Monday, 6 December 2021

DIO BULDANA NEWS 6.12.21

 




विधान परिषद निवडणुक निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी

बुलडाणा, (जिमाका) दि.6 :  महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकोला - वाशिम - बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक 2021 जाहीर झाली आहे. या निवडणुकीचे निरीक्षक तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ दिलीप पांढरपट्टे यांनी जिल्ह्यातील शेगांव, जळगांव जामोद, नांदुरा व बुलडाणा येथील मतदान केंद्रांची पाहणी आज 6 डिसेंबर रोजी केली. दरम्यान विश्राम गृह बुलडाणा येथे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हाधिकारी निवडणूक गौरी सावंत, उपविभागीय अधिकारी श्री. हांडे आदींसमवेत निवडणूकीसंदर्भात चर्चाही करण्यात आली.

    निवडणूकीचे निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी  शेगांव, जळगांव जामोद येथील तहसील कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रांची तर नांदुरा येथील पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात असलेल्या मतदान केंद्राची पाहणी केली. त्याचप्रमाणे बुलडाणा येथे तहसिल कार्यालयातील मतदान केंद्रांची पाहणीसुद्धा त्यांनी केली. यावेळी त्यांनी मतदार संख्या, मतदान केंद्रांवरील सुविधा, मतदान केंद्रांवरील साहित्य, प्रशिक्षण आदींची माहिती संबधित अधिकाऱ्यांकडून घेतली. जळगाव जामोद येथे तहसीलदार शितल सोलाट, नांदुरा येथे तहसिलदार राहुल तायडे, बुलडाणा येथे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, तहसिलदार राहुल तायडे आदी  उपस्थित होते.

*****


माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक

डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची जिल्हा माहिती कार्यालयाला भेट

बुलडाणा, (जिमाका) दि.6 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज  जिल्हा माहिती कार्यालयास सदीच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या कार्याबाबत विचारणा करीत माहिती घेतली. त्याचप्रमाणे जिल्ह्याची भौगोलिक, सांस्कृतिक, साहित्यीक, कृषि, प्रशासकीय संपूर्ण माहिती घेतली.  याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, माहिती सहाय्यक निलेश तायडे यांनी महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.  भेटीप्रसंगी कार्यालयाची पाहणी करीत कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. यावेळी महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांचे विभागीय संपर्क अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला येथील प्रकल्प अधिकारी श्री. हिवाळे,   कार्यालयाचे कर्मचारी दुरमूद्रक चालक श्रीमती श्रेया दाभाडकर, प्रेमनाथ जाधव, शिपाई राम पाटील, वाहनचालक प्रमोद राठोड आदी उपस्थित होते.

                                                                                    *****

                                  जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कार्यशाळा व मेळावा उत्साहात

बुलडाणा, (जिमाका) दि.6 :  जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य अपंग (दिव्यांग) कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेव्दारे कोविड-19  च्या नियमांचे पालन करुन जागतिक दिव्यांग दिनानिमित्त एकदिवसीय कार्यशाळा व मेळावा  जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय  येथे उत्साहात पार पडला.  या  दिव्यांग कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती उपस्थिती होते, तर  प्रमुख पाहूणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. यास्मिन चौधरी, अधिक्षक  श्रीमती शामला खोत, तहसिलदार श्रीमती प्रिया सुळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड आदी मान्यवर उपस्थित होते.

                     कार्यशाळेचे प्रास्ताविक नायब तहसिलदार संजय बनगाळे यांनी दिव्यांग दिन हा 1992 पासून जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने आयोजीत करण्यात येतो असे सांगून जगातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 10 टक्के लोक हे दिव्यांग असून या वंचीत घटकाला समाजप्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन केले.

        दिव्यांग कार्यशाळेमध्ये जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी दिव्यांगांच्या बाबतीत मार्गदर्शन करुन जिल्हयातील दिव्यांग घटकाला न्याय देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध् असल्याचे प्रतिपादन केले. सोबतच कार्यशाळेचे प्रमुख पाहूणे अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे यांनी दिव्यांग कायदा 2016 व प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

     संचालन दिव्यांग संघटनेचे जिल्हा सचिव किसन केणे मानेगांवकर यांनी केले. कार्यशाळेला जिल्हा दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी सुरेश जगताप, बबन कासतकर, योगेश मुळे, अनंता पाटील, श्रीमती अपेक्षा जाधव, प्रविण डोंगरे, रामेश्वर जाधव, गजानन हिंगे, नंदकिशोर येसकर व जिल्हयातील सर्व कार्यालयातील दिव्यांग अधिकारी, कर्मचारी  मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच कार्यशाळा व मेळावा यशस्वी करण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व दिव्यांग व महसुल कर्मचारी यांनी प्रयत्न केले. आभार प्रदर्शन सुरेश जगताप यांनी केले.

                                                                                                ********

मोताळा नगरपंचायत निवडणूकीची आदर्श आचारसंहीता लागू

*मतदान केंद्रांपासून 200 मीटर आत कोणताही मंडप, कार्यालय उभारण्यास बंदी

*जागा मालकाच्या लेखी संमतीशिवाय पोस्टर्स, बॅनर लावू नये

बुलडाणा,(जिमाका) दि.6 : मोताळा नगर पंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने 22 डिसेंबर 2021 पर्यंत आदर्श आचार संहीता लागू करण्यात आली आहे. आचार संहीतेचा भंग होवू नये या दृष्टीकोनातून भारतीय दंड संहीता चे कलम 188, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144  मोताळा नगर पंचायत क्षेत्रात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार मतदान केंद्र, धार्मिक स्थळे, दवाखाने आणि शैक्षणिक संस्था यापासून 200 मीटरच्या आत कोणताही मंडप तथा कार्यालय उभारण्यास बंदी असणार आहे. तसेच जेथे एकाच मतदान केंद्राच्या ठिकाणी किंवा त्याच्या जागेत एकापेक्षा जास्त मतदान केंद्र असतील तेथे अशा मतदान केंद्रांच्या गटासाठी त्या जागेच्या 100 मीटरचे अंतरापलीकडे उमेदवाराचा केवळ एकच मंडपाला परवानगी आहे. उमेदवाराला ज्या ठिकाणी मंडप उभारावयाचा आहे त्या ठिकाणी 3 x 4.5 फुटाचा एक बॅनर वापरता येणार आहे. ज्या उमेदवाराला असे मंडप उभारावयाचे असतील अशा प्रत्येक उमेदवाराने ज्या मतदान केंद्रावर मंडप उभारावयाचे आहेत, त्या मतदान केंद्राचे नाव, अनुक्रमांक याबाबतची लेखी माहिती संबंधीत निवडणूक अधिकऱ्यांना आगाऊ कळवावी. असे मंडप उभारताना स्थानिक प्राधिकरणाकडून लेखी परवानगी घेतली पाहिजे. मतदारांना मतदान यादीतील अनुक्रमांक देण्याच्या एकमेव प्रयोजनाकरीताच केवळ या मंडपाचा वापर करण्यात आला पाहिजे. अशा मंडपामध्ये कोणत्याही परिस्थितीत गर्दी करण्यास मुभा असणार नाही. मतदान केंद्रातून मत देऊन बाहेर पडलेल्या व्यक्तीस मंडपात येण्याची मुभा असणार नाही. मंडप सांभाळणाऱ्या व्यक्तींनी मतदान केंद्राकडे जाणाऱ्या मतदारांच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण करण्यास किंवा त्यांना दुसऱ्या उमेदवारांच्या मंडपात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

     निवडणूकीत सर्व राजकीय पक्ष, संघ, संस्थाने उमेदवार, प्रतिनिधी यांनी सार्वजनिक जागा, शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे इमारत व जागेवरील लावलेली भिंतीपत्रके, फलक, पोस्टर्स, बॅनर्स कट आऊट त्वरित काढून टाकावीत. तसेच खाजगी जागा, इमारतीवरील संबंधीत जागा मालकाचे लेखी संमतीशिवाय लावलेली भिंतीपत्रके, फलक, पोस्टर्स, बॅनर्स, कट आऊट त्वरित काढून टाकावीत. मतदानाचे दिवशी मतदान केंद्र व परीसरात जमाव करण्यास, मतदारांना घाबरविण्यास, बळजबरीने मतदान करण्यास किंवा मतदान न करण्यास प्रवृत्त करणे, उमेदवाराच्या निवडणूक चिन्हाचे प्रदर्शन करणे, मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करणे, वाहनांचा प्रवेश, मतदान केंद्रामध्ये अनधिकृत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

   हा आदेश मतदानाशी संबंधीत अधिकारी, सर्व पोलीस अधिकारी, सुरक्षा पथकातील कर्मचारी, निवडणूक निरीक्षक यांना लागू असणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येणार आहे, असे मलकापूरचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी मनोज देशमुख यांनी कळविले आहे.

                                     

No comments:

Post a Comment