जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
बस स्थानकासमोर, प्रशासकीय इमारत, तळमजला, बुलडाणा- 443001
दूरध्वनी- 242341, फॅक्स- 242741 E-Mail : diobuldana@gmail.com
वृत्त क्रमांक-591 दि. 10 ऑगस्ट 2016
शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड बंधनकारक
• महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक संकलीत करावे
• शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती संबंधित महाविद्यालयाच्या बँक खात्यात जमा
• विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक बॅक खात्याशी संलग्नित करावा
बुलडाणा दि. 10 - शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्ता हा त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करण्यात येतो. तर शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्ती ही ज्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी शिकत आहे, त्या महाविद्यालयाच्या बँक खात्यात जमा होते. या योजनेचा लाभ योग्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी संकलित करून योग्य असल्याची तपासणी करावी.
आधार क्रमांक हा बँक खात्याच्या क्रमांकाबरोबर लिंक करण्याबाबत विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रमुख यांनी लेखी सूचना द्याव्यात. ज्यांनी आधार कार्ड क्रमांक दिला आहे, परंतु तो वैध नाही असे आढळून आले आहे. त्याबाबत पुन्हा वैध आधार क्रमांक संकलित करण्याची कार्यवाही संबधित महाविद्यालयांनी करावी. ज्या विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक संकलित झाला आहे, त्याचे वैधताकरण एक महिन्याच्या आत महाविद्यालयांनी करावे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लिंक झाला आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी https://resicent.uidai.net या पोर्टलवर जावून खात्री मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी करून घ्यावी.
ज्या विद्यार्थ्यांचा आधार कार्ड वैध आहेत, त्याची यादी संबंधित महाविद्यालयाच्या लॉगीनवर पाठविण्याची व्यवस्था करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी ई-स्कॉल पोर्टलमध्ये आधारकार्ड क्रमांकाची माहिती दिली आहे. तो मास्टर आधार डाटाबेस सोबत वैध असल्याची खात्री प्राचार्य यांनी करून घ्यावी.
*******
शेगांव तालुक्यातील बाधीत शेतकऱ्यांना मदतीचे वाटप
• खरीप हंगाम 2015 मधील दुष्काळग्रस्त शेतकरी
• शेतकऱ्यांनी अचूक खाते क्रमांक द्यावा
बुलडाणा दि. 10 – शेगांव तालुक्यात सन 2015 च्या खरीप हंगामात दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होवून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीपोटी शेगांव तालुक्यासाठी प्रशासनाला 3 कोटी 48 लक्ष रूपयांचा मदत निधी प्राप्त झाला. आर्थिक मदत प्रशासनाच्यावतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवही सुरू आहे.
शेगांव तालुक्यातील ज्या खातेदारांना खरीप अनुदान 2015 वाटपाची मदत मिळाली नाही. अशा खातेदारांनी आपला अचूक खातेक्रमांक तीन दिवसांच्या आत संबंधित गावाचे तलाठी यांचेकडे देण्यात यावा. अचूक खातेक्रमांक देण्यात यावे. जेणेकरून सदर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे शेगाव तहसीलदार यांनी कळविले आहे.
******
स्पोर्ट्स नर्सरीसाठी मुला-मुलींचा प्रवेश निश्चित करावा
बुलडाणा दि. 10 – जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती अंतर्गत जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे 8 ते 15 वर्षाखालील मुला-मुलींकरीता स्पोर्ट्स नर्सरी सुरू करण्यात आलेली आहे. सदर नर्सरीमध्ये लहान वयात मुलांना शारीरिक हालचाल व खेळाची आवड निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे.
सदर स्पोर्ट्स नर्सरी सायंकाळ 6 ते 7.15 या वेळेत जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे नियमित सुरू आहे. तरी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या 8 ते 15 वर्षाखालील मुले/मुलींनी आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. गिरी यांनी केले आहे.
शालेय डेंगू जागृती मोहिमेतंर्गत प्रबोधन विद्यालयात जनजागृती कार्यक्रम
बुलडाणा दि. 10 – माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामधील इयत्ता 5 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांमध्ये डेंग्यू प्रतिबंध व नियंत्रण संदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी व डास नियंत्रणासाठी 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा पंधरवडा शालेय डेंग्यू जागृती मोहिम म्हणून संपूर्ण राज्यात साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनात शाळांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले.
त्याअनुषंगाने प्रबोधन विद्यालय, जिजामाता नगर, बुलडाणा येथे जनजागृतीपर कार्यक्रम नुकताच पार पडला. जिजामाता नगर येथे डेंग्यू जनजागृती रॅली काढण्यात आली. याप्रसंगी आरोग्य कर्मचारी पी. डी वनारे, आरोग्य सहाय्यक आर.जी पाखरे यांनी गप्पी मासे संदर्भात माहिती दिली. यावेळी प्राचार्य प्रफुल्ल मोहरील, रवींद्र गणेशे, श्री. वंढाळे तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी ए.एस लोखंडे, आर.एस जाधव व ए.पी बाहेकर यांनी प्रयत्न केले.
*****
दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेत जमिन खरेदीमध्ये पारदर्शकता
• लाभार्थ्यांनी खोट्या प्रलोभनांना बळी पडू नये
बुलडाणा दि. 10 – कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत मागासवर्गीय व इतर काही लोक या योजनेत जमिन विक्री करणाऱ्या मालकाकडून तसेच भुमीहीन लाभार्थ्यांकडून समाज कल्याण विभागाच्या नावावर खोटी माहिती देवून, त्यांचेकडून रोख रक्कम घेवून त्यांची पिळवणूक करीत आहे. ही बाब समाज कल्याण विभागाच्या निदर्शनास आली आहे. तसेच या योजनेतंर्गत लाभार्थी निवड व वाटप यामध्ये फसवणूक झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. याबाबत सामाजिक न्याय विभागाकडून कुठल्याही प्रकारची फसवणूक लाभार्थ्यांनी करण्यात येत नाही.
समाज कल्याण विभागातंर्गत या योजनेतंर्गत प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची शासन निर्णयानुसार शेतजमिन धारकाकडून जमिन खरेदी करून दारिद्रय रेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्ध भुमीहिन लाभार्थ्यांना वाटप करण्याची रितसर पारदशकपणे कार्यवाही करण्यात येते. अशा व्यक्तींशी समाज कल्याण कार्यालयाचा काही एक संबंध नसताना या विभागाची बदनामी करण्यात येत आहे. सदर प्रकरणी काही व्यक्तींकडून जमीन मालक व लाभार्थ्यांना खोटी माहिती देवून, प्रलोभने, आमिष दाखवून त्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत असून फसविल्या जात आहे. अशा प्रसंगी जमिन मालक व लाभार्थी यांनी जागृत राहून ते पोलीस विभागाकडे तक्रार दाखल करावी.
समाज कल्याण कार्यालयामार्फत अत्यंत पारदर्शक पद्धतीने याबाबत कार्यवाही करण्यात येत असून जमिन मालक व लाभार्थ्यांनी कुणाच्याही भुल थापांना बळी पडून स्वत:ची फसवणूक करून घेवू नये. असे झाल्यास समाज कल्याण कार्यालय त्यास जबाबदार राहणार नाही, असे सहायक आयुक्त एम. जी वाठ यांनी कळविले आहे.
*****
वीर जगदेवराव कापूस उत्पादक सहकारी सुतगिरणीचा निवडणूक कार्यक्रमास प्रारंभ
बुलडाणा दि. 10 – हुतात्मा वीर जगदेवराव कापूस उत्पादक सहकारी सुतगिरणी मर्या मलकापूर यांचे संचालक मंडळाची निवडणूकीच्या कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे. यापूर्वी निवडणूक प्रक्रियेस उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 17 जून 2016 रोजी स्थगिती दिली होती. या स्थगितीवेळी संस्थेच्या निवडणूकीतील नागनिर्देशन पत्र माघारीचा कालावधी सुरू होता. सद्यस्थितीत सदर याचिका उच्च न्यायालयाने खारीज केलेली असल्याने सुतगिरणीचा निवडणूक कार्यक्रम यापूर्वीच सुरू झाल्याप्रमाणे ज्या टप्प्यावरती थांबविण्यात आला होता. त्या टप्प्यावरून 10 ऑगस्ट 2016 पासून पुढे सुरू करण्या आलेला आहे.
त्यानुसार 24 ऑगस्ट 2016 पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेणे, 3 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत मतदान व 4 सप्टेंबर 2016 रोजी मतमोजणी सदर सुतगिरणीचे सभागृहात होणार आहे. सदरचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा, निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक सहकारी संस्था ता. मलकापूर तसेच सूतगिरणीचे सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.
*****
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आज आयोजन
बुलडाणा, दि. 10 : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या 11 ऑगस्ट 2016 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. तरी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अनुषंगाने असलेल्या तक्रारी पुराव्यासह दोन प्रतीत लेखी स्वरूपात बैठकीत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
****
विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा दौरा
बुलडाणा, दि. 10 - महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे 12 ऑगस्ट 2016 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 12 ऑगस्ट 2016 रोजी दुपारी 12.05 वाजता यवतमाळ येथून शासकीय विश्रामगृह खामगांव येथे आगमन व राखीव, दुपारी 1 वाजता सुजातपूर येथे माजी खासदार स्व. बाळकृष्ण वासनिक यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 3 वाजता कोल्हटकर स्मारक मंदीर, खामगांव येथे कार्यक्रमास उपस्थिती, दु. 4.30 वाजता कृषि उत्पन्न बाजार समिती खामगांव येथे शेतकरी पाल्यांना संगणक शिक्षण कक्षाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, सायं 5.30 वाजता गणात्रा ले आऊट येथे मातोश्री रमाई आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या भूमीपुजन समारंभास उपस्थिती, सायं 7 वाजता शासकीय विश्रामगृह खामगांव येथे आगमन व राखीव, रात्री 9 वाजता खामगाव येथून मोटारीने नांदुराकडे प्रयाण, रात्री 9.50 वाजता नांदुरा रेल्वे स्थानक येथून विदर्भ एक्सप्रेसने नाशिककडे प्रयाण करतील.
****
वैद्यकीय अधिकारी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर
• जिल्हा परिषदेच्या zpbuldhana.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
बुलडाणा, दि. 10 - जिल्हा निवड समिती बुलडाणा अंतर्गत अधिकारी गट अ संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता 16 व 17 जुलै 2016 रोजी मुलाखत व मुळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. याआधारे तात्पुरती गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी उमेदवारांच्या उवलोकनार्थ जिल्हा परिषदेच्या zpbuldhana.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच सामान्य रूग्णालय व आरोग्य विभाग जि.प बुलडाणा कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी उमेदवारांनी भेट देवून यादी बघावी. काही हरकती अथवा आक्षेप असल्यास 11 ऑगस्ट 2016 रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्रत्यक्ष उपस्थित राहून नोंदवावेत. विहीत मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या निवेदनांचा विचार होणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment