Wednesday, 20 July 2022

DIO BULDANA NEWS 20.7.2022

 महिलांसाठी संगणक प्रशिक्षण नोंदणीस 30 जुलैपर्यंत मुदतवाढ

बुलडाणा, दि. 20 : महिलांकरिता कौशल्य विकासाचा संगणक अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत दि. 23 जुलै 2022 पर्यंत होती. सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रवेशासाठी आता दि. 30 जुलै 2022 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार वाढीव मुदतीत नोंदणी करू शकतील.

जिल्हाधिकारी अमरावती, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि नवगुरूकुल फाऊंडेशन फॉर सोशल वेलफेअरतर्फे कौशल्यातून जिवनोन्नतीकडे ‘आकांक्षा’ कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत महिलांकरीता ॲडव्हांस डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग विशेष अभ्यासक्रम खास महिलांकरीता तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय आणि विकास प्रबोधिनी, अमरावती या संस्थेमध्ये राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकासावर भर देण्यात येणार आहे. प्रशिक्षित आणि तज्‍ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच नामांकीत कंपनी, स्टार्टअपमध्ये रोजगाराची संधीसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

              महिलांसाठी हे प्रशिक्षण नि:शुल्क आणि निवासी स्वरूपाचे आहे. सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 18 महिने असणार आहे. सदर कालावधीत महिला उमेदवारांकरीता नि:शुल्क प्रशिक्षण, निवास आणि भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारांना प्रशिक्षण संपेपर्यत लॅपटॉप देण्यात येणार आहेत. सदर प्रशिक्षण हे अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या महिला उमेदवारांकरीता आयोजित केले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ जिल्ह्यातील रहिवाशी असणाऱ्या महिला उमेदवारांना होणार आहे. महिला उमेदवार ही 17 ते 28 या वयोगटातील असावी. शैक्षणिक पात्रता कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण, आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांचे पालक शासकीय सेवेत नसावेत. यात आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणाची प्रवेश परीक्षा नोंदणी दि. 5 जुलै 2022 पासून सुरू झाली आहे. प्रशिक्षण प्रवेशाकरीता ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षा दि. 10 ते 30 जुलै 2022 आणि ऑफलाईन परीक्षा दि. 7 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात येणार आहे.  सदर प्रशिक्षणासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दि. 30 जुलै 2022 पर्यंत नोंदणी करू शकतील.

          सदर प्रशिक्षण हे महिलांकरीता देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर महिलांना नामांकित कंपनी, स्टार्टअपमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक आणि गरजू महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. प्रशिक्षणाबाबत अधिक माहितीसाठी नंदू मेहेत्रे मो. क्र. 9975704117 आणि श्री. शफीउल्ला सय्यद मो. क्र. 7620378924 तसेच कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 07262-242642 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000





क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण

बुलडाणा, दि. 20 : जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे विविध शालेय आणि इतर क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण मंगळवार, दि. 19 जुलै रोजी पार पडले. जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी मार्गदर्शन केले.

जिल्ह्यातील बुलडाणा, मोताळा, मलकापूर, खामगाव, चिखली, देऊळगाव राजा तालुक्‍यातील तालुका क्रीडा स्पर्धा संयोजक, विविध विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, संगणक चालक उपस्थित होते.  दुपारच्या सत्रात नांदुरा, शेगांव, सिंदखेड राजा, संग्रामपूर, जळगाव जामोद, मेहकर, लोणार येथील क्रीडा संयोजकांनी प्रशिक्षण घेतले.

          ऑनलाईन प्रशिक्षणात श्री. जाधव यांनी डिजीटल इंडिया, पेपरलेस कामकाज आदीबाबत माहिती दिली. क्रीडा स्पर्धांसाठी ऑनलाईन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. तसेच क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्याकरीता संबंधित शारीरिक शिक्षण शिक्षक, मार्गदर्शकांना करावयाची कसरत, सर्व संबंधित खेळाडूंचे कागदपत्रे सांभाळणे आणि खेळाडूंचे जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरापर्यंत प्रत्येक वेळी नवे ओळखपत्र तयार करणे आदी बाबी ऑनलाईन पद्धतीमुळे बंद होणार आहेत. 

एकदा शाळेची नोंदणी, खेळाडूंची नोंदणी अचूक झाल्यानंतर पुन्हा नोंदणी आणि ओळखपत्राची गरज भासणार नाही. यामुळे शारीरिक शिक्षण शिक्षक आणि मार्गदर्शकांवरील ताण कमी होईल. तसेच खेळाडूंची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. तसेच क्रीडा स्पर्धा उत्कृष्टपणे पार पाडणे सोईचे होईल. असे सांगितले.

प्रशिक्षणासाठी क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, रविंद्र धारपवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे, वरिष्ठ लिपीक विजय बोदडे, विनोद गायकवाड, कैलास डूडवा, भिमराव पवार, कृष्णा नरोटे, गणेश डोंगरदिवे, गोपाल गोरे यांनी सहकार्य केले.

00000








जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेला सुरुवात

          बुलडाणा, दि. 20 : क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, बुलडाणा यांचे संयुक्त विद्यमाने, सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली यांचे संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांचे हस्ते पार पडले.

यावेळी जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव एन. आर. वानखेडे, मुकेश बाफणा, शेख अहेमद शेख सुलेमान (छब्बुभाई), दिलीप हिवाळे, आर. एस. काझी उपस्थित होते.

श्री. जाधव यांनी कोरोनामुळे जिल्ह्यातील खेळाडू स्पर्धेपासुन वंचित होते.  यावर्षीपासून सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेमुळे खेळाडूंमध्ये उत्साह संचारला आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा, संघ, खेळाडूंनी सर्व स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

स्पर्धेसाठी सहकारी विद्या मंदिर, बुलडाणा, स्कुल ऑफ स्कॉलर्स, मलकापूर याच्या मधील पहिला सामन्यामध्ये 3-0 गोलनी सहकार विद्या मंदिरचा संघ विजयी झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये यशोधाम पब्लिक स्कुल, मलकापूर 1-0 गोलने विजयी झाली.  अंतिम सामना सहकार विद्या मंदिर विरुद्ध यशोधाम पब्लिक स्कुल यांच्यात होऊन सहकार विद्या मंदिर संघ विजयी झाला. हा संघ अकोला येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.  तिसऱ्या क्रमांकासाठी शारदा ज्ञानपीठ संघाने टाय ब्रेकमध्ये 3-2 नी स्कुल ऑफ स्कॉलरच्या संघावर विजय संपादन केला.

स्पर्धेला पंच म्हणून सकीब चौधरी, आकीब खान, उजेर खान, आशीष सोनुने, मोहसीन शेख, फव्वाद अहमद, सय्यद निसार काम पाहिले. गुरूवार, दि. 21 जुलै2022 रोजी 17 वर्षाआतील मुला, मुलींच्या स्पर्धा होणार आहेत. 

स्पर्धेचे सूत्रसंचालन स्पर्धा संयोजक, राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी केले. मनोज श्रीवास यांनी आभार मानले.  विजयी आणि उपविजयी संघांना प्रमाणपत्र देण्यात आले.

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक राहुल औशलकर, जावेद खान, स्वप्नील साळुंके, विनायक क्षिरसागर, गणेश सुधाकर जाधव तसेच कार्यालयाचे क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, रविंद्र धारपवार, वरिष्ठ लिपीक विजय बोदडे, जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती व्यवस्थापक सुरेशचंद्र मोरे, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, भिमराव पवार, कृष्णा नरोटे, गणेश डोंगरदिवे, गोपाल गोरे यांनी पुढाकार घेतला.   पोलीस प्रशासन आणि जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयाचे डॉ. राजपूत व त्यांची संपुर्ण टिमचे सहकार्य लाभले.

00000

मध केंद्र योजनेसाठी अर्ज आमंत्रित

          बुलडाणा, दि. 20 : खादी आणि ग्रामोद्योग मंडळातर्फे मध केंद्र योजना राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वैयक्तिक मधपाळ यासाठी जिल्ह्यातच प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अर्जदार हा साक्षर असावा, वय 18 वर्षांपेक्षा अधिक असावे लागणार आहे. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रगतशिल मधपाळसाठी महाबळेश्वर येथे 20 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. किमान दहावी उत्तीर्ण आणि वय 21 वर्षे असावे लागणार आहे. स्वत: किंवा कुटुंबातील व्यक्तीकडे किमान एक एकर शेती असावी. तसेच मधशाळा पालन आणि प्रजनन आणि मधोत्पादनाबाबत प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी. केंद्र चालक संस्थांसाठी महाबळेश्वर येथे 20 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नोंदणीकृत संस्था आणि एक एकर शेती किंवा 1 हजार चौरस फुट इमारत असावी. संस्थेकडून मधशाळा पालन आणि प्रजनन आणि मध उत्पादनाबाबत प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी. या सर्व घटकांसाठी प्रशिक्षणापूर्वी 50 टक्के स्वगुंतवणूक भरावी लागणार आहे.

लाभार्थींची निवड झाल्यानंतर प्रशिक्षणापूर्वी उद्योग सुरू करण्यासंबंधी बंधपत्र लिहून द्यावे लागणार आहे. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. तसेच मधमाशा कॉलनी व मेलीफेरा मधपेट्या भांडवली स्वरूपात मंडळाने निश्चित केलेल्या पुरवठादाराकडून पुरवठा केला जाणार आहे. या योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, मार्कलिस्ट, शेतीचा सातबारा, नमुना आठ, दोन फोटो सादर करावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

गौण खनिज वाहतुकीच्या वाहनाला

जीपीएस यंत्रणा लावण्यासाठी मुदतवाढ

बुलडाणा, दि. 20 : अवैध उत्खनन आणि वाहतुकीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील गौण खनिज वाहतूक करणारे वाहतूकदार, खाणपट्टाधारक आणि क्रशर धारक यांनी रविवार, दि. 31 जुलै 2022 पर्यंत गौण खनिज वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवावी. जीपीएस यंत्रणा बसविलेली नसल्यास संबंधित वाहनावर कार्यवाही केली जाणार आहे.

गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी वाहतुकीच्या सनियंत्रण व देखरेख करण्यासाठी ‘महाखनिज’ (mahakhanij) ही संगणकीय प्रणाली लागू करण्यात आली आहे.  वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ॲटोमोटीव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड 140 आयआरएनएसएस प्रमाणके असलेले जीपीएस यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे. यामुळे वाहनांचे रियल टाईम मॉनिटरिंगद्वारे अवैध उत्खननास आळा घालणे शक्य होणार आहे. जीपीएस यंत्रणा दि. 31 जुलै 2022 पर्यंत महाखनिज प्रणालीशी लिंक करणे आवश्यक आहे. जीपीएस यंत्रणा महाखनिज प्रणालीशी लिंक न केल्यास वाहनाकरीता ईटीपी जनरेट होणार नाही. ईटीपी क्रमांकाशिवाय केलेली वाहतूक अवैध समजण्यात येईल. अशा वाहनांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. याची सर्व खनिजपट्टाधारक, परवानाधारक, यशस्वी लिलावधारक व गौणखनिज वाहतुकदार यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment