Wednesday, 9 October 2019

ELECTION NEWS DIO BULDANA 9.10.2019



लोकशाहीत दिलेल्या मताधिकाराचा उपयोग करून मतदानाचा टक्का वाढवावा
                                                - निवडणूक निरीक्षक डॉ. पी सुरेश बाबु

* बुलडाणा शहरात निघाली मतदार जनजागृती मॅरेथॉन रॅली
बुलडाणा, 9 :  लोकशाहीमध्ये मतदार हाच सर्वश्री आहे. प्रत्येक मतदाराने लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांना मिळालेला मताधिकार  हा वापरलाच  पाहिजे. मताधिकार उपयोगात आणून या विधानसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन  निवडणूक निरीक्षक डॉ.पी सुरेश बाबु यांनी आज 9 ऑक्टोंबर रोजी बुलडाणा शहरात निघालेल्या मॅरेथॉन रॅलीला संबोधित करताना केले.
   आज सकाळी जिजामाता प्रेक्षागार येथून बुलडाणा शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी शहरात मतदार जागृती अभियान अंतर्गत मॅरेथॉन रॅलीचे आयोजन आले होते. या मॅरेथॉन रॅलीला बुलडाणा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेश लोखंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून  रॅलीचा शुभारंभ केला. लोककलावंत विजय कदम यांनी मतदान जागृती अभियानाअंतर्गत लोककलेच्या माध्यमातून लोकगीते सादर केली. सदर मतदार जनजागृती रॅली जिजामाता प्रेक्षागार पासून संगम चौक, एसटी स्टॅन्ड, जांभरून रोड, सुवर्ण नगर या मार्गाने काढण्यात आली.
    रॅलीचा समारोप मुख्य निवडणूक निरीक्षक डॉक्टर सुरेश बाबु यांच्या हस्ते शासकीय विश्राम गृहाच्या परिसरात करण्यात आला. बुलडाणा विधानसभा निवडणूक निरीक्षक डॉ. पी सुरेश बाबु यावेळी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले,   आपल्या परिसरातील मतदारांमध्ये जागृती घडवून आणून 21 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी कशी वाढेल हे प्रत्येकाने बघावे . याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी राजेश्वर हांडे म्हणाले,  मतदारांनी निर्भयपणे मतदान करून मतदानाचा हक्क बजावावा तसेच 22-बुलडाणा विधानसभा मतदार संघातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही बळकट करावी.
  या रॅलीमध्ये प्रमुख्याने शिक्षण विभागाचे श्री. पाटील, उपशिक्षणाधिकारी श्री. वराडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी  श्री. वाघमोडे, नायब तहसीलदार श्री. पाटील यांच्या समवेत विविध शासकीय अधिकारी - कर्मचारी तथा बुलडाणा शहरातील राजीव गांधी मिलिटरी स्कूल, भारत विद्यालय, प्रबोधन विद्यालय, एडेड हायस्कूल , श्री शिवाजी विद्यालय,  जिल्हा परिषद विद्यालय आदींचे विद्यार्थी,  शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मतदार जागृती मॅरेथॉन रॅलीचे प्रास्ताविक तथा आभार प्रदर्शन नरेंद्र लांजेवार यांनी केले.
                                                                        *****



जळगांव जामोद तालुक्यातील आठवडी बाजारात मतदार जनजागृती
* सेल्फी पाँईटद्वारे मतदारांनी घेतल्या सेल्फी
 बुलडाणा, दि. 9 :  दसऱ्याच्या मुहूर्तावर आज जळगाव जामोद मतदार संघातील सर्वात मोठ्या आठवडी बाजारात असालगांव येथे ग्राम पंचायत, पंचायत समिती व महसूल विभागाच्या वतीने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आपट्याच्या पानांच्या चित्रावर मतदानाच्या बोटांची खूण असलेले छोटे कार्ड मतदारांना वाटप करण्यात आले.
    तसेच मतदान सेल्फी स्टँड  तयार करून प्रबोधन करण्यात आले. या सेल्फी पाँईटच्या माध्यमातून यावेळी अनेक मतदारांनी सेल्फी काढत मतदान करण्याचे आवाहन केले.  याशिवाय EVM मशीन व VVPAT चे प्रात्यक्षिक मतदारांना दाखविण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे, विस्तार अधिकारी श्री. मोरे, ग्रामसेवक धीरज मारोडे , तलाठी गजानन सरप, तलाठी श्रीकांत, मंडळ अधिकारी श्री भेलके दादा उपस्थित होते. याप्रसंगी बाजारात सर्व विक्रेते व ग्राहक यांच्यापर्यंत पोहचून त्यांना 21 तारखेला न चुकता मतदान करण्यासाठी प्रेरित करण्यात आले.
                                                                        ****


निवडणूक निरिक्षकांनी घेतला निवडणूकी तयारीचा आढावा
विविध ठिकाणी असलेल्या चेकपोस्टवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश
   बुलडाणा,दि.9 : विधानसभा निवडणूकीची मतदान प्रक्रिया निर्भयपणे पार पडण्यासाठी जिल्ह्यातील निर्माण करण्यात आलेल्या चेकपोस्टवर बारकाईने लक्ष ठेवावे. तसेच तपासणी करण्यात येणाऱ्या वाहनांची व्हिडीओग्राफी करावी, असे निर्देश निवडणूक निरिक्षकांनी 7 ऑक्टोंबर रोजी  दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय नियुक्ती केलेल्या निवडणूक निरीक्षकांनी बैठक घेतली.
   बैठकीला मेहकर, खामगांव व जळगांव जामोद मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक (सामान्य)  भंवरलाल मेहरा, मलकापूर व बुलडाणा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक डॉ पी सुरेश बाबु, चिखली व सिंदखेड राजा मतदारसंघ कार्यक्षेत्र असलले निवडणूक निरीक्ष ओमप्रकाश बुनकर, निवडणूक खर्च निरीक्षक कोमी शेट्टी मुरलीधर, कायदा व सुव्यवस्थेचे निवडणूक निरीक्षक संजय कुमार, जिल्हाधिकारी डॉ निरूपमा डांगे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ दिलीप पाटील- भुजबळ, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे आदी उपस्थित होते.
      याप्रसंगी निवडणूक निरिक्षक भंवरलाल मेहरा म्हणाले,  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी त्याचबरोबर दिव्यांग मतदारांना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी स्वीप कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. मतदानाच्या दिवशी मतदारांना सुट्टी अथवा सवलत देण्याचे निर्देश सर्व खाजगी आस्थापनांना देण्यात यावे. मतदान प्रक्रियेत कुठलीही अडचण उद्भवू नये, याकरीता सर्व कर्मचाऱ्यांना व्यवस्थित प्रशिक्षण द्यावे. सेक्टर ऑफिसर सोबत मास्टर ट्रेनर अथवा ईव्हीएम एक्सपर्ट ठेवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा. याकरीता त्यांचेकडून मतदानाचा फॉर्म भरुन घ्यावा. पेडन्युजवर बारकाईने लक्ष ठेवावे.
   कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक संजय कुमार म्हणाले,  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करावे. सर्व्हीस वोटरला विहित वेळेत मतपत्रिका पाठविण्याची व्यवस्था करावी. तसेच जिल्ह्यातील परवानाधारकांकडून शस्त्रात्रे जमा करावीत. प्रत्येक उमेदवाराच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवावे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पोलीस, परिवहन व राज्य उत्पादन शुल्क विभागाबरोबरच जिल्ह्यात नेमण्यात आलेले फ्लाईग स्कॉड, व्हीडीओ सर्व्हिलन्स टीम, स्थिर निगराणी पथके यांनी वाहनांची तपासणी करावी. निवडणूक यंत्रणेने उमेदवारांच्या सभा, बैठकांची माहिती घेऊन त्यानुसार पथकांची नेमणूक करावी.
    विना परवानगी कुठलीही सभा, बैठका होणार नाही याची दक्षता निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच प्रचाराच्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सुचनांही त्यांनी यावेळी केल्यात. तत्पूर्वी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी निवडणूक निरिक्षकांना जिल्ह्यातील कृषि, उद्योग, पर्यटन, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय घडामोडींच्या संक्षिप्त माहितीसोबतच जिल्हा प्रशासनाने निवडणूकीसाठी केलेल्या तयारीची तर पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील - भुजबळ यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त, चेकपोस्ट, अवैध दारु वाहतुक रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती निवडणूक निरिक्षकांना दिली. जि.प मुकाअ षण्मुगराजन यांनी स्वीप कार्यक्रमातंर्गत राबविण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती उपक्रमांची माहिती दिली. दरम्यान जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेली पुर्वपिठीका निवडणूक यावेळी संबंधित समित्यांचे प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                                                    ***



आपट्याच्या पानांच्या आकाराचे मतदार जनजागृतीच्या बॅचेसचे वाटप
* मोताळा तालुक्यात 61 ग्रामपंचायतींमध्ये उपक्रम
 बुलडाणा, दि. 9 :  दसऱ्याच्या मुहूर्तावर आपट्याच्या पानांना सोने म्हणून देण्यात येते. या प्रथेला मतदार जन जागृतीसाठी उपयोग करण्याचे मोताळा तालुक्यातील पंचायत समिती प्रशासनाने ठरविले. त्यानुसार स्वीप कार्यक्रमातंर्गत मोताळा तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींमध्ये  आपट्याच्या पानांच्या आकाराचे मतदार जनजागृतीचे बॅचेस तयार करून वाटप करण्यात आले. सोने म्हणून देण्यात येणाऱ्या आपट्यांच्या पानांऐवजी मतदार जनजागृतीचे बॅचेस देण्यात येवून मतदार जनजागृती करण्यात आली. मोताळा तालुक्यातील कोऱ्हाळा बाजार, पान्हेरा, परडा, शिरवा आदींसह तालुक्यातील अन्य गावांमध्ये बॅचेसचे वितरण करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे तालुकयात कौतुक करण्यात येत आहे. बॅचेस वितरण करताना अधिकाऱ्यांनी 21 ऑक्टोंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन केले.
      *************


माध्यम कक्षास निवडणूक निरीक्षक ओमप्रकाश बुनकर यांची भेट
बुलडाणा, दि. 9 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात मतदारसंघ निहाय निवडणूक  निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक तयारी बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्ष, माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती कक्षास सिंदखेड राजा व चिखली मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक ओमप्रकाश बुनकर यांनी 7 ऑक्टोंबर रोजी भेट दिली. यावेळी  जिल्हा माहिती अधिकारी एस. के बावस्कर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतिष जाधव,  माहिती सहाय्यक निलेश तायडे, पाटबंधारे विभागाचे श्री. राजपूत यांची उपस्थिती होती.
    याप्रसंगी निवडणूक निरीक्षक श्री. बुनकर म्हणाले,  उमेदवारांकडून देण्यात येणाऱ्या पेड न्यूजवर बारकाईने लक्ष ठेवावे. कुठल्याही परिस्थितीत पेड न्यूज शोधून उमेदवारांना नोटीस  द्यावीत. तसेच त्याचा खर्च निवडणूक खर्चात समाविष्ट करावा. त्याचप्रमाणे विधानसभा मतदारसंघात स्थापन करण्यात आलेल्या मिडीया कक्षांनी स्थानिक केबल चॅनेल, स्थानिक वर्तमानपत्रांवर बारकाईने लक्ष ठेवावे. त्याचा अहवाल जिल्हा समितीकडे पाठवावा.
    ते पुढे म्हणाले, मतदार जनजागृतीसाठी व्यवस्थित प्रसिद्धी करावी.  यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री. बावस्कर यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात आलेले मॅग्नीफिशंट महाराष्ट्र, निवडणूक पुर्वपिठीका देवून निरीक्षकांचे स्वागत केले. यावेळी माध्यम कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.
                                                                                    ******

No comments:

Post a Comment