- महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 अन्वये कारवाई
- झडती पथकामध्ये 79 अधिकारी/कर्मचारी नियुक्ती
बुलडाणा, दि. 3 : जिल्ह्यात कथीत अवैध सावकारी व्यवसायाबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयास 6 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या चौकशीकरीता महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अन्वये संबधीत गैरअर्जदारांच्या ठिकाणांवर सहकार विभागाच्या झडती पथकाने आज धाडी टाकीत कारवाई केली. यामध्ये खामगांव तालुक्यात 3, चिखली 3, नांदुरा 3, जळगाव जामोद 1 व शेगांव तालुक्यातील एका करवाईचा समावेश आहे. या सदर कारवाईसाठी सहकार विभागाच्या प्रशासन व लेखा परीक्षण शाखेतील जिल्ह्यामधील 70 अधिकारी/कर्मचारी यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे 9 कर्मचारी आहेत. अशाप्रकारे एकूण 79 अधिकारी/कर्मचारी या पथकामध्ये होते.
सदर पथकांसोबत शासकीय पंच म्हणून स्थानिक तहसिल कार्यालयातील कर्मचारी होते. तर संबंधित पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी यांचा समावेशही पथकामध्ये होता. खामगांव येथे तीन पथकांनी केलेल्या कारवाईमध्ये संबंधित गैरअर्जदार यांचे राहते घरी व दुकानामध्ये झडती करण्यात आली. या ठिकाणावरून नोंदणीकृत खरेदी खते व पैशांच्या व्यवहारांचे नोंदी असलेल्या वह्या अशा स्वरूपाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. तसेच नांदुरा येथील तीन पथकांनी गैरअर्जदारांच्या ठिकाणी केलेल्या झडतीमध्ये नोंदणीकृत खरेदी खते व इतर काही दस्ताऐवज जप्त करण्यात आले आहेत. शेगांव तालुक्यात कारवाईदरम्यान नोंदणीकृत खरेदी खते, कोरे बाँड असे दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले. चिखली तालुक्यातील धोत्रा भणगोजी येथे तीन पथकांच्या कारवाईत संबंधीत तीन गैरअर्जदारांच्या ठिकाणांवरून खरेदी खते, कोरे चेक, कोरे बाँड जप्त करण्यात आले. तसेच जळगाव जामोद तालुक्यातील आसलगांव येथील एका ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये संबंधित गैरअर्जदार यांचे राहते घरातील व्यवसायाचे ठिकाण कुलूपबंद असल्यामुळे व कुणीही हजर नसल्यामुळे सदर ठिकाण सिल करण्यात आले.
तरी सर्व 11 ठिकाणी रितसर झडती पंचनामे करण्यात आलेले आहे. झडती दरम्यान प्राप्त कागदपत्रांची सावकारी कायद्यातंर्गत संबंधित तालुक्याचे सहाय्यक निबंधक (सावकारी) यांचेकडून चौकशी करून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही संपूर्ण कारवाई जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आली, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने कळविले आहे.
*****
योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण कामकाज तात्पुरत्या स्वरूपात बंद
बुलडाणा, दि.3 - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू असलेले योग्यता प्रमाणपत्र तात्पुरत्या स्वरूपात शिबिर कार्यालय कामकाजाच्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे. या कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सद्या कमी प्रमाणात कार्यरत आहे. त्यामुळे योग्य प्रमाणपत्र नुतनीकरण कामकाज तात्पुरत्या स्वरूपात शिबिर कार्यक्रमाच्या दिवशी बंद ठेवण्यात येत आहे. तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
------------
जिल्हाधिकारी कार्यालयात
7 मे रोजी लोकशाही दिन
बुलडाणा, दि. 3 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन दि. 7 मे 2018 दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे. अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
पाणी टंचाई निवारणार्थ तीन गावासाठी टँकर मंजूर
बुलडाणा,दि.3: मोताळा तालुक्यातील शिरवा येथील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावासाठी पाणीपुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. तसेच बुलडाणा तालुक्यातील रायपूर व मेहकर तालुक्यातील वरूड येथे सुद्धा पाणीपुरवठ्याकरीता टँकर मंजूर करण्यात आले आहे. शिरवा गावच्या 1840 लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. सदर टँकर दररोज 58 हजार 760 लीटर पाणीपुरवठा करणार आहे. तसेच रायपूर येथील 9550 लोकसंख्येकरीता दोन टँकर मंजूर करण्यात आले आहे. वरूडच्या 1900 लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment