नवमतदारांना मिळणार स्मार्ट
ओळखपत्र…!
·
30 नोव्हेंबर 2017 पर्यंत विशेष मोहिम
·
सहस्त्रक मतदार म्हणून होणार गौरव
बुलडाणा, दि. 23 : संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रमातंर्गत
जिल्ह्यात 15 ते 30 नोव्हेंबर 2017 दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या
मोहिमेदरम्यान बीएलओ घरोघरी जावून मतदार यादीत नाव नोंदविणे व अन्य मतदारासंबंधी कामे
करणार आहे. सदर बीएलओ घरी आल्यानंतर त्यांना सहकार्य करून आपले नाव मतदार यादीत
नसल्यास ते नोंदवावे. तसेच बीएलओ 1 ते 8 नमुन्यांची माहिती संकलीत करून ऑनलाईन
मोबाईल ॲपवर अपलोड करणार आहे. या नव मतदारांना स्मार्ट मतदान ओळखपत्र देण्यात
येणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान 21 व्या शतकाच्या पहिल्या
दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2000 रेाजी जन्म झाला व 1 जानेवारी 2018 रोजी वयाची 18
वर्ष पुर्ण करीत असलेल्या मतदारांना सहस्त्रक मतदार अर्थात मिलेनीयम वोटर्स म्हणून
संबोधण्यात येणार आहे. जे मतदार सहस्त्रक मतदार म्हणून नोंदणी करतील अशा मतदारांचा
घरोघरी जावून बीएलओ सत्कार करणार आहे. तसेच आगामी राष्ट्रीय मतदार दिनी 25
जानेवारी 2018 रोजी या तरूण मतदारांच्या समवेत त्यांना ‘मी भारताचा सहस्त्रक मतदार आहे, I am Millenium Voter of India’ असे
लिहीलेला खास बॅच व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार वैयक्तिकपणे जिल्हाधिकारी तथा
जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 1
जानेवारी 2000 रोजी ज्यांचा जन्म झाला आहे व वयाची 18 वर्ष पुर्ण होत आहेत, अशा
सहस्त्रक मतदारांनी जास्त संख्येने मतदार नोंदणी करावी.
निवडणूक आयोगाने ऑनलाईन मोबाईल ॲप विकसित केले
आहे. या ॲप्सच्या माध्यमातून माहिती अपलोड करावयाची आहे. ग्रामीण भागात सकाळी
किंवा सायंकाळी आणि शहरी भागात दिवसभरात एकदा बीएलओ घरी येणार आहे. माहिती निवडणूक
आयोगाने दिलेल्या नमुना 1 ते 8 मध्ये नोंदवून ऑनलाईन मोबाइल ॲपवर अपलोड करावयाची
आहे. त्याअनुषंगाने बीएलओ आपल्या दारी ही
मोहिम राबविण्यात येत आहे. बीएलओला घरी आल्यानंतर संपूर्ण कुटूंबाची माहिती
द्यावी. जेणेकरून आपल्या कुटूंबातील कुणीही व्यक्ती मतदार यादीत नाव नोंदणीपासून
वंचित राहणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
*****
प्रलंबित
शिष्यवृत्ती अदा करण्यासाठी ई- स्कॉलरशीप पोर्टल सुरू
- प्रलंबित अर्ज प्रकरणे महाविद्यालयांनी 30
नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन समाजकल्याणकडे सादर करावी
बुलडाणा,
दि.23 : सामाजिक
न्याय विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अथवा शिक्षण शुल्क,
परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता, विद्यावेतने आदी योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ
दिला जातो. सन 2017-18 या वर्षापासून राज्य शासनाने सर्व विभागाच्या सर्व
प्रकारच्या शिष्यवृत्त्या ह्या महाडीबीटी पोर्टल मार्फत अदा करण्याचा निर्णय
घेतला. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे http://mahaeschol.maharashtra.gov.in
हे संकेतस्थळ संस्थगित करण्यात आले होते. मात्र काही विद्यार्थ्यांचे या
प्रकरणांचे लाभ देण्याचे प्रलंबित असल्यामुळे ते अदा करणेसाठी आता ई-स्कॉलरशीप हे
संकेतस्थळ 21 नोव्हेंबर पासून पुन्हा मर्यादीत कालावधीकरीता सुरू करण्याचा निर्णय
घेण्यात आला आहे.
प्रथम टप्प्यामध्ये ज्या
विद्यार्थ्यांनी सन 2015-16 साठी 31 जून 2016 पर्यंत आणि सन 2016-17 करीता 31
मार्च 2017 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत. मात्र ज्यांना अद्याप शिष्यवृत्ती,
शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कचा लाभ मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांचे
महाविद्यालयाकडे प्रलंबित असलेले अर्ज आणि नुतनीकरण करावयाचे प्रस्ताव
महाविद्यालयांनी या पुनरूज्जीवीत करण्यात आलेल्या संकेतस्थळावरून 21 नोव्हेंबर ते 30
नोव्हेंबर 2017 या कालावधीत जिल्हा समाज
कल्याण अधिकारी, बुलडाणा यांचेकडे पाठवावीत. याबाबत सविस्तर सुचना असलेले परीपत्रक
आणि वेळापत्रक हे विभागाच्या www.sjsa.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी
त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सादर केलेले सन 2015-16 व 2016-17 चे पात्र
विद्यार्थ्यांचे प्रलंबित आणि नुतनीकरणाचे प्रस्ताव त्वरीत सादर करावे. कोणताही
पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची महाविद्यालयाच्या
प्रचार्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले
आहे.
*****
अनुसूचिज जमाती
प्रवर्गातील शिष्यवृत्तीच्या अर्जांसाठी महाडीबीटी पोर्टल कार्यान्वीत
·
http://mahadbt.gov.in
या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे
·
तात्रिक अडचणींकरीता 18001025311
क्रमांकावर संपर्क साधावा
बुलडाणा, दि. 23 - प्रकल्प
अधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत शासकीय, अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालय,
कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय, प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद, नगर पालिका
शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
देण्यात येते. त्यांना या शैक्षणिक वर्षापासून शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या सुवर्ण
महोत्सवी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना, इयत्ता 8 ते 12 वी मध्ये शिक्षण
घेणाऱ्या अपंग विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती
योजना, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनांची अंमलबजावणी http://mahadbt.gov.in
पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून राज्य शासनाच्यावतीने सर्व वैयक्तिक
लाभाच्या योजना डीबीटी पोर्टल मार्फत (थेट लाभ
हस्तांतरण योजना)
राबविण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. सदर पोर्टलवर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन
अर्ज दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच संस्था, महाविद्यालय, प्राथमिक व
माध्यमिक विद्यालयांनी या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तरी अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र
विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षात भारत सरकार मॅट्रीकोत्तर
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेचा लाभ थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे
करण्यात येत आहे. या अनुषंगाने भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क
व परीक्षा शुल्क योजनेचा लाभ मिळविण्यासाठीचे अर्ज वित्तीय वर्ष 2017-18
पासून http://mahadbt.gov.in
या संकेतस्थळावर सादर करावयाचे आहे.
त्यानुसार सर्व पात्र विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज भरावे.
याबाबत काही तांत्रिक अडचणी किंवा शंका उद्भवल्यास डीबीटी टोल फ्री क्रमांक 18001025311 किंवा इमेल mahadbt.helpdesk@maharashtra.gov.in यावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी
विनीता सोनावणे यांनी केले आहे.
****
स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी ई-ग्रंथालयात 50 विद्यार्थ्यांना
निशुल्क प्रवेश मिळणार
·
जिल्हाधिकारी कार्यालयातील अभ्यासिका
·
27 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2017
दरम्यान अर्ज सादर करावे
बुलडाणा, दि. 23 - जिल्हास्तरीय सेतु
समिती अंतर्गत एमपीएससी व युपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी ई-ग्रंथालयमध्ये 50 विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश देण्यात येणार
आहे. त्यासाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जाचा नमुना व अटींची माहिती www.buldhana.nic.in या
संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्जाचा नमुना डाऊनलोड करून अर्जासोबत
पदवीचे प्रमाणपत्र जोडून अर्ज ई ग्रंथालय, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,
बुलडाणा येथे सादर करावेत. सदर अर्ज व पदवीचे प्रमाणपत्र स्कॅन करून elibdisbul@gmail.com या ईमेल आयडीवर 27
नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून ते 8
डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाठवावेत. निर्धारीत दिनांकानंतर अर्ज
स्वीकारले जाणार नाहीत. तसेच आवश्यकता असल्यास परीक्षेस पात्र ठरलेल्या
उमदेवारांची लेखी परीक्षेची दिनांक, यादी व प्रवेशपत्र www.buldhana.nic.in या संकेतस्थळावर 15
डिसेंबर 2017 रेाजी अपलोड करण्यात येईल. सदर प्रवेशपत्र पात्र उमेदवारांनी डाऊनलोड
करून सदर प्रवेशपत्र भरून त्यासोबत उमेदवारांनी परीक्षेला येताना छायांकित ओळखपत्र
उदा. आधार कार्ड, मतदान कार्ड, चालक परवाना, पॅनकार्ड आदीपैकी एक पुरावा सोबत
आणावा, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
******
तूर पिकावरील किडींचे व्यवस्थापन
करावे
·
कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि.
23 : तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या किडीमध्ये हिरवी अळी अर्था घाटे अळी, पिसारी
पतंग, शेंग माशी या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेंगा
पोखरणाऱ्या किडीची मादी सरासरी 600 ते 800 अंडी तूरीची कोवळी पाने, देठ अथवा
कळ्या, फुले तसेच शेंगांवर वेगवेगळी घालत असते. अंडी अवस्था 3 ते 4 दिवसांची असते.
अंडीतून बाहेर पडलेल्या अळ्या सुरूवातीस सुस्त असून प्रिाम कोवळी पाने व देठ
कुरतडून खातात. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान आभाळ आभ्राच्छादीत असल्यास या किडीचा
प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो.
पिसारी पतंग नाजूक निमुळता
12.5 मि.मी लांब करड्या/भुऱ्या रंगाचा असतो. पुढील पंख दुभंगलेले व मागील पंख तीन
भागात विभागलेले असतात. त्यांच्या कडांवर नाजूक केसांची दाट लव असते. पुढील पंख
खूप लांब असून त्यांचे पाय लांब व बारीक असतात. अंड्यातून बाहेर पडलेली अळी कळ्या,
फुले व शेंगांना छिद्रे पाडून खाते. पुर्ण
वाढ झालेली अळ प्रथम शेंगेचा पृष्ठभाग खरडून खाते व नंतर शेंगेला शेंगेच्या बाहेर राहून
खाते. शेंगमाशीच्या प्रादुर्भावाने शेंगेवर कोणतेही लक्षण दिसत नाही. मात्र जेव्हा
पूर्ण वाढलेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते. छिद्रातून माशी
बाहेर पडते, तेव्हा नुकसानीचा प्रकार आढळून येतो. अपाद अळी शेंगेत शिरून दाणे
अर्धवट कुरतडून खाते. त्यामुळे दाण्याची मुकणी होते. त्यावर वाढणाऱ्या बुरशीमुळे
दाणे कुजतात.
असे करावे नियंत्रण
तृणधान्य व तेलबिया पिकाबरोबर पिकाची फेरपालट करावी,
पेरणीपूर्वी मशागत खोल नांगरणी व वखरणी करावी, वेळेवर कोळपणी व खुरपणी करावी, अळ्या
वेचून त्यांचा नाश करावा, हेक्टरी 10 कामगंध व 20 पक्षीथांबे पिकात उभारावीत, घाटे
अळीच्या नियंत्रणाकरीता त्या अळीचा विषाणू प्रति हेक्टर 500 रोगग्रस्त अळ्यांचा अर्क
फवारावा, शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणाकरीता 5 टक्के निंबोळी अर्क फवारावा.
तसेच या किडीच्या नियंत्रणाकरीता आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास अझाडिरेक्टीन 300
पीपीएम 50 मि.ली किंवा क्लोरानट्रनिलीप्रोल 18.5 एस.सी 3 मिली इमामेक्टीन बेंझोएट
5 एसजी 4.4 ग्रॅम किंवा इथिऑन 50 ईसी 20 मि.ली किंवा फ्लुबेंडामाईड 39.35 एससी 2
मिली किंवा एन्डॉक्सिकार्ब 15.8 ई.सी 6-7 मिली किंवा लॅमडा सायहेलेथ्रीन 5 ई.सी 10
मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 28 मिली किंवा स्पिनोसॅड 45 एससी 1.5-1.6 मिली प्रति
10 लीटर पाण्यात मिसळून यापैकी एक घटकाची फवारणी करावी , असे आवाहन उपविभागीय कृषि
अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.
*******
संपूर्ण डिसेंबर
महिनाभर मुख कर्करोग तपासणी मोहिम
बुलडाणा, दि.
23 : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम निदर्शनास आणून 30 वर्षावरील
नागरिकांची मौखिक तपासणीची महत्वपूर्ण मोहिम 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत
राबविली जाणार आहे. तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थांच्या सेवनामुळे हृदयरोग, फुफ्फुपासे
आजार, कर्करोग यासह अनेक गंभीर आजराचे प्रमाण वाढत आहे. या पदार्थांच्या सेवनामुळे
शरीरावर होणाऱ्या दुष्परीणामांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य
विभागामार्फत जनजागृती केली जाणार आहे.
या मोहिमेच्या पूर्व तयारीसाठी आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा
आढावा घेण्यात येत आहे. मुख कर्करोग तपासणी मोहिमेसाठी विशेष चमुची स्थापना
करण्यात आली आहे. तसेच जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या
मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 30 वर्षाव्रील नागरिकांनी डिसेंबर महिन्यात मुख
कर्करोग तपासणी करावी व तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन टाळावे, असे आवाहन जिल्हा शल्य
चिकित्सक यांनी केले आहे.
मुख कर्करोगाविषयी थोडेसे..
मुख कर्करोगाची कारणे: तंबाखू गुटखा
यांचे सेवन, सुपारी व तत्सम पदार्थ, मुख आरोग्य संबंधी अनास्था, दारूचे नियमित
सेवन, पोषक जीवनसत्वांची कमतरता, विषाणू संसर्ग. लक्षणे: तोंडात न बरी होणारी जखम,
पांढरा चट्टा (आतून गाल व ओंयावर), तोंडात वाढत जाणारी गाठ, तोंडात न बरा होणारा
अल्सर, मानेमध्ये वाढत जाणाऱ्या गाठी, तोंड उघडण्यास, गिळण्यास किंवा चावण्यास
त्रास, जीभेची कमी हालचाल आणि तोंडाचा खराब वास येणे. मुख कर्करोगापूर्वी होणारे
विकार : तोंड कमी उघडणे, गाल आतून कडक होणे, गाल ओढ आतून पांढरे पडणे, गालावर आतून
किंवा लाल चट्टा येणे.
No comments:
Post a Comment