Wednesday, 22 February 2017

news 22.2.2017 dio buldana

 957 उमेदवारांच्या भाग्याचा आज निर्णय
·        185 टेबलवर मतमोजणी
·        597 कर्मचाऱ्यांची नियुक्ती
·        मतमोजणी होणार 209 फेऱ्या
बुलडाणा, दि. 22 : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीकरीता पहिल्या टप्प्यात 16 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्ह्यात मतदान झाले. जिल्ह्यात जिल्हा परिषद गटासाठी 574 उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. त्यापैकी 228 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. तसेच पंचायत समिती गणांसाठी जिल्ह्यात एकूण 1067 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी 456 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. अशाप्रकारे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांसाठी 957 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद गटासाठी 346 व पंचायत समिती गणांसाठी 611 उमेदवारांचा समावेश आहे. या 957 उमेदवारांच्या भाग्याचा निर्णय आज 23 फेब्रुवारी 2017 रोजी लागणार आहे.
    मतमोजणीकरीता जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून 185 टेबलवर मतमोजणी होणार आहे. सर्वत्र मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. जिल्ह्यात तेराही मतमोजणी केंद्रावर मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. बुलडाणा येथे मतमोजणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे होणार आहे. त्याचप्रमाणे चिखली येथे तालुका क्रीडा संकूल, दे.राजा येथे टाऊन हॉल, सिं. राजा येथे नगर परिषद टाऊन हॉल, मेहकर येथे वखार महामंडळाचे गोदाम डोणगांव रोड, लोणार येथे तहसील कार्यालय सभागृह, खामगांव येथे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाजूला सरकारी धान्य गोदाम, शेगाव येथे ग.भि मुरारका महाविद्यालय, मोताळा येथे तहसील कार्यालयाचे जुने सभागृह, मलकापूर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था जुनी इमारत नांदुरा रोड, नांदुरा येथे तहसील कार्यालय सभागृह, जळगांव जामोद येथे शासकीय धान्य गोदामाचा पश्चिमेकडील भाग आणि संग्रामपूर येथील मतमोजणी तहसील कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे.  
               मतमोजणीसाठी तालुकानिहाय असलेली टेबल, कर्मचारी आणि होणाऱ्या फेऱ्यांची संख्या
  बुलडाणा : टेबल 16, कर्मचारी 48 आणि मतमोजणी फेरी 30, चिखली : टेबल 15, कर्मचारी 75 आणि मतमोजणी फेरी 3 आणि मतमोजणी फेरी 3, दे.राजा : टेबल 12, कर्मचारी 48 आणि मतमोजणी फेरी 16, सिंदखेड राजा :  टेबल 16, कर्मचारी 48 आणि फेरी 18, मेहकर : टेबल 18, कर्मचारी 54 आणि फेरी 19, लोणार : टेबल 12, कर्मचारी 36 आणि फेरी 12, खामगांव : टेबल 15 , कर्मचारी 45 आणि फेरी 28, शेगांव : टेबल 15, कर्मचारी 45 आणि फेरी 12, मोताळा : टेबल 16, कर्मचारी 48 आणि फेरी 11, मलकापूर : टेबल 14, कर्मचारी संख्या 42 आणि फेरी 13, नांदुरा : टेबल 14, कर्मचारी संख्या 42 आणि फेरी 20, जळगांव जामोद : टेबल 10, कर्मचारी संख्या 30 आणि फेरी 22, संग्रामपूर : टेबल 12, कर्मचारी 36 आणि फेरी 5.  
                                                                        *****
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी 28 फेब्रुवारी 2017 रोजी चाचणीचे आयोजन
बुलडाणा, दि. 22 : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील युवक – युवतींकरीता सैन्य, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेतंर्गत शारीरिक मापदंड चाचणीचे आयोजन 28 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 11 वाजता सामाजिक न्याय भवन, त्रिशरण चौक, चिखली रोड, बुलडाणा येथे करण्यात आले आहे.
    या चाचणीकरीता उमेदवार हा महाराष्ट्राचा रहीवासी व अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील असावा, वय 18 ते 25 दरम्यान असावे, पुरूष उमेदवाराची उंची 265 से.मी व महिला उमेदवारांची उंची 155 से.मी असावी, पुरूष उमेदवारांसाठी छाती 79 से.मी आणि फुगवून 84 से.मी असावी, उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयातंर्गत नाव नोंदणी दाखला व ओळखपत्राची सत्यप्रत देणे आवश्यक राहील. उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. तरी पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.
                                                            *********
विधी साक्षरता शिबिर संपन्न
बुलडाणा, दि. 22 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने न्याय सेवा सदन हॉल, जिल्हा न्यायालय, बुलडाणा येथे नुकतेच दावा न्यायाधिकरण मान्य प्रक्रिया व असंघटीत कामगार क्षेत्रबाबतीत तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजना या विषयावर विधी साक्षरता शिबिर संपन्न झाले.
   या दोन्ही कार्यक्रमांना अध्यक्ष म्हणून सहदिवाणी न्यायाधीश एस.सी सिरसाट, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर.एन हिवसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा वकील संघाचे सचिव ॲड सै. हारूण यांनी केले. उपस्थितांना मान्यवरांनी मोटार अपघात न्यायाधिकरण प्रक्रिया व असंघटीत कामगारांसाठी शासनाच्या योजना या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
  संचलन व आभार प्रदर्शन ॲड अमर इंगळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस.एस अवचार, आर.आर इंगळे, मु. ग तायडे आदींनी सहकार्य केले. शिबिरांना बहुसंख्येने न्यायालयातील पक्षकार उपस्थित होते, असे अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी कळविले आहे.
********
विक्रीसाठी असलेल्या नवीन बारदान्याची लिलाव प्रक्रिया रद्द
बुलडाणा, दि. 22 : अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिपत्याखालील जिल्ह्यात 9 शासकीय गोदाम आहेत. या गोदामांमध्ये रिकामा बारदाना विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याकरीता ई-लिलाव प्रक्रिया सुरू करण्याबाबत जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे सदर निवीदा सुचना व निवीदाबाबत सविस्तर कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्या www.buldhana.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही ई-लिलाव सुचना तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात येत आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
*******
पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या कार्यशाळेचे आयोजन
·        www.jdatam.blogspot.in या संकेतस्थळावर थेट प्रेक्षपण
बुलडाणा, दि. 22 : नालंदा विद्यापीठाचे कुलपती तथा उन्नत भारत अभियानाचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांचा सत्कार सोहळा व मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन 23,24 व 25 फेब्रुवारी 2017 रोजी लेखा व कोषागार भवन, विद्यापीठ रोड, अमरावती येथे दुपारी 3 वाजता करण्यात आले आहे.

   या कार्यशाळेत राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण संस्थांच्या मदतीने राज्यातील विविध सामाजिक, विकासाच्या दैनंदिन जीवनातील समस्यांची उकल करून त्यावरील तोडगा यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच उन्नत भारत अभियानातंर्गत राज्य शासनाच्या विविध योजना, कृषि विकास व ग्राम विकास, अर्थसंकल्पीय व कॅशलेस मोहिमेबद्दल जागरूकता व संधी याबाबत डॉ. विजय भटकर मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण www.jdatam.blogspot.in या संकेतस्थळावर 23,25 व 25 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 3 वाजता करण्यात येणार आहे. या संधीचा उपयोग करून मार्गदर्शन प्राप्त करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment