Thursday, 23 December 2021

DIO BULDANA NEWS 23.12.2021

शेतकरी कर्जमुक्ती योजनेने फुलविले शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य • महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना • 1 लक्ष 72 हजार 532 खातेदार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त नव्हे, तर चिंतामुक्त करण्यासाठी राज्य शासन महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवित आहे. योजनेच्या लाभासाठी आधार क्रमांक हा मुलभूत घटक आहे. योजनेमुळे पीक कर्जाचा डोंगर डोक्यावर असलेल्या शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. योजनेच्या अंमलबजावणीमुळे कर्जाचा भार डोक्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी जिल्हयात प्रभावीरित्या करण्यात आली. योजनेनुसार 1 एप्रिल 2015 पासून ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत व्याजासह मुद्दल असलेले 2 लाख रूपये पिक कर्ज माफ करण्यात आले आहे. योजनेतंर्गत जिल्ह्यात 1 लक्ष 72 हजार 532 खातेधारक लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट कर्ज खात्यात 1139.77 कोटी रूपये त्यांच्या जमा करण्यात आले आहे. यामुळे बळीराजावरील कर्जाचे ओझे निश्चितच उतरले आहे. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी केवळ आधार क्रमांक हा मुलभूत घटक मानण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे अधिकचे कागदपत्रे जमा न करता सहजरित्या या योजनेचा लाभ मिळाला. आपल्या जवळच्या महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रावर जावून शेतकऱ्यांना बँकेत कर्जमूक्ती लाभार्थ्यांच्या यादीत नाव असल्यास आधार प्रमाणीकरण करावयाचे होते. अशाप्रकारे जिल्ह्यात 1 लक्ष 76 हजार 033 शेतकऱ्यांनी आपली खाती आधार प्रमाणीकरण केली. त्यापैकी 1 लक्ष 72 हजार 532 कर्जदार खातेधारक शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. त्यानुसार आधार प्रमाणीकरण केलेल्या खात्यांमध्ये कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला. उर्वरित खात्यांमध्ये कर्जमुक्तीचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे उतरवून मागील दोन वर्षात शासनाने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आणण्यासाठी महत्तम प्रयत्न केले आहे. त्यामुळेच आज बळीराज्याच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे हलके होत बळीराजा आपल्या शेतीतून अधिकचे उत्पादन घेण्यासाठी सज्ज झाला आहे. *********** विविध खाजगी क्रीडा संस्था अथवा मंडळांनी अनिवासी क्रीडा प्रबोधिनी करीता प्रस्ताव सादर करावेत बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी निवासी प्रबोधिनीची योजना कार्यान्वीत झालेली आहे. ज्या ठिकाणी निवासी क्रीडा प्रबोधिनीची सोय उपलब्ध नाही किंवा विशिष्ट खेळांसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. अशा ठिकाणी पुढील विहीत अटी व सोयी सुविधा उपलब्ध असणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना अनिवासी क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्यास परवानगी देण्यात येईल. सदरची संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 अथवा मुंबई धर्मादाय आयुक्त अधिनियम 1960 च्या कायद्यानुसार नोंदणीकृत असावी. सदरच्या संस्थेने २ ते ५ वर्षे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले असावे. संस्थेची आर्थिक स्थिती उत्तम असावी त्या पृष्ठ्यर्थ मागील दोन वर्षाचे ताळेबंदपत्रक सनदी लेखापालाने प्राधिकृत केले असले पाहिजे. ज्या संस्थेने ज्या खेळासाठी अनिवासी क्रीडा प्रबोधिनीची मान्यता मागीतले आहे. त्याच्याकडे त्या खेळासाठीच्या सर्व पायाभूत व इतर सोयी सुविधा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे व या सोयी सुविधा त्या संस्थेकडे असल्याची खातरजमा संबंधित विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा प्रमाणित करतील. एका खेळासाठी एकापेक्षा जास्त संस्थांची मागणी आल्यास गुणवत्तेनुसार या प्रयोजनार्थ नेमलेली समितीने घेतलेला निर्णय अंतिम राहील. अधिक माहितीकरीता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दि.21 सप्टेंबर, 2013 रोजीच्या शासन निर्णयाचे अवलोकन करण्यात यावे. बुलडाणा जिल्ह्यातील आर्थिक सक्षम, सर्व क्रीडा सुविधा उपलब्ध असलेल्या, क्रीडा क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबविणाऱ्या तसेच प्राविण्यप्राप्त खेळाडू घडविणाऱ्या खाजगी क्रीडा संस्था व क्रीडा मंडळे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध असलेला फॉर्म घेऊन आपल्या क्रीडा मंडळ / क्रीडा संस्थेची सविस्तर माहिती भरुन दिनांक 03 जानेवारी, 2022 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे जमा करावी असे गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे. ****** प्रलंबित बदल अर्जांच्या निपटाऱ्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत विशेष मोहिम बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बुलडाणा येथे अवादांकीत प्रलंबित बदल अर्जांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी 13 ते 24 डिसेंबर दरम्यान विशेष मोहिम राबविण्यता आली. या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद बघता सदर मोहिम 30 डिसेंबर 2021 पर्यंत राबविण्यात येणार आहे. विशेष मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. तसेच विश्वस्तांनी आपले प्रलंबित अर्जांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन सहायक धर्मदाय आयुक्त प्र. नि आवळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. *****

No comments:

Post a Comment