मासेमारी करताना मृत्यूमुखी पडलेल्या अरूण किकराळे
यांच्या कुटूंबीयांना मदतीचा धनादेश प्रदान
बुलडाणा,(जिमाका) दि.20: येळगांव जलाशयामध्ये मासेमारी करतांना कै. अरुण आनंदा किकराळे यांचा मुत्यू झाला आहे. अरुण आनंदा किकराळे हे मच्छिमार सहकारी संस्था मर्यादीत येळगांव संस्थेचे सभासद होते. मच्छिमारांना मच्छिमार कायदयाने वारसदारांना उदनिर्वाहा करीता निधी दिला जातो. तसेच मृतकाची पत्नी श्रीमती अलका अरुण किकराळे यांना शासनाने मासेमारी संकट निवारण निधी योजने अंतर्गत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) कार्यालयामार्फत 1 लाख रुपये निधी सहाय्यक आयुक्त स. इ. नायकवडी यांचे हस्ते मृत मच्छिमारांचे वारसदार यांना दि. 16 एप्रिल 2021 रोजी धनादेश प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी मच्छिमार सहकारी संस्था मर्यादीत येळगांव संस्थेचे अध्यक्ष तुकारात आनंदा किकराळे, सचिव सुभाष गंगाराम राऊळकर, मनोहर राजाराम घट्टे, जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष दादाराव जाधव, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी इं. तु. देवकत्ते उपस्थित होते, असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक)स. इ. नायकवडी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000000
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन
कोविड साथरोग पार्श्वभूमी
बुलडाणा, (जिमाका) दि.20: सध्या राज्यात कोविड - 19 साथरोग संसर्गाचा प्रदुर्भाव वाढत असल्याने शासनाने जाहिर निर्बंध जाहीर केले आहे. खरिप हंगाम 2021 मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठयाबाबत राज्यातील शेतकरी, उत्पादक, वाहतुकदार, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणाऱ्या अडचणीचे निवारण करण्याकरीता राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देशानुसार जिल्हास्तरावर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विभाग जिल्हा परिषद येथे नियंत्रण कक्ष स्थापीत करण्यात आला आहे.
सदर नियंत्रण कक्षाशी 24 तास संपर्क साधण्यासाठी संपर्काचा भ्रमणध्वनी क्रमांक 8275340540, 8830152010 तसेच कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002334000 संपर्क साधावा. सोबत अडचण किंवा तक्रार dsaobuldana.qc @gmail.com, ado.buldana@yahoo.in ई मेल वर पाठवावे किंवा नोंदवता येणार आहे. तसेच ई -मेल वर येणाऱ्या अडचणी निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिकिंग बाबत असलेल्या तक्रारी नोंदवतांना आपले नाव, पत्ता संपर्क क्रमांक थोडक्यात किंवा सदर माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा छायाचित्र व्हॉट्सॲप किंवा ई - मेलवर पाठवल्यास आपल्या तक्रारींचे निराकरण करणे सोयीस्कर होईल. ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲप वापर करणे शक्य नसेल त्यांनी दिलेल्या भ्रमणध्वनी वर तोंडी तक्रार नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
000000000
अवैध सालई गोंद व लाकडे जप्त; भिंगारा ते निमखेडी मार्गावरील कारवाई
बुलडाणा, (जिमाका) दि.20: वनविभागाअंतर्गत जळगांव जामोद वनपरिक्षेत्रात दि. 12 एप्रिल 2021 रोजी सकाळी अंदाजे 5 वाजता निमखेडी बिट वनखंड 371 मध्ये भिंगारा ते निमखेडी मार्गावर रात्रगस्त करीत असतांना चॉकलेटी रंगाची टाटा इंडिगो कार क्रमांक एम एच – 20 बी सी 397 दिसून आली. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने गाडी जंगलात सोडून पळ काढला. आरोपीची वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी आरोपी तेजराज अशोक लोणी जळगांव जामोद येथील राहणार असल्याची खात्री केली असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) जळगांव जामोद यांनी नमूद केले आहे.
सदर आरोपीने टाटा इंडिगो गाडी व भ्रमणध्वनी सोडून पळ काढला आहे. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरित्या सालई गोंद व 8 कट्टे आढळून आले सदर गोंद मालाचे पंचनामा करुन वजन केले असता 265 कि. लो. भरले. याबाबत वनगुन्हा क्र. 665/16601 दि 12 एप्रिल 2021 अन्वये जारी करण्यात आला आहे. तसेच सदर माल व वाहन, भ्रमणध्वनी जप्त करुन लाकुड जळगांव जामोद आगारात ठेवण्यात आले आहे.
सदर आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) जळगाव जामोद व वनविभागाचे कर्मचारी घेत आहेत. आरोपी विरुध्द भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 ड, फ, ग, 41, 42, 52,61 ए,69 महाराष्ट्र वननियमावली नियम 2014 चे नियम 31,82 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी बी. डी. कटारिया, जळगांव जामोद, वनपाल पी. जी. सानप, वनरक्षक ए. आर. खेडकर, आर. व्हि. फड, बी. एम. खेडकर, वनविभागाचे कर्मचारी यांनी वरील प्रमाणे कारवाई केली आहे. तसेच अवैध सालई गोंद, अवैध वाहतुक,शिकार तस्करी, वृक्षतोड ची तक्रार बाबत माहिती असल्यास वनविभागास कळविण्याचे आवाहन उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
--
Comments
Post a Comment