Wednesday, 9 May 2018

आहे उन्हाळा.. तब्येत सांभाळा


·        उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्याचे नागरीकांना आवाहन
बुलडाणा, दि.9 : राज्यात मागील काही दिवसांपासून असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या लाटेपासून  व  उष्माघातापासून बचाव करण्याकरीता करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासनाने जनतेला आवाहन केले आहे. हवामान विभागाने यावर्षी उष्णतेच्या लाटेची सुरूवात नेहमीपेक्षा लवकर होण्याचा अंदाज वर्तविला आहे. तसेच 2018 मध्ये उष्णतेची लाट दिर्घकाळापर्यंत असण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.
   सर्वसाधारपणपणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल मध्य, मे, जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रभाव जाणवत असतो. तसेच त्यामुळे मृत्यू होण्याची संभावना असते. मात्र जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा परिणाम आताच जाणवू लागला आहे.  उष्माघाताचा परिणाम होऊ नये,यासाठी सर्व जनतेनी आतापासूनच जागृत राहीले पाहीजे, रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी अगोदरच तयारी करुन ठेवणे आवश्यक आहे.
उष्माघात  होण्याची सर्वसाधारण कारणे : उन्हाळयात शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ उन्हात करणे, कारखान्याच्या बॉयलर रुम मध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपडयांचा वापर करणे अश्या प्रकारे उष्णतेशी प्रत्यक्ष अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होतो.
उष्माघाताची लक्षणे : थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागने, चक्कर येण, निरुत्साही होणे, डोके दुखी, पोटात वेदना होणे अथवा पेंडके येणे, रक्तवाढ वाढणे, मानसिक बेचैन व अस्वच्छता, बेशुध्दावस्था इत्यादी. 
उष्माघातापासून बचावासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना : गावामधील तसेच शहरामधील मंदीरे, सार्वजनिक इमारती, हॉल, उद्याने आदी ठिकाणे दुपारीसुद्धा उघडी ठेवावीत. जेणेकरून नागरिकांना दुपारच्या वेळी येथे आश्रय घेता येणार आहे. याकाळात रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी महत्वाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत करू नये, वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असतांना करावीत , बाहेर काम करीत  असताना मध्ये-मध्ये नियमित आराम करण्यात यावा, गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी, चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरित डॉक्टरकडे जावे, मद्य, चहा, कॉफी व कार्बानेटेड शितपेय पिण्याचे टाळावे, पुरेसे पाणी पित रहावे,  उष्णता शोषून घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत, सैल सुती पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, सरबत प्यावे, उन्हात बाहेर जातांना गॉगल, डोक्यावर टोपी, टॉवेल यांचा वापर करावा, शिळे अन्न खाणे टाळावे, तीव्र उन्हात  मुख्यत: दुपरी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
                                                                                    *****
सुशिक्षीत बेरोजगार प्रवर्गातील लाभार्थ्यांची 11 मे रोजी लॉटरी पद्धतीने निवड
  • जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना
बुलडाणा, दि‍.9 -  शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना अंमलात आणली आहे. योजनेतंर्गत सुशिक्षीत बेरोजगार व्यक्ती या प्रवर्गामधून पात्र ठरलेल्या  व ऑनलाईन अपलोड केलेले कर्ज मंजूरी पत्र मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये विनाअट कर्ज मंजूरीचा दाखला ऑनलाईन दाखल करणाऱ्या अर्जदारांची संख्या जिल्ह्याच्या लक्षांकापेक्षा जास्त आहे.  त्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे गठीत केलेल्या समितीने लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची  करावयाची आहे. जिल्ह्यातून सुशिक्षीत बेरोजगार व्यक्ती प्रवर्गातून एकूण 70 अर्जदारांचे बँक कर्ज मंजूरी पत्रे मंजूर करण्यात आलेली असून जिल्ह्यांचा लक्षांक 40 आहे. या 70 मंजूर अर्जदारांची यादी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलडाणा यांचे कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मधून अंतिम लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड 11 मे 2018 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे करण्यात येणार आहे. त्यासाठी समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी लक्षांकाप्रमाणे 40 लाभार्थ्यांची निवड करण्यात येवून अन्य सभासदांची प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे सदर सभेला सर्व संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन  जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
                                                                                    ********
पाणी टंचाई निवारणार्थ नऊ गावांसाठी टँकर मंजूर
  • चिखली, शेगांव व खामगांव तालुक्यातील गावांचा समावेश
बुलडाणा,दि‍. 9 : चिखली तालुक्यातील चांधई, शेगांव तालुक्यातील गायगाव बु, गायगांव खु, तरोडा कसबा आणि खामगांव तालुक्यातील किन्ही महादेव, चिखली बु, सुजातपूर, पिंप्री देशमुख व टेंभूर्णा  येथील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावांसाठी पाणीपुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे.  चांधई  गावच्या 2200 लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. तसेच गायगाव खु व गायगांव बु  येथील अनुक्रमे 1520 व 760 लोकसंख्येकरीता एक-एक टँकर मंजूर करण्यात आले आहे.  तरोडा कसबा येथील 1820, किन्ही महादेव गावच्या 1750, चिखली बु येथील 500, सुजातपूरच्या 500, पिंप्री देशमुख येथील 2585 आणि टेंभूर्णा गावच्या 4500 लोकसंख्येकरीता प्रत्येकी एक टूंकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
******

जिल्ह्यात 31 विंधन विहीरींना मंजूरात
·        मोताळा तालुक्यात 15, दे.राजा 5 व लोणार तालुक्यातील 2 गावांचा समावेश
बुलडाणा, दि‍. 9 - जि‍ल्हा परिषद  बुलडाणा यांच्यावतीने पाणी टंचाई कृती अराखडा सन 2017-2018 मध्ये समाविष्ट असलेल्या मोताळा, लोणार, दे.राजा, नांदुरा व मोताळा तालुक्यातील 23 गावांमध्ये एकूण 31 विंधन विहींरींना मंजुरात देण्यात आली आहे. पाणी टंचाई निवारणार्थ घेण्यात येणाऱ्या या विंधन विहीरींची कामे पूर्ण करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद यांच्यावर आहे.
   विंधन विहीरींना मंजूरात दिलेल्या गावांमध्ये मोताळा तालुक्यातील 15 गावांचा समावेश आहे. काही गावांमध्ये 1, तर काही ठिकाणी 2 व 3 विहीरींना मंजूरात देण्यात आली आहे. एक विहीरीला मंजूरात दिलेल्या गावांमध्ये मोताळा तालुक्यातील शेलापूर खु, नळकुंड, टाकळी वाघजाळ, धामणगांव देशमुख, अंत्री, गोतमारा तांडा, वरूड, फर्दापूर, लोणघाट व धनगर वाडा निमखेडी यांचा समवेश आहे. तर दोन विहीरींना मंजूरात आडविहीर, तालखेड व बोराखेडी या गावांचा समावेश आहे. तसेच तीन विहीरी रोहीणखेड गावामध्ये देण्यात आल्या आहेत. 
   दे.राजा तालुक्यात एक विंधन विहीर तुळजापूर, पांगरी व किन्ही पवार येथे मंजूर करण्यात आली असून दे.मही व अंढेरा या गावांमध्ये दोन विंधन विहीरी देण्यात आल्या आहे. तर लोणार तालुक्यात सोनुना, वझर आघाव येथे एक विंधन विहीरी देण्यात आली आहे. तसेच नांदुरा तालुक्यातील नारखेड येथे एक विहीरीला मंजूरात देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                ***********
मोबाईल ॲपद्वारे ईव्हिएम मशीनची पडताळणी
बुलडाणा, दि‍.9 -  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेल्या एम 1 (2000-2005) इव्हीएम यंत्राचे 100 टक्के फिजीकल पडताळणी मोबाईल ॲपद्वारे 8 मे 2018 रोजी करण्यात आली. सदर पडताळणी अल्पबचत भवन, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बुलडाणाच्या बाजुला करण्यात आले. या पडताळणीला अर्थातच व्हेरीफिकेशनला जिल्ह्यातील राजकीय पक्ष प्रतिनिधींना उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले होते. तरी सदर पडताळणी उपजिल्हाधिकारी निवडणूक राजेंद्र देशमुख, तहसिलदार शैलेश काळे, सहा. जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी आमोद सुर्यवंशी यांचे निदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी राजकीय पक्ष प्रतिनिधी नगरसेवक आकाश दळवी, शिवसेनेकडून राजु फकीरबा मुळे, भाजपाकडून मंगेश चौधरी तसेच अव्वल कारकून पी. एम डब्बे, ऑपरेटर स्वप्नील बाभुळकर आदी उपस्थित होते.   

No comments:

Post a Comment