- घरकूल, धडक विहीर, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे विषयांचा आढावा
- जलयुक्तमधील अपूर्ण कामे मे अखेर पूर्ण करावी
- जिओ टॅगिंग पूर्ण करावे, कार्यारंभ आदेशानंतर त्वरित काम सुरु करावे
बुलडाणा, दि. 11 - राज्य व केंद्र शासन विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करीत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेवटच्या घटकाचा पूर्ण विकास होवून तो स्वयंपूर्ण झाला पाहिजे. शासनाचे हे ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी कार्यवाही केली पाहिजे, अशा सूचना विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात विविध शासकीय उपक्रमांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना विभागीय आयुक्त बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र. जिल्हाधिकारी षण्मुखराजन,उपायुक्त शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी नेमाने, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहूल साकोरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे आदी उपस्थित होते.
वृक्षलागवड मोहिमेचा आढावा घेताना विभागीय आयुक्त म्हणाले, या वर्षी ऐतिहासिक कामगिरी करायची आहे. राज्यात 13 कोटी वृक्षलागवड करायची आहे. जिल्ह्यात या मोहिमेसाठी प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज रहावे. खड्डे खोदून अक्षांश – रेखांशनुसार खड्यांचे फोटो अपलोड करावे. खड्यांसाठी लँड बँक तयार करावी. प्रत्येक यंत्रणेने उद्दिष्टानुसार रोपे उपलब्ध करून लागवड करावी. जीवंत रोपे असण्याचे प्रमाण वाढविण्यात यावे. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत अपूर्ण असलेली कामे येत्या मे अखेर पूर्ण करण्यात यावीत. कुठल्याही परिस्थितीत मागील अपूर्ण कामांना जुनमध्ये पूर्ण करू नये. तसेच पाण्याचा ताळेबंद पूर्ण असलेल्या गावांचा ‘एक्झिट प्रोटाकॉल’ ची माहिती द्यावी. यामध्ये मंजूर आराखड्यापासून गावाचे पर्जन्यमान, भूजल पातळी, जलयुक्तच्या कामानंतर पडलेला प्रभाव, पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी पाणी उपलब्धता अशी संपूर्ण माहिती एक्झिट प्रोटोकॉलमध्ये द्यावयाची आहे.
ते पुढे म्हणाले, एखाद्या कामाला कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळत नसेल, तर जास्त वेळ न घालविता यंत्रणांनी स्वत:च ते काम पूर्ण करावे. यंत्रणांनी जबाबदारी घेत कामे पूर्ण करून गाव वाटर न्युट्रल करावे. जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेत यंत्रणेनी काम पूर्ण करावे. ज्या कामांचे जिओ टॅगिंग झाले नसेल त्या कामांचे टॅगिंगचे काम त्वरित पूर्ण करावे. सन 2018-19 मध्ये निवडलेल्या 165 गावांमध्ये कामे मंजूर असल्यास पूर्ण करावीत. कार्यारंभ आदेश दिलेले असताना काम सुरू न झाल्यास यंत्रणानी जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी कार्यारंभ आदेश दिलेले असताना कामे त्वरित सुरू करावी. या वर्षात निवडलेल्या गावांमध्ये लाभार्थ्यांचे प्रशिक्षण घेण्यात यावे.
मागेल त्याला शेततळे व धडक सिंचन विहीर योजनेचा आढावा घेताना विभागीय आयुक्त म्हणाले, मागेल त्याला शेततळे योजनेमध्ये उद्दिष्टपूर्तीसाठी यंत्रणेने काम करावे. जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त काम व्हायला पाहिजे. तसेच शेततळ्याचे अनुदान काम पूर्ण झाल्यानंतर त्वरित लाभार्थ्याला देण्यात यावे. धडक सिंचन विहीर योजनेत काम अपूर्ण असलेल्या विहीरी त्वरित पूर्ण करण्यात याव्यात.
याप्रसंगी तालुकानिहाय जलयुक्त शिवार अपूर्ण कामे, शेततळे योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मतदार पडताळणीसाठी बीएलओ आता घरोघरी…!
· 15 मे ते 20 जुन दरम्यान मोहिम
· मतदार यादीतील नोंदणीची दुरूस्ती, स्थलांतरीत मतदारांची माहिती करणार गोळा
· 4 जानेवारी 2019 रोजी अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध
बुलडाणा, दि.24: भारत निवडणूक आयोगाच्यावतीने विशेष मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणावर मतदार नाव नोंदणी व जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी विविध उपक्रमही हाती घेण्यात आले आहे. यामध्ये बीएलओ घरोघरी जावून माहिती गोळा करणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 15 मे ते 20 जुन 2018 या कालावधीत घरोघरी जावून मतदार पडताळणी करणार आहे. बीएलओ दुबार, मयत व कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदारांची माहिती गोळा करणार आहे. तसेच मतदार यादीतील नोंदणीची दुरूस्तीही करणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी दिली. यावेळी माहिती सहायक निलेश तायडे उपस्थित होते.
मोहिमेदरम्यान 1 जानेवारी 2018 रोजी पात्र असलेले परंतु मतदार म्हणून अद्यापपर्यंत नोंदणी न झालेल्या नागरिकांची नावे गोळा करण्यात येणार आहे. तसेच 1 जानेवारी 2018 रोजी मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र ठरणाऱ्या भावी मतदारांची नावेही गोळा केल्या जाणार आहे. मतदान केंद्राचे सुसूत्रिकरण व प्रमाणीकरण 21 जून ते 31 जुलै 2018 या कालावधीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अंबाबारवा अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन केल्यामुळे दोन मतदान केंद्र रद्द करण्यात आली आहे. या कालावधीत मतदान केंद्राच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात येणार आहे. नियंत्रक तक्ते अद्ययावत करणे, पुरवणी यादी तयार करणे व विलीनीकरण, एकत्रिकरण करून प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम 1 ऑग्स्ट ते 31 ऑगस्ट 2018 कालावधीत केल्या जाणार आहे.
प्ररूप मतदार यादी 1 सप्टेंबर 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहे. या यादीवर दावे व हरकती 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहे. या काळात 1 जानेवारी 2019 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या तरूण मतदारांना नाव नोंदता येणार आहे. प्राप्त दावे व हरकती 30 नोव्हेंबर 2018 पूर्वी निकाली काढण्यात येणार आहे. डाटाबेसचे अद्यावतीकरण करणे व पुरवणी यादीची छपाई 3 जानेवारी 2019 पूर्वी करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी 4 जानेवारी 2019 रोजी करण्यात येणार आहे.
बीएलओला घरी आल्यानंतर संपूर्ण कुटूंबाची माहिती द्यावी. जेणेकरून आपल्या कुटूंबातील कुणीही व्यक्ती मतदार यादीत नाव नोंदणीपासून वंचित राहणार नाही, असे आवाहन उपजिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
*****
ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन नामनिर्देशनपत्र भरावे
बुलडाणा, दि. 11 - ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन नामनिर्देशन पत्र सादर करावे. शेवटच्या दिवसाची प्रतिक्षा न करता ऑनलाईन नामनिर्देशन भरून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावी. जेणेकरून नामनिर्देशनपत्र भरण्याच्या अंतिम दिवशी तांत्रिक अडचणी उद्भवणार नाही. असे आवाहन निवडणूक शाखेने केले आहे.
रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा सुधारीत दौरा
बुलडाणा, दि. 11 - राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल दि. 12 मे 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दि. 11 मे 2018 रोजी रात्री 11.18 वाजता मलकापूर रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने लोणारकडे प्रयाण, पहाटे 2.30 वाजता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृह येथे आगमन व राखीव, सकाळी 9 वाजता लोणार सरोवर परिसर पाहणी, सकाळी 10.30 वाजता लोणार सरोवर परिसर विकासाबाबत एमटीडीसी कार्यालयात आयोजित बैठकीस उपस्थिती, दु. 1 वा. राखीव, दु. 2 वाजता लोकप्रतिनिधींसोबत लोणार परिसर विकास कामांचे भूमिपुजन, दुपारी 4 वाजता लोणार येथून चिखलीकडे प्रयाण, सायं 5.30 वाजता शासकीय विश्रामगृह चिखली येथे आगमन व राखीव, सायं 6 वा विश्रामगृह येथून स्वरांजली लॉन, जालना रोड, चिखलीकडे प्रयाण, सायं 6.30 वाजता डॉ. सुधाकर इंगळे यांच्या कन्येच्या लग्न समारंभास उपस्थिती, रात्री 8 वा स्वरांजली लॉन, जालना रोड, चिखली येथून मलकापूर रेल्वे स्टेशनकडे प्रयाण, रात्री 10.15 वाजता मलकापूर रेल्वे स्टेशन येथे आगमन व विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
No comments:
Post a Comment