Wednesday, 20 November 2019

DIO BULDANA NEWS 20.11.2019

आरोग्य विषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी
- जिल्हाधिकारी

तंबाखू खाण्याच्या दुष्परीणामांविषयी जनजागृती करावी
बुलडाणा, दि. 20 : शासन विविध आरोग्यविषयीच्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आरोग्यवर्धनासाठी काम करते. आरोग्याच्या योजनांतून लाभार्थ्यांना उपचार, प्रतिबंधात्मक माहिती मिळते. अनेक योजनांमुळे संबंधित आजाराविषयी जनजागृती होवून नागरिकांकडून आजार न होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येतात. शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी आज दिल्या.
  जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये आज विविध आरोग्य विषयक योजनांच्या अंमलबजावणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. गोफणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) श्री. रामरामे, संबंधित विभागाचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
    जास्तीत जास्त लोकसंख्येची एचआयव्ही तपासणी करण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी म्हणाल्या, एचआयव्ही तपासणी करताना अधिकाधिक लोकांचा सहभाग घ्यायला पाहिजे. जिल्ह्यातील संपूर्ण गावे त्यामध्ये आली पाहिजेत. 'हाय रिस्क' लोकसंख्येची तपासणी करून आजुबाजूच्या गावातील, परिसरातील लोकांची तपासणीही करून घ्यावी. एड्स नियंत्रण कार्यक्रमात जिल्हा अव्वल असावा. एआरटीवर असणाऱ्या रूग्णांना विनात्रास औषधे उपलब्ध करून द्यावीत. क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविताना जिल्ह्याचे काम अव्वल दर्जाचे असावे. लसीकरण मोहिम राबविताना शासनाकडून देण्यात येणाऱ्या लसींचा पुरवठा पर्याप्त संख्येत ठेवावा. लसीकरणातंर्गत सर्व पात्र बालके घ्यावीत.
      पीसीपीएनडीटी कायद्यातंर्गत सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी करण्याच्या सूचना देत जिल्हाधिकारी म्हणाल्या, स्त्री भ्रुण हत्या जास्त होत असलेल्या भागांमध्ये जनजागृती करण्यात यावी. प्रत्येक महिन्यात मुलांच्या जन्मांची संख्या, मुलींच्या जन्मांची संख्या व आढळणारी तफावत याचा सखोल विश्लेषणात्मक अहवाल सादर करावा. ज्या गावांत, तालुक्यात हे प्रमाण व्यस्त्‍ असेल तिथे लक्ष केंद्रीत करून तपासण्या बारकाईने कराव्या. अशा ठिकाणी केसेस दाखल कराव्यात. मुलींचा जन्मदर कमी राहत असलेल्या गावाचा, भागाचा बारकाईने तपास करून कारणांसह अहवाल सादर करावा. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत तंबाखू नियंत्रण प्रभावीपणे करण्यासाठी कार्यवाही करावी. तंबाखू नियंत्रण कायद्याचा प्रभावीरित्या उपयोग करावा.
  त्या पुढे म्हणाल्या, तंबाखू नियंत्रणासाठी महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांचा गट, तंबाखूमुळे कर्करोग झालेल्या नागरिकांचा एक गट अशा पद्धतीने  कार्यवाही करावी.  विद्यार्थी गटात तंबाखूचे दुष्परिणाम समजवून जनजागृती करावी, तर कर्करोग झालेल्या गटात उपचारासाठी कार्यवाही करावी. तंबाखू नियंत्रण करताना जिल्ह्यात तंबाखूमुळे कर्करोग झालेल्या नागरिकांचा अहवाल सादर करावा. यामध्ये तालुकानिहाय आकडेवारी असावी. बैठकीप्रसंगी संबंधित शाखेचे जिल्हा समन्वयक, गजानन देशमुख, डॉ लता बाहेकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                                        *******
आयटीआय मलकापूर येथे तासिका तत्त्वावर पदांसाठी अर्ज आमंत्रित
  • 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत मुदत
बुलडाणा, दि. 20 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मलकापूर येथे अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर शासकीय नियमानुसार मानधनावर निदेशक पदांसाठी भरती करावयाची आहे. निदेशक पद 'एम्प्लॉयबीलीटी स्कील' या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी असून त्याची शैक्षणिक पात्रता दोन वर्षांसह एमबीए किंवा बीबीए, अथवा सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र या विषयात स्नातक दोन वर्षाच्या अनुभवासह आहे. पदसंख्या एक आहे. या पदाकरीता शैक्षणिक अर्हताधारकांनी संपूर्ण अर्ज, बायोडाटासह संस्थेच्या iti_malkapur@yahoo.com व iti_malakapur@dvet.edu.in या इमेलवर 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत पाठवावे, असे आवाहन प्राचार्य, आयटीआय मलकापूर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                                    *******
        जिल्ह्यात 2 डिसेंबरपासून लसीकरणाची विशेष इंद्रधनुष्य मोहिम
बुलडाणा, दि. 20 : जिल्ह्यात लसीकरण सक्षमीकरणासाठी ‘विशेष इंद्रधनुष्य मोहिम 2.0’ येत्या 2 डिसेंबर 2019 पासून सुरू करण्यात येणार आहे. सदर मोहिमेंतर्गत जिह्यातील लसीकरणापासून वंचित 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालके व गरोदर माता यांचा सर्व्हे करून त्यांच्यासाठी अतिरिक्त लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
   या मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत आज 20 नोव्हेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी डॉ.निरुपमा डांगे, यांचे अध्यक्षतेखाली नियमित लसीकरण सक्षमीकरण जिल्हा कृती समितीची सभा घेण्यात आली.  जिल्हाधिकारी यांनी जिह्यातील लसीकरण कार्यक्रमाचा यावेळी आढावा घेतला.
   जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र गोफणे यांनी विशेष इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेविषयी माहिती दिली. सदर मोहिमेचे प्रभावी नियोजन करून सर्व विभागांच्या समन्वयातून मोहीम यशस्वी करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. यावेळी आरोग्य विभागाचे विविध अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) अरविंद रामरामे याचेसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी हजर होते.
                                                                                    ******
 एक दिवसीय उद्योजकता परिचय मेळाव्याचे 21 नोव्हेंबर रोजी आयोजन
बुलडाणा, दि. 20 : शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेतंर्गत जिल्ह्याकरीता 18 दिवसीय मोफत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन 28 नोव्हेंबर पासून करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रम अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असून प्रशिक्षणाकरीता मुलाखतीअंती 40 प्रशिक्षणार्थिंची निवड कार्यबल समितीमार्फत केली जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्याकरीता 21 नोव्हेंबर 2019 रोजी मोफत एक दिवसीय उद्योजकता परिचय मेळाव्याचे आयोजन पवार सायन्स/ चव्हाण कॉमर्स क्लासेसच्या सभागृह, गजानन महाराज मंदीराजवळ, विष्णुवाडी, बुलडाणा येथे आयोजित करण्यात येत आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील बेरोजगार इच्छूक तथा गरजवंत युवक युवतींनी मोफत एक दिवसीय उद्योजकता परिचय मेळाव्यास उपस्थित रहावे. अधिक माहितीकरीता मिटकॉन किंवा जिल्हा उद्योग केंद्र, बुलडाणा येथे संपर्क करावा, असे आवाहन मिटकॉनच्यावतीने प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.
                                                                        ********
कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करावे
·        कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 20 :  यावर्षी सुरूवातीच्या काळात चांगला पाऊस असल्यामुळे पिक चांगले होते. मात्र परतीच्या जास्तीच्या पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे निदर्शनास येते. मात्र काही भागामध्ये निचरा होणाऱ्या हलक्या जमिनीमध्ये कापसाला फुले, पाते व बोंडे लागलेली आढळतात. अशा पिकावर गुलाबी बोंडअळी येण्याची दाट शक्यता आहे.
   पेरणी झालेल्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा 5 ते 10 टक्के पर्यंत प्रादुर्भाव फुलामध्ये ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडयात दिसुन आला. सद्यस्थितीत हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी फेरोमोन सापळे, डोमकळया वेचुन नष्ट करणे, निंबोळी अर्काची फवारणी व लक्षणीय प्रादुर्भावाच्या ठिकाणी रासायनिक किटकनाशकांचा वापर इत्यादीचा पिकाचे अवस्थेनुसार वेळीच वापर करून या किडीच्या प्रादुर्भावावर आवर घालण्यात आला. यासाठी सर्व कृषि विभागाची विस्तार यंत्रणा अशासकीय यंत्रणा, तसेच कृषि विद्यापीठाचे वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन व बोंड अळीच्या नियंत्रणाची व्युहरचना आखून अंमलबजावणी सुरु आहे.
    गुलाबी बोंड अळीचे प्रादुर्भाव सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अथवा ऑक्टोंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवडयात सरासरी 29 ते 33 अंश से. तापमान असताना आढळून येतो. मात्र यावर्षी पावसाळा वाढल्यामुळे व पोषक हवामान असल्यामुळे गुलाबी बोंड अळीचे पतंग जमिनीत असलेल्या कोषावस्थेमधून बाहेर निघाले. हीच परिस्थिती सर्वदूर शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या कोषातून बाहेर निघालेले पतंग मिलन होवून अंडी टाकल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी त्यांचा प्रादुर्भाव ज्या कपाशीला हिरवे बोंडे व पात्या आहेत अशा ठिकाणी दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
    शेतकरी बांधवांनी त्वरित कापूस पिकात त्वरीत किमान एकरी दोन फेरोमन सापळे लावून त्यामध्ये सतत तीन दिवस सात ते आठ पतंग आढळल्यास 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली/10लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. बोंडे/पात्या/फुले यामध्ये प्रादुर्भाव 5 ते 10 टक्क्यापर्यंत आढळून आल्यास इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के प्रवाही 10 मिली किंवा थायोडिकार्ब 75 टक्के भुकटी ग्रॅम किंवा सायहॅलोथ्रीन 4.9 सीएम, 10 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
   गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 10 टक्केपेक्षा जास्त आढळून आल्यास इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के दाणेदार 4 ग्रॅम किंवा बाजारात उपलब्ध असलेली मिश्र किटकनाशके जसे, प्रोफेनोफॉस 40 टक्के अ सायपरमेथ्रीन 4 टक्के 20 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 1 अ ट्रायझोफॉस 35 टक्के प्रवाही 1250 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50  सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
   शेतकरी बंधुंनी पिकाचे नियमित निरिक्षण करुन कामगंध सापळ्यामधील पतंगाची संख्या/प्रादुर्भाव तसेच सध्याच्या कापूस पिकाच्या वाढलेल्या हंगामामध्ये कापूस पिकाची संपूर्ण वेचणी झाल्यानंतर एक ते दिड महिन्यामध्ये कापसावर असलेली बोंडाची संख्या व अपेक्षीत उत्पन्न यांचा अंदाज घेऊनच कीड व्यवस्थापनाची वरील प्रमाणे उपाय योजना करावी. सरसकट सर्व शेतकरी बंधुंनी कीड व्यवस्थापनाची उपरोक्त प्रमाणे उपाययोजना करावी. डिसेंबर 2019 नंतर कापूस पीक पूर्णत काढून टाकावे. कापूस फरदड घेण्याचा मोह टाळावा जेणेकरुन, किडीचे जीवनचक्र खंडीत होऊन येणाऱ्या पुढील खरीप हंगामामध्ये या किडीचा प्रतिबंध करण्यास मदत होईल, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. 

                                                                                    *******


  

No comments:

Post a Comment