बोंड अळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे
- पालकमंत्री पांडुरंग फुंडकर
- पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा थाटात
- ऐतिहासिक कर्जमाफी योजना कार्यवाहीत जिल्हा राज्यात प्रथम
- मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेतंर्गत अर्ज करण्याचे आवाहन
- जिल्ह्यातील 441 गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प
- कृषी यांत्रिकीकरण योजनेला 10 कोटी रूपयांची वाढीव तरतूद
- 587 ग्रामपंचायती हगणदारीमुक्त, मार्च 2018 पर्यंत संपूर्ण जिल्हा हगणदारीमुक्तीचा संकल्प
बुलडाणा, दि. 26 - कापूस पिकावर आलेल्या बोंडअळीच्या संकटामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यात बोंडअळीने नुकसान झालेल्या 2.4 लक्ष शेतकऱ्यांच्या 33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त बाधीत असलेल्या 1.90 लक्ष हेक्टरवरील क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या नुकसानीपोटी 134.34 कोटी रूपये आर्थिक मदतीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. त्यानुसार बोंड अळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिल्या जाणार असून बोंडअळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे, असे प्रतीपादन राज्याचे कृषि तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज केले.
भारतीय प्रजासत्ताकाचा 68 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधीत करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार सखाराम आहेर (गुरूजी), विजयराज शिंदे, तोताराम कायंदे, जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, नगराध्यक्षा श्रीमती नजमुन्नीसा मो. सज्जाद, उपाध्यक्ष विजय जायभाये, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, बुलडाणा बाजार समितीचे सभापती जालींधर बुधवत, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, अप्पर जिल्हाधिकारी श्री. दुबे, अप्पर पोलीस अधिक्ष संदीप डोईफोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी नेमाने आदींची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांना उभारी देणारी ऐतिहासिक कर्ज माफी शासनाने दिली असल्याचे सांगत पालकमंत्री श्री. फुंडकर म्हणाले, तंत्रज्ञानाचा उपयोग करीत खऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यात 2 लाख 4 हजार 700 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. कर्जमाफीपोटी आतापर्यंत तब्बल 843 कोटी रूपये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आले आहे. कर्जमाफीच्या कामामध्ये जिल्ह्याने उत्कृष्ट काम केले असून याबाबतीत बुलडाणा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. शासनाने नाफेडमार्फत हमी भावाला शेतमाल खरेदी करण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. जिल्ह्यात सोयाबीन 26 हजार 423 क्विंटल, उडीद 1 लक्ष 55 हजार 784, मका 26 हजार 126 आणि मुंगाची 15 हजार 997 क्विंटल शासकीय खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीपोटी शासनाने 67.21 कोटी रूपयांचे चुकारे शेतकऱ्यांना अदा केले आहे. उर्वरित चुकारे अदा करण्याची कार्यवाही सुरू आहे.
जलयुक्त शिवार अभियानाबाबत पालकमंत्री म्हणाले, सन 2016-17 साठी दुसऱ्या टप्प्यात निवडलेल्या 245 गावांमध्ये 5 हजार 390 कामे पूर्ण झाली आहे. या कामांमुळे जिल्ह्यात 18 हजार 729 टि.सी.एम पाणीसाठा निर्माण झाला आहे. तसेच 16 हजार 535 हेक्टर क्षेत्रावर एक वेळच्या संरक्षित सिंचनाची आणि 9 हजार 525 हेक्टर क्षेत्रावर दोन वेळच्या संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे. तसेच 2017-18 मध्ये निवडलेल्या 195 गावांच्या शिवारात जलसंधारणाची 718 कामे पूर्ण झाली आहे. शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ योजना अंमलात आणलेली आहे. या योजनेला जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शेततळ्यासाठी जिल्ह्यात प्राप्त अर्जांपैकी पात्र ठरलेल्या 5 हजार 913 अर्जांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. त्यापैकी 2 हजार 409 शेततळी पुर्ण झाली असून 346 प्रगतीपथावर आहे. जिल्ह्यात 2 हजार 219 शेततळी धारक शेतकऱ्यांना 987.78 लक्ष रूपयांचे अनुदान अदा करण्यात आले आहे.
ते पुढे म्हणाले, उन्नत शेती समृद्ध शेतकरी या मोहिमेतंर्गत कृषि यांत्रिकीकरणासाठी जिल्ह्यात एकूण 4 हजार 770 शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. त्यानुसार ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, दालमिल आदी स्वयंचलित औजारांकरिता D.B.T. द्वारे आतापर्यंत एकूण 4 कोटी 13 लक्ष रूपये अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 250 ट्रॅक्टर, 275 रोटाव्हेटर, 150 ट्रॅक्टरचलित अवजारे व इतर अशी एकूण सुमारे 750 अवजारे वितरीत केली आहेत. तसेच योजनेस मिळालेला शेतकरी बांधवांच्या भरघोस प्रतिसादामुळे व मागणीमुळे अजून 10 कोटी रूपयांची वाढीव तरतूद बुलडाणा जिल्ह्याकरिता मंजूर केली आहे. राज्यात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प 15 जिल्ह्यांतील 5142 गावांमधून राबविण्यात येत आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील 441 गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून जनजागृतीचे काम आजपासून सुरू झाले आहे. तसेच शासनाने जुन 2017 मध्ये मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार कृषि प्रक्रिया उद्योग सुरू करणाऱ्या इच्छूकांनी 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत कृषी विभागाकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन याप्रसंगी पालकमंत्री यांनी केले.
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतंर्गत सुक्ष्म सिंचन योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यात ऑनलाईन ई ठिबक प्रणालीद्वारे 38 हजार 471 अर्ज प्राप्त झाले असून ही संख्या राज्यात सर्वात जास्त आहे. प्राप्त झालेल्या ठिबक व तुषार सिंचन प्रस्तावांची क्षेत्रीय तपासणी करण्यात आली. यामधून 9 हजार 27 लाभार्थ्यांना 6 हजार 977 हेक्टर क्षेत्रासाठी 23.19 कोटी अनुदान वितरीत करण्यात आले आहे. ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज स्वीकारण्याकरीता ही आज्ञावली 15 मार्च 2018 पर्यंत सुरू ठेवण्यात आली असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागात सन 2016-17 मध्ये 2 हजार 482 घरकूल पूर्ण करण्यात आली आहे. तसेच 2017-18 मध्ये 1 हजार 55 लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता अदा करण्यात आला असून घरकूल निर्मिती प्रगतीपथावर आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेनुसार जिगांव मोठा प्रकल्प व अन्य 8 लघु प्रकल्पांना 6 हजार 61 कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यामुळे सर्वात मोठ्या जिगांव प्रकल्पाच्या कामास गती प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 100 दलघमी पाणीसाठा आहे. पुर्ण क्षमतेने धरणे भरली नसल्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणी टंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाने जून 2018 पर्यंत 18.24 कोटी रूपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे.
राज्यामध्ये ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत जिल्ह्यात मलकापूर, शेगांव, संग्रामपूर, जळगांव जामोद, नांदुरा व देऊळगांव राजा तालुके हगणदारीमुक्त झाली असून 587 ग्रामपंचायती हगणदारीमुक्त ठरल्या आहेत. वैयक्तिक शौचालयांच्या निर्मितीमध्येही जिल्ह्याने भरारी घेतली आहे. जिल्ह्यात 3.53 लक्ष कुटूंबांपैकी 3.18 लक्ष कुटूंबाकडे शौचालय आहेत. जिल्ह्याने सन 2017-18 मध्ये 88 हजार 164 शौचालयांची निर्मिती करून विक्रमी कामगिरी नोंदविली आहे. जिल्ह्याची स्वच्छतेची व्याप्ती 90.6 टक्के असून मार्च 2018 पर्यंत संपूर्ण जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प पालकमंत्री यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला पालकमंत्री यांनी परेड निरीक्षण केले. बुलडाणा पुरूष व महिला पोलीस दल, होमगार्ड पुरूष व महिला दल, वन रक्षक दल, एनसीसी छात्र, राजीव गांधी सैनिकी शाळा विद्यार्थी, जिजामाता मुलींची सैनिकी शाळा विद्यार्थीनी, पोलीस बँण्ड पथक तसेच शिघ्र कृती दल आदींनी मानवंदना दिली. विविध विद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी कराटे प्रात्याक्षिक, लेझीमचे सामुहिक संचलनाचे सादरीकरण कार्यक्रमाप्रसंगी केले. कार्यक्रमाचे संचलन नरेंद्र लांजेवार यांनी केले. पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी याप्रसंगी कुष्ठरोग निर्मुलनाची शपथ दिली. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, समाज भूषण पुरस्कार प्राप्त, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
उत्कृष्ट ध्वज दिन निधी संकलन केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुडंवार यांचे पालकमंत्री यांच्याहस्ते विशेष स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. तसेच 7/12 संगणकीकरणात जिल्ह्याने 100 टक्के कार्यवाही पुर्ण केली आहे. त्याबद्दल तलाठी साझा सवचे नितीन अहीर, सवना भाग 2 चे इंदू शेजोळ, वर्दळी बु चे वाय. एच गरजाळे, सरंबाचे व्हि. एन सांगळे, कळंबेश्वर दिपक सवडतकर, दाभाचे शिवशंकर खारवाल, पिं. देवी भाग 2 चे प्रियंका राठोड, महाळुंगीचे श्रीकृष्ण सोनोने, वरखेडचे डि. टी तालीमकर, तरोडाचे यु.पी बुरजे, मडाखेडचे श्रावण पुंजाजी, पारखेड भाग 2 चे नीता कडवकर, पातुर्डा के. एस कऱ्हाळे आदींचा सत्कार करण्यात आला. सहज सोप्या पद्धतीने शेतातील हरभरा शेंडा खुडणी यंत्र तयार केल्याबद्दल नंदुअप्पा बोरबळे केळवद ता. बुलडाणा यांचा गौरव करण्यात आला. तसेच स्वच्छ करंडक वर्त्कृत्व स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम आल्याबद्दल कु. प्रतीक्षा वासुदेव मिसाळ रा. शेगांव हिचा सत्कार करण्यात आला.
बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमातंर्गत मुलींच्या जन्माचे गुणोतर प्रमाण 1000 च्या वर नेणाऱ्या ग्रामपंचायतींचा 5 हजार रूपये रोख व प्रमाणपत्राचे वाटप यावेळी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते करण्यात आले. त्यामध्ये कोऱ्हाळा ता. मोताळा, दे.घाट ता. बुलडाणा व चांडोळ ता. बुलडाणा यांचा समावेश आहे. धोके निवारण उपक्रमामध्ये निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या कु. श्रृती विलास डुकरे वर्ग 10 वा, दे. राजा व द्वितीय क्रमांक प्राप्त ऋषिकेश मानकर वर्ग 12 शेगांव यांना बक्षीस देण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत दिल्या जाणारा गुणवंत खेळाडू पुरस्कार कुलदीप भोलाने, कु. मृणाल सरकटे यांना तर क्रीडा संघटक पुरस्कार प्रा. डॉ. कैलास पवार व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार चंद्रकांत इलग यांना प्रदान करण्यात आला.
त्याचप्रमाणे यावेळी गत 25 वर्षापासून प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन व महाराष्ट्र दिन कार्यक्रमाचे संचलन करणाऱ्या नरेंद्र लांजेवार यांचा यावेळी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागामार्फत दिपक पाटील, प्रबोधन विद्यालय जिजामाता नगर, बुलडाणा व पर्यावरण मित्र मंडळ बुलडाणा यांचा वृक्ष लागवड, पर्यावरण पुरक कामाबद्दल बक्षीस देवून गौरव करण्यात आला.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीसांचा सत्कार
नक्षलग्रस्त भागात खडतर कामगिरी केल्याबद्दल खडतर सेवा पदक पोलीस उपअधिक्षक बुलडाणा बी. बी महामुनी यांना देवून सन्मानित करण्यात आले. उपविभागीय पोलीस कार्यालय मेहकर आयएसओ केल्याबद्दल पोलीस उपअधिक्षक रामेश्वर वैजने यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पोलीस स्टेशन मेहकर व धाड आयएसओ केल्याबद्दल अनुक्रमे पोलीस निरीक्षक श्री. प्रधान, सहायक पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये बॉस्केटबॉल क्रीडा प्रकारात मपोकॉ रूबीना शेख वाहतूक शाखा व हिना खान पिं.राजा यांना गोल्ड मेडल देण्यात आले. तसेच बॉक्सींग क्रिडा प्रकारात दिपाली देशमुख खामगांव यांना सिल्व्हर मेडल प्रदान करण्यात आले.
प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलीस कवायत मैदानावर विविध विभागांचे चित्ररथ साकारण्यात आले. त्यामध्ये बुलडाणा पोलीस दल, मतदार जागृती करणारा तहसील कार्यालय बुलडाणाचा चित्ररथ, 108 ॲम्ब्युलन्स सेवा, अग्नीशमन दल, सामाजिक वनीकरण विभागाचा हरीत चित्ररथ, हगणदारीमुक्ती नगर परिषदेचा चित्ररथ, बेटी बचाओ बेटी पढाओ चित्ररथ, सर्व शिक्षा अभियान, जिल्हा हिवताप कार्यालयाचा किटकजन्य रोग नियंत्रण चित्ररथ, सामाजिक न्याय विभाग, पशुसंवर्धन विभाग, स्वच्छ भारत मिशन, उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाचा कृषि विभागाचा चित्ररथ आणि वन विभाग, एडेड हायस्कूलच्या चित्ररथाचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment