आजपासून इयत्ता 12 वीच्या परीक्षेला सुरूवात..!
- कॉपीसाठी
मदत करणाऱ्यांविरूद्ध फौजदारी
- परीक्षा
केंद्र परीसरात 144 कलम
- संबधित
विषयाच्या शिक्षकांनी पंचायत समिती कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक
बुलडाणा,दि.20 : उच्च माध्यमिक शालांत
परीक्षा अर्थातच इयत्ता 12 वी ची परीक्षा उद्या 21 फेब्रुवारी 2018 पासून सुरू होत
आहे. या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा असून परीक्षा 20 मार्च 2018 पर्यंत
चालणार आहे. परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणामध्ये होण्यासाठी व विद्यार्थ्यांना
पेपर लिहण्यासाठी भयमुक्त, शांत वातावरण राहण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
ज्या विषयाचा
पेपर असेल त्या विषयाचे शिक्षक परीक्षा केंद्राचे परीसरात उपस्थित राहणार नाही. संबधित
विषय शिक्षकांनी आपले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पेपरचे अर्धा तास
अगोदर ते पेपर संपल्यानंतर अर्धा तास पर्यंतच्या कालावधीमध्ये पुर्णवेळ उपस्थित
रहावे लागणार आहे. सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी याबाबत कार्यवाही करावयाची आहे. पेपर
सुरू असलेल्या विषयाचा किंवा कोणताही विषय शिक्षक परीक्षा केंद्राचे आवारात आढळला,
तसेच तोंडी उत्तरे सांगणे, सांकेतिक भाषेचा उपयोग करून परीक्षार्थींना मदत करणे
असा प्रकार दिसून आला त्यांचेविरूद्ध विद्यापीठ व परीक्षा गैरप्रकार अधिनियम 1982
अंतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
परीक्षा केंद्र परीसरात सायक्लोस्टाईल, झेरॉक्स, उत्तरे असलेले
कागद दिसून आल्यास संबधित केंद्र संचालकावर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी,
बुलडाणा यांचे आदेशानुसार परीक्षा केंद्र परीसरात भादवि कलम 144 लागू करण्यात आली
आहे. त्यामुळे परीक्षा केंद्राजवळ
पालकांनी व इतरांनी थांबू नये, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी कळविले आहे.
*******
जिल्हास्तर युवा पुस्काराकरीता प्रस्ताव आमंत्रित
बुलडाणा,
दि. 20 : राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा
संचालनालय अंतर्गत राज्याचे युवा धोरण 2012 अन्वये 12 नोव्हेंबर 2013 रोजीच्या
शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील युवांनी व संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या
कार्याचा गौरव व्हाव, युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे
यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार प्रतीवर्षी देण्यात येत असतो. हा पुरस्कार
जिल्हयातील एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येतो.
त्यानुषंगाने सदर पुरस्काराकरीता या कार्यालयाच्या वतीने प्रस्ताव मागविण्यात येत
आहे.
सदर
पुरस्काराकरीता अर्जदार युवक/युवतीचे वय 13 ते 35 वर्षापर्यंत असावे. अर्जदाराचे
जिल्ह्यात सलग 5 वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे. व केलेल्या कार्याचे सबळ पुरावे
जोडणे अनिवार्य राहील. तसेच संस्थांकरीता अर्जदार संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेचे कार्य स्वयंस्फुर्तीने केलेले असावे.
युवा व युवा विकासाचे कार्य करणा-या संस्थांनी केलेले कार्य 1 एप्रिल
ते 31 मार्च या कालावधीतील गत तीन वर्षातील ग्राह्य धरण्यात येईल.
तरी संबंधित युवा/संस्थांनी
कार्यालयातून अर्ज प्राप्त करुन घेवून विहीत नमुन्यातील आवश्यक कागदपत्रांसह आपला
अर्ज 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत दोन
प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जांभरुन रोड, बुलडाणा येथे सादर करावा.
तसेच अधिक माहितीकरीता कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष कार्यालयात संपर्क साधावा, असे
जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी
कळविले आहे.
*******
छत्रपती शिवाजी
महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलडाणा, दि. 20 : छत्रपती
शिवाजी महाराज यांना 19 फेब्रुवारी रोजी जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करून जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे यांनी प्रतिमेला
पुष्पहार अर्पण केला. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रतिमेला पुष्प वाहीले. यावेळी जिल्हा
खनिकर्म अधिकारी श्री. मारबाते आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
******
वृद्ध कलावंताकडून मानधनासाठी प्रस्ताव आमंत्रित
·
31 मार्च 2018
पर्यंत प्रस्ताव सादर करावे
बुलडाणा, दि. 20 : शासन परिपत्रकानुसार वृद्ध साहित्यिक व कलाकार
मानधन योजनेचा वृद्ध कलावंतांना मानधनाचा लाभ देण्यात येतो. या योजनेनुसार सन
2017-18 या आर्थिक वर्षात लाभ घेवू इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांकडून प्रस्ताव
मागविण्यात येत आहे. याबाबत 7 फेब्रुवारी 2014 च्या शासन निर्णयानुसार अटी व शर्तींची
पुर्तता करणाऱ्या मान्यवर वृद्ध कलावंतांनी मुळ आवश्यक कागदपत्रे संबंधित पंचायत
समिती कार्यालयास दाखवून दोन छायांकित प्रतींमध्ये मानधनासाठीचे प्रस्ताव 31 मार्च
2018 पर्यंत पंचायत समिती कार्यालयात दाखल करावे. या मुदतीनंतर आलेले प्रस्ताव विचारात
घेतले जाणार नाहीत. तसेच सर्व संबधित गट विकास अधिकारी यांनी निकषानुसार सदर
अर्जाची मूळ कागदपत्रांची खात्री करून छाननीअंती पात्र प्रस्ताव 30 एप्रिल 2018
पर्यंत जिल्हा परिषद कार्यालयाकडे सादर करण्यात यावेत, असे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी,
जि.प बुलडाणा यांनी कळविले आहे.
*******
जिल्ह्यात दोन नवीन
महसूल मंडळांची निर्मिती
- जनुना व कल्याणाचा
समावेश
बुलडाणा, दि. 20 : जिल्ह्यात दोन नवीन महसूल
मंडळांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये खामगांव तालुक्यातील जनुना व मेहकर
तालुक्यातील कल्याणा मंडळाचा समावेश आहे. जनुना महसूल मंडळातंर्गत जनुना, खामगांव
ग्रामीण, जयपूर लांडे, जळका तेली व किन्ही महादेव गावांचा समावेश आहे. या मंडळाचे
मुख्यालय जनुना आहे. तसेच कल्याणा महसूल मंडळातंर्गत कल्याणा, भालेगांव, नागझरी
बु, सारंगपूर, चिंचोली बोरे या गावांचा समावेश असून मुख्यालय कल्याणा येथे आहे.
महाराष्ट्र जमिन
महसूल अधिनियम 1966 व शासन अधिसुचनेनुसार जिल्हाधिकारी यांनी या महसूल मंडळांना मान्यता
प्रदान केली आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीद्वारे प्रस्ताव
मागविण्यात आले. त्यानुसार उपविभागीय समितीने लोकसंख्या/खातेदार व क्षेत्रफळ यांचा
विचार करून नवीन महसूल मंडळ व त्याअंतर्गत येणारे साझे सुचविले आहेत, असे जिल्हाधिकारी
यांनी कळविले आहे.
***********
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्वाधार योजनेचा अर्ज करण्यास मुदतवाढ
- 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारणार
- विद्यार्थ्यांनी
अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 20 : राज्यात इयत्ता 10 वी
नंतरच्या व इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक
अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येतो.
प्रवेशित विद्यार्थ्यांना भोजन, निवास व
इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांच्या आधार संलग्न असलेल्या
बँक खात्यात थेट रक्कम योजनेनुसार वितरीत
करण्यात येते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
2017-18 साठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यात मुदतवाढ व शासन निर्णयातील अटींमध्ये
अंशत: बदल करण्यात येत आहे. सन 2017-18 विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याची मुदत 28
फेब्रुवारी 2018 पर्यंत आहे. तसर्व स्तरावरील विद्यार्थ्यास किमान 50 टक्के गुण
असणे अनिवार्य आहे. मनपा, नपा यांच्या हद्दीपासून 20 किलोमीटर परिसरात असलेल्या
महाविद्यालयात शिकत असलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र असणार
आहे. विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये
शिक्षण घेत आहे, त्या जिल्ह्याच्या सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांचेकडे
अर्ज करू शकणार आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहीत
नमुना http://sjsa.maharashtra.gov.in
व http://www.maharashtra. gov.in या
संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पूर्ण भरलेला व अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांसह तो
विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहे. त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त,
समाज कल्याण कार्यालय यांचेकडे समक्ष अथवा टपालाद्वारे किंवा कार्यालयाच्या swadhar.swbuldhana@gmail.com
इमेल आयडीवर अर्ज करू शकतात. तरी महाविद्यालयीन इयत्ता 10 वी नंतरच्या व इयत्ता 12
वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या
अुन. जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार
योजनेचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त मनोज मेरत यांनी केले
आहे.
असा आहे भोजन, निर्वाह व निवास भत्ता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्वाधार योजनेतंर्गत भोजन भत्ता, निवास व निर्वाह भत्ता देण्यात येतो. तो
पुढीलप्रमाणे : मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर
या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 32 हजार, निवास
भत्ता 20000 व निर्वाह भत्ता 8000 असा एकूण 60 हजार रूपये देण्यात येतो. तसेच इतर
महसूल विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण
घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता 28 हजार, निर्वाह 8 हजार व निवास भत्ता 15
हजार असा एकूण 51 हजार रूपये प्रदान करण्यात येतो. त्याचप्रमाणे उर्वरित
ठिकाणांसाठी भोजन 25 हजार, निवास 12 हजार व निर्वाह भत्ता 6 हजार असा एकूण 43 हजार
रूपये देण्यात येतो. या व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी
प्रतिवर्ष रूपये 5 हजार रूपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 2 हजार
रूपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी रोख स्वरूपात देण्यात येणार आहे.
********
पाणी
टंचाई निवारणार्थ नळ योजनांची विशेष दुरूस्ती
* मोताळा
तालुक्यातील तीन गावांचा समावेश
बुलडाणा दि. 20 - पाणीटंचाई निवारणार्थ मोताळा तालुक्यातील
सावरगांव जहाँगीर, शेलगांव बाजार व चिंचखेड खु या गावांसाठी नळ योजनांची विशेष
दुरूस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहे. या
कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या गावांमधील संबधित ग्रामपंचायतीने वीज देयक
न भरल्यामुळे नळ योजना बंद असेल, तर अशा ग्रामपंचायतीने प्रथम थकीत वीज देयकाची रक्कम
संबंधिताकडे भरून नळ योजनेचा विद्युत पुरवठा सुरू करावा. कामे सुरू होण्यापूर्वी व
काम पूर्ण झाल्यानंतर पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा
परिषद यांनी करावा. सदर मंजूर कामे इतर
निधीतून झालेले नाही अथवा प्रस्तावित नाही, याची खात्री केल्यानंतरच मंजूर कामास
सुरूवात करावी, अन्यथा संबंधितास जबाबदार धरण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी
कळविले आहे.
*******
चिखली
तालुक्यातील चंदनपूर गावासाठी टँकर मंजूर
बुलडाणा,दि.20 : चिखली तालुक्यातील चंदनपूर येथील
पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावासाठी पाणीपुरवठ्याकरिता टँकर मंजूर
करण्यात आले आहे. चंदनपूर गावाची लोकसंख्या 1720 असून या लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर
करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची
ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी
यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून
द्यावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment