Wednesday, 3 January 2018

सावित्रीबाई फुले यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

सावित्रीबाई फुले यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

     बुलडाणा, दि.3 :  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त आज 3 जानेवारी 2018 रोजी अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी ओमप्रकाश दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, तहसिलदार श्री. शेळके आदी उपस्थित होते.
*********
सेवानिवृत्ती वेतन धारकांनी बचतीचा तपशील सादर करावा
  • जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन

     बुलडाणा, दि.3 :  निवृत्ती वेतन धारक/ कुटूंब निवृत्ती वेतन धारक वित्तीय वर्ष 2017-18 मध्ये आयकरास पात्र असल्यास त्यांनी केलेल्या बचतीचा तपशील, अपंग प्रमाणपत्र, पॅन कार्ड आदींचा तपशील सादर करावा. तसेच आयकराचा भरणा केला असल्यास गणना पत्रक, चलन आदींसह संपूर्ण तपशील 15 जानेवारी 2018 पर्यंत जिल्हा कोषागार कार्यालय, बुलडाणा येथे सादर करावा.  जेणेकरून आयकरास पात्र असलेले निवृत्ती वेतन धारक / कुटूंब निवृत्ती वेतन धारक यांचे निवृत्ती वेतन आहरीत करून अदा करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. तरी त्वरित तपशील सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावीस्कर यांनी केले आहे.
                                                                        *****
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर
  • जानेवारी ते जून 2018 दरम्यानचा कार्यक्रम
     बुलडाणा दि. 3 - माहे जानेवारी ते जून 2018 दरम्यान राबविण्यात येणारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शिबिराच्या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक व सहायक रोखपाल हजर राहणार आहेत.
    शिबिर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे जानेवारी 2018 मध्ये : जळगाव जामोद 4 जानेवारी, शेगाव 6, मेहकर 17, खामगांव 10 व 24, चिखली 12 , नांदुरा 19 , मलकापूर 22, सिंदखेड राजा 25, लोणार 8 व देऊळगाव राजा येथे 15 जानेवारी 2017 रोजी होणार आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये : जळगाव जामोद 2 फेब्रुवारी, शेगाव 5, मेहकर 16, खामगांव 9 व 23, चिखली 12, नांदुरा 20, मलकापूर 22, सिंदखेड राजा 26, लोणार 7 व देऊळगाव राजा 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मार्च 2018 मध्ये :  जळगाव जामोद 5 मार्च, शेगाव 7, मेहकर 19, खामगांव 12 व 26, चिखली 14, नांदुरा 21, मलकापूर 23, सिंदखेड राजा 28, लोणार 9 व देऊळगाव राजा 16 मार्च रोजी होणार आहे. एप्रिल 2018 : जळगाव जामोद 4 एप्रिल, शेगाव 6, मेहकर 19, खामगांव 11 व 27, चिखली 13, नांदुरा 20, मलकापूर 23, सिंदखेड राजा 25, लोणार 9 व देऊळगाव राजा 16 एप्रिल रोजी होणार आहे. मे 2018 : जळगाव जामोद 4 मे, शेगाव 7, मेहकर 18, खामगांव 11 व 28, चिखली 14, नांदुरा 21, मलकापूर 23, सिंदखेड राजा 25, लोणार 9 व देऊळगाव राजा 16 मे रोजी होणार आहे. जून 2018 : जळगाव जामोद 4 जून, शेगाव 6, मेहकर 19, खामगांव 11 व 28, चिखली 13, नांदुरा 21, मलकापूर 25, सिंदखेड राजा 27, लोणार 8 व देऊळगाव राजा 15 जून रोजी होणार आहे. याबाबत नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
                                                                        **********

                           जिल्हा परिषदेच्या नस्त्यांची विनाकारण अडवणूक नाही
  • जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाचा खुलासा
     बुलडाणा दि. 3 वित्त विभागाकडे जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील नस्त्या वित्तीय अभिप्रायाकरीता व देयके प्रदानाकरीता येत असतात. सदर नस्त्या व देयकांचा नियमानुसार, विहीत कालावधीत निपटारा करण्यात येतो. या नस्त्या व देयके विनाकारण अडविण्यात येत नसून त्रुटीयुक्त नस्त्या व देयके नियमानुसार लेखी अभिप्राय देवून त्रुटी पुर्ततेकरीता संबंधित विभागास परत करण्यात येतात. सदर नस्ती किंवा देयकांचा पाठपुरावा करीत असतांना संबधीत व्यक्ती भेटावयास आला असता त्यांना कोणत्याही प्रकारची ॲट्रासिटी दाखल करणे बाबतची धमकी देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रकाशित वृत्तामध्ये तथ्य नसून जिल्हा परिषदेचा वित्त विभाग हा शासन नियमानुसार वित्तीय नियमावलीने काम करीत आहे, असा खुलासा मुख्य वित्त व लेखा अधिकारी, जि.प, बुलडाणा यांनी केला आहे.
                                                                        ********
राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल
बुलडाणा दि‍.3 -  राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यामुळे दि 12.1.2018 रोजी मेहकर- जालना मार्गावरील सिंदखेड राजा मार्गे होणाऱ्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल 11 जानेवारी रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 12 जानेवारी रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
  सध्याचा प्रचलीत मार्ग असलेल्या मालेगांव-मेहकर-सुलतानपूर- सिंदखेड राजा- न्हावा- जालना आणि जालना-न्हावा-सिंदखेडराजा-सुलतानपूर-मेहकर-मालेगांव असा आहे. या मार्गात 12 जानेवारी रोजी बदल करण्यात येत असून हा मार्ग मालेगांव-मेहकर-चिखली-दे.राजा- जालना व परतीचा जालना-दे.राजा-चिखली-मेहकर-मालेगांव असा करण्यात आला आहे. या वाहतूक बदलातून सर्व शासकीय वाहने, रूग्णवाहिका, शववाहिनी, अग्नीशमन दलाची वाहने व जिवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने यांना वगळण्यात आले आहे, असे जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी कळविले आहे.
                                                            *********
      निवृत्ती वेतन धारकांच्या मेळाव्याचे 6 जानेवारी रोजी आयोजन
बुलडाणा दि‍.3 -  राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारक / कुटूंब निवृत्ती वेतन धारक यांच्या अडी – अडचणी सोडविण्यासाठी तसेच अन्य लाभ देण्याकरीता 6 जानेवारी 2018 रोजी दुपारी 12 वाजता नगर परिषद शाळा क्रं 2, बुलडाणा येथे त्रैमासिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळावा जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील निवृत्ती वेतनधारकांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे.  निवृत्ती वेतनाबाबत काही अडचणी असल्यास लेखी स्वरूपात सोबत आणाव्यात, त्यामध्ये बँकेचे नाव, खाते क्रमांक व निवृत्ती वेतन प्रदान आदेश क्रमांक असणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावीस्कर यांनी केले आहे.
                                                                                    *******
राज्य परिवहन महामंडळात समुपदेशक पदासाठी अर्ज आमंत्रित
बुलडाणा दि‍.3 -  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सर्व विभागांमध्ये मानद तत्वावर समुपदेशक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. याविषयी अधिक माहिती महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची मानसशास्त्र या विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी, तसेच समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका आवश्यक आहे. समुपदेशन क्षेत्रातील किमान दोन वर्षांचा अनुभव पाहिजे.
  ही नेमणूक निव्वळ मानद तत्त्वावर असून नेमणूकीचा कालावधी एक वर्षाचा राहणार आहे. आवश्यकता वाटल्यास समुपदेशकाचा कालावधी विचारात घेवून संबंधित विभागामार्फत वाढविण्यात येईल. ही नियुक्ती मानद तत्वावर असल्यामुळे रा.प महामंडळाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे, सामावून घेण्याचे अथवा नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचे अधिकार, हक्क अर्जदारास किंवा समुपदेशकास नसतील.  तसेच सक्षम प्राधिकारी, नियुक्ती प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत समुपदेशकाची सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील. रा.प महामंडळाच्या विभागामध्ये आवश्यकतेनुसार समुपदेशकांची मानद तत्वावर नेमणूक करण्यात येईल. त्यासाठी मासिक मानधन 4 हजार  रूपये देण्यात येईल. समुपदेशकाला समुपदेशनाद्वारे रा.प कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक ताणतणावाचे निवारण करणे, त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधून अडी अडचणी समजावून घेणे, वैयक्तिक पातळीवर निराकारण करणे व आवश्यकता वाटल्यास वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून पुढील उपचाराची गरज निदर्शनास आणून देणे. तसेच आगारास महिन्यातून किमान 3 वेळा भेटी देणे आदी कर्तव्य पार पाडावे लागणार आहे.
   उमेदवाराने अर्ज टंकलिखीत करून स्वत:चा फोटो त्यावर चिटकवावा. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्र, अनुभवाचा दाखला जोडण्यात यावे. सदर अर्ज ज्या विभागात समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छूक असाल, त्या विभागातील रा.प महामंडळाच्या विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय यांचेकडे 17 जानेवारी 2018 पर्यंत पाठवावे, असे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.
                                                                        *****
जिल्ह्यातील उद्योजकांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे 5 जानेवारी रोजी आयोजन
बुलडाणा दि‍.3 -  जिल्ह्यातील उद्योजकांसाठी सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय आणि जिल्हा उद्योग केंद्र, बुलडाणा यांचे संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन खामगांव येथील हॉटेल प्रेम रेसिडेन्सीमध्ये 5 जानेवारी 2018 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. या कार्यशाळेत उद्योग, कर्ज, पुरस्कार आदींची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तरी या कार्यशाळेचा उद्योजकांसाठी लाभ घ्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांनी केले आहे.

                                                                        ******

No comments:

Post a Comment