Thursday, 9 February 2017

news 9.2.2017,1 dio buldana

जिल्हा परिषदेच्या विभागीय क्रीडा स्पर्धा बुलडाण्यात
·         11 ते 13 फेब्रुवारी 2017 दरम्यान आयोजन
·         आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिलाषा म्हात्रे व अजित लाकरा राहणार उपस्थित
बुलडाणा, दि.9 - जिल्‍हा परिषदेच्‍यावतीने जिल्‍हा क्रीडा संकुल येथे आयोजित जिल्‍हा परिषद अधिकारी, कर्मचारी यांच्‍या अमरावती विभागीय क्रीडा स्‍पर्धा व सांस्‍क‍ृतिक महोत्‍सवाचे दिनांक 11 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्‍यात आले आहे. राज्‍याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजित उदघाटन समारंभास आंतरराष्‍ट्रीय खेळाडू  अभिलाषा म्‍हात्रे व अजित लाकरा यांची विशेष उपस्थिती या स्‍पर्धांचे मुख्‍य आकर्षण ठरणार आहे.
    जिल्‍हा परिषदेअंतर्गत कर्मचा-यांच्‍या जिल्‍हा स्‍तरीय क्रीडा स्‍पर्धा या वर्षी आयोजीत करण्‍यात आल्‍या होत्‍या. या पार्श्‍वभूमीवर गेल्‍या  कित्‍येक वर्षानंतर बुलडाणा जिल्‍ह्याला विभागीय क्रीडा स्‍पर्धा व सांस्‍कृतीक महोत्‍सवाच्‍या  आयोजनाचा बहुमान मिळालेला आहे. मुख्‍य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांच्‍या पुढाकाराने आयोजन बुलडाणा येथे करण्‍यात आले आहे.
    क्रीडा स्‍पर्धांचे औचित्‍य लक्षात घेता  आंतरराष्‍ट्रीय खेळाडू  अभिलाषा म्‍हात्रे व अजित लाकरा यांना या समारंभासाठी उदघाटक व विशेष अतिथी म्‍हणून दिपा मुधोळ यांनी निमंत्रित केले आहे. अभिलाषा म्‍हात्रे ह्या सन 2015 या वर्षीच्‍या अर्जून पुरस्‍कार विजेत्‍या कबड्डीपटू आहेत. आशियाई तसेच कबड्डी विश्‍वचषक आदी  विविध आंतरराष्‍ट्रीय स्‍पर्धामध्‍ये त्‍यांचे नावे पाच सुवर्णपदकांची नोंद आहे. राष्‍ट्रीय स्‍पर्धा तसेच फेडरेशन चषक स्‍पर्धांमध्‍ये त्‍यांनी व्‍यक्तिगत व सांघिक कामगिरीसाठी सुवर्ण, रजत व कास्‍ंय अशी एकूण 10 पदक प्राप्‍त केलेली आहेत. सद्य:स्थितीत दूरचित्रवाणीवर लोकप्रिय ठरत असलेल्‍या प्रो कबड्डीमध्‍ये सहभागी असलेल्‍या तीन महिला संघांपैकी एका संघाच्‍या कर्णधार म्‍हणून सुध्‍दा त्‍यांची कामगिरी उल्‍लेखनीय आहे. अजित लाकरा हे हॉकीचे आंतरराष्‍ट्रीय व जेष्‍ठ खेळाडू आहेत. छत्रपती पुरस्‍कार विजेते लाकरा यांनी 1989 च्‍या आशियाई क्रीडा स्‍पर्धेत रजत पदक आपल्‍या नावे नोंदविल्‍यानंतर ते प्रकाशझोतात आले होते. त्‍यानंतर 1990 चा पाकीस्‍तनमध्‍ये खेळल्‍या गेलेला विश्‍वचषक व 1992 मधील बार्सिलोना ऑ‍लपिंक स्‍पर्धेत सुध्‍दा भारतीय हॉकी संघातील खेळाडू म्‍हणून त्‍यांची कामगिरी उल्‍लेखनीय होती. सद्य:स्थितीत अजित लाकरा हे हॉकीपटूंचे प्रशिक्षक म्‍हणून बालेवाडी येथे कार्यरत आहेत.
  दरम्‍यान जिल्‍हा परिषद अधिकारी, कर्मचारी यांच्‍या अमरावती विभागीय क्रीडा स्‍पर्धा व सांस्‍क‍ृतिक महोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून बुलडाणेकरांना  दिनांक 11 ते 13 फेब्रुवारी या तीन दिवसीय कालावधीत विविध प्रकारच्‍या सांघिक व वैयक्तिक तसेच महिला व पुरूष गटातील एकूण  40 प्रकारच्‍या स्‍पर्धांचा आनंद घेता येणार आहे. विशेष उल्‍लेखनीय असे की, मुख्‍य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ ह्या स्‍वतः बॅडमिंटन या खेळात महिला दुहेरी स्‍पर्धेमध्‍ये बुलडाणा जिल्‍ह्याचे प्रतिनिधीत्‍व करणार आहेत, असे जिल्हा परिषदेच्यावतीने कळविण्यात आले आहे.
                                                            ******
नांदुरा येथील परिवहन विभागाचे शिबिर 22 फेब्रुवारी रोजी होणार

बुलडाणा, दि.9: नांदुरा येथे आयोजित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे तालुका शिबीर 17 फेब्रुवारी 2017 रोजी होणार होते. मात्र  प्रशासकीय कारणास्तव सदर शिबिर आता  22 फेब्रुवारी 2017 रोजी आयोजित करण्यात येणार आहे, असे  उपप्रादेशीक परीवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. 

No comments:

Post a Comment