Tuesday, 10 December 2019

DIO BULDANA NEWS 10.12.2019

राजा राम मोहन रॉय प्रतिष्ठान अंतर्गत ग्रंथालयांना असमान निधी योजनेतून अर्थसहाय्य
·        20 डिसेंबर 2019 पर्यंत ग्रंथालयांनी अर्ज करावे
बुलडाणा, दि.१० :  भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातंर्गत राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या असमान निधी योजने अंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येतात. त्यानुसार सन 2019-20 साठी असमान निधी योजनेतंर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विविध बाबींसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.     
         ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामुग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य,  राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य, ५०,६०, ७५, १००, १२५ आणि १५० वे महोत्सवी वर्ष असल्यास हे वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरूकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य आणि बाल ग्रंथालय व राजा राममोहन ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्याकरिता अर्थसहाय्य या योजनेतून देण्यात येते. या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
   या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी संकेतस्थळावर संपर्क साधावा. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरीलपैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहीत मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात २० डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावे, असे आवाहन ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                                    *****
मनरेगातंर्गत तक्रार निवारण प्राधिकारी पदासाठी अर्ज सादर करावे
बुलडाणा, दि.१० :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कार्यरत  मजुर, योजनेचे लाभार्थी व सामान्य नागरिक यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी व योजनेमध्ये पारदर्शकता, उत्तरदायीत्व व सहभाग वाढविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा 2005 कलम 27 (1) अंतर्गत जिल्हास्तरावर तक्रार निवारण अधिका-याची (ombudsman) नियुक्ती करण्यासाठी  ईच्छुक व्यक्तीकडुन अर्ज मागविण्यात येत आहे.
      या पदासाठी अर्ज करणा-या व्यक्तीस लोकप्रशासनाचा, कायद्याचा , सामाजिक कार्य, शैक्षणिक किंवा व्यवस्थान क्षेत्रातला किमान 20 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा किमान पदव्युत्तर Post Graduate), संगणकीय ज्ञान असणारा (किमान एमएससीआयटी असावा, त्याव्यक्तीचा राजकीय पक्षाशी कोणत्याच प्रकारचा संबध नसावा, सदर व्यक्ती शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त व सक्षम असावी, अतिदूर भागात दौरे , निरीक्षणे करण्यास सक्षम असावी, निवड होणा-या तक्रार निवारण अधिका-याची (ombudsman) चा कालावधी 2 वर्षाचा राहणार असून या अधिका-याचे मुख्यालय जिल्हयाचे ठिकाणी राहिल व त्यास मासिक बैठक भत्ता 1 हजार रूपये प्रति बैठक या दराने (मात्र दरमहा कमाल 20 हजार रूपये एवढया मर्यादेत), तांत्रिक व प्रशासकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. उमेदवारांस शासन निर्देशीत करील अशा ठिकाणी स्वखर्चाने मुलाखतीचे ठिकाणी हजर रहावे लागेल.

      इच्छूकांनी सदर अर्ज ए-4 पेपरसाईज चे कागदावर, एका बाजुनेच (one side) संगणकीय टंकलीखीत केलेला असावा. सदर अर्जात अर्जकर्त्याचे पूर्ण नांव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक(landline), भ्रमणध्वनी (Mobile No.), ईमेल आयडी, शैक्षणीक पात्रता, सेवापुस्तकाचे पहिल्या पानाची झेरॉक्स, अनुभवाचे सविस्तर वर्णन (शेवटी कार्यरत कार्यालयाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी आदींसह), कोणत्याही राजकीय पक्षाशी संबधीत नसल्याचे व कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र, फिटनेस (Fitness)बाबत वैद्यकीय दाखला,पासपोर्ट साईज फोटो आदी कागदपत्रांसह अर्ज दि.30 डिसेंबर 2019 पुर्वी कार्यालयीन दिवशी दु 1 वाजता पावेतो जिल्हाधिकारी कार्यालय (रोहयो शाखा), बुलडाणा येथे समक्ष सादर करावा. सोबत शैक्षणीक पात्रतेच्या, अनुभवा संबधीत सर्व कागदपत्र, सेवापुस्तक पहिल्या पानाची झेरॉक्स स्वसाक्षांकीत करुन जोडावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        *****
वैश्विक आरोग्य संरक्षण दिनानिमित्त 12 डिसेंबर रोजी आरोग्य शिबिर
·        शेगांव, लव्हाळा ता. मेहकर, सावळा ता. बुलडाणा व दाताळा ता. मलकापूर येथे आयोजन
बुलडाणा, दि.१० :  जिल्ह्यामध्ये वैश्विक आरोग्य संरक्षण दिनाचे औचित्य साधून गुरूवार, १२ डिसेंबर २०१९ रोजी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर अंगीकृत रूग्णालयांमार्फत सईबाई मोटे शासकीय उपजिल्हा रूग्णालय शेगांव, लव्हाळा ता. मेहकर, दाताळा ता. मलकापूर, सावळा ता. बुलडाणा येथे आरोग्य शिबिरे होणार आहेत.
   शेगांव येथे सामान्य रूग्णालय खामगांव, जिल्हा सामान्य रूग्णालय बुलडाणा, सईबाई मोटे उपजिल्हा रूग्णालय शेगांव, माऊली डायलीसीस सेंटर शेगांव आणि सिल्वरसिटी हॉस्पीटल खामगांव हे अंगीकृत रूग्णालये आरोग्य शिबरात सहभाग घेणार आहेत. तसेच ग्रामपंचायत लव्हाळा ता. मेहकर येथे होणाऱ्या शिबिरात तुळजाई हॉस्पीटल चिखली व मेहकर मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल मेहकर सहभागी होणार आहेत. ग्रामपंचायत दाताळा ता. मलकापूर येथे शिबिरात चोपडे हॉस्पीटल मलकापूर व सिटी हॉस्पीटल बुलडाणा सहभागी होवून रूग्णसेवा देणार आहेत. ग्रामपंचायत सावळा ता. बुलडाणा येथील शिबिरात अमृत हृदयालय आणि सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल बुलडाणा व मेहेत्रे हॉस्पीटल बुलडाणा सहभागी असणार आहेत.
    आरोग्य वर्धिनी केंद्रांच्या मदतीने संबंधित केंद्रांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व गावांमधील आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांचे कार्ड तयार करून घेण्यात यावे. जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देणे शक्य होणार आहे.  तरी लाभार्थ्यांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
                                                आयुष अभियानातंर्गतही १६ डिसेंबर रोजी शिबिराचे आयेाजन
आयुष अभियान अंतर्गत सर्व जनतेसाठी मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन १६ डिसेंबर २०१९ रोजी आयुष कक्ष, जिल्हा रूग्णालय बुलडाणा येथे सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या शिबिरात आयुर्वेदीक, युनानी होमीओपॅथी, योग व निसर्गोपचार पद्धतीने उपचार करण्यात येणार आहे.   गरजु रूग्णांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सामान्य रूग्णालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
                                                                        *****

दिव्यांग सहाय्यता व मार्गदर्शन मेळावा उत्साहात
बुलडाणा, दि. 10 : स्थानिक गर्दे वाचनालय सभागृहात 9 डिसेंबर 2019 रोजी दिव्यांग सहाय्यता व मार्गदर्शन मेळावा व नोंदणी अभियानाचे आयोजन नगर परिषद बुलडाणा, दिव्यांग कल्याण केंद्र,  संत गाडगेबाबा अपंग कल्याण व पुर्नवसन संस्था यांच्या सहभागाने करण्यात आले.  हा मेळावा उत्साहात पार पडला.  या मेळाव्यामध्ये दिव्यांगांना एस.टी.पास,  रेल्वे पास, असमर्थ दाखला आदींचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान दिव्यांग कल्याण केंद्र बुलडाणा यांच्या वतीने दिव्यांग वधु-वर नोंदणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्राअंतर्गत अस्थिव्यंग, अंध, मुकबधिर दिव्यांगांची नोंदणी करुन लग्न जुळवून देण्यासाठी प्रयत्न केला जातो. या कार्यक्रमात उपक्रमाची घोषणा केल्यानंतर एका दिव्यांग जोडप्याचे मान्यवरांच्या शुभआशिर्वादाने लग्नही  लावण्यात आले.  नगर परिषदेच्यावतीने या जोडप्याला शुभेच्छा म्हणुन नगर परिषदेचे उपाध्यक्ष विजय जायभाये यांनी 11 हजार रूपये नगर पालिकेच्या फंडातुन आर्थिक सहाय्य देण्याचे घोषित केले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी केले. ते म्हणाले, दिव्यांग कल्याण केंद्र नगर परिषद च्या माध्यमातुन शहरातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणी करुन शासनाच्या विविध योजना एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी दिव्यांग कल्याण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.पा उपाध्यक्ष विजय जायभाये होते.  उद्घाटक म्हणून  जिल्हा शल्य चिकित्सक प्रेमचंद पंडित उपस्थित होते.  एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक श्री. रायवलकर, उपशिक्षणाधिकारी उमेश जैन,  कुणाल गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी दिव्यांगांना शासकिय योजनांविषयी मार्गदर्शन केले.  बुलडाणा नगर परिषदेचे नगर सेवक उमेश कापुरे, मंदार बाहेकर आणि विविध अधिकारी व कर्मचारी वर्ग कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित होते.
    दिव्यांग लाभार्थ्यांना नगर परिषद बलडाणा च्या माध्यमातुन विविध प्रकारची मदत दरवर्षी करण्यात येत आहे. दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्यासाठी नगर परिषद नेहमीच आपल्यासोबत राहील असे आवाहन विजय जायभाये यांनी केले.  संचालन रमेश आराख यांनी तर,आभार प्रदर्शन कर निरीक्षक स्वाती तायडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  न.प. व्यवस्थापक महेंद्र सौभागे यांनी प्रयत्न केले, असे मुख्याधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                        *******

--

No comments:

Post a Comment