Thursday, 30 December 2021

DIO BULDANA NEWS 30.12.2021

 


    अवैध दारू प्रकरणी 88 गुन्हे नोंद, 89 आरोपींना अटक; 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

  • डिसेंबर महिन्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

बुलडाणा, (जिमाका) दि. 30: राज्य उत्पादन शुल्क विभागार्फत विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे  तसेच अधीक्षक श्रीमती भाग्यश्री प.जाधव यांचे मार्गदर्शनाखाली 1 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये एकूण 88 गुन्हे नोंदविण्यात आले असून 82 वारस गुन्हे, 6 बेवारस गुन्हे नोंदवुन 89 आरोपींना अटक करण्यात आली.  तसेच 9 वाहनांसह एकुण 28 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  जिल्ह्यात 31 डिसेंबरच्या अनुषंगाने 29 डिसेंबर रोजी प्र. निरीक्षक एन. के मावळे, दुय्यम निरीक्षक आर. के फुसे, एस डी चव्हाण यांचे पथकाने शेंदला, ता. मेहकर येथील आरोपी इसम नामे संतोष सरदार यांचे राहते घरी दारूबंदी गुन्ह्याकामी छापा टाकला. त्याठिकाणी गोवा राज्य निर्मित व विक्रीसाठी असलेली, राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेली विदेशी दारू ब्ल्यु 7 एक्स्ट्रा स्मुथ व्हिस्की या ब्रँण्डच्या 750 मिलीच्या 36 बाटल्या, राज्यातील मॅकडॉल क्रमांक 1 व्हिस्की या ब्रँण्डच्या जुन्या बाटल्यामध्ये भरलेल्या बनावटी विदेशी मद्याच्या 223 सिलबंद बाटल्या, मॅकडॉल व्हिस्कीचे बनावट नवीन 1540 बुचे व 424 रिकाम्या जुन्या बाटल्या व एक हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल व आरोपीचे दोन मोबाईल असा एकूण 142815 रूपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी संतोष संपत सरदार ह. मु शेंदला ता. मेहकर व प्रमोद भुजंग सरदार रा. रामनगर, मेहकर यांना अटक करण्यात आली.  त्यांचेविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65, 80, 81, 83, 90 व 108 नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या कार्यवाहीत जवान प्रदीप देशमुख, अमोल सुसरे, गणेश मोरे, प्रफुल्ल साखरे, शरद निकाळजे व महिला जवान सौ शारदा घोगरे सहभागी होते.

  तसेच यापूर्वी 20 नोव्हेंबर रोजी दे. मही ते दे. राजा रस्त्यावरील हॉटेल निसर्ग धाब्यावर नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांमधील आरोपी अमोल तेजराव शिंगणे यांनी नशेमध्ये वाद घालून शिवीगाळ केल्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा व सरकारी कर्मचारी यांना मारहाण केल्याप्रकरणी कालपावेतो एकूण 40 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यत आलेली आहे.

  तसेच 27 डिसेंबर रोजी झालेल्या चिखली येथे मोठ्या स्वरूपातील बनावट मद्य व 29 डिसेंबर रोजी मेहकर येथील शेंदला या गावामध्ये गोवा राज्य निर्मित बनावट विदेशी मद्य पकडण्यात आले असून बनावट विदेशीा मद्याचा गुन्हे उघडकीस आल्याने जिल्ह्यात इतरत्र अशा प्रकारचे बनावट विदेशी मद्य वितरीत होण्याची दाट शक्यता आहे. तसेच बनावट मद्य सेवनामुळे यापूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणावर जिवितहानी होऊन शेकडो लोकांचा मृत्यू झालेला आहे. तसेच बनावट मद्यामुळे गंभीर स्वरूपाचे आजार तसेच गंभीर स्वरूपाचे अपंगत्व येण्याची संभावना असते किंवा अन्य दुर्घटना होण्याची दाट संभावना आहे. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाचा मद्यसेवन परवाना प्राप्त करून केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी व सेवन करावे. त्याचप्रमाणे पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच यांनी बनावट मद्य निर्मिती, वाहतुक, विक्री होत असल्यास या विभागास टोल फ्री क्रमांक 1800833333 वर किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 वर किंवा  excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी, असे आवाहन अधिक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी केले आहे.

                                                                                                                                *******

 

रब्बी हंगामासाठी पिक स्पर्धेचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 30: शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण याची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पातळीवर पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ 6 पिकांचा समावेश करण्यात आला आहे. पिकस्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पिकाखालील किमान 10 आर (0.10 हेक्‍टर) क्षेत्र आवश्यक आहे.

     तालुक्यामध्ये ज्या पिकाखालील लागवड क्षेत्र 1000  हेक्टर हून अधिक आहे, अशा सर्व पिकांकरिता पीक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पिकस्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान 5 स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून त्याकरिता भाग घेण्यासाठी रुपये 300 प्रति शेतकरी प्रति पिक या प्रमाणे प्रवेश शुल्क राहील. तालुका पातळीवर वरील स्पर्धेच्या निकालावरून पुढे जिल्हा, विभाग व राज्य पातळीवरील बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत.

    एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पूर्वी जिल्हाभर राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्य पातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते. आता ते काढून केवळ तालुका पातळीवर एकदाच प्रवेश शुल्क भरून पीक कापणी वरून आलेल्या उत्पादकतेच्या निकालानुसार त्याची तालुका जिल्हा विभाग व राज्य पातळीवर निवड केली जाणार आहे. रब्बी हंगामासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

पारितोषिकाचा रकमा

स्पर्धा पातळी सर्वसाधारण व आदिवासी गटात आहे. तालुका पातळीवर पहिले बक्षीस 5000, द्वितीय 3000 व तृतीय बक्षीस 2000 रूपये, जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस 10000 द्वितीय 7000 तृतीय 5000 रूपये, विभाग पातळीवर पहिले बक्षीस 25000 द्वितीय 20000 तृतीय 15000 व राज्य पातळीवर पहिले बक्षीस 50000 द्वितीय 40000 तृतीय 30000 रूपये असणार आहे.

*****

कोविडमुळे पालकत्व गमावलेल्या अनाथ बालकांना शासनाचा मदतीचा हात…

  • जिल्ह्यात 13 बालके अनाथ, 494 बालके एक पालक
  • अनाथ बालकांना 65 लाखांची मदत

बुलडाणा, (जिमाका) दि. 30: कोविडकाळात समाजातील प्रत्येक घटकाला मोठा फटका सहन करावा लागला. कोरोनामुळे समाजाला निरोशेने ग्रासले. या कठीण काळात प्रत्येकाला मदतीची गरज होती.  कोविड काळात मोठे, लहान कुणीही सुटले नाही. त्यामध्ये बालकांचे अपरीमीत नुकसान झाले. राज्यात अनेक बालकांनी आपले आई वडील गमाविले. त्यामध्ये जिल्ह्यातील बालकही सुटले नाही. कोरोनाने जिल्ह्यात 507 बालकांचे बालपण हिरावले. कोरोनाने आई व वडील दोन्ही पालक गेलेले अशी 13 बालके  अनाथ झाली.  तसेच 494 बालकांनी आपले आई किंवा वडील गमाविले. मात्र शासनाने कोविडमुळे पालकत्व गमाविलेल्या बालकांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली.

 जिल्ह्यात कोरोनाने अनाथ झालेल्या 13 बालकांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने 5 लाख रूपयंची मुदत ठेव महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून देण्यात आली. या मुदत ठेव प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे  यांचेहस्ते करण्यात आले. तसेच जिल्ह्यात कोरोना एक पालक झालेल्या बालकांची संख्या 494 असून यापैकी 338 बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आला. त्यांना प्रति महिना  1100 रूपये देण्यास मान्यता देण्यात आली. अशाप्रकारे शासनाने पालकत्वाची भूमिका साकारत कोविड काळात पालकत्व गमाविलेल्या बालकांचे संगोपण करण्याचा निर्णय घेतला. केवळ आर्थिक सहाय्य न देता शासनाने अशा बालकांच्या संपत्ती टिकविण्यासाठी कायद्याचा आधार घेत त्याचे संरक्षण करण्याचे कामही केले. तसेच अनाथ झालेल्या बालकांना शासनाने अनाथ प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ देण्यासाठी अनाथ प्रमाणपत्राचे वितरणही केले. त्यामुळे भविष्यात अशा बालकांना अनाथ प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांवर नियुक्ती मिळणे सोयीचे होणार आहे. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून शासनाने कोविड काळात पालकत्व गमाविलेल्या बालकांच्या पाठीशी उभे राहत माणूसकीचे मुर्तिमंत उदाहरण उभे केले आहे.

                                                                                *******

                      

कोरोना अलर्ट : प्राप्त 538 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 02 पॉझिटिव्ह

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 540 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 538 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 02 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 217 तर रॅपिड टेस्टमधील 321 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 536 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : छत्रपती नगर 1, मलकापूर शहर : 1, अशाप्रकारे जिल्ह्यात 2 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच स्त्री रुग्णालय बुलडाणा येथे देऊळगाव राजा येथील 50 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 746295 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86984 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86984 आहे.  आज रोजी 410 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 747306 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87674 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86984 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 14 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 676 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                                                                                *********

No comments:

Post a Comment