Wednesday, 22 March 2017

news 22.3.2017 dio buldana

पाण्याची बचत करून आपले कर्तव्य पार पाडा
-         जिल्हाधिकारी
·        जलजागृती सप्ताहाचा समारोप
            बुलडाणा, दि.22 :  पावसाची अनियमितता, अनिर्बंध होणारा पाण्याचा उपसा, दरडोई वाढलेला पाण्याचा वापर यामुळे पाणी हा काटकसरीचा विषय बनला आहे. पाण्याचा जेवढा उपयोग आपण करतो, त्यापेक्षा जास्त पाण्याची बचत करायला शिकले पाहिजे. पाण्याची बचत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून हे कर्तव्य प्रत्येकाने पार पाडावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी आज व्यक्त केली.
    जलजागृती सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम आज बुलडाणा रेसीडेन्सी क्लब हॉटेलच्या सभागृहात पार पडला. त्यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर बुलडाणा पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता सुनील चौधरी, कार्यकारी अभियंता राजेश हुमणे, जलतज्ज्ञ रामकृष्ण पाटील, माधवराव मारशेटवार आदी उपस्थित होते.
  पाण्याची बचत ही काळाची गरज असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, पाणी बचतीचा मंत्र सर्वांनी ध्यानी धरला पाहिजे. शालेय जीवनापासूनच पाण्याच्या बचतीचे महत्व सांगितले पाहिजे. विद्यार्थी दशेपासून पाणी बचतीचा संस्कार रूजल्यास भावी आयुष्यात पाण्याचे महत्व सांगण्याची आवश्यकता भासणार नाही. जलसंपदा विभागाने राबविलेल्या या जलजागृती सप्ताहामुळे जिल्हाभर पाणी बचतीचे महत्व कळाले आहे. या विभागाने जिल्हाभर हा सप्ताह साजरा करून जलजागृती केली आहे. समाजाच्या सर्व स्तरातून जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास भविष्यातील पाणी टंचाईसारख्या परिस्थितीवर मात करता येणे शक्य होणार आहे.
    अध्यक्षीय विचार मांडताना अधिक्षक अभियंता सुनील चौधरी म्हणाले, जलसंपदा विभागाचा मुख्य संपर्क हा धरणाच्या लाभक्षेत्रात येणारे लाभधारक, भूधारक यांच्याशी येतो. हा शेतकरी किंवा भूधारक जेव्हा त्यागाची भावना ठेवतो. त्यातूनच जलसंपदा विभागाला काम करण्याची संधी मिळते व मोठे, मध्यम, लघू प्रकल्प आकारास येतात. जलजागृती केवळ सप्ताहापुरती मर्यादीत न राहता नागरिकांनी सतत पाण्याबाबत जागरूक असले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  जलप्रतिज्ञेचे वाचन याप्रसंगी कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे यांनी केले.
   यावेळी माधव मारशेटवार यांचा जलप्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.  रामकृष्ण पाटील यांनीही पाण्याचे महत्व सांगितले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी यांनी जलजागृतीपर चित्रप्रदर्शनीची पाहणी केली. यावेळी अंध मुला-मुलींच्या चैतन्य चमूने जलजागृतीपर गीत सादर केले. कार्यक्रमादरम्यान जलजागृती सप्ताहामध्ये राबविलेल्या उपक्रमांवर आधारीत माहितीपट सादर करण्यात आला. कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता हेमंत सोळगे, संजय जेवळीकर, महादेव कदम, रोहीत जगताप, चंद्रकांत साळुंखे, के.बी उमाळे आदी उपस्थित होते. संचलन ज्योती नलावडे व वैशाली रोकडे यांनी, तर आभार प्रदर्शन उपअभियंता एकनाथ हिरडकर यांनी केले.
********
2 एप्रिल रोजी पोलीओ लसीकरण
·        0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलीओचा डोस पाजण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 22 : जिल्ह्यात दोन सत्रात पल्स पोलीओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत रविवार, 2 एप्रिल 2017 रोजी जिल्ह्यात पल्स पोलीओ लसीकरण  करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना या दिवशी पोलीओ डोस पाजण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. ही लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी 1924 पोलीओ बुथची व्यवस्था करण्यात आली आहे.
      जिल्ह्यातील सर्व गावे, वाड्या, वस्ती, तांडे, विटभट्टी, मेंढपाळ, आदिवासी कुठल्याही स्तरावरील बालक वंचित राहणार नसल्याची काळजी घेण्यात येत आहे. लसीकरण झालेल्या सर्व बालकांच्या डाव्या करंगळीवर मार्कर पेनने खुण करण्यात येणार असून यासाठी मोबाईल पथक, ट्रन्झिट टीम आदी सज्ज ठेवण्यात येत आहे.
  जिल्ह्यात ग्रामीण भागात 1 लक्ष 95 हजार 908 बालके असून शहरी भागात 61 हजार 377 बालके आहे. अशाप्रकारे एकूण 2 लक्ष 57 हजार 285 बालके अपेक्षीत आहे. सर्व बालकांना लसीकरणाकरिता 1924 बुथची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यात आरोग्य विभागासोबत विविध विभागातून एकूण 5122 कर्मचारी सहकार्य करणार आहे. त्यासाठी 382 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येकाने आपले 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालक असल्यास ते पोलीओ डोसपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
                                                                                    **********
सिकलसेलग्रस्त रूग्णांचे आरोग्य तपासणी शिबिर
बुलडाणा, दि. 22 : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालय येथील टेलिमेडीसीन विभागात सिकलसेलग्रस्त रूग्णांचे आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच पार पडले. यामध्ये बुलडाणा व चिखली तालुक्यातील रूग्णांचा समावेश होता. शिबिरात 30 रुग्णांनी तपासणीचा लाभ घेतला.
   यावेळी मुंबई येथील जे. जे हॉस्पीटलचे तज्ज्ञ डॉक्टर यांनी रूग्णांची टेलीमेडीसीनद्वारे तपासणी करून औषधोपचाराबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी सिकलसेलग्रस्त रूग्णांना मोफत एस.टी प्रवास, संजय गांधी निराधार योजनेतून दरमहा 600 रूपये मानधन, मोफत रक्तसंक्रमण कार्ड, 10 वी किंवा 12 वी इयत्तेत शिकणाऱ्या रूग्णांना बोर्डाचे पेपरसाठी प्रत्येक तीन तासाला 1 तास वाढीव आदी योजनांची माहिती दिली. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याहस्ते रूग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले. तरी या रूग्णांनी अशा योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. चिखली येथील डॉ. कोठारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खान, डॉ. प्रशांत बढे आदींनी रूग्णांची तपासणी केली.
*******
26 मार्च रोजी होणारा माजी सैनिकांचा मेळावा रद्द
 बुलडाणा, दि 22- जिल्ह्यातील माजी सैनिक व युद्ध विधवा, वीर पत्नी यांच्या इसिएचएस व सीएसडी कँटीन च्या अडी अडचणी, उपाययोजना, वन रँक वन पेन्शन आणि कुटूंब निवृत्ती वेतन आदींबाबत माजी सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन 26 मार्च 2017 रोजी सकाळी 10.30 वाजता स्टेशन हेडक्वॉर्टर, भुसावळ, जि. जळगांव येथे करण्यात आले होते. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव हा मेळावा रद्द करण्यात आला आहे. तरी सर्व माजी सैनिक, युद्ध विधवा व अवलंबित यांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  यांनी केले आहे.
****
मनरेगाची मजूरी आता आधार क्रमांक संलग्न केलेल्या बँक खात्यातच होणार जमा
·        1 एप्रिल 2017 पासून होणार कार्यवाही
·        30 मार्च 2017 पर्यंत पंचायत समिती कार्यालयात कागदपत्रे सादर करावी
बुलडाणा,दि.22 - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत नोंदणी झालेल्या सर्व मजुरांची मजूरी 1 एप्रिल 2017 पासून त्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात ऑनलाईन जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत मजुरांनी आपले आधार क्रमांक 30 मार्च 2017 पर्यंत बँक खात्याशी संलग्न करावे.
     मनरेगातंर्गत नोंदणी झालेले व सध्या काम करत असलेल्या सर्व मजुरांची मजूरी त्यांच्या आधार क्रमांक संलग्नित बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार मजुरांची मजूरी नरेगाच्या संकेतस्थळावर नोंदविण्यात आलेल्या आधार क्रमांकाशी संलग्नित असलेल्या बँक खात्यातच जमा केली जाणार आहे. त्यामुळे सर्व मजूरांनी आपले क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मजूरांनी आपले क्रमांक बँक खाते पुस्तकाच्या पहिल्या पानाची सत्यप्रत, आधार कार्डची सत्यप्रत व जॉबकार्ड सत्यप्रत संबधीत ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक, पंचायत समिती कार्यालयात 30 मार्च 2017 पर्यंत जमा करावे.

  आधार क्रमांक संलग्नीत न करणाऱ्या मजुरास त्याची मजूरी न मिळाल्यास संबधीत मजूर जबाबदार राहणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
**********
सोनेवाडी व मालगणी येथे तात्पुरती पूरक नळ योजना मंजुर
बुलडाणा दि‍.22 - जि‍ल्हा परिषद  बुलडाणा यांच्यावतीने पाणी टंचाई कृती अराखडा सन 2016-2017 मध्ये समाविष्ट असलेल्या चिखली तालुक्यातील सोनेवाडी व मालगणी गावामध्ये पाणी टंचाई नि‍वाणार्थ तात्पुरती नळ योजना मंजुर करण्यात आली आहे. या उपाययोजनेची अंदाजपत्रकीय कि‍मत अनुक्रमे 13 लाख 22 हजार 380 व 14 लाख 9 हजार 610 इतकी आहे. या योजनेमुळे  येथील पाणीटंचाई सुसह्य होण्यास मदत होणार आहे.

******

No comments:

Post a Comment