Tuesday, 6 September 2016

news 6.9.2016 dio buldana

लोकशाही दिनात 31 तक्रारी प्राप्त
बुलडाणा, दि. 6 : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार 5 सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे मंगळवार, आज 6 सप्टेंबर 2016 रोजी लोकशाही दिनाच्या कार्यवाहीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. कार्यवाही जिल्हाधिकारी डॉ. विजय एन झाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ, निवासी उपजिल्हाधिकरी नरेंद्र टापरे, जिल्हा कोषागर अधिकारी निलेश नलावडे, महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. कडाळे, उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक एस. आर कदम आदी उपस्थित होते. लोकशाही दिनात 31 तक्रारी प्राप्त झाल्या असून 2 तक्रारी प्रलंबित आहेत.
या लोकशाही दिनात31 तक्रारीवर सुनावणी होवून 30 तक्रारी सामान्य तक्रार म्हणून संबंधित विभागांकडे पाठविण्यात आल्या आहेत. प्रलंबित तक्रारींमध्ये जितहसीलदार, बुलडाणा व भारतीय स्टेट बँक यांच्याकडील तक्रारीचा समावेश आहे. प्राप्त तक्रारींपैकी एक तक्रार लोकशाही दिन कार्यवाहीत स्वीकृत करण्यात आली आहे. लोकशाही दिनाच्या कार्यवाहीला विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
********
लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान जाहीर
• 7 सप्टेंबर 2016 पर्यंत सहभागी होता येणार
• अभियानात सहभागी होण्याचे प्रशासनाचे आवाहन
बुलडाणा, दि. 6 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवास 125 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने शासनाने सामाजिक जनजागृतीसाठी “लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ यांनी केले आहे.
या अभियानात तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये बेटी बचाओ- बेटी पढाओ, साक्षरता, स्वदेशी, व्यवसनमुक्ती व जलसंवर्धन या विषयावर देखावे, सजावटींचा समावेश राहणार आहे. मुलींचा घटता जन्मदर लक्षात घेता बेटी बचाओ- बेटी पढाओ विषय स्पर्धेसाठी असल्याने याबाबत जाणीव जागृती करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सदर स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारिख 7 सप्टेंबर 2016 आहे. गणेश मंडळांनी विहीत नमुन्यातील अर्ज तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारी यांचेकडे सादर करावे. तसेच अधिक माहितीसाठी सर्व तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ यांनी केले आहे.
अभियानात सहभागी होण्यासाठी-
• स्पर्धेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास सहभागी होता येईल
• स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळाने धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक
• विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुक्याच्या गट शिक्षण अधिकाऱ्याकडे सादर करावा
• देखावे उपरोक्त नमूद पाच विषयांवर असावेत
बक्षीसे
• विभागीयस्तर प्रथम पारितोषिक 2 लाख द्वितीय पारितोषिक 1लाख 50 हजार, तृतीय पारितोषिक 1 लाख रुपये
• जिल्हास्तर प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 75 हजार आणि तृतीय पारितोषिक 50 हजार रुपये
• तालुकास्तर प्रथम पारितोषिक 25 हजार, द्वितीय पारितोषिक 15 हजार आणि तृतीय पारितोषिक 10 हजार रुपये.
********
फळ पिक विमा योजनेची मदत जाहीर
• संत्रा व डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार मदत
• 54 लक्ष 62 हजार रूपयांचे होणार वाटप
बुलडाणा, दि. 6 : राष्ट्रीय पिक विमा योजनेतंर्गत राज्यात हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना 2015-16 वर्षातील आंबिया बहाराकरिता लागू करण्यात आली होती. ही योजना द्राक्ष, संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरू, केळी व आंबा या फळपिकांकरिता लागू होती. त्यानुसार जिल्ह्यातील संत्रा व डाळींब फळपिकांसाठी फळपिक विम्याची मदत जाहीर करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात संत्रा व डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना एकूण 54 लाख 62 हजारांची मदत वाटप केले जाणार आहे. ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. संत्रा फळपिकासाठी – दे.राजा तालुक्यातील अंढेरा महसूल मंडळात 35 शेतकऱ्यांना 2 लक्ष 17 हजार 125 रूपये, खामगांव तालुक्यातील बोरी अडगाव महसूल मंडळात 13 शेतकऱ्यांना 1 लक्ष 32 हजार 750, लाखनवाडा महसूल मंडळात 5 शेतकऱ्यांना 56 हजार 250, लोणार तालुक्यात अंजनी खु महसूल मंडळात 2 शेतकऱ्यांना 15 हजार 750, मेहकर तालुक्यातील डोणगांव महसूल मंडळात 33 शेतकऱ्यांना 3 लक्ष 46 हजार 500, संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर महसूल मंडळात 20 शेतकऱ्यांना 7 लक्ष 17 हजार 525, तर सोनाळा मंडळामध्ये 75 शेतकऱ्यांना 31 लक्ष 3 हजार 650 रूपये, सिं.राजा तालुक्यातील साखरखेर्डा महसूल मंडळामध्ये 20 शेतकऱ्यांकरिता 1 लक्ष 33 हजार 87 व शेंदुर्जना मंडळात 5 शेतकऱ्यांना 31 हजार 500 रूपये मंजूर झाले आहेत.
डाळींब फळपिकासाठी – बुलडाणा तालुक्यातील धाड महसूल मंडळामध्ये 6 शेतकऱ्यांना 1 लक्ष 5 हजार, चिखली तालुक्यातील चांदईमध्ये 9 शेतकऱ्यांना 1 लक्ष 5 हजार, चिखली महसूल मंडळात 2 शेतकऱ्यांना 52 हजार 500, पेठमध्ये 5 शेतकऱ्यांना 72 हजार 750, खामगांव तालुक्यातील हिवरखेड मंडळात 5 शेतकऱ्यांना 2 लक्ष 5 हजार, काळेगांवमध्ये 5 शेतकऱ्यांकरिता 76 हजार 500, मोताळा तालुक्यातील मोताळा मंडळात 1 शेतकऱ्याला 50 हजार 500 व शेलापूर महसूल मंडळात 2 शेतकऱ्यांना 41 हजार 250 रूपये विमा रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
तरी पिक विमा रक्कम बँकेमार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. विमा हप्ता भरलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले खाते असलेल्या बँकेशी संपर्क साधावा, असे जिल्हा कृषि अधिक्षक अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.
*******
शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी
बुलडाणा दि. 6- ई-स्कॉलरशिप प्रणाली सन 2016-17 या शैक्षणिक सत्रामध्ये भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण फी, परिक्षा फी, ई-स्कॉल्रशिप ऑन लाईन शिष्यवृत्तीचे अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र विद्यार्थ्यांना प्रथम वर्षासाठी अर्ज करण्यासाठी तसेच प्रथम वर्षाव्यतिरीक्त पुढील वर्षासाठी महाविद्यालयांनी अर्ज नुतनीकरण करण्यासाठी शासनाने https://mahaeschol.maharashtra.gov.in हे संकेत स्थळ केलेले आहे.
ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 वी, 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रिका/ मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या परीक्षेची गुणपत्रिका, जातीचा दाखला, जाती प्रमाणपत्र पडताळणी दाखला, आधार कार्ड क्रमांक, राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडले आहे, तो बँक खाते क्रमांक, बँकेचा आयएफएससी कोड व एमआयसीआर कोड, बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्नीत करणे, सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आदींची पुर्तता करावी. पात्र विद्यार्थ्याचे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क यांनी ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. त्या महाविद्यालयाच्या बँक खात्यावर परस्पर जमा केले जाते.
भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण फी, परिक्षा फी शिष्यवृत्ती पात्र मागासवर्गिय विद्यार्थ्यांना प्रथम वर्षासाठीच अर्ज करावा लागेल. महाविद्यालयांनी वरील कागदपत्रांची पूर्तता करून ती तयार ठेवावी. तसेच कोणताही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती किंवा शिक्षण फी, परिक्षा फी योजनेपासुन वंचित राहणार नाही, याची खबरदारी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी घ्यावी, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी कळविले आहे.
*****
खाजगी माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे ऑनलाईन पद्धतीने समायोजन
* ज्येष्ठतेनुसार व रिक्त पदांनुसार शिक्षकांना पदस्थापना
बुलडाणा, दि. 6 : राज्य शासनामार्फत शिक्षण विभागात ई-गर्व्हनन्स हा महत्वांकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्पातंर्गत्‍ा राज्यात प्रथमच खाजगी माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन पद्धतीने समायोजन केल्या जात आहे. सदर समायोजनाची प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शी व कर्मचारी यांचे हिताची आहे. त्यामुळे कोणत्या शिक्षक कर्मचाऱ्यांवर समायोजनामध्ये अन्याय होणार नाही. ज्येष्ठतेनुसार व रिक्त पदानुसार शिक्षकांचे मागणीनुसार त्यांना शाळेवर पदस्थापना मिळणार आहे.
अतिरिक्त शिक्षकांच्या यादीवर शिक्षकांकडून व रिक्त पदे असलेल्या शाळांकडून आक्षेप, हरकती मागविण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी या हरकतींवर निर्णय घेतील. आक्षेप व हरकती नंतरची अंतिम यादी 7 सप्टेंबर 2016 रोजी माध्यमिक शिक्षण विभागात प्रसिद्ध केल्या जाणार आहे. त्यानंतर समायोजन राऊंड 1, 2 व 3 पूर्ण करण्यात येणार आहे. समायोजन प्रक्रियेच्या दिवशी अतिरिक्त शिक्षक व मुख्याध्यापकांनी तसेच अतिरिक्त शिक्षकांनीही उपस्थित रहावयाचे आहे. ही प्रक्रिया शारदा ज्ञानपीठ येथे 14 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 10 ते प्रक्रिया संपेपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच वाढल्यास 15 व 16 सप्टेंबर रोजी सुद्धा सुरू राहणार आहे, असे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी कळविले आहे.


********

No comments:

Post a Comment