Monday, 18 July 2022

DIO BULDANA NEWS 18.7.2022

 

पीकविमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पिक पाहणी नोंद सक्तीची नाही

बुलडाणा, दि. 18 : राज्यात सन 2022-23 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबवण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पिक पाहणी नोंद सक्तीची नसल्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी कळविले आहे.

खरीप 2022 मध्ये या योजनेत भाग घेण्याची अंतिम मुदत दि. 31 जुलै 2022 आहे. शासनाच्या ई-पीक पाहणीमध्ये पीक पेऱ्याची नोंद घेण्याची कार्यवाही दि. 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होत आहेत. पीकविमा योजनेत सहभाग घेण्यासाठीही पीक पाहणीची नोंद आवश्यक असल्याबाबत काही ठराविक शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. पीकविमा योजनेत भाग घेत असताना काही वेळेस पिकाचा विमा, काढलेले पीक व प्रत्यक्ष शेतात असलेले पीक यामध्ये तफावत आढळते. त्यामुळे शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहतो. शेतकर्‍यांनी शेतात घेतलेले पीक व विमा हप्ता भरताना नोंदवलेले पीक यामध्ये काही तफावत आढळल्यास शेतकर्‍यांनी पीकपाहणीमध्ये केलेली नोंद ही अंतिम ग्रहीत धरण्यात येईल, असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे पीकविमा योजनेत सहभाग घेत असताना ई-पीक पाहणीमध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही. सदर शेतकरी स्वयंघोषणा पत्राद्वारे पीकविमा योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतो. मात्र दि. 1 ऑगस्ट 2022 नंतर त्यांनी ई-पीक पाहणीमध्ये आपल्या पिकाची नोंद करावी, असे आवाहन कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी केले आहे.

00000





जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक युवा कौशल्य दिन साजरा

*जिल्हाधिकाऱ्यांनी साधला युवकांशी संवाद

बुलडाणा, दि. 18 : बुलडाणा येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलडाणा यांच्यातर्फे ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ साजरा करण्यात आला. जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा नियोजन सभागृहात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची” बैठक पार पडली.

जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विष्णू बचाटे, उपव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. लोकरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील, बुलडाणा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रकाश खुळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. मुकुंद सर, देऊळगाव राजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ज्ञानेश्वर पवार, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर, कौशल्य विकास अधिकारी प्रमोद खोडे आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवाडानिमित्त जिल्हा कौशल्य विकास कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील उमेदवारांनी सहभाग नोंदविला. यात प्रतिक्षा उत्तम दांडगे - प्रथम, कैलास प्रकाश अवचार - द्वितीय, चंचल गजानन तायडे - तृतीय आणि स्वाती संमिद्रा झिने - उत्तेजनार्थ क्रमांक मिळविल्याबद्दल जिल्हाधिकारी यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे जिल्हास्तरीय फॅशन शोचे आयोजन करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंजली हिवाळे, गायत्री चव्हाण, रोशनी गायकवाड या विद्यार्थीनींचाही जिल्हाधिकारी यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्राचे वितरण करून गौरविण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम योजनेतील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या दत्तात्रय हॉस्पीटल ॲण्ड मेटर्निटी होम डोनगाव प्रशिक्षण संस्थेतील विशाल संजय डगर, सोहेल शाह कासम शाह, शेख जहीर शेख सत्तार या उमेदवारांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. त्याचसोबत संस्थेच्या संचालक संगीता संजय धाडकर यांचाही उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी यांनी उमेदवारांनी जास्तीत जास्त कौशल्यविषयक योजनांचा लाभ घेवून देशाच्या विकासात हातभार लावण्याचे आवाहन केले. श्री. बचाटे यांनी जागतिक युवा कौशल्य दिनाची पार्श्वभूमी सांगितली. श्री. पाटील यांनी व्यवसायाभिमुख कौशल्यांची ओळख याबाबत मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा उद्योग केंद्रातील विविध योजनांबाबत माहिती दिली. उद्योग, व्यवसायासाठी कोणती कौशल्ये असावीत, याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा समन्वयक पुरूषोत्तम अंभोरे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी आवश्यक कागदपत्रे, योजनेचे स्वरूप, अर्जाची पद्धत आदीबाबत लाभार्थींना माहिती दिली. प्रांजली बारस्कर यांनी जागर करीअरचा, जागर तरूणाईचा, जागर कौशल्यांचा या विषयावर युवक, युवतींना मार्गदर्शन केले. आपण आपले ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, आईवडिलांचे परिश्रम लक्षात घेता आपण स्वावलंबी बनावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सुमारे 250हून अधिक प्रशिक्षणार्थी युवक व युवती उपस्थित होते. सदर कार्यक्रमामागील भूमिका व हेतू प्रांजली बारस्कर यांनी प्रास्ताविकतून मांडली. प्राचार्य श्री. खुळे यांनी आभार मानले.

00000

शेतपिकाचे नुकसान झाल्यास 72 तासाच्या आंत कळवावे

*विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना आवाहन

बुलडाणा, दि. 18 : स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान व या जोखमीच्या बाबी अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी शेत सर्वे नंबरनुसार बाधित पिकव बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप, संबंधित विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक, कृषी व महसूल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळविताना सर्वे नंबर आणि नुकसानग्रस्त क्षेत्र तपशिल कळविणे बंधनकारक आहे, असे कृषी विभागाने कळविले आहे.

बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी  प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पिक संरक्षण मिळण्यासाठी मुदतीपूर्वी नजीकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.

कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा किंवा न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकरी योजनेत सहभागासाठी इच्छूक नसल्यास तसे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या आत 7 दिवस आधीपर्यंत देणे आवश्यक आहे. जे शेतकरी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत, त्या सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता कपात करून योजनेत सहभागी करून घेण्याबाबत बँकेमार्फत कार्यवाही केल्या जाणार आहे.

योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विमा कंपनी शेतकरी विमा हप्ता आणि केंद्र व राज्य शासनाकडून विमा अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झाल्यानंतर पीक पेरणी, लावणी पूर्व नुकसान भरपाई, हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान, स्थानिक आपत्ती या जोखमीच्या बाबींकरिता नुकसान भरपाईची पूर्तता करतील. त्याचप्रमाणे उत्पन्नाच्या आकडेवारीवर आधारीत  आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई ही जोखमीच्या बाबींकरिता नुकसान भरपाईची पूर्तता केंद्र आणि राज्य शासनाकडून विमा अनुदान अंतिम हप्ता झाल्यानंतर करेल.

विमा योजनेंतर्गत विविध जोखीमींतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून निश्चित केले जाते. हंगामात घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगातून प्राप्त होणाऱ्या सरासरी उत्पन्नाची तुलना ही उंबरठा उपत्पन्नाशी करून हंगामाच्या शेवटी नुकसान भरपाई निश्चित करण्यात येईल. योजनेत सहभागासाठी नजीकच्या उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बँक आपले सरकार सेवा केंद्र यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एन. एम. नाईक यांनी केले आहे.

विम्याचा हप्ता आणि संरक्षीत रक्कम

पिक विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता रक्कम प्रति हेक्टर खालीलप्रमाणे – खरीप ज्वारी : विमा संरक्षीत रक्कम 32,125, हप्ता 642.50रूपये (प्रति हेक्टर), मका : विमा संरक्षीत रक्कम 35,598, हप्ता 711.96 रूपये, तुर : विमा संरक्षीत रक्कम 36,802 हजार, हप्ता 726.04 रूपये, मुग : विमा संरक्षीत रक्कम 25,817, हप्ता 516.34 रूपये, उडीद : विमा संरक्षीत रक्कम 26,025, हप्ता 520.50 रूपये, सोयाबीन : विमा संरक्षीत रक्कम 55,500, हप्ता 11,110 रूपये आणि कापूस पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 59,983, हप्ता 2999.15 रूपये राहणार आहे.

*******

पोस्टातर्फे पाच वर्षाआतील बालकांसाठी आधार काढण्यासाठी मोहिम

बुलडाणा, दि. 18 : डाक विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सहाय्याने पाच वर्षाच्या आतील बालकांचे नवीन आधार कार्ड काढण्याची मोहिम जानेवारी 2022 पासून सुरू करण्यात आली आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी नजिकच्या पोस्टात जाऊन या सुविधेचा लाभ घ्यावा किंवा ग्रामीण डाक सेवक, पोस्टमनमार्फत ही सेवा घरपोच दिली जाते. या सुविधेमधून पाच वर्षापर्यतच्या बालकांचे आधारकार्ड काढता येतील. ही सुविधा डाक विभागामार्फत विनामुल्य पुरविली जाते. त्यासाठी कोणतेही दर आकारले जात नाही. या सुविधेचा लाभ नागरिक घरपोच पोस्टमन, ग्रामीण डाक सेवक यांच्यामार्फत घेऊ शकता असे डाकघर अधीक्षक गणेश अंभोरे यांनी कळविले आहे.

00000

पवित्रा ट्रेडींग कंपनीविरूद्ध शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल

*शेतकऱ्याची तीन कोटी 41 लाखांनी फसवणूक

बुलडाणा, दि. 18 : चिखली येथील पवित्रा ट्रेडींग कंपनीने शेतकऱ्यांचा शेतमाल विकत घेऊन त्यापोटी मालाचे पैसे दिले नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.

याबाबत चिखली येथील सरस्वती नगरातील सुनिल लक्ष्मणराव मोडेकर यांनी 18 जुन 2022 रोजी केलेल्या लेखी तक्रारीनुसार पवित्रा ट्रेडींगचे संतोष बाबुराव रानमोडे, रा. चिखली, अशोक समाधान म्हस्के, रा. गांगलगाव, निलेश आत्माराम सावळे, रा. गांगलगाव यांनी तूर, सोयाबीन, चना, भुईमूग शेंगा असा शेतमाल विकत घेऊन शेतकऱ्याला मालाचे पैसे बँक खात्यात जमा करण्यात येईल, असा विश्वास संपादन केला. यातील तीनही शेतमाल खरेदी करणाऱ्यांनी नियोजितपणे कट रचून तीन कोटी 41 लाख 42 हजार 504 रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणी भांदवी 406, 409, 420, 120 ब, 34 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरचा गुन्हा जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या आदेशाने नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक अनिल बेहेरानी, सहायक पोलिस निरीक्षक अशोक जायभाये करीत आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी संतोष रानमोडे, रा कोडगाव, ता. परंडा, जि. उस्मानाबाद याला उस्मानाबाद जिल्ह्यातून 14 जुलै रोजी अटक करण्यात आली.

याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पवित्रा ट्रेडींग कंपनी, एमआयडीसी चिखली येथे शेतमाल जादा दराने घेण्याचे आमिष देऊन खरेदी केलेल्या शेतमालाची रक्कम अदा न करता फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळ उपलब्ध असलेल्या कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त

माजी सैनिकांसाठी मेळाव्याचे आयोजन

बुलडाणा, दि. 18 : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आजी, माजी सैनिकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी तालुकास्तरावर मेळावे आयोजित करण्यात आले आहे. याचा सैनिकांच्या कुटुंबियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

            गौरवशाली पर्वानिमित्त 12 मार्च 2021 पासून 15 ऑगस्ट 2023पर्यंत आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल आहे. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीच्या भावना कायम राहाव्यात, त्याचे संस्मरण व्हावे, या उद्देशाने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्ह्यात तालुकास्तरावर माजी सैनिकांचे मेळावे आयोजित करण्यात आले आहे. दि. 19 जुलै 2022 रोजी तहसिल कार्यालय, मोताळा, दि. 20 जुलै 2022 रोजी तहसिल कार्यालय, जळगाव जामोद, दि. 22 जुलै 2022 रोजी तहसिल कार्यालय, देऊळगाव राजा, संग्रामपूर येथे मेळावे घेण्यात येणार आहे.

माजी सैनिकांनी आपल्या अडचणी सोडविणे आणि समस्यांच्या निराकरणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, यासाठी सर्वप्रथम जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment