Tuesday, 5 May 2020

DIO BULDANA NEWS 5.5.2020



लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यात 9809 मजूरांच्या हाताला मनरेगाचे ‘काम’
·        1896 कामे सुरू
·        चिखली तालुक्यात सर्वात जास्त 247 कामे
बुलडाणा, (जिमाका) दि. 5 : कोरोना विषाणू आपला विळखा पक्का  करीत असताना शासनाने देशात लॉकडाऊन जाहीर केले. तसेच विविध उपाययोजना करून कोरोनाला थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कामांनाही स्थगिती देण्यात आली. यामागे कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये हा उद्दात्त हेतू होता. लॉकडाऊन कालावधीत काम नसल्यामुळे बेरोजगार नागरिकांना उदरनिर्वाहाची चिंता सतत होती. मात्र शासनाने काही अटींवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार जिल्ह्यात या लॉकडाऊनच्या कालावधीत 9 हजार 809 मजूरांच्या हाताला काम मिळाले आहे.
  सध्या जिल्ह्यात 1896 कामे सुरू असून त्यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या कामांचा वाटा मोठा आहे. बेरोजगारीमुळे होणारी फरफट लक्षात घेता शासनाने मनरेगाची कामे सुरू करून खूप मोठा दिलासा दिला आहे. मनरेगाची मजूरीही विनाविलंब आठवड्याला मजूरांच्या बँक खात्यात जमा होत असल्यामुळे त्याची चिंताही मिटली आहे.   मनरेगातंर्गत एप्रिल 2020 पासून 238 रूपये प्रति दिवस मजूरीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मनरेगाचे कामावर कामाचे सप्ताह समाप्ती नंतर 15 दिवसाचे आत मजूरी प्रदान केल्या जाते. वेळेवर प्रदानाचे बाबत जिल्ह्याची टक्केवारी 100 टक्के असून सदर बाबतीत जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. मजूरी संबंधित मजूराचे बँक खात्यात प्रदान केल्या जाते. त्यामुळे मजूरीस विलंब लागत नाही. या योजनेतंर्गत सिंचन व जलसंधारण कामे प्राधान्याने करण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत. तसेच वैयक्तिक लाभाची कामे अंतर्गत विहीरी, फळबाग लागवड, गायी / शेळ्यांचा गोठा, शेततळे, रेशीम विकास कामे, शौचालये, शेतीची बांध बंधीस्ती व दुरूस्तीचे कामे केल्या जातात.
   जिल्ह्यात सर्वात जास्त मनरेगाचे कामावरील 1532 मजूर मेहकर तालुक्यात आहे. तसेच चिखली तालुक्यात मजूरांची उपस्थिती 1192 आहे. बुलडाणा तालुक्यात 638, देऊळगांव राजा 562, जळगांव जामोद 836, खामगांव 996, लोणार 336, मलकापूर 449, मोताळा 904, नांदुरा 629, संग्रामपूर 775, शेगांव 533 आणि सिंदखेड राजा तालुक्यात 427 मजूरांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे सर्वात जास्त 247 कामे चिखली तालुक्यात सुरू आहेत.  तर संग्रामपूर तालुक्यात 201 कामे सुरू आहे. बुलडाणा तालुक्यात 127, दे. राजा 75, जळगांव जामोद 193, खामगांव 178, लोणार 87, मलकापूर 77, मेहकर 168, मोताळा 166, नांदुरा 147, शेगांव 134 आणि सिंदखेड राजा तालुक्यात 96 कामे सुरू आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 1896 कामे सध्या सुरू आहेत.
  मजूरही शारिरीक अंतर व मास्क घालून काम करीत आहेत. चिखली तालुक्यातील बोरगांव वसू येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटीकेत काम करणाऱ्या मजूरांना मास्कचे वितरणही करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसलेल्या मजूरांसाठी मनरेगा धावूनच आली आहे.  या योजनेमुळे मजूरांना काम मिळून त्यांना मजूरीतून मिळणाऱ्या पैशामुळे उदरनिर्वाहाची चिंता मात्र मिटली आहे.
                                                                                ******
                                               
 कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बँकांनी पीक कर्ज वितरणाचे नियोजन करावे
-         जिल्हाधिकारी
·        खरीप हंगाम पीक कर्ज वितरण बैठक
बुलडाणा, (जिमाका) दि. 5 : कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीमुळे यावर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पिक कर्जाचा मोठा आधार मिळणार आहे. बँकांनी कुठल्याही प्रकारे शाखांमध्ये गर्दी न होता, साथरोग प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून पिक कर्ज वितरणाची कार्यवाही करावयाची आहे. त्यासाठी आतापासून बँकांनी सोपी व पारदर्शक पद्धत अंगीकारून पिक कर्ज वितरणाचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज दिल्या.
  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात खरीप हंगाम पीक कर्ज वितरण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. मनवर, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
  बँकांनी आपल्या क्षेत्रानुसार नियोजनबद्धरितीने पीक कर्जासाठी कागदपत्रे घेण्यासाठी मेळावे आयोजित करण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाल्या, यावेळी शेतकऱ्यांकडून सोशल डिस्टसिंगचे पालन करीत कागदपत्रे घ्यावीत. त्यासाठी एक फेरी आयोजित करावी. तर दुसऱ्या फेरीत पिक कर्ज वितरण करावे. शेतकऱ्यांना यासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास होवू देवू नये. शेतकऱ्यांना सौजन्याची वागणूक द्यावी. तालुकास्तरावर बँकांनी बैठका घेवून त्यासाठी महसूल यंत्रणेचा सहभाग घ्यावा. बँकांकडे यापूर्वी ज्या शेतकऱ्यांची केवायसी केलेली असेल किंवा केवायसीसाठी कागदपत्रे घेतलेली असतील, तर त्यांच्याकडून पुन्हा कागदपत्रे मागवू नये.
   यावेळी जिल्ह्यातील विविध बँकाकडून पात्र शेतकरी, पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आदींचा आढावा घेण्यात आला. बैठकीला विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
                                                                                 *****
कोरोना अलर्ट : जिल्हयात आज प्राप्त 6 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह '
बुलडाणा, (जिमाका) दि. 5 : जिल्ह्यात आज प्राप्त 6 रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत 555 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 24 रुग्ण कोरोनाबधित होते. त्यापैकी एक मृत आहे.  तसेच आतापर्यंत 20 कोरोनाबधीत रुग्णांचा दुसरा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 20 असून सध्या रूग्णालयात 3 रूग्ण उपचार घेत आहेत.
   तसेच आज 5 मे रोजी 6 अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व 6 अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 34 आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण 3 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 555 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment