Friday, 29 July 2022

DIO BULDANA NEWS 29.7.2022

 

राज्यात  पिक स्पर्धेसाठी 11 पिकांचा समावेश

*शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 29 : शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात  पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी भात, ज्‍वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर, सोयाबीन, भुईमुग,  सुर्यफुल, मुग आणि उडीद या ११ पिकांचा समावेश समावेश करण्यात आला आहे. 

तालुक्यामध्ये ज्या पिकाखालील लागवड क्षेत्र एक हजार हेक्टरहून अधिक आहे, अशा सर्व पिकांकरिता पिक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पिक स्पर्धेसाठी तालुकापातळीवर सर्वसाधारण गटातील किमान १० स्पर्धक, तर आदिवासी गटातील किमान ५ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक आहे. त्याकरिता भाग घेण्यासाठी 300 रुपये प्रति शेतकरी प्रति पिक या प्रमाणे प्रवेश शुल्क राहणार आहे.

एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पूर्वी जिल्हाभर राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा आणि राज्य पातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते. आता ते वगळून केवळ तालुकापातळीवर एकदाच प्रवेश शुल्क भरून पीक कापणी वरून आलेल्या उत्पादकतेच्या निकालानुसार त्याची तालुका पातळीवर निवड केली जाणार आहे. मागील दोन वर्षांत ज्‍या शेतकऱ्यांची तालुकापातळीवर प्रथम दोन क्रमांक आलेले शेतकरी जिल्‍हापातळीवर पिक स्‍पर्धेमध्‍ये भाग घेण्‍यास पात्र असतील. तालुका आणि जिल्‍हा पातळीवरील पिकस्‍पर्धा स्‍वतंत्र होणार आहे. खरीप  हंगामातील मुग आणि उडीद पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. 31 जुलै 2022 आणि इतर पिकांमध्‍ये भात, ज्‍वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या पिकासाठी दि. 31 ऑगस्‍ट 2022 आहे. यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि संचालक विकास पाटील यांनी केले आहे.

00000

हरवलेल्या व्यक्ती बाबत आवाहन



संतोष राजेभाऊ गिरी

बुलडाणा, दि. 29 : मेहकर येथील संतोष राजेभाऊ गिरी, वय 44 वर्षे, रा. सोनाटी, ता मेहकर, जि. बुलडाणा ही व्यक्ती हरविल्याची तक्रार मेहकर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

संतोष राजेभाऊ गिरी हे दि. 15 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता सोनाटी येथून दवाखान्यात उपचार करुन येतो असे कारण सांगून घरुन निघुन गेला आहे. ते अद्याप परत आले नाही. त्याचा वर्ण सावळा, उंची पावणे सहा फुट अंदाजे, डोक्यावर अर्ध टक्कल पडलेले, उजव्या कानाखाली मस, अंगामध्ये पांढरे हिरवट रंगाचे फुल बाह्याचे शर्ट, काळपट रंगाचा फुलपॅंट, गळ्यामध्ये पांढरा रुमाल, पायात पॅरागॉन स्लीपर चप्पल घातलेली आहे. उपरोक्त वर्णनाची व्यक्ती कुणाला आढल्यास त्यांनी पोलिस ठाणे मेहकर येथील 07262-224536 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

हरवलेल्या व्यक्ती बाबत आवाहन



जया ज्ञानेश्वर गिरी

बुलडाणा, दि. 29 : मेहकर येथील जया ज्ञानेश्वर गिरी, वय 22 वर्षे, रा. सोनाटी, ता मेहकर, जि. बुलडाणा ही महिला हरविल्याची तक्रार मेहकर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

जया ज्ञानेश्वर गिरी ही दि. 15 एप्रिल 2022 रोजी दुपारी 12 वाजता सोनाटी येथून बॅकेतून पैसे काढुन येते असे कारण सांगून घरून निघून गेली आहे. ती अद्याप परत आलेली नाही. तिचा वर्ण रंग गोरा, उंची 5 फुट 2 इंच, अंगात गुलाबी फिक्कट रंगाची साडी, पायात काळ्या रंगाची चप्पल घातलेली आहे. उपरोक्त वर्णनाची महिला कुणाला आढल्यास त्यांनी पोलिस ठाणे, मेहकर येथील 07262-224536 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

हरवलेल्या व्यक्ती बाबत आवाहन



विनोद आश्रुबा नवले

बुलडाणा, दि. 29 : मेहकर येथील विनोद आश्रुबा नवले, वय 37 वर्षे, रा. उकळी, ता. मेहकर, जि. बुलडाणा ही व्यक्ती हरविल्याची तक्रार मेहकर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

विनोद आश्रुबा नवले ही व्यक्ती ट्रक क्रमांक एमएच 16 सीसी 9433 वर कामाला जात आहे असे सांगून घरुन निघुन गेला आहे. त्याचा वर्ण सावळा, उंची अदाजे 5 फुट 3 इंच, बांधा मजबूत, अंगात चौकडीचे लाल पांढरा पट्टे असलेले फुलबाह्याचे शर्ट, काळ्या रंगाची पॅंट, पायात साधी चप्पल, पिवळे पट्टे असलेली घातेले आहे. त्याचा मोबाईल क्रमांक 9322426626 संपर्क केला असता संपर्क होत नाही. उपरोक्त वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास त्यांनी पोलिस ठाणे मेहकर येथील 07262-224536 या दूरध्वनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Thursday, 28 July 2022

DIO BULDANA NEWS 28.7.2022

 


सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग करावा

*प्रत्येक घरी वीज पोहचविण्याचे लक्ष

*ऊर्जा क्षेत्रातील देशाची दैदिप्यमान प्रगती

बुलडाणा, दि. 28 : केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालय, राज्य शासन आणि ऊर्जा विभागातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत ‘उज्वल भारत, उज्वल भविष्य,  पॉवर @2047’ चा ऊर्जा महोत्सव लोणारच्या तहसील कार्यालयच्या सभागृहात पार पडला.

शिवनी जाटचे सरपंच राजेश गवळी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून तालुकाच्या प्रभारी तहसीलदार श्रीमती परळीकर, महावितरण अकोला परिमंडाळाचे मुख्य अभियंता अनिल डोये उपस्थित होते.

वीज ही विकासाची जननी आहे. ऊर्जा क्षेत्रात देशाने टाकलेले प्रगती पाऊल बघून प्रत्येक भारतीयांचा ऊर आनंदाने भरून निघेल असे नेत्रदीपक आयोजन  करण्यात आलेले होते.

          प्रभारी तहसीलदार श्रीमती परळीकर यांनी अमृत महोत्सवी वर्षाच्या उपस्थितांना शुभेच्छा देत ऊर्जा महोत्सवाकरिता या जागतिक स्तरावर नावारूपास आलेल्या शहरात नियोजनबद्ध आयोजन करून लोणारवासीयांना ग्राहकांचे हक्क, विविध योजनांची माहिती, देशाची ऊर्जा क्षेत्रातील प्रगती याबाबत माहिती दिली त्याबद्दल आभार मानले.

सक्षम भारत घडविण्यासाठी २०४७चे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून असलेली आव्हाने  समर्थपणे पेलण्याची ताकद आपल्याकडे आहे. येत्या काही वर्षांत सरकारच्या प्रभावी नियोजनाचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी ग्वाही देत शेतकऱ्यानी जास्तीत जास्त सोलर ऊर्जेचा वापर वाढवावा, असे आवाहन अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता यांनी  केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा योजनेचे लाभार्थी श्री. गवळी यांनी अखंडित वीज पुरवठ्यामुळे उत्पन्नात भर पडून जमिनीचा मोबदला वाढला असल्याचे सांगितले.

देशाने ऊर्जा क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीवर चित्रफितीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. यावेळी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. लाभार्थीनी विजेमुळे त्यांच्या जीवन आणि उत्पन्नात पडलेली भर याबाबत मनोगत व्यक्त केले.

महावितरणचे अधीक्षक अभियंता तथा नोडल अधिकारी संजय आकोडे यांनी प्रास्ताविक केले. विकास बांबल यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला पावर फायनान्स कॉर्पोरेशनचे उपमुख्य व्यवस्थापक तरुणकांत गुप्ता, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री बद्रीनाथ जायभाये, श्री अजितपालसिंग दिनोरे, श्री प्रशांत गायकवाड उपस्थित होते.

यावेळी वीज ग्राहकांसाठी असलेले कायदे, ग्राहकांचे हक्क आदीबाबत जनजागृती महावितरणचे गणेश बंगाळे आणि चमूने लघु नाटिकेद्वारे केली. तसेच शाहीर गणेश कदम यांनी लोककलापथकाद्वारे महावितरणच्या विविध योजना समजून सांगितल्या. मनीष कदम यांनी आभार मानले.

देशाने ऊर्जा क्षेत्रात केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी ऊर्जा महोत्सवाचे आयोजन दि. 25 ते 30 जुलै या कालावधीत करण्यात येत आहे. देश ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करीत आहे. सीओपी-21मध्ये अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज उत्पादनाचे 2030 पर्यंत एकूण उत्पादन क्षमतेपैकी 40 टक्के ऊर्जा निर्माण करण्याचे उद्दिष्ट होते. परंतू हे लक्ष नियोजित वेळेच्या ९ वर्षाअगोदरच गाठले आहे. भारत ऊर्जा निर्यात करणारा देश ठरला आहे. मागणीपेक्षा विजेचे उत्पादन अधिक असल्याने २०१५ मध्ये सरासरी १२.५ तास वीज उपलब्ध होती, ती आज देशात सरासरी २२.५ तास उपलब्ध झाली आहे. लदाख ते कन्याकुमारी आणि कच्छ ते म्यानमार पर्यंत जोडणारे एकात्मिक ग्रीड निर्माण करण्यात आले.

00000

शिक्षणाचा अधिकारातील चौथ्या टप्प्याची प्रवेश प्रक्रिया सुरु

* दि. 30 जुलै 2022 पर्यंत करावे लागणार प्रवेश

बुलडाणा, दि. 28 : बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन 2022-23 या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सद्यास्थितीत सुरु आहे. निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून चौथ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रवेश दि. 30 जुलै 2022 पर्यंत करावे लागणार आहे.

प्रतिक्षा यादीतील चौथ्या टप्प्यातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या टप्प्यात दि. 30 जुलै 2022 पर्यंत विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करता येतील. चौथ्या टप्प्यातील प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी त्यांच्या लॉगीनमधून ॲलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून, विहित मुदतीत तालुकास्तरावरील कागदपत्रे पडताळणी समिती केंद्रावर सादर करून प्रवेश निश्चित करुन घ्यावे. जिल्ह्यातील सर्व शाळा, पालक आणि तालुकास्तरावतील संबंधित यंत्रणांनी नोंद घेवून, अधिकाधिक बालकांना प्रक्रियेत सहभागी करावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पगारे यांनी केले आहे.

00000

Wednesday, 27 July 2022

मंत्रिमंडळ निर्णय - लोणार सरोवराचे जतन, संवर्धन आणि विकास करणार

                                         लोणार सरोवराचे जतनसंवर्धन आणि विकास करणार

 

लोणार सरोवराच्या पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी 369 कोटी 78 लाख रुपयांच्या विकास आराखड्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

यासंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. या कामांची विभागीय आयुक्तअमरावती यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी केली जाईल. यामध्ये लोणार सरोवर परिसरात मंदिराचे जतननिसर्ग पर्यटनवन्यजीव संरक्षणसरोवराभोवती पदपथरस्त्यांचे भूसंपादनअतिक्रमण धारकांचे पुनर्वसन अशी विविध कामे विविध कामे केली जातील.

नियोजन विभागाने मंजूर आराखडयातील कामनिहाय आवश्यक निधी लोणार सरोवर विकास समितीकरीता पीएलए खाते तयार करुन त्यामध्ये वर्ग करण्यात येईल. तथापि, ज्या विभागांना राज्याच्या अर्थसंकल्पा व्यतिरिक्त इतर स्त्रोतातून निधी प्राप्त होतो ज्याची तरतूद नियोजन विभागामार्फत करणे शक्य नाही तसेच तांत्रिक कारणामुळे निधी लोणार सरोवर विकास समितीकडे वर्ग करण्याची बाब शक्य नसल्यास, अशा प्रकरणी संबंधित विभागाने आराखडयातील कामे प्रचलित पध्दतीनुसार समितीच्या देखरेखीखाली करण्यात येईल.

DIO BULDANA NEWS 27.7.2022

 

पिंप्री गवळी येथील विनापरवाना किटकनाशकांची विक्री

*कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

*5 लाख 83 हजारांचे किटकनाशके, रासायनिक खते जप्त

बुलडाणा, दि. 27 : मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी येथील विनापरवाना किटकनाशकांची विक्री करणाऱ्या साईरामा हार्डवेअरवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा घालून कारवाई केली. या कारवाईत 5 लाख 83 हजारांचे किटकनाशके, रासायनिक खते जप्त करण्यात आले आहे.

 कृषी विभागाच्या भरारी पथकाला पिंप्री गवळी येथे विनापरवाना किटकनाशकांची विक्री सुरु असल्याबाबत माहिती मिळाली. त्याआधारे भरारी पथकाने सापळा रचून साईरामा हार्डवेअर या दुकानावर छापा घातला. विनापरवाना आणि अवैधरित्या किटकनाशके विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे दुकान मालक रोशन गजानन पाटील याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण इंगळे यांनी धामनगाव बढे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

या दुकानातील एकूण 5 लाख 83 हजार 527 रूपये किमतीचे किटकनाशके आणि रासायनिक खते जप्त करण्यात आली. भरारी पथक प्रमुख कृषी विकास अधिकारी अनिसा महावळे, मोहीम अधिकारी विजय खोंदील, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अरुण इंगळे, मोताळा तालुका कृषी अधिकारी सचिन मोरे, पोलीस ठाण्यचाचे मोहनसिंग राजपूत, गजानन भराड यांनी ही कारवाई केली.

शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी किटकनाशके, बियाणे आणि खते अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्राकडूनच खरेदी करुन पक्की पावती घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे.

00000





ऊर्जा महोत्सवाचे दिमाखात आयोजन

*प्रत्येक घरी वीज पोहचविण्याचे लक्ष

*ऊर्जा क्षेत्रातील देशाची दैदिप्यमान प्रगती

बुलडाणा, दि. 27 : केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालय, राज्य शासन आणि ऊर्जा विभागातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत ‘उज्वल भारत, उज्वल भविष्य,  पॉवर @2047’ चा ऊर्जा महोत्सव जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडला.

आमदार संजय गायकवाड अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते उपस्थित होते.

आमदार श्री. गायकवाड यांनी, वीज ही विकासाची जननी आहे. आम्ही लहानपणी भारनियमन अनुभवले आहे. मात्र आज ती परिस्थिती राहिलेली नाही. हे आपल्या देशाचे ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीचे पाऊल आहे, असे सांगितले.

जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी २०४७ पर्यंत सक्षम भारत घडविण्यासाठी असलेली आव्हाने समर्थपणे पेलण्याची ताकद आपल्याकडे आहे. प्रधानमंत्री यांच्या मनातील भारत नक्कीच घडवला जाईल, असे सांगितले.

देशाने ऊर्जा क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीवर चित्रफितीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. यावेळी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. लाभार्थीनी विजेमुळे त्यांच्या जीवन आणि उत्पन्नात पडलेली भर याबाबत मनोगत व्यक्त केले.

महावितरणचे अधीक्षक अभियंता तथा नोडल अधिकारी संजय आकोडे यांनी प्रास्ताविक केले. विकास बांबल यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, पावर फायनान्स कॉर्पोरेशनचे उपमुख्य व्यवस्थापक तरुणकांत गुप्ता, उपस्थित होते.

यावेळी वीज ग्राहकांसाठी असलेले कायदे, ग्राहकांचे हक्क आदीबाबत जनजागृती महावितरणचे गणेश बंगाळे आणि चमूने लघु नाटिकेद्वारे केली. तसेच शाहीर गणेश कदम यांनी लोककलापथकाद्वारे महावितरणच्या विविध योजना समजून सांगितल्या. मनीष कदम यांनी आभार मानले.

देशाने ऊर्जा क्षेत्रात केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी ऊर्जा महोत्सवाचे आयोजन दि. 25 ते 30 जुलै या कालावधीत करण्यात येत आहे. देश ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करीत आहे. सीओपी-21मध्ये अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज उत्पादनाचे 2030 पर्यंत एकूण उत्पादन क्षमतेपैकी 40 टक्के ऊर्जा निर्माण करण्याचे उद्दिष्ट होते. परंतू हे लक्ष नियोजित वेळेच्या ९ वर्षाअगोदरच गाठले आहे. भारत ऊर्जा निर्यात करणारा देश ठरला आहे. मागणीपेक्षा विजेचे उत्पादन अधिक असल्याने २०१५ मध्ये सरासरी १२.५ तास वीज उपलब्ध होती, ती आज देशात सरासरी २२.५ तास उपलब्ध झाली आहे.

00000

मच्छिमार, मत्स्य कास्तकारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी

*सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांचे आवाहन

बुलडाणा, दि. 27 : देशातील असंघटीत कामगारांना सुरक्षा आणि फायदे देण्यासाठी केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार विभागाच्या पोर्टलवर मत्स्यव्यवसाय कामगार मत्स्य विक्रेते, मत्स्यव्यवसाय व मत्स्यव्यवसाय अनुषंगाने कामात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या कामगारांनी नोंद करावी, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त म. वि. जयस्वाल यांनी केले आहे.

श्रम आणि रोजगार विभागाच्या register.eshram.gov.in या पोर्टलवर संबंधित कामगाराचे आधार कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँकेचा तपशिल आदी माहितीसह मत्स्य कामगारांना स्वतः नोंदणी करता येणार आहे. तसेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये मोफत नोंदणी करता येणार आहे.

सदर नोंदणीसाठी मत्स्यव्यवसाय, मत्स्य शेती क्षेत्रातील मच्छिमार आणि मत्स्य मूल्य साखळी (Fisheries Value Chain) आदीमध्ये समाविष्ठ असलेले मत्स्य कामगार यांची वयमर्यादा 16 ते 59 वर्ष असावी, तसेच जे कर्मचारी राज्य विमा (ESI), कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO) यांचे सभासद नसावेत. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs) आणि शासन सेवेतील कर्मचारी आणि आयकर भरणारे नसावेत, अशी आवश्यक पात्रता आहे.

केंद्र शासनाने पोर्टल तयार केल्यामुळे असंघटीत मजूर, मच्छिमार, मत्स्यशेती व मत्स्यव्यवसाय अनुषंगाने कामांमध्ये समावेश असलेला मजूर आदींची माहिती आधार क्रमांकाशी जोडून अपलोड करण्यात येते. जे कामगार या पोर्टलवर नोंदणी करतील त्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत सुरक्षा विमा योजनेतून व्यक्तीचा मृत्यू झाल्यास दोन लाख रूपये आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास एक लाख रुपये देण्यात येतात. असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा फायदे या पोर्टल मार्फत देण्यात येणे शक्य होईल. या पोर्टल वरील डेटाबेस, अचानक उद्भवणाऱ्या आणि राष्ट्रीय महामारीसारख्या परिस्थितीमध्ये सहाय्यासाठी वापरता येणे शक्य होईल. सदर पोर्टलमध्ये नोंदणी झाल्यानंतर मत्स्य कामगारांना याप्रमाणे लाभ होण्यास मदत होईल.

याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी इंद्रजित देवकत्ते यांनी केले आहे.

00000

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

*28 ते 29 जुलै 2022 दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळावा

बुलडाणा, दि. 27 जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा दि. 28 जुलै ते दि. 29 जुलै 2022 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

          या मेळाव्यात नामांकीत खासगी उद्योजक, कंपनी, त्यांचे प्रतिनिधी 75 पदांसाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवतील. तसेच पात्र पुरुष आणि महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल.

          कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, आयटीआय पास, पदवीधर, पुरुष आणि महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी आणि पासवर्डचा उपयोग करुन आपल्या लॉगीनमधून ऑनलाईन अर्ज  करावा.

या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन (एम्पलॉयमेंट) कार्ड युझर आयडी आणि पासवर्डचा उपयोग करुन आपल्या लॉगइनमधून ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ शकतील.

पात्र पुरुष आणि महिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदांसाठीही ऑनलाईन अर्ज करु शकतील. उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्डचा युझर आयडी आणि पासवर्ड वापरुन आपल्या लॉगीनमधून ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करताना अडचणी आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कार्यालयाच्या 07262-242342, 299342 या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त  प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000

मोताळा येथील नवीन प्रशासकीय इमारतीत वृक्षारोपण

बुलडाणा, दि. 27 : मोताळा येथे नव्याने बांधकाम होत असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात मंगळवार, दि. 26 जुलै 2022 रोजी 250 वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पार पडला.

आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने औद्योगिक प्रशिक्षण  संस्था, सामाजिक वनीकरण आणि तससिल कार्यालय यांच्या वतीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाला तहसीलदार डॉ. सारिका भगत, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. बी. थोरात, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. डी. गंगावणे, मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे, नायब तहसिलदार श्री. गौर, वनपाल पी. पी. राजपूत, व्ही. पी. म्हस्के, शाखा अभियंता श्री. गायकवाड, तलाठी श्री. कऱ्हाळे उपस्थित होते.

वृक्षारोपन कार्यक्रम यशस्वीतेसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांनी वृक्षरोपण केले. वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. थोरात यांनी वृक्षलागवडीनंतर संगोपनाची आवश्यकता, तसेच पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवडीचे महत्व सांगितले. यावेळी उपस्थितांना वृक्ष लागवडी संदर्भात शपथ देण्यात आली.

00000

मोताळा आयटीआयमध्ये साहित्याची निविदा

बुलडाणा, दि. 27 : मोताळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आरओ वॉटर कूलर, कम्प्युटर, चेअर्स, जनरेटर शेड, बॅटरी आदी साहित्याचा पुरवठा करण्याकरीता दि. 31 जुलै 2022 पर्यंत बंद लिफाफ्यात‍ निविदा मागविण्यात आली आहेत. सदर निविदा शासकीय कामाकरिता मागविण्यात आली असल्याचे प्राचार्य एस. डी. गंगावणे यांनी कळविले आहे.

00000

राष्ट्रीय लोक अदालतीचे 13 ऑगस्ट रोजी आयोजन

बुलडाणा, दि. 27 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी दि. 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतीचा फायदा पक्षकारांनी घेऊन दाखल किंवा दाखलपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीद्वारे निकाली काढावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष स्वप्नील खटी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एच. एस. भुरे, जिल्हा वकिल संघाचे विजय सावळे यांनी केले आहे.

राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यासाठी पक्षकारांनी आणि संबंधितांनी नजिकच्या तालुका विधी सेवा समिती किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे संर्पक साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

लोकशाही दिनाचे 1 ऑगस्ट रोजी आयोजन

* मोबाईल क्रमांक 9021353670 वर तक्रारी कराव्यात

बुलडाणा, दि. 27 : जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. 1 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आले आहे.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येते. ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन दि. 1 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन पद्धतीने 9021353670 या मोबाईल क्रमांकावर पीडीएफ फाईल तयार करून तक्रारी द्याव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांना दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू असण्याची खातरजमा करावी.

तालुकास्तरावरील लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावीत. त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व, अपिल, सेवा आणि आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहित, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी आठ दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

00000

 

Tuesday, 26 July 2022

DIO BULDANA NEWS 26.7.2022

 जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी

गुरुवारी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम

बुलडाणा, दि. 26 : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, दि. 28 जुलै 2022 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेसाठी जिल्हा नियोजन समिती सभागृह तर पंचायत समितीसाठी संबंधित तहसील कार्यालयाचे सभागृहात आरक्षण काढण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 12 उपकलम (1), कलम 58(1)(अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियम 1996 नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभाग आणि निर्वाचण गण क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, स्त्रियांच्या आरक्षणासह राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढणे, तसेच आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करुन त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद, बुलडाणा साठी दुपारी दोन वाजता, तर पंचायत समिती, बुलडाणा साठी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे आरक्षण काढण्यात येणार आहे.

उर्वरित पंचायत समितीसाठी संबंधित पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहामध्ये दि. 28 जुलै 2022 रोजी आरक्षण काढण्यात येणार आहे. पंचायत समिती, चिखली दुपारी 3 वाजता, पंचायत समिती, देऊळगाव राजा सकाळी 11 वाजता, पंचायत समिती, सिंदखेडराजा दुपारी 3 वाजता, पंचायत समिती, मेहकर सकाळी 11 वाजता, पंचायत समिती, लोणार दुपारी 3 वाजता, पंचायत समिती, खामगाव सकाळी 11 वाजता, पंचायत समिती, शेगाव दुपारी 3 वाजता, पंचायत समिती, जळगांव जामोद सकाळी 11 वाजता, पंचायत समिती, संग्रामपूर दुपारी 3 वाजता, पंचायत समिती, मलकापूर सकाळी 11 वाजता, पंचायत समिती, नांदुरा दुपारी 3 वाजता, पंचायत समिती, मोताळा सकाळी 11 वाजता आरक्षण काढण्यात येणार आहे.

आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध दि. 29 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी, संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना दि. 29 जुलै 2022 ते दि. 2 ऑगस्ट 2022 या कालावधीत सादर कराव्यात लागतील.

जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीतील रहिवाशांना सदर सभेस उपस्थित रहावयाचे आहे ते आरक्षण सोडतीच्या ठिकाणी उपस्थित राहू शकतील, असे जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी कळविले आहे.

00000



प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रचार रथास सुरुवात

बुलडाणा, दि. 26 : प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी प्रचार रथास सोमवार, दि. 25 जुलै 2022 पासून सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी हिरवी झेंडी दाखविली.

यावेळी कृषि उपसंचालक विजन बेतीवार, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजीवनी कणखर, भारतीय कृषि विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक दिलीप लहाने यांच्यासह तालुका पीक विमा कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2022-23 अंतर्गत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम मुदत दि. 31 जुलै 2022 पर्यंत आहे. जिल्ह्यात सदर योजना राबविण्याकरिता भारतीय कृषि विमा कंपनी, स्टॉक एक्सचेंज टॉवर्स, वीसवा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई -400023, ई-मेल आयडी pikvima@aicofindi.com, टोल फ्री क्रमांक 1800 4195 004 या विमा कंपनीची शासनाकडून निवड करण्यात आली आहे. ही योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एैच्छिक स्वरुपाची आहे. तरी सदर योजनेचा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम योजनेत अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 26 : सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम राबवला जातो. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्रातर्फे करण्यात आले आहे. 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) ही योजना दि. 1 ऑगस्ट 2019 पासून सुरू करण्यात आली आहे. योजनेमध्ये 18 ते 45 वयोगटातील किमान सातवी उत्तीर्ण असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग सुरू करण्यासाठी 50 लाख रुपयांपर्यंत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध होण्याची सोय आहे. तसेच यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक या प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादेत अधिक 5 वर्षे सवलत देण्यात आली आहे.

या ऑनलाईन योजनेमध्ये ग्रामीण आणि शहरी घटकांना 15 टक्के, 25 टक्के, 35 टक्यांपर्यंत अनुदानाची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेसोबतच केंद्र शासनाची पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) अनुदानित योजना राबविली जाते. इच्छुकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राने केले आहे.

00000

Monday, 25 July 2022

DIO BULDANA NEWS 25.7.2022

                                             प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या

लाभासाठी 31 जुलैपर्यंत केवायसी करावी

*कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 25 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभाचा तिसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. ई-केवायसीशिवाय तिसरा हप्ता वितरीत करण्यात येणार नसल्याने या योजनेतील लाभार्थ्यांनी दि. 31 जुलै 2022 पर्यंत ई-केवायसी करावी, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबियांना दोन हजार रूपये प्रती हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात सहा हजार रूपये प्रती वर्षी लाभ थेट बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेतून राज्यातील 109.97 लाख लाभार्थ्यांना 20 हजार 187.04 कोटी रूपयांचा लाभ देण्यात आला आहे.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना सहजरित्या लाभ अदा करता यावा, यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांचे ई-केवायसी पडताळणी दि. 31 जुलै, 2022 पुर्वी पुर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. ही ई-केवासी पडताळणी दि. 31 जुलै, 2022 पर्यंत पुर्ण केलेल्या लाभार्थ्यांनाच पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर pmkisan.gov.in या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्रामार्फत ई-केवायसी पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहेत. या दोनपैकी स्वत:च्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची ई-केवायसी पडताळणी करता येणार आहे.

पीएम किसान पोर्टलवरील pmkisan.gov.in या लिंकद्वारे ई-केवासी करताना लाभार्थ्यांस त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीआधारे स्वत:चे ई-केवायसी पडताळणी करता येणार आहे. यासाठी कोणतीही फी आकारणी केली जाणार नाही. तसेच सामाईक सुविधा केंद्रामध्ये जाऊन लाभार्थी बायोमेट्रिक पद्धतीद्वारे ई-केवायसी पडताळणी करू शकतील. यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडून 15 रूपये प्रती लाभार्थी शुल्क आकारणी करतील.

राज्यात दि. 22 जुलै 2022 अखेर एकूण 61.33 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरीत लाभार्थ्यांनी स्वत: अथवा सामाईक सुविधा केंद्राच्या माध्यमातून त्यांची ई-केवायसी पडताळणी दि­ 31 जुलै 2022 पुर्वी पुर्ण करावे, असे आवाहन कृषि गणना उपआयुक्त विनयकुमार आवटे यांनी केले आहे.

00000

अग्निपथ योजनेंतर्गत जिल्ह्यातील युवकांसाठी

औरंगाबाद येथे अग्निपथ योजनेंतर्गत सैन्य भरती

*युवकांनी 30 जुलैपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 25 : अग्निपथ योजनेंतर्गत जिल्ह्यातील युवकांसाठी सैन्य भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही सैन्य भरती औरंगाबाद येथे दि. 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2022 पर्यंत होणार आहे. यासाठी दि. 30 जुलै 2022 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अग्निपथ योजनेंतर्गत औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रिडांगणावर पुरूषांकरिता ही भरती होणार आहे. यात अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लार्क, स्टोअर किपर, टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन दहावी पास, अग्निवीर ट्रेड्समन आठवी पास या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. यासाठी युवकांना joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील युवकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

रक्षाबंधनासाठी पोस्टाची विशेष व्यवस्था

बुलडाणा, दि. 25 : यावर्षीच्या रक्षाबांधनानिमित्त पोस्ट ऑफीसमार्फत राखी पाठविण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

यावर्षी पोस्ट ऑफिस मार्फत देश-विदेशात राखी पाठवण्याची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. राखी पाठविण्यासाठी पाकिटावर राखी टपाल’ नमूद करून अचूक पिन कोड लिहावा, नागरिकांनी आपल्या नजिकच्या पोस्ट ऑफिसमार्फत राखी, भेटवस्तू पाठविण्याच्या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक अधीक्षक गणेश अंभोरे यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यातील 12 ग्रामपंचायतींची शुक्रवारी आरक्षण सोडत

*आरक्षण कार्यक्रम जाहिर

बुलडाणा, दि. 25 : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 12 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत शुक्रवार, दि. 29 जुलै रोजी काढण्यात येणार आहे. यासाठीचा आरक्षण कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोग यांचे कार्यालयाचे सुधारणा आदेश ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक (सदस्य संख्या, प्रभाग रचना व आरक्षण) सुधारणा आदेश - 2022 आणि राज्य निवडणूक आयोग यांच्या पत्रानुसार बुलडाणा तालुक्यातील चिखला, दत्तापूर, ढालसावंगी, गिरडा, दहिद खुर्द, इरला, मौढाळा, रुईखेड, मायंबा, सव, सावळा, उमाळा, येळगांव या 12 ग्रामपंचायतीच्या मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतीसाठी आयोगाने दिलेल्या आदेशानुसार आरक्षण सोडत दि. 29 जुलै 2022 रोजी विशेष ग्रामसभा बोलावून तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेवार आरक्षणाची सोडत ही नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला आरक्षणानुसार आयोगाचे निर्देशानुसार कार्यक्रमानुसार काढण्यात येईल.

आरक्षण कार्यक्रमानुसार दि. 26 जुलै 2022 पर्यंत आरक्षणाची सोडत काढण्याकरिता विशेष सभेची सुचना देणे, दि. 29 जुलै 2022 रोजीपर्यंत विशेष ग्रामसभा बोलावून तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेवार आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. यात नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, महिला आणि सर्वसाधारण महिलानुसार आरक्षण काढण्यात येणार आहे. दि. 1 ऑगस्ट 2022  सोडतीनंतर प्रभागानिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्दी करणे, दि. 1 ऑगस्ट 2022 ते दि. 3 ऑगस्ट 2022 प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी राहणार आहे. दि. 10 ऑगस्ट 2022 रोजी उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देणे, दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस (नमुना-अ) जिल्हाधिकारी यांनी मान्यता देणे, दि. 17 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला (नमुना-अ) व्यापक प्रसिद्धी देण्यात येणार आहे, असे बुलडाणाचे तहसिलदार रुपेश खंडारे यांनी कळविले आहे.

00000