Thursday, 9 February 2017

news 9.2.2017 dio buldana

                      
         दबावाला बळी न पडता मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा
-         ज.स. सहारीया
·         जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक तयारीया आढावा
·         मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची माहिती देणारे फ्लेक्स
·         ट्रु वोटर ॲप्सचा उपयोग करावा
·         बॅलेट पेपरवरील ‘फॉन्ट साईज’ वाढविली
·         आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी करावी
बुलडाणा, दि.9 - जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका पहिल्या टप्प्यात घेण्यात येत असून या निवडणूकीला 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होत आहे.  जिल्हा परिषदेसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका घेण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व उपायोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करा, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी आज येथे दिल्या.
              जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियेाजन समिती सभागृहात निवडणुकीसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पूर्व तयारीचा आढावा ज. स. सहारिया यांनी घेतला. याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप बिष्णोई, निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक संजीवकुमार बावीस्कर, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दिपा मुधोळ, अप्प्र जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती श्वेता खेडेकर आदी उपस्थित होते.
    आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी करतांना मतदारांवर प्रभावासाठी दारु, रोख रक्कम अथवा वस्तूरुपाने साहित्य वाटप होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना करीत राज्य निवडणूक आयुक्त श्री. सहारिया म्हणाले, पहिल्यांदाच रेल्वे, वन विभाग, बँक तसेच आयकर विभागांच्या अधिकाऱ्यांची मदत घेणार असून इतर राज्यातून येणारे रेल्वे व इतर वाहतुकीवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र संगणकाच्या सहाय्याने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे उमेदवारांना त्यांच्या सोयीप्रमाणे नामनिर्देशन पत्र भरता आले. यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी तब्बल 70 हजार  नामांकन पत्र दाखल झाले. त्याचप्रमाणे नामनिर्देशन पत्र नामंजूर होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून निवडणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी पोलीस विभागानेही आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना पूर्ण केल्या आहेत. बॅलेट पेपरवरील उमेदवारांची नावे सहज वाचता येण्यासाठी या निवडणूकीपासून  अक्षर आकार 16 वरून 24 वर करण्यात आला आहे. सर्व यंत्रणांनी, राजकीय पक्षांनी आदर्श आचार संहितेची कडक अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  .
           जिल्ह्यात पंचायत समितीचे 120 नग व जिल्हा परिषदेचे 60 गट मतदारंसघात मतदान होत असल्याचे सांगत निवडणूक आयुक्त म्हणाले,  आदर्श आचार संहितेच्या अंमलबजावणीसाठी 13 पथके निर्माण केली आहेत. तसेच 13 नाका तपासणी पथके निर्माण करण्यात आली आहे. यावेळी सर्वप्रथम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी राज्यात मतदान केंद्र ठिकाणी फ्लेक्सवर उमेदवारांची माहिती देण्यात येणार आहे. ही माहिती उमेदवारांनी दिलेल्या शपथपत्रावर आधारीत असेल.  यामध्ये उमेदवारांचे शिक्षण, स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता, असलेले गुन्हे, झालेली शिक्षा व प्रलंबित असलेले गुन्ह्यासंदर्भात माहितीचा समावेश राहणार आहे. मतदारांनी आयोगाने विकसित केलेल्या ट्रु वोटर ॲपचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.
          ते पुढे म्हणाले, उमेदवारांना खर्चाची माहिती देणे बंधनकारक असून एक महिन्याच्या आत उमेदवारांनी खर्च सादर करावा. यावेळी राज्याचे विशेष पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी यावेळी विविध सूचना केल्या. बैठकीला उपजिल्हाधिकारी निवडणूक एस.एस खांदे, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार आदींसह संबंधीत यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.    

No comments:

Post a Comment