मोताळा नगरपंचायत क्षेत्रात आदर्श आचार संहीता लागू
*आक्षेपार्ह चित्र, चिन्ह प्रदर्शित करण्यावर बंदी
बुलडाणा,(जिमाका) दि.9 : मोताळा नगर पंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने 22 डिसेंबर 2021 पर्यंत आदर्श आचार संहीता लागू करण्यात आली आहे. आचार संहीतेचा भंग होवू नये या दृष्टीकोनातून भारतीय दंड संहीता चे कलम 188, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मोताळा नगर पंचायत क्षेत्रात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार नगर पंचायत मतदार संघातील कायदा व परिस्थिती कायम राहण्याच्या दृष्टीने तसेच नगर पंचायत निवडणूक निर्भय, निपक्षपातीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने निवडणूकीचे कालावधीत देशाच्या व राज्याच्या सुरक्षिततेला धोका पोहचेल, अशा सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे, नकला करणे, आक्षेपार्ह चित्र व चिन्ह प्रदर्शीत करणे, ज्याद्वारे नियमांचा भंग होईल, असे कृत्य करण्यास बंदी घालण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व मुद्रक व प्रकाशक यांनी निवडणूकीशी संबंधित साहित्य मुद्रीत व प्रकाशीत करताना त्यावर मुद्रक, प्रकाशक यांचे नाव व पत्ता असणे आवश्यक आहे. मुद्रकाजवळ प्रकाशकाच्या स्वाक्षरीचे करारपत्र असावे. निवडणूकीचे साहित्य प्रकाशित केल्यापासून 3 दिवसाचे आत प्रकाशित साहित्यांच्या तीन प्रती व मुद्रकाला प्रकाशकाने प्राधिकृत केल्याबाबतचे करारपत्र निवडणूक शाखेत सादर करणे आवश्यक राहील. तसेच छापील निवडणूक साहित्याच्या 4 प्रती व सदर निवडणूक साहित्य छापण्याकरीता आलेल्या खर्चाचा तपशील निवडणूक शाखेस सादर करावा. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1960 चे कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येणार आहे, असे मलकापूरचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी मनोज देशमुख यांनी कळविले आहे.
डाक अदालतीचे 13 डिसेंबर रोजी आयोजन
बुलडाणा,(जिमाका) दि. 9: बुलडाणा डाक विभागाच्यावतीने सोमवार, 13 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता डाक अधिक्षक यांच्या कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. डाक विभागाच्या कामा संबधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्याच्या आत निराकारण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतल्या जाणार आहे. विशेष टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहे. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. त्यामध्ये तारिख व ज्या अधिकाऱ्यास मुळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा असावा. संबंधीतांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार डाक अधिक्षक ए. के इंगळे यांचे नावे दोन प्रतीसह अधिक्षक डाकघर, बुलडाणा विभाग, बुलडाणा या पत्त्यावर 11 डिसेंबर 2021 पर्यंत पाठवाव्यात. तदनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केल्या जाणार नाही, असे अधिक्षक, डाकघर बुलडाणा यांनी कळविले आहे.
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा जिल्हाधिकारी यांना ध्वज लावून शुभारंभ
बुलडाणा, (जिमाका) दि. 9 : माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी 7 डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबरपर्यंत निधी गोळा केला जातो. देशाच्या संरक्षणासाठी आपले प्राणार्पण केले अशा जवानांच्या कुटूंबियांच्या जीवनातील अडी अडचणी दुर करून त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे, यासाठी या निधीचा उपयोग केला जातो. त्यानुसार शासनाने सन 2021-22 करीता जिल्ह्याला 53 लाख 38 हजार इतका इष्टांक दिला आहे. या निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन दिनाचे औचित्य साधून 7 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांना ध्वज लावून निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान उपस्थित होते. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे व आपले जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.
कोरोना अलर्ट : प्राप्त 269 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह
बुलडाणा, (जिमाका) दि. 9 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 270 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 269 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील चाचणी मधील 1 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 80 तर रॅपिड टेस्टमधील 189 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 269 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : लोणार शहर : खाटकेश्वर नगर 1, अशाप्रकारे जिल्ह्यात 1 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आला आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 739914 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86969 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86969 आहे. आज रोजी 244 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 739914 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87655 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86969 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 11 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 675 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
******
जिल्ह्यात 15 लक्ष 98 हजार 852 लाभार्थ्यांचा लसीचा पहिला डोस पूर्ण
बुलडाणा, (जिमाका) दि. 9 : जिल्ह्यात 100 टक्के लसीकरणासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यानुसार 8 डिसेंबर पर्यंत जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत लसीचा पहिला डोस घेतलेल्या एकूण उद्दीष्ट असलेल्या 21,87,294 पैकी 15,98,852 लाभार्थ्यांचे लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. त्याची टक्केवारी 75.96 टक्के आहे. जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पहिला डोस घेतलेल्या 50 ते 75 टक्के डोस घेतलेले लाभार्थी संख्या असलेले प्रा. आ केंद्र 41 आहे. तसेच 75 ते 100 टक्के पहिला डोस घेतलेले लाभार्थी केंद्र 11 आहे. जिल्हा प्रशासन लसीकरण पुर्ण होण्याकरीता सातत्याने प्रयत्न करीत आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.
****
पोलीस स्टेशनमध्ये वाहन जप्त असल्यास कागदपत्रांमधून मालकी हक्क दाखवावा
• मेहकर पोलीस स्टेशनचे आवाहन
• 70 दुचाकी वाहने
बुलडाणा,(जिमाका) दि. 9 : मेहकर पोलीस स्टेशनला बेवारस स्थितीत मिळून आलेले 70 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. त्या सर्व बेवारस वाहनांची निर्गती करणे असल्याने जप्त करण्यात आलेल्या वाहनावर ज्या कोणत्याही व्यक्तीचा हक्क असेल त्यांनी हे आवाहन प्रकाशित झाल्याचे तारखेपासून सात दिवसाचे आत पोलीस स्टेशन, मेहकर येथे येऊन बेवारस स्थितीत जप्त करण्यात आलेल्या वाहनांचे कागदपत्रे आणून आपला मालकी हक्क दाखवावा.
पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आलेले मालमत्तेवर कुणीही मालकी हक्क प्रस्थापित केला नाही, तर जप्त मालमत्तेची निर्गती करण्यात येणार आहे. तरी ज्या नागरिकांचे वाहन चोरी झालेले, हरविलेले बाबत तक्रारी असल्यास त्यांनी जिल्हा पोलीस दलाचे www.buldhanapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध आलेल्या वाहनांचे यादीची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.
12 ते 17 डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन
बुलडाणा,(जिमाका) दि.9 : राज्यातील कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्याचा परिणाम उद्योग, व्यवसायावर झाला होता. मात्र आता राज्यातील सदर उद्योग, व्यवसाय पुर्ववत स्थितीप्रमाणे कार्यरत होत आहेत. त्यामुळे रोजगाराच्या विविध संधी तसेच कोविडच अनुषंगाने विविध क्षेत्रात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात 12 ते 17 डिसेंबर 2021 दरम्यान राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यामध्ये नामांकित खाजगी उद्योजक, कंपनी, त्यांचे प्रतिनिधी विविध पदांसाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवतील. इयत्ता दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधारक पात्र पुरूष व महिला उमेदवारांना ऑनलाईन अप्लाय करून या ऑनलाईन मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. त्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या उपरोक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त पुरूष तसेच महिला उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्डचा युजर आयडी व पासवर्डचा वापर करून आपल्या लॉग ईन मधून अप्लाय करू शकतात. ऑनलाईन अप्लाय केलेल्या उमेदवारांच्या कंपनी, उद्योजक, एचआर प्रतिनिधी यांचेकडून ऑनलाईन मुलाखती घेवून निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे ऑनलाईन अप्लाय करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती प्रां यो बारस्कर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment