कोरोना अलर्ट : जिल्हयात आज प्राप्त 08 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह '
बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : जिल्ह्यात आज प्राप्त 08 रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत 681 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 26 रुग्ण कोरोनाबधित होते. त्यापैकी एक मृत आहे. आतापर्यंत 23 कोरोनाबधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 23 आहे. सध्या रूग्णालयात दोन रूग्ण कोरोनाबाधीत असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
तसेच आज 16 मे रोजी 08 अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व 08 अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 72 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 681 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
********
बाहेरून येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करावी
- पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
· जिल्ह्याच्या सीमांवर अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांना रोखावे
· पालकमंत्री यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : जिल्ह्यात सध्या बाहेरून येणा-या नागरिकांचे प्रमाण खूप वाढले आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी परवानगी देण्यात आल्यानंतर अनेक कामगार, विद्यार्थी, मजूर व अडकलेले यात्रेकरू जिल्ह्यात दाखल होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या बाहेरून येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात यावी, असे आदेश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक दालनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद्र पंडीत, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पुरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते.
परवानगी देण्यात आलेल्या दुकानांमधून मूळ किंमतीपेक्षा दुकानदार चढ्या दराने साहित्य विक्री करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, कृषी, बांधकाम या क्षेत्राशी निगडीत असलेले साहित्य काही दूकानदार मूळ किंमतीपेक्षा चढ्या दराने विक्री करीत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे कुणीही दुकानदार अधिक दराने मालाची विक्री करीत असल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोरोनाच्या या आपत्कालीन परिस्थितीत कुणीही नफेखोरी करू नये. नागरिकांना मूळ किंमतीतच माल विकून त्यांची लूट करू नये. असे केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही यावेळी पालकमंत्री यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, बाहेरून आलेल्या नागरिाकांवर प्रशासनाने पूर्णपणे लक्ष ठेवावे आणि जिल्ह्याच्या सीमांवर अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या नागरिकांना रोखावे. याबाबत पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी. येत्या 17 तारखेला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत आहे. तसेच 18 मे पासून चौथा टप्पा सुरु होणार असल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे. शासनाकडून या चोथ्या टप्प्यात जे काही नवीन निर्देश येतील, त्यांचे तंतोतत पालन व्हावे. नवीन निर्देशांनुसार जिल्हा प्रशासनाने आपले नियोजन तयार ठेवावे, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी यावेळी दिले.
ग्रामस्तरीय समिती गावातच भरून घेणार पीक कर्ज अर्ज
· बँक प्रतिनिधी गावातच येवून अर्ज घेतील
· स्टॅम्प पेपरवर नोटरी तहसिलमध्ये करण्याची आवश्यकता नाही
बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : खरीप हंगाम काही दिवसांवर येवून ठेपला आहे. प्रशासनाकडून पीक कर्ज वितरणाची कार्यवाही सुरू आहे. पीक कर्ज वितरणाला गती व सुलभता मिळण्यासाठी प्रशासनाने या टाळेबंदीत विशेष कार्यपद्धतीचा अंगीकार केला आहे. प्रत्येक स्तरावर कर्ज सुलभीकरण समित्यांची स्थापनाही करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा, तालुका व ग्राम स्तरीय समित्यांचा समावेश आहे. टाळेबंदी व कोरोना संसर्ग विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पीक कर्जासाठी बँकेत गर्दी करण्याची गरज नसून ग्रामस्तरीय समिती गावातच पात्र शेतकऱ्यांचे पीक कर्ज अर्ज भरून घेणार आहे.
कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी सर्व बँकांनी तालुकास्तरीय समितीकडे अर्थात तहसिल कार्यालयात तात्काळ सादर करावयाची आहे. ही यादी बँकांनी गावनिहाय सादर करावी. त्याचप्रमाणे संबंधित बँकेने यादीतील शेतकऱ्यांच्या संख्येनुसार पीक कर्ज मागणीचे कोरे अर्ज तहसिल कार्यालयात सादर करावे. तहसिल कार्यालयाकडे प्राप्त पात्र शेतकऱ्यांची यादी तहसील कार्यालय व तालुका निबंधक / सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांनी सदर याद्या गावांमध्ये प्रकाशित कराव्यात. तसेच प्राप्त कोरे अर्ज ग्रामस्तरीय समितीकडे सुपूर्द करावेत.
ग्रामस्तरीय समितीने गावामध्ये जावून पात्र शेतकऱ्यांचे पीक कर्ज मागणी अर्ज भरून घ्यावे. या अर्जासोबत 7/12, नमुना 8 अ आदी आवश्यक कागदपत्रे गावातच जोडून घ्यावीत. त्यानंतर बँकांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवून गावातच असे परिपूर्ण अर्ज प्राप्त करून घ्यावेत. यासाठी तालुका निबंधक अथवा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांनी व बँकांनी गावात जावून अर्ज जमा करावेत. त्यासाठी निश्चित असा कार्यक्रम जाहीर करून प्रकाशित करावा. स्टॅम्प पेपरवर करावयाचे शपथपत्र हे नोटरी किंवा तहसिल कार्यालयामध्ये जावून करून घेण्याची आवश्यकता नाही. बँकांनी पूर्वीच स्टॅम्प पेपर विकत घेवून बॅकेकडे ठेवावेत. आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावीत व कर्ज प्रकरणाला जोडावीत. तसेच बँकांनी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करू नये. आवश्यकता असल्यास ती आपसात मागणी करून घ्यावीत.
कर्ज प्रकरणे प्राप्त झाल्यानंतर व मंजूर केल्यानंतर असे दोन वेळा बँकांनी त्यांचा अहवाल तालुकास्तरीय समितीला सादर करावा. फेरफार प्रमाणपत्र केवळ नवीन शेतकरी कर्जदार यांनाच आवश्यक असल्याने इतर नियमित अर्थात जुन्या शेतकऱ्यांना फेरफार प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच 7/12 व नमुना 8 अ मध्ये मागील कर्ज प्रकरणानंतर बदल झालेला असल्यास फेरफार प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. कर्जमाफी झालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना संबंधीत बँकेने कर्ज वाटपाची प्रक्रिया प्राधान्याने पुर्ण करावी. संपूर्ण कर्जवाटप प्रक्रिये दरम्यान कोरोना साथरोग पसरू नये म्हणून मास्क किंवा रूमाल चेहऱ्यावर बांधावा आणि शारिरीक अंतराच्या नियमांचे पालन बंधनकारक राहणार आहे, असे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी कळविले आहे.
अशी असणार ग्रामस्तरीय सामिती
अध्यक्ष तलाठी असून विविध कार्यकारी सह. संस्था / ग्रामसेवा सह. संस्थेचे गट सचिव सदस्य सचिव असणार आहे. ग्रामसेवक, कृषि सहाय्यक व ग्रामस्तरीय बँकेचे प्रतिनिधी सदस्य असणार आहे.
No comments:
Post a Comment