मतदार जनजागृतीसाठी माध्यम संस्थांना
निवडणूक आयोगाकडून पुरस्कार
बुलडाणा, दि. 30 : लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव असणाऱ्या निवडणुकांत मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी जाणीवजागृती करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने भारत निवडणूक आयोगातर्फे गौरविले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत मुद्रित माध्यम, दूरचित्रवाहिनी, रेडिओ आणि ऑनलाईन (इंटरनेट)/सोशल मीडिया या चार गटात हे पुरस्कार देण्यात येतील.
लोकशाही बळकटीकरणासाठी 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकांत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात जनजागृती, सर्वसामान्यांमध्ये मतदान जागृती व मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना 25 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येतील. मतदार जागृती मोहीम, मोठ्या प्रमाणातील विशेष प्रसिद्धी, जनतेवर पडलेला प्रभाव या निकषांवर पुरस्कारांची निवड करण्यात येईल. त्यासाठी माध्यम संस्थांनी 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव (संवाद) श्री. पवन दिवाण यांनी केले आहे.
प्रसारमाध्यमांनी इंग्रजी आणि हिंदीमधून प्रवेशिका पाठवाव्यात. इतर कोणत्याही भाषेतून या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवता येईल. मात्र त्यासोबत इंग्रजीतून भाषांतर केलेली प्रत सोबत जोडावी लागेल. संपर्क - श्री. पवन दिवाण, अवर सचिव (कम्युनिकेशन), भारत निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका रोड, नवी दिल्ली – 110001, ईमेल- media. election.eci@gmail.com, अथवा d iwaneci@yahoo.co.in, दूरध्वनी क्र. 011-23052133.
*******
टॅक्सी संवर्गातील वाहनांतून ‘चाईल्ड लॉक्’ची सुविधा निष्क्रीय करावी
- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन
बुलडाणा, दि. 30 : रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांनी कळविलेल्या पत्रानुसार वाहनांतील ‘चाईल्उ लॉक’ या यंत्रणेच्या अतिरिक्त सुविधेचा विविध गुन्हेगारांकडून गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: ही सुविधा टॅक्सी मधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशी चाईल्ड लॉक यंत्रणा टॅक्सीसह अन्य वाहनांतून निष्क्रीय करण्यात यावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
तलाठी पदभरतीच्या निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची कागदपत्रांची होणार तपासणी
- खुला, अ.जा, अ.ज, विमुक्त जाती- अ प्रवर्गासाठी 7 नोव्हेंबर रोजी तपासणी
- भटक्या जमाती –ड, इमाव, एसईबीसी व ईडब्ल्युएस प्रवर्गासाठी 8 नोव्हेंबर रोजी तपासणी
बुलडाणा, दि. 30 : महापरीक्षा पोर्टलमार्फत 2 ते 26 जुलै 2019 या कालावधीत तलाठी पदाची लेखी परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेच्या निकालामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे व त्यांनी ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे प्रारूप निवड अथवा प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर प्रारूप निवड अथवा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे मुळ प्रमाणपत्र तपासणी प्रवर्गनिहाय 7 व 8 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे करण्यात येणार आहे.
खुला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती –अ प्रवर्गातील निवड अथवा प्रतीक्षा योदीवरील उमेदवारांनी 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुळ प्रमाणपत्र तपासणीसाठी उपस्थित रहावे. तसेच भटक्या जमाती- ड, इतर मागासवर्ग, एसईबीसी (सोशल ईकॉनॉमीकली बॅकवर्ड क्लास) व ईडब्ल्यूएस (ईकॉनॉमीकली विकर सेक्शन) प्रवर्गातील उमेदवारांनी 8 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुळ प्रमाणपत्र तपासणीसाठी उपस्थित रहावे.
येताना उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड, वाहन परवाना तसेच ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेली सर्व मुळ प्रमाणपत्रे व या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या प्रतीचा एक संच आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो न चुकता सोबत आणावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
जलसाठ्यातील पाणी आरक्षणासाठी 5 नोव्हेंबरपर्यंत पाणी मागणी नोंदवावी
- 31 ऑक्टोंबर रोजी होणार पाणी आरक्षण सभा पुढे ढकलली
बुलडाणा, दि. 30 : जिल्हा पाणी आरक्षण समितीची सभा 31 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. बुलडाणा पाटबंधारे विभागाकडील तलावांवरून पिण्याचे पाणी आरक्षणाची मागणी नोंदविण्याबाबत सर्व नगर परिषद, गटविकास अधिकारी, संबंधित ग्रामपंचायत यांना कळविण्यात आले होते. मात्र नियमित पाणी वापर करणारे बरेचसे बिगर सिंचन पाणी पुरवठा करणारे योजनांचे बिगर सिंचनाची पाणी आरक्षणाची मागणी अद्याप या विभागास अप्राप्त असल्यामुळे व प्रशासकीय कारणास्तव सदर बैठक पुढे ढकलण्यात येत आहे.
तरी सर्व संबंधितांनी आपले पाणी मागणी कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणा यांच्याकडे 5 नोव्हेंबर 2019 पूर्वी न चुकता नोंदवावी. अन्यथा बिगर सिंचन पाणी आरक्षणाची मागणीची नोंदणी न झाल्यास किंवा विलंब झाल्यास आपली पाणी आरक्षण होणार नाही. या बाबीस संबंधित स्वत: जबाबदार राहतील. होणाऱ्या सभेमध्ये धरणातील उपलब्ध पाणी साठयानुसार, पिण्याच्या पाण्याचे आरक्षणास मंजुरीबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. याची सर्व संबंधित बिगर सिंचन आरक्षण करणाऱ्या संस्थांनी नोंद घ्यावी, असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
No comments:
Post a Comment