Wednesday, 16 May 2018

खेलो इंडीया अंतर्गत आयोजीत होणाऱ्या मास्टर्स ट्रेनर्स प्रशिक्षण शिबीराचे आयोजन


बुलडाणा, दि. 16 : भारत सरकार यांचे युवक सेवा व क्रीडा मंत्रालयातंर्गत पुनरुज्जीवीत खेलो इंडीया राष्ट्रीय खेल विकास कार्यक्रमानुसार क्रीडा व सामुहिक सहभागामध्ये उत्कृष्टतेचे नवे राष्ट्रीय उध्दीष्ट साध्य करण्याकरीता शासनाने ही योजना सुरु केली आहे. पुनरुज्जीवीत खेलो इंडीया या योजने अंतर्गत देशात खेळाचा वाढ व विकास करणे त्यामध्ये सामुदायिक प्रशिक्षणाचा विकास या मुदयाचा समावेश आहे. समाजातील प्रशिक्षणाचा विकास ज्याद्वारे शारिरीक शिक्षण, शिक्षक/स्वयंसेवक यांना विकसीत करणे जेणेकरुन त्यांचेद्वारे प्रशिक्षणार्थींचा स्वत:च्या स्थानिक विभागातील किंवा राज्यातील लोकप्रिय क्रीडा प्रकाराद्वारे खेळाचा विकास होण्यास मदत होणार आहे.
  त्या अनुषंगाने खेलो इंडीयाद्वारे सदर योजने अंतर्गत 2 एप्रिल 2018 ते 28 जानेवारी 2019 या दरम्यान मास्टर्स ट्रेनर्स करीता एकुण 15 प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे, सदर शिबीरासाठी ग्वाल्हेर व गुवाहाटी या ठिकाणी एकुण 100 प्रशिक्षकांची एक बॅच या प्रमाणे एकुण 15 प्रशिक्षण शिबीरे आयोजीत करण्यात आलेली आहेत. प्रत्येक प्रशिक्षण शिबीराचा कालावधी 15 दिवसाचा असून पैकी 10 प्रशिक्षण शिबीर हे एल.एन.आय.पी.ई. ग्वालियर या ठिकाणी आहेत व 05 प्रशिक्षण शिबीर हे  एल.एन.आय.पी.ई. गुवाहाटी या ठिकाणी आयोजीत करण्यात आलेले आहे.
    खेलो इंडीया अंतर्गत एकुण 15 प्रशिक्षण शिबीराचा कालावधी  पुढीलप्रमाणे : ग्वालीयर ट्रेनिंग सेंटर – 2 ते 19 जुलै 2018, 23 जुलै ते 16 ऑगस्ट, 10 ते 24 सप्टेंबर, 1 ते 15 ऑक्टोंबर, 18 ऑक्टों ते 1 नोव्हेंबर, 5 ते 19 नोव्हेंबर, 3 ते 17 डिसेंबर. गुवाहाटी ट्रेनिंग सेंटर – 23 जुलै ते 16 ऑगस्ट, 1 ते 15 ऑक्टो, 18 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2018
सदर प्रशिक्षण शिबीराकरीता मास्टर ट्रेनर्सची पात्रता : वय – 18 ते 40 वर्षनिवास- तालुक्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याचे ठिकाणाचे जवळ असावे,  क्रीडा पात्रता- कोणताही खेळ खेळलेला असावा, शारिरीक पात्रता – शारिरिक दृष्टया तंदुरुस्त असावाशैक्षणिक पात्रता – शारिरिक शिक्षणात पदवी किंवा पदवीका प्राप्त असावा किंवा मान्यता प्राप्त शारिरीक शिक्षण संस्थेकडून प्रमाणपत्र प्रशिक्षण घेतलेला असावा.
वरीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता असलेले प्रशिक्षणार्थी आवश्यक आहेत. तसेच वरील शैक्षणिक पात्रता नसलेले परंतू प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक यांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करता येईल. प्रत्येक प्रशिक्षीत प्रशिक्षणार्थींनी प्रतिवर्षी किमान 100 क्रीडा शिक्षक/शिक्षक/स्वयंसेवकांना प्रशिक्षीत करणे हा सामुदायीक प्रशिक्षण कार्यक्रमाचा उददेश आहे.
सदर प्रशिक्षण शिबीरासाठी उपस्थित राहणाऱ्या प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण, निवास, भोजन, वैद्यकीय सेवा या बाबींवरील खर्च केंद्र शासनाच्या युवक कल्याण व खेल मंत्रालयाद्वारे करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींच्या मुख्यालयापासून ते प्रशिक्षणाचे ठिकाणापर्यंतचा प्रशिक्षणार्थींचा फक्त प्रवास खर्च, येणे-जाणे, शासनाद्वारे निधी उपलब्ध होताच प्रत्यक्ष प्रवास खर्चाची प्रतिपुर्ती करता येईल.
उपरोक्त पात्रतेनुसार बुलडाणा जिल्हयातील शारिरीक शिक्षण शिक्षक/ प्राथमिक शिक्षक/माध्यमिक शिक्षक तसेच शारीरीक शिक्षणात पदवी किंवा पदविका प्राप्त असलेल्यांनी आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा नगरी जांभरुण रोड बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत विहित नमुन्यात 21 मे 2018 पर्यंत सादर करावी, तसेच अधिक माहितीसाठी अनिल इंगळे यांच्या 9970071172 यांच्याशी संपर्क साधावा असे  क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी कळविले आहे.
*********
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ देणार युवकांना ‘गाईड’चे प्रशिक्षण
  • अमरावती, सिंधुदुर्ग, औरंगाबाद व नागपूर येथे प्रत्येकी 100 युवकांना प्रशिक्षण
बुलडाणा, दि. 16 : महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आता गाईड प्रशिक्षण कोर्स नियमितपणे सुरू करीत आहे. त्यानुसार अमरावती, औरंगाबाद, सिंधुदुर्ग व नागपूर येथे प्रत्येकी 100 युवकांना गाईडचे प्रशिक्षण महामंडळाच्यावतीने दिल्या जाणार आहे. यासाठी उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून वय 18 ते 60 च्या दरम्यान असावे. प्रशिक्षणाचा कालावधी हा 12 दिवसांचा आहे. त्यामध्ये 10 दिवस शिकवणी वर्ग व 2 दिवस प्रत्यक्ष क्षेत्रावर जावून प्रशिक्षणाचा समावेश असणार आहे.
  सदर प्रशिक्षणात चहा, दुपारचे जेवण दिले जाणार असून गाईड प्रशिक्षणाचे प्रमाणपत्रही दिल्या जाणार आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी उमेदवारांकडून 25 मे 2018 पर्यंत http://mtdc2018.mhpravesh.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. याबाबतचा सविस्तर तपशील http://www.maharashtratourisam.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेवून अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक प्रशांत सवई यांनी केले आहे.
                                                            ************
तालुका स्तरीय लोकशाही दिनाचे 21 मे रोजी आयोजन
  बुलडाणा, दि.16 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी तालुका स्तरीय लोकशाही दिन संबंधित तहसिल  कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.  त्यानुसार या महिन्याच्या तिसऱ्या सेामवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 21 मे 2018 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात होणार आहे.  या दिवशी तहसीलदार व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे.
   अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.
   तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात प्राधिकाऱ्यां-कडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत. असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे तहसलीदार यांनी कळविले आहे 
                                                            **********
शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी बँकामध्ये अर्ज सादर करावे
·        जिल्हा प्रशासनाचे आवाहन
बुलडाणा, दि.16 : खरीप हंगाम जवळ आला असून बळीराजा पेरणीसाठी सज्ज होताना दिसत आहे. पेरणीपूर्व शेतमशागतीची कामे सुरू आहेत. या खरीप हंगामात पेरणीसाठी बि-बियाणे, खते व आंतर मशागतीसाठी पैशाची तजवीज शेतकरी करीत आहे. अशा परिस्थितीत नवीन पिक कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांनी संबंधित राष्ट्रीयकृत बँकेत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
    खामगांव येथे दि. 12 एप्रिल रोजी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत बँकांना पिक कर्ज वितरणाबाबत निर्देश देण्यात आले होते. बँकांनी पीक कर्ज वितरणासाठी अर्ज घ्यावे. कुठल्याही प्रकारे वंचित शेतकरी कर्जापासून वंचित राहता कामा नये. बँकांनी आलेल्या शेतकऱ्यांना सौजन्याची वागणूक द्यावी. जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकाकडे पीककर्ज वितरणाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी नवीन पीक कर्जास पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला पीक कर्ज वितरण तात्काळ सुरू करावे.
  कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या मात्र संपूर्ण कर्जमाफीची रक्कम कर्ज खात्यात प्राप्त न झालेल्या शेतकऱ्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. जेणेकरून त्यांना पिक कर्जाचा लाभ मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीची रक्कम कर्ज खात्यात प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना नवीन पिक कर्ज देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी त्वरित संबंधित जिल्हा बँक, व्यापारी बँक व राष्ट्रीयकृत बँकेत जावून नवीन पिक कर्जासाठी अर्ज द्यावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
पाणी टंचाई निवारणार्थ तीन गावांसाठी टँकर मंजूर
  • आंधई, धोत्रा भनगोजी व जांब गावांचा समावेश
बुलडाणा,दि‍. 16 : चिखली तालुक्यातील आंधई व धोत्रा भनगोजी, बुलडाणा तालुक्यातील जांब  येथील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावांसाठी पाणीपुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे.  आंधई  गावच्या 1020 लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. हे टँकर दररोज 32 हजार 100 लिटर पाणीपुरवठा करणार आहे. तसेच धोत्रा भनगोजी  व जांब येथील अनुक्रमे 2931 व  3828 लोकसंख्येकरीता एक-एक टँकर मंजूर करण्यात आले आहे.  टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                    

No comments:

Post a Comment