तक्रारींचा विहीत कालावधीत निपटारा करावा
- जिल्हाधिकारी
· जिल्हास्तरीय लोकशाही दिन
· 21 तक्रारी प्राप्त, तीन तक्रारी निकाली
बुलडाणा,दि.3 : लोकशाही दिन कार्यवाहीमधून सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निरसन केल्या जाते. या कार्यवाहीत लोकशाही दिन कक्षेत येणारे अर्ज स्वीकारण्यात येतात. अन्य अर्ज सामान्य तक्रार म्हणून घेतल्या जातात. अशा सर्व तक्रारींचा यंत्रणांनी विहीत कालावधीत निपटारा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती सुमन चंद्रा यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात लोकशाही दिन कार्यवाहीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, अति. जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी रामेश्वर पुरी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, कार्यकारी अभियंता श्री. शिखरे आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या लोकशाही दिन कार्यवाहीमध्ये एकूण 21 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या कार्यवाहीत तीन तक्रारी निकाली काढण्यात आल्या. सदर निकाली तक्रारी उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा, वरिष्ठ भूवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, आणि उपविभागीय अधिकारी बुलडाणा, तहसिलदार चिखली, कार्य अभियंता खडकपूर्णा प्रकल्प दे. राजा, तालुका कृषि अधिकारी चिखली व उपविभागीय अधिकारी खडकपूर्णा कालवे प्रकल्प चिखली यांच्याशी संबंधित आहे. लोकशाही दिन कार्यवाहीला संबंधित यंत्रणांचे अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
· 10 फेब्रुवारी 2020 पर्यंत मुदत
बुलडाणा,दि.3 : राज्यातील सामाजिक वनीकरणाच्या वनेत्तर क्षेत्रातील वृक्षारोपण व संवर्धन यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देवून गौरविण्यात येते. हा पुरस्कार महसलू विभाग स्तर, राज्य स्तरावर देण्यात येतो. पुरस्कार हा व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, ग्राम / विभाग/ जिल्हा या पाच संवर्गात देण्यात येतो.
तरी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार – 2018 साठी प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, पुणे यांचेकडून विहीत प्रपत्रामध्ये प्रस्ताव 10 फेब्रुवारी 2020 पर्यंत मागविण्यात आले आहे. पुरस्काराचे स्वरूप, अटी व शर्ती तसेच विहीत प्रपत्रामधील अर्ज विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, बुलडाणा तसेच संबंधित तालुक्याचे वनपरीक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग येथे उपलब्ध असून अधिकच्या माहितीसाठी सदर कार्यालयांची संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वनाधिकारी एस.ए पार्डीकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment