Sunday, 11 April 2021
DIO BULDANA NEWS 11.4.2021
जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन
बुलडाणा, दि. 11 : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्ताने दि. 11 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला नायब तहसिलदार श्री. साठे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी पुष्प अर्पण केले.
**************
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि.11: कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साध्या पद्धतीने साजरी करावी आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने एकत्र जमून तसेच जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता एकत्र येऊन जयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने सकाळी 7 वाजूपासून संध्याकाळी 8 वाजण्यापूर्वी जयंती साजरी करणे अपेक्षित आहे.
दरवर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नये. त्याऐवजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. त्याठिकाणी एकाचवेळी अनुयायांची संख्या 5 पेक्षा अधिक असू नये. तसेच सामाजिक अंतराचे पालन व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दादर चैत्यभूमी येथे गर्दी जावू नये. तेथील कार्यक्रमाचे दूरदर्शनद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायींनी चैत्यभूमी दादर येथे न येता घरातूनच परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.
सार्वजनिक ठिकाणी गाणी, पथनाट्य व्याख्यानाचे आयोजन किंवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण केबलद्वारे किंवा ऑनलाईन करण्याची व्यवस्था करावी. यादिवशी प्रशासनाच्या परवानगीने आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करता येतील आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. अशा उपक्रमांचे आयोजन करताना कोरोनाविषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे.
कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे करावे. कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
00000
शासकीय कार्यालयात अभ्यांगतांसाठी आरटीपीसीआर कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्र आवश्यक
अत्यंत महत्वाचे काम असल्यासच कार्यालयात यावे
निवेदनेही ऑनलाईन ईमेल आयडीवर स्वीकारण्यात येतील
बुलडाणा, (जिमाका) दि.11: महसुल व वन विभागाच्या आदेशानुसार कोविडचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांनी अत्यावश्यक कामाशिवाय येवू नये. तसेच शासकीय कार्यालयात अति आवश्यक काम असल्यास अभ्यागतांनी त्यांचा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटीव्ह असल्याबाबतचे मागील 48 तासातील प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे अभ्यागतांनी अत्यावश्यक कामाशिवाय येवू नये. जिल्हाधिकारी कार्यालय येथे अतिआवश्यक काम असल्यास अभ्यागतांनी त्यांना आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटीव्ह असल्याबाबतचे मागील 48 तासातील प्रमाणपत्र सोबत ठेवावे. सदर निर्देश सोमवार 12 एप्रिलपासून लागू होणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे निवेदन देण्यासाठी न येता ऑनलाईन collector.buldhana@ maharashtra.gov.in व rdc_buldhana@rediffmail.com या ईमेल आयडीवर पाठवावे, असे अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
************
ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा पुरवठा व वापराचे योग्य नियोजन करावे
- पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे
डायलिसीसवरील रूग्ण पॉझीटीव्ह निघाल्यास त्याची स्वतंत्र व्यवस्था करावी
ऑक्सीजन पुरवठा, रेमडेसिवीरची उपलब्धतेचा घेतला आढावा
कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक
बुलडाणा, (जिमाका) दि 11 : जिल्हयात दिवसेंदिवस कोविड रूग्ण वाढत आहे. अशा परिस्थितीत यंत्रणांनी गाफील राहू नये. आलेल्या परिस्थितीवर मात करीत यंत्रणांनी ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा पुरवठा व वापराचे योग्य प्रकारे नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी आज दिल्या.
कोविड संसर्ग नियंत्रणाबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे आदी उपस्थित होते.
अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभागाने समन्वय ठेवून जिल्हयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे सांगत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, शासकीय रूग्णालयांमध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण होता कामा नये. डायलिसीसवरील रूग्ण जर पॉझीटीव्ह निघाल्यास त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. तसेच त्याचे नियमित डायलिसीस करण्यात यावे. रेमडेसिवीरचा जास्त वापर झाल्यास रूग्णांना साईड इफेक्ट होवू शकतात. त्यामुळे अतिआवश्यक असल्यासच त्याचा वापर करावा. जे खाजगी रूग्णालये कोविडवरील उपचार करीत आहेत, त्यांनी परवानगी घेतली आहे किंवा नाही हे तपासून बघावे. त्यांना नियमानुसार परवानगी दयावी. तसेच खाजगी रूग्णालये रूग्णांकडून अवाजवी रक्कम घेत तर नाही ना याबाबतही तपासणी करावी.
ते पुढे म्हणाले, जिल्हयात प्रत्येक उपविभागीय स्तरावर एक कोविड रूग्णालय तयार करता येईल का याबाबत जिल्हाधिकारी यांनी चाचपणी करावी. सिं. राजा येथील शासकीय रक्तपेढी लवकरात लवकर सुरू करण्यात यावी. परिस्थिती बघता राज्याचे मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याला जिल्हावासियांनी समर्थ द्यावे.
यावेळी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी कोविडचा पॉझीटीव्हीटी दर, मृत्यू दर, लसीकरणाचे प्रमाण, ऑक्सीजनचा साठा व पुरवठा, रेमडेसिवीरचा साठा व पुरवठा आदींचा आढावा घेतला. यंत्रणांकडून अडचणी जाणून घेतल्या. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
--
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment