Friday, 14 February 2020

DIO BULDANA NEWS 14.2.2020

परीक्षा : 18 फेब्रुवारीपासून इयत्ता 12 वीची ; 3 मार्चपासून दहावीची
·        कॉपीमुक्त अभियान राबविणार, 10 भरारी पथके
·        इयत्ता 12 वी परीक्षेला 32 हजार 284 परीक्षार्थी
·        इयत्ता 10 वी ला 43 हजार 806 परीक्षार्थी
·        परीक्षा केंद्र आवारात कलम 144 लागू राहणार
बुलडाणा, दि. 14 : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता 12 वीची परीक्षा मंगळवार दि. 18 फेब्रुवारी 2020 पासून सुरू होत आहे. ही परीक्षा 18 मार्च 2020 पर्यंत चालणार आहे. माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 वी च्या परीक्षेला 3 मार्च 2020 पासून  प्रारंभ होणार आहे. परीक्षेमध्ये होणारे कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभाग यावर्षीसुद्धा कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविणार आहे. याबाबत सर्व शाळांचे मुख्याध्यापक व केंद्रचालकांची सभा घेण्यात आली असून शाळा-शाळांमधून पालक सभा घेवून जनजागृती करण्यात आली आहे. याबबत 11 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या जिल्हा दक्षता समितीची सभेत कॉपीमुक्त वातावरण परीक्षा पार पाडण्यासाठी  उपाययोजना करण्यात आल्या.
   इयत्ता 12 वी परीक्षेसाठी जिल्ह्यात 32 हजार 284 परीक्षार्थी आहेत. त्यामध्ये 30 हजार 986 नवीन परीक्षार्थी व 1298 पुर्नपरीक्षार्थी यांचा समावेश आहे. या परीक्षेसाठी 109 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून उपद्रवी केंद्र एस.ई.एस कनिष्ठ महाविद्यालय, साखरखेर्डा ता. सिं.राजा आहे. इयत्ता 10 वीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात 43 हजार 806 परीक्षार्थी असणार आहेत. त्यामध्ये नवीन परीक्षार्थी 40 हजार 336 व पुर्नपरीक्षार्थी 3470 यांचा समावेश आहे. या परीक्षेकरीता 159 परीक्षा केंद्र असणार ओहत. जनता हायस्कूल, कोथळी, ता. मोताळा हे परीक्षा केंद्र उपद्रवी केंद्र आहे.  
   या परीक्षांसाठी 16 परीरक्षक केंद्र आहेत. त्यामध्ये बुलडाणा, चिखली, अमडापूर, दे.राजा, साखरखेर्डा, मेहकर, लोणार, खामगांव येथे दोन, नांदुरा, मोताळा, मलकापूर, जळगांव जामोद, शेगांव, संग्रामपूर, धाड यांचा समावेश आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी 10 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. भरारी पथकामध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), विशेष महिला भरारी पथक, प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचा समोवश असलेले विशेष भरारी पथक, विभागीय व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी, उपविभागीय अधिकारी (महसूल विभाग), तहसिलदार व गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे.
    परीक्षा केंद्र आवारात कलम 144 लागू करण्यात येणार असून परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्राचे 100 मीटर परीसरात पालक व अनधिकृत व्यक्तींना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींविरूद्ध महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ माल प्रॅक्टीस ॲक्ट युनीव्हरसिटी बोर्ड ॲण्ड ऑदर एक्झामिनेशन ॲक्ट 1982 चे कलम 8 आणि भादविचे कलम 34 (188) आणि 217 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येतील. तसेच उपद्रवी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे.  प्रत्येक केंद्रावर नेमूण दिलेल्या पेपरचे दिवशी बैठे पथक स्थापित करून दररोज परीक्षेचा अहवाल जिल्हास्तरावर घेण्यात येणार आहे. या परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, असा निर्णयही दक्षता समितीने घेतला आहे, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                                    ****

माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांची सवलत
  • एकविध क्रीडा संघटनेमार्फत अहवाल 10 मार्चपर्यंत सादर करण्याचे आवाहन
 बुलडाणा, दि. 14 :  राज्याचे क्रीडा धोरण 2012 नुसार माध्यमिक शालेय प्रमाणपत्र (10 वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (12 वी) च्या परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याचे कार्यपध्दतीबाबत सुधारीत शासन निर्णयामधील परिशिष्ठ 4 व 5 अन्वये एकविध खेळाच्या जिल्हा व राज्यसंघटनांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांना स्पर्धा विषयक अहवाल दि. 10 मार्च 2020 पर्यंत सादर करावे.
     धर्मदाय आयुक्त यांच्याकडे संस्था नोंदणी अधिनियम 1860 किंवा मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अन्वये नोंदणी प्रमाणपत्र, जिल्हा क्रीडा संघटना राज्य क्रीडा संघटनेस संलग्न असले बाबतचे पत्र, जिल्हास्तर क्रीडा स्पर्धेचा संपुर्ण अहवाल, सहभागी संघाची यादी, सहभागी खेळाडूंची यादी.  (शासन निर्णयामधील परिशिष्ठ 10 नुसार), स्पर्धेची भाग्यपत्रीका, स्पर्धेचे अंतीम निकाल, स्पर्धा आयोजनाचे परिपत्रक, राज्य संघटनेचे अध्यक्ष / सचिव यांची सही व शिक्क्यासह नमुना स्वाक्षरी असलेले पत्र आदी प्रमाणे सर्व कागदपत्र एकविध क्रीडा संघटनांनी वेळेत सादर न केल्यास संबंधीत खेळाडूंचे प्रस्ताव गुणांकनास अपात्र राहतील व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत क्रीडा संघटनेची राहील. 
    गुण सवलतीकरीता आर्चरी, ॲथलेटीक्स, बॅडमिंटन, वेटलिफ्टींग, बास्केटबॉल, बॉक्सींग, सायकलींग, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टीक्स, हॅण्डबॉल, हॉकी, ज्युदो, व्हॉलीबॉल, लॉनटेनिस, रायफल शुटींग, टेबल टेनिस, तायक्वांदो, जलतरण, कुस्ती, कबड्डी, सॉफ्टबॉल, बेसबॉल, नेटबॉल, कराटे, स्क्वॅश, वुशू, नेहरु हॉकी, फुटबॉल, रग्बी, सेपक टकरा, मॉडर्न पेन्टॅथलॉन, सॉफ्ट टेनिस, मल्लखांब, खो-खो, बॉल बॅडमिंटन, कॅरम, बुध्दीबळ, क्रीकेट, थ्रोबॉल, रोलर स्केटींग/हॉकी, योगासन, किक बॉक्सींग, सिकई, रोलबॉल, डॉजबॉल, शुटींगबॉल, टेनिक्वाईट, आट्यापाट्या या खेळाच्या जिल्हा राज्य संघटनांनी अहवाल सादर करावे, असे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        *******
खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा गुण सवलतीसाठी  शाळांनी प्रस्ताव सादर करावे
·        31 मार्च 2020 पर्यंत मुदत
बुलडाणा, दि. 14 : माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा, विभाग अथवा राज्य स्तरावरील तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या, सहभागी झालेल्या खेळाडु विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भात सुधारीत शासन निर्णयान्वये कळविण्यात आले आहे.  त्यानुसार शालेय स्पर्धेतील खेळाडूंकरीता विहित नमुना अर्ज, आडवा चार्ट परिशिष्ट-ई, प्रत्येक खेळाडूंचे स्वतंत्र हॉल तिकीट, खेळाचे प्रमाणपत्र तसेच एकविध क्रीडा संघटनामार्फत खेळाडू असल्यास विहीत नमुना अर्ज, आडवा चार्ट परिशिष्ठ ई, प्रत्येक खेळाडूंचे स्वतंत्र हॉल तिकीट, मान्यता प्राप्त खेळाचे प्रमाणपत्र, शासन निर्णय दि. 20 डिसेंबर 2018 अन्वये परिशिष्ठ क्र.10 अन्वये वैयक्तीक व सांघिक खेळाडूंची माहिती जिल्हा अथवा राज्य संघटनेमार्फत सादर करणे आवश्यक आहे.  संबंधित शाळा/ कनिष्ठ महा विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य यांनी खेळाडूंचे परिपुर्ण प्रस्ताव विहीत नमुण्यात 31 मार्च 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत. 
     गुण सवलतीकरीता आर्चरी, ॲथलेटीक्स, बॅडमिंटन, वेटलिफ्टींग, बास्केटबॉल, बॉक्सींग, सायकलींग, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टीक्स, हॅण्डबॉल, हॉकी, ज्युदो, व्हॉलीबॉल, लॉनटेनिस, रायफल शुटींग, टेबल टेनिस, तायक्वांदो, जलतरण, कुस्ती, कबड्डी, सॉफ्टबॉल, बेसबॉल, नेटबॉल, कराटे, स्क्वॅश, वुशू, नेहरु हॉकी, फुटबॉल, रग्बी, सेपक टकरा, मॉडर्न पेन्टॅथलॉन, सॉफ्ट टेनिस, मल्लखांब, खो-खो, बॉल बॅडमिंटन, कॅरम, बुध्दीबळ, क्रीकेट, थ्रोबॉल, रोलर स्केटींग/हॉकी, योगासन, किक बॉक्सींग, सिकई, रोलबॉल, डॉजबॉल, शुटींगबॉल, टेनिक्वाईट, आट्यापाट्या या खेळांचा समावेश राहील.
            त्याअनुषंगाने सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षात खेळाडूंनी क्रीडा सवलतीचे वाढीव गुण सवलत मिळण्याकरीता ऑनलाईन प्रस्ताव तयार करुन, त्या प्रस्तावाची हार्ड कॉपी दोन प्रतीत प्राचार्य/मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीसह तसेच प्रमाणपत्र साक्षांकीत करुन शारीरिक शिक्षक यांचे मार्फतच 31 मार्च 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत असे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                                    ******
बाल न्याय मंडळाच्या बैठकीचे आज लोणार येथे आयोजन
  बुलडाणा, दि. 14 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील अधिकारान्वये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील नियमानुसार मंडळाची फिरती बैठक आयोजित करण्यात येते. येत्या शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 रोजी आशा बालकाश्रम, हिरडव रोड, लोणार येथे मंडळाच्या फिरत्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मंडळासमोर त्या- त्या भागातील विधी संघर्षग्रस्त बालकांची प्रकरणे सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे. तरी या बैठकीला संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह अधिक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे
                                                                                    *****
महिला लोकशाही दिनाचे 17 फेब्रुवारी रोजी आयोजन
बुलडाणा, दि.14 : महिलांना त्यांच्या तक्रारी दाखल करता याव्या म्हणून महिला लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी करण्यात येत असते. त्यानुसार सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
        ज्या महिलांना लोकशाही दिनात तक्रारी दाखल करावयाच्या आहेत त्यांनी बचत भवन येथे तक्रारी दाखल कराव्यात. न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी तसेच वैयक्तिक स्वरुपाची तक्रार निवेदन अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे. ज्या महिलांचे तालुकास्तरावर लोकशाही दिनात तक्रारीचे निरसन झाले नाहीत, त्याच तक्रारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनी सादर कराव्यात. तक्रार सादर करतेवेळी तालुका स्तरीय लोकशाही दिनात सादर केलेला अर्ज व टोकन क्रमांकही दाखल करावा, असे प्रसिद्धी पत्रकान्वये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी  कळविले  आहे.
                                                            *****
श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त शेगांव येथे आज मद्यविक्री बंदी
बुलडाणा, दि.14 : शेगांव शहर व शहराच्या सभोववतालच्या 5 कि.मी परीसरातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, परवाना कक्ष व बिअरबार श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त शनिवार, दि. 15 फेब्रुवारी 2020 रोजी बंद राहणार आहेत. मुंबई दारूबंदी कायदा, 1949 चे कलम 142 अन्वये कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधीत रहावी म्हणून हा आदेश लागू करण्यात आला आहे. तरी शेगांव परीसरातील मद्य विक्री बंद ठेवण्याची दक्षता घेण्यात यावी. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा उत्पादन शुल्क विभाग यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.
                                                                        *****
 ‘नोव्हेल करोना’ विषाणूचा कुक्कुट पक्षी व उत्पादनांशी काहीही संबंध नाही
  • अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पशुसंवर्धन उपायुक्त यांचे आवाहन
बुलडाणा, दि.14 : मागील काही दिवसात चिन देशात आलेल्या नोव्हेल करोना विषाणूचा प्रादुर्भावाने हजारो नागरिक मरण पावले आहेत. या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सामाजिक माध्यमांद्वारे समाजात कुक्कुट मांस व इतर कुक्कुट उत्पादने यांच्या आहारातील उपयोगाबाबत विविध अशास्त्रीय अफवा पसरविल्या जात आहे. तरी या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. नोव्हेल करोना या विषाणूचा कुक्कुट मांस व कुक्कुट उत्पादने यांच्याशी कुठलाही संबंध नाही. याचा मानवीय आहारामध्ये उपयोग पुर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावे.
   कुक्कुट मांस व उत्पादने यांच्या सेवनामुळे मानवामध्ये नोव्हेल करोना विषाणू संक्रमीत झाल्याचे संदर्भ नाहीत. आपल्याकडे चिकन व मटन उकळून, शिजवून सेवन केले जात असल्यामुळे त्या तापमानात कुठल्याही प्रकारचे विषाणू जिवंत राहत नाही. तरी ग्राहकांनी सोशल मिडीयावर विपर्यास केलेल्या बातम्या, माहिती व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी.जी बोरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        *****
गांव आपत्ती व्यवस्थापन आराखडा प्रशिक्षण उत्साहात
  • यशदाकडून देण्यात आले प्रशिक्षण
बुलडाणा, दि.14 : यशवंतरावज चव्हाण विकास प्रशासन प्रबोधीनी (यशदा) पुणे येथील आपत्ती व्यवस्थापन केंद्र व जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने गांव आपत्ती व्यवस्थापन आराखडा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हाभर नुकताच राबविण्यात आला. या कार्यक्रमातंर्गत मलकापूर, खामगांव, सिंदखेड राजा, जळगांव जामोद, मेहकर, बुलडाणा, चिखली, नांदुरा, शेगांव, लोणार, मोताळा तहसिल कार्यालयात प्रशिक्षण उत्साहात पार पडले.
   हा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, आपत्ती व्यवस्थापन केंद्र यशदा पुणे येथील संचालक कर्नल व्ही. एन सुपनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी डॉ. सतीश पाटील, विवेक नायडू, लखन गायकवाड, अक्षय यांनी राबविला.  घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्याठिकाणचे तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, महसूल कर्मचारी आदींना प्रशिक्षीत करण्यात आले. या प्रशिक्षणात प्रात्याक्षिके, आराखडा, गटचर्चा, आपत्ती व्यवस्थापन आराखडा, धोका असुरक्षा व जोखीम मूल्यांकन, गाव आपत्ती व्यवसथापन आराखडा, आपत्ती व्यवस्थापन प्रात्याक्षिके यांचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांनी प्रयत्न केले, असे प्रकल्प अधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.
                                                                                    ********

No comments:

Post a Comment