Saturday, 18 November 2017

news 18.11.2017 dio buldana

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची व्यवसाय प्रशिक्षण योजना जाहीर
  • 24 नोव्हेंबर पर्यंज अर्ज स्वीकारणार
  • युवकांनी स्वयंरोजगारासाठी योजनेचा लाभ घ्यावा
बुलडाणा, दि.18 -  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्या जिल्हा कार्यालयाला सन 2017-18 आर्थिक वर्षाकरीता उद्दिष्ट प्राप्त झाले  आहे. सदर उद्दिष्ट व्यावसायिक प्रशिक्षण योजनेतंर्गत देण्यात आले आहे. त्यानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र उमेदवारांचे व्यावसायिक प्रशिक्षण निवडीकरीता अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. अर्ज 24 नोव्हेंबर 2017 रोजी सायं 6 वाजेपर्यंत जिल्हा कार्यालय, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, सामाजिक न्याय भवन, त्रिशरण चौक, बुलडाणा यांच्याकडे सादर करावीत.
   अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील पात्र व इच्छूक उमेदवारांची निवड व्यवसाय प्रशिक्षण योजनेतंर्गत करण्यात येणार आहे. या योजनेसाठी मात्र मातंग व चर्मकार संवर्गातील सर्व जाती व त्यामध्ये येणारे सर्व उपजातीचे लाभार्थी पात्र असणार नाही.  योजनेसाठी अर्जदार हा जिल्ह्याचा रहीवासी असावा, अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा तहसिलदाराचा दाखला, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखल्याची झेरॉक्स, पासपोर्ट फोटो सादर करावे. तरी गरजू व इच्छूक सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक संजय लातूरकर  यांनी केले आहे.
                                                                        ********
विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने विधी सेवा सप्ताह साजरा
बुलडाणा, दि.18 -  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा वकील संघ बुलडाणा यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात विधी सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. सदर सप्ताह जिल्ह्यात 9 ते 18 नोव्हेंबर दरम्यान साजरा करण्यात आला.  सप्ताहादरम्यान जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सभागृहात ‘मध्यस्ती काळाची गरज’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये जिल्हा वकील संघाचे ॲड किरण राठोड, ॲड विनोद बनकर, ॲड अमोल देशमुख, ॲड संतोष राठोड, ॲड एस.ए झिने, ॲड संतोष नरवाडे, ॲड सै. हारूण, ॲड संदीप टेकाळे, ॲड विक्रांत मारोडकर, ॲड वर्षा पालकर, ॲड आरीफ सैय्यद, ॲड अनुराधा वावगे या विधीज्ञांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला.
   या स्पर्धेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे शै. अ बाफना, कर्मचारी डि. सी तोमर, अधिक्षक एस. एस अवचार, आर. आर इंगळे, एम. एम भारसाकळे, सुनील मुळे, हेमंत देशमुख आदींनी प्रयत्न केले.
*****
महिला लोकशाही दिनाचे 20 नोव्हेंबर रोजी आयोजन

बुलडाणा, दि‍. 18 : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित होणाऱ्या जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन 20 नोव्हेंबर 2017 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे.  तक्रारी असणाऱ्या महिला तक्रारदारांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment