- खामगांव तालुक्यातील कलोरी, टेंभूर्णा व सुटाळा शिवारातील पिक पाहणी
- शेतकऱ्यांशी साधला संवाद, जाणून घेतली परिस्थिती
- भादोला येथील शेतात नुकसानग्रस्त सोयाबीनच्या सुडीची केली पाहणी
बुलडाणा, दि. 23 : अरबी समुद्रात गत काही दिवसांमध्ये निर्माण झालेल्या ‘क्यार’ व ‘महा’ या चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. केंद्रीय कृषी मंत्रालयातंर्गत असणाऱ्या कापूस विकास संचालनालयाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ आर. पी सिंग यांचे पथकाने आज जिल्ह्यात नुकसान झालेल्या खरीप पिकांची पाहणी केली. पथकाने खामगांव तालुक्यातील कलोरी, टेंभूर्णा व सुटाळा तर बुलडाणा तालुक्यातील भादोला शिवारातील शेतांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी या पथकासमवेत खामगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर, अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंग, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, अमरावती विभागाचे कृषि सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, खामगांवचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री. पटेल, तहसीलदार शितल रसाळ, तालुका कृषि अधिकारी श्री. गिरी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच भादोला येथील शेतात उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसिलदार श्री. शिंदे, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम पथकाने कलोरी येथील शेतकरी विशाल वामनराव घुले यांच्या शेतात जाऊन अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पीकाची पाहणी केली. तसेच टेंभूर्णा येथील शेतकरी नरेश जगन्नाथ चौकसे यांच्या सोयाबीन व ज्वारी पीकाची, तर सुटाळा येथील शेतकरी शंकर संपत वानखेडे यांच्या शेतातील कापून ठेवलेल्या ज्वारी पीकाची पाहणी केली.
पीक परिस्थितीची पाहणी करून केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी डॉ. सिंग यांनी यावेळी सांगितले. त्यांनी पाहणी केलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती करून घेत परिस्थिती जाणून घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पथकातील अधिकाऱ्यांना माहिती देतांना शेतकऱ्यांनी सांगितले की, ऐन पीक काढणीच्यावेळी आलेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. त्याचबरोबर अद्यापही काही ठिकाणी जमीन ओलसर असल्यामुळे रब्बी हंगाम घेण्यातही अडचण येत आहे. तसेच ज्वारी, सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्यामुळे जनावरांना या पिकापासून बनलेला चारा मिळणार नाही.
भादोला येथील शंकरअप्पा दगडअप्पा चित्ते यांच्या शेतात सोंगूण सुडी मारलेल्या नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. यावेळी डॉ. सिंग यांनी शेतकऱ्याशी संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली. भेटीप्रसंगी महसूल, कृषी विभागाचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच भेट दिलेल्या ठिकाणी ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. सुरूवातीला जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती पथकाला दिली. तसेच जिल्ह्यातील पीकाचे खरीप व रब्बी हंगामाचे क्षेत्र, पीक परिस्थिती, लागवड केलेले क्षेत्र, बाधित क्षेत्र, पाऊसाची सरासरी तसेच पीक काढणीच्यावेळीच पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, कापूस, फळपिके आदींचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती दिली.
खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची पथकाने केली पाहणी
- सोयाबीन व मुंगाच्या प्रतवारीची घेतली माहिती
बुलडाणा, दि. 23 : जिल्ह्यात परतीचा व अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतमालाची प्रतवारीही घसरली आहे. अशा शेतमालाची पाहणी आज केंद्रींय पथकातील केंद्रीय कृषी मंत्रालयातंर्गत असणाऱ्या कापूस विकास संचालनालयाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ आर. पी सिंग खामगांव येथील कृषि उत्पन्न बाजास समितीमध्ये जावून केली. याप्रसंगी मुंग, सोयाबीन शेतमालाची प्रतवारी बघत संबंधित शेतकरी व अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
यावेळी या पथकासमवेत आमदार ॲड आकाश फुंडकर, अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंग, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, अमरावती विभागाचे कृषि सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, खामगांवचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री. पटेल, तहसीलदार शितल रसाळ, तालुका कृषि अधिकारी श्री. गिरी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
*******
‘आरटीओ’ विशेष वाहन तपासणी मोहिम; 273 वाहनधारकांना दंड
- स्वत: विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दंड ठोठावला
- वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 23 : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने आज 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात विशेष वाहन तपासणी मोहिम राबविण्यात आली. केंद्रीय पथकाच्या दौऱ्यानिमित्ताने जिल्ह्यात आलेल्या विभागीय आयुक्त पियुष सिंग, तसेच दौऱ्यावर असलेल्या जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी स्वत: या तपासणी मोहिमेत सहभाग घेत वाहतुक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनधारकांना दंड ठोठावला. यावेळी स्वत: विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी चलान दिल्या. तसेच वाहनधारकांना वाहतुक नियमांचे पालन करीत वाहन चालविण्याचे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे उपस्थित होत्या.
जिल्ह्यात आज करण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत हेल्मेट न वापरणे, फॅन्सी नंबरप्लेट, अवैध प्रवाशी वाहतूक, विना नोंदणी वाहने, विहीत मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, सिट बेल्ट न लावणे, अनुज्ञप्ती सादर न करणे, विमा सादर न करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे या गुन्ह्यांअंतर्गत सदर कार्यालयाने चार पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात खामगांव ते मलकापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व ईतर मार्गांवर एकुन 273 वाहन धारकांवर कार्यवाही केली. तपासणी मोहिमेत बुलडाणा- चिखली -दे.राजा रस्त्यावर मोटार वाहन निरीक्षक निशिकांत वैद्य, संदीप मोरे, वरिष्ठ लिपिक गजानन तनपुरे, कनिष्ठ लिपिक प्रविण मुंगळे, अनंता सोर यांचा समोवश होता. तर नांदुरा – खामगांव- कलोरी फाटापर्यंत मोटार वाहन निरीक्षक संदीप तायडे, संदीप पवार, वरिष्ठ लिपीक संतोष घ्यार, कनिष्ठ लिपीक विजय माहुलकर, अमोल खिरोडकर, यांनी तपासणी मोहिम राबविली. तसेच नांदुरा ते मलकापूर रस्त्यावर मोटार वाहन निरीक्षक संताजी बर्गे, अविनाश भोपळे, वरिष्ठ लिपीक सुनील सोळंकी, कनिष्ठ लिपीक राजेश काळे, मिलींद उईके यांनी, तर चिखली – खामगांव महामार्गावर मोटार वाहन निरीक्षक फारूक शेख, वरिष्ठ लिपीक सुनील सुर्यवंशी, कनिष्ठ लिपीक रोहीत काळे यांनी तपासणी मोहिमेत सहभाग घेतला, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी कळविले आहे.