतस्थळावर भेट देवुन  आपले गांव ज्या बँक शाखेत येते त्या बँकेची निवड करुन  अर्ज  जवळच्या सेतु सुविधा केंद्रात जावुन अथवा मोबाईल वरुन दाखल करावा बुलडाणा  जिल्हयातील प्रत्येक  गांव / शहरातील   सुशिक्षित बेरोजगार   युवक युवतींनी या योजनेचा लाभ  घ्यावा  स्वत ची तसेच गावाची प्रगती साधावी.

         सदर बातमीपत्र आपल्या सर्व  गरजु मित्र  मैत्रिणी / नातेवाईक  यांना व्हॉटस ॲप / फेसबुक चे  माध्यमातुन   फॉरवर्ड   करुन उद्योजक होण्यासाठी सहकार्य करावे,  असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र बुलडाणा यांनी केले आहे.

--

DIO BULDANA NEWS 25.5.2022,1

 वृद्ध साहित्यिक, कलावंत मानधन योजेनत पात्र अर्जांची यादी प्रसिद्ध

·         अपात्र कलावंतांनी 27 मे पर्यंत आक्षेप सादर करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग कार्यालयास वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेतंर्गत कलावंतांचे मानधन मंजुरीसाठी सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या आर्थिक वर्षात एकूण 1753 अर्ज प्राप्त झाले. प्रतिवर्षी तीन व सहा महिन्यातून एकदा जिल्हा वृद्ध साहित्यिक व कलावंत निवड समितीची बैठक घेवून इष्टांकानुसार शासन निर्णयान्वये एक वर्षात 100 तर तीन वर्षात 300 कलावंतांची मानधनासाठी निवड करण्याचे निकष आहेत.

   पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 7 फेब्रुवारी 2014 च्या शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर एकूण 1753 प्राप्त अर्जांची अटी व शर्तीनुसार समाज कल्याण कार्यालयाने छाननी केली. छाननी बाबत अहवाल तयार करण्यात आलेला आहे. या योजनेतंर्गत सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वित्तीय वर्षातील एकूण 191 पात्र  अर्जांची यादी समाज कल्याण, जि.प कार्यालयात उपलब्ध आहे. कार्यालयात दर्शनी फलकावर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच ज्या वृद्ध साहित्यिक, कलावंत यांना अपात्र यादीबाबत आक्षेप असल्यास अशा वृद्ध साहित्यिक, कलावंतांना त्यांचे मूळ कागदपत्र यावरून खात्री करून घ्यावी. तरी आक्षेप 27 मे 2022 अखेर आक्षेपांचा विचार करण्यात येणार नाही. याची नोंद घ्यावी, असे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                        ******     

सिंदखेडराजा आयटीआय येथे कालबाह्य अवजारांच्या लिलावाचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिंदखेडराजा यांचे कार्यालय, कार्यशाळेतील कालबाह्य अथवा तुटफूट झालेली अवजारे व भंगर साहित्याच्या लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी भंगर खरेदीदाराकडून निविदा आमंत्रित करण्यात येत आहे. या साहित्याची यादी कार्यालयीन वेळेत आयटीआय येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व निवीदेतील निर्लेखन साहित्याची संख्या कमी अथवा अधिक करण्याचे आणि कोणतेही कारण न देता निवीदा नाकारण्याचे तसेच रद्द करण्याचे अधिकार, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिंदखेडराजा यांनी राखून ठेवलेला आहे. निविदा विक्री 31 मे 2022 पर्यंत मिळतील. तसेच निवीदा कार्यालयीन वेळेत दिनांक 7 जुन 2022 पर्यंत स्वीकारल्या जातील. तसेच 10 जुन 2022 रोजी सकाळी 12 वाजता निवीदा उघडण्यात येतील. उशिराने आलेल्या निवीदांचा विचार करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. निवीदेच्या शर्ती व अटी लागू राहतील. निवीदा अर्जाची किंमत 100 रूपये रोख भरून वर नमूद केलेल्या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येईल, असे  प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिं.राजा यांनी कळविले आहे.

                                                            ******

DIO BULDANA NEWS 25.5.2022


 शेतकऱ्‍यांनी कृषी उत्पादनांचा दर्जा व वेगळेपणा जपावा

 उपमुख्यमंत्री अजित पवार

·         भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : शेतकरी बांधवांनी त्यांच्या कृषी उत्पादनाचा दर्जा आणि वेगळेपणा जपून गुणवत्तापूर्वक उत्पादने तयार करण्याची गरज आहे. जागतिक पातळीवर राज्याची ओळख निर्माण करण्यासाठी गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादनांची निर्मिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठी भौगोलिक मानांकन हा एक महत्त्वपूर्ण घटक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात राज्यातील 12 भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यात मंगळवेढा मालदांडी ज्वारी, नवापूर तूरडाळ, भिवापूर मिर्ची पावडर, पुणे आंबेमोहोर तांदूळ, महाबळेश्वर ड्राय स्ट्रॉबेरी, सांगली हळद, आजरा घनसाळ तांदूळ, वायगाव हळद, डहाणू चिक्कू पावडर, सांगली बेदाणा, वेंगुर्ला काजू, भंडारा चिन्नोर तांदूळ या उत्पादनांचा समावेश आहे. या शुभारंभप्रसंगी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार तथा प्राधिकृत अधिकारी  बाबासाहेब पाटील, सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी व पदुम विभागाचे सचिव एकनाथ डवले, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, प्राधिकृत अधिकारी  मंडळ  सदस्य नंदकिशोर सूर्यवंशी यांच्यासह राज्यातील विविध भागातून आलेले शेतकरी  उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ आज करण्यात आला. या माध्यमातून शेतकऱ्‍यांची गुणवत्तापूर्ण उत्पादने आता ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. सध्या मॅाल संस्कृती पुढे येत असून या संस्कृतीत शेतकऱ्‍यांची कृषी उत्पादने टिकून ग्राहकांमध्ये विश्वासार्हता निर्माण होणे गरजेचे आहे.

            सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, ग्राहक हा चोखंदळ असतो. त्याला चांगली उत्पादने हवी असतात. ग्राहकाला भौगोलिक मानांकन प्राप्त असलेली उत्पादने ही अधिक विश्वासार्ह वाटतात. गुणवत्ता व दर्जा टिकवून ग्राहकांचा विश्वास संपादन करता येते. 

            भौगोलिक मानांकन (जीआय) म्हणजे एखादी वस्तू व उत्पादनास विशिष्ट स्थानामुळे प्राप्त झालेला असाधारण गुणधर्म, दर्जा आणि वेगळेपणा होय. वस्तू व उत्पादनांना वैज्ञानिक विश्लेषण, वैशिष्टपूर्ण गुणधर्म व पारंपरिक इतिहास सिद्ध केल्यावरच भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त होते. केंद्र शासनाच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्याद्वारे भौगोलिक मानांकन देण्यात येते. जीआय टॅगमुळे फसवेगीरीस आळा बसतो व अस्सल दर्जाची उत्पादने असल्याची ग्राहकाला शाश्वती मिळते.

                                                                        ********

Monday, 23 May 2022

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन

 

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन

• उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्डच्या लॉग ईन आयडीतून अर्ज करावे

• 26 मे पर्यंत चालणार मेळावे

 बुलडाणा,(जिमाका)दि.23 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन 23 ते 26 मे 2022 दरम्यान केले आहे. सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www. mahaswayam.gov.in संकेतस्थळावर भरावे.

   या ऑनलाईन मेळाव्यात नामांकित खाजगी उद्योजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविणार आहे. या भरतीमध्ये पात्र पुरुष, महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर नांव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, आय. टी. आय. पास, पदव्युत्तर, पुरुष व महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करुन आपले लॉगईन मधुन ऑनलाईन अर्ज करुन सहभाग नोंदणी करुन रोजगार प्राप्त करावा. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन कार्डचा युझर व पासवर्ड चा वापर करुन आपल्या लॉगइन मधुन ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊ शकतात.

  पात्र असलेल्या पुरुष, महिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एका पेक्षा जास्त पदाकरिता सुध्दा ऑनलाईन अर्ज करु शकतात. तरी 23 ते 26 मे कालावधी दरम्यान आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करुन आपले लॉगईन मधुन ऑनलाईन अर्ज करावा.  उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावा. जास्तीत जास्त उमेदवारांनी ऑनलाईन सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्रीमती प्रां. यो बारस्कर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

                                                                                                ******

DIO BULDANA NEWS 23.5.2022

 विज पडण्याची सूचना देणार ‘दामिनी

  • दामिनी ॲप वापरून पडणाऱ्या वीजेपासून संरक्षण करण्याचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.23 :  मान्सून कालावधीत विशेषतः जुन व जुलै या महिन्यात विज पडून जिवीतहानी होत असते. विज पडुन जिवीत हानी होऊ नये, या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी दामिनी  अॅप तयार केले आहे. हे दामिनी ॲप विज पडण्याची सूचना देणारआहे. त्यामुळे नागरिकांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी ॲप वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

   सदरचे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांना तसेच  शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी , कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंन्ट्री ऑपरेटर यांना सदरचे अॅप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करण्यात यावे. तसेच सदरचे अॅप GPS लोकेशन ने काम करीत असून विज पडण्याच्या 15 मिनिटापूर्वी सदरच्या अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते.   अॅपमध्ये आपले सभोवताल विज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासुन सुरक्षीत स्थळी जावे. तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये.

         गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी कर्मचारी यांना सदर ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या अलर्ट नुसार आवश्यक पूर्वसुचना गावातील सर्व नागरिकांना देऊन होणारी जीवितहानी टाळावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांनी केले आहे .

                                                                        ******

            आदिवासी पारंपारिक नृत्य पथकांच्या नृत्य स्पर्धेचे आयोजन

  • 31 मे रोजी होणार नृत्य स्पर्धा

बुलडाणा,(जिमाका) दि.23 :  आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी आदिवासी समाजाच्या पारंपारिक नृत्य कलेला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. नृत्य कलेला वाव मिळावा, लोकनृत्याबाबत जागृती व्हावी, याकरीता आदिवासी पारंपारिक नृत्य पथकांच्या नृत्य स्पर्धा घेण्यात येत आहे. सदर स्पर्धेसाठी नाव नोंदणी ही 29 मे 2022 पर्यंत करण्यात येणार आहे. नोंदणी प्रकल्प अधिकारी कार्यालय अकोला व शासकीय आश्रम शाळा, कोथळी ता. बार्शिटाकळी, जि. अकोला येथे करण्यात येत आहे. इच्छूकांनी 29 मे पर्यंत नोंदणी करावी, त्यानंतर नविन संस्थेची नोंदणी करून घेतल्या जाणार नाही. नृत्यस्पर्धा ही मंगळवार, 31 मे 2022 रोजी शासकीय आश्रम शाळा, कोथळी ता. बार्शिटाकळी जि अकोला येथे आयोजित करण्यात येणार आहे. आदिवासी पारंपारिक नृत्य सर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांना येण्या- जाण्याचा खर्च, मानधन, वेशभुषेचा खर्च शासकीय नियमाप्रमाणे अदा करण्यात येणार आहे. तसेच विजेत्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाला रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तरी इच्छूक नृत्य पथकांना नाव नोंदणी करून सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी केले आहे.

**********

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने बांधकाम कामगार मंडळाचा आयकॉनिक सप्ताह

  • मंडळातंर्गत आतापर्यंत 65 हजार 503 बांधकाम कामगारांची नोंदणी

बुलडाणा,(जिमाका) दि.23 :  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातंर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आयकॉनिक सप्ताह 7 ते 13 मार्च 2022 दरम्यान राबविण्यात आला. या सप्ताहादरम्यान बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. प्रत्यक्ष बांधकाम स्थळी भेटी देवून उपस्थित सर्व बांधकाम कामगारांना मंडळात नोंदणी करण्याचे आवाहनही करण्यात आले. बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती देवून जनजागृती करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात मंडळामध्ये 65 हजार 503 बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. तर 28 हजार 45 बांधकाम कामगारांनी नोंदणीचे नुतनीकरण केले आहे. नोंदणी झालेल्या जिवीत असलेल्या एकूण 22 हजार 185 बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ डीबीटी पद्धतीने प्रदान करण्यात आलेला आहे, असे सरकारी कामगार अधिकारी आ. शि. राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                        *******

बुलडाणा डाक विभागात ग्रामीण डाकसेवक 65 पदांची ऑनलाईन भरती

बुलडाणा,(जिमाका) दि.23 :  अधिक्षक डाकघर बुलडाणा विभाग या कार्यालयातंर्गत जीडीएस ब्रँच पोस्टमास्टर, सहायक ब्रँच पोस्टमास्टर, डाक सेवक अशा एकूण 65 पदांची ऑनलाईन भरती करण्यात येत आहे. संबंधित पदांविषयी सविस्तर माहिती, नियम व अटी https: //indiapostgdsonline.cept.gov.in/Home.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार इच्छूक उमेदवारांनी आपला अर्ज या संकेतस्थळावर अपलोड करावा. अर्ज अपलोड करण्याची अंतिम मुदत 5 जुन 2022 आहे. ब्रँच पोस्टमास्टरला वेतन 12 हजार रूपये व ग्रामीण डाकसेवक पदासाठी 10 हजार रूपये प्रति महिना आहे. वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष असून एसएससी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, असे डाक अधिक्षक यांनी कळविले आहे.

                                                                                                **********


--