Friday, 25 November 2016

news 25.11.2016 dio buldana

मतदारांनी  निर्भिडपणे मतदान करावे
                                                                                    - विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता
·         मतदारांनी बुथ क्रमांक तसेच इतर माहितीसाठी True Voter या मोबाईल ॲप चा वापर करावा
·        निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या पोलीसांनाही मिळणार भत्ता
·        मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल सोबत नेण्यावर बंदी
बुलडाणा, दि. 25 :  जिल्हयात बुलडाणा, चिखली, मेहकर, मलकापूर, दे.राजा, शेगांव, जळगांव जामोद, नांदुरा व खामगांव या नऊ नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. या निवडणूकीकरीता रविवार, 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान व 28 नोव्हेंबर 2016 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे. मतदारांनी कुठल्याही प्रकारची भिती, दबावाला बळी न पडता निर्भिड वातावरणात मतदान करावे, असे आवाहन विभागीय महसुल आयुक्त जे.पी. गुप्ता यांनी केले आहे. 
    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात  नगरपालीका निवडणुकी संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना  ते बोलत होते. यावेळी  जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर, अति. मुख्यकार्यकारी अधिकारी बी.बी नेमाने, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे आदी मंचावर उपस्थित होते.
    प्रत्येक मतदाराला शासनातर्फे वोटरस्लीपचे वाटप होणे आवश्यक असुन वोटरस्लीपचा उपयोग मतदानाच्यावेळी  इतर अधिकृत ओळखपत्र उपलब्ध नसल्यास ओळखपत्र म्हणुन ग्राहय धरण्यात यावा अशा सूचना करीत विभागीय आयुक्त श्री. गुप्ता म्हणाले,  या वोटरस्लीपवर प्राधिकृत अधिकाऱ्यांची सही व शिक्का आवश्यक आहे. मतदान केंद्रावर मतदान प्रक्रीयेत भाग घेत असलेल्या अधिकारी व कर्मचारी व्यतिरिक्त इतर कोणालाही मोबाईल सोबत ठेवण्यास  व त्याचा वापर करण्यास बंदी आहे.  सदर निवडणुकीमध्ये मद्यवाटप तसेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे तसेच भेट वस्तूचे वाटप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी  पोलीस विभागासह  इतर निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या निरीक्षकांनी  लक्ष ठेवुन कार्यवाही करणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले, नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमजबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरूपयोग टाळणे  व मतदारांवर प्रभाव टाकणा-या वस्तूंच्या  वाटपावर अंकुश ठेवणे याकरिता कार्यवाही करण्यात यावी. चलनातून रद्द करण्यात आलेल्या  500 व 1000 रूपयांच्या चलनी नोटांचे वितरण मतदारांना आकर्षीत करण्यासाठी  निवडणूक काळात  मोठया प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी पोलीस विभागाने लक्ष ठेवून यावर अंकुश ठेवणे आवश्यक असल्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मतदारांना बुथ क्रमांक तसेच अन्य माहितीसाठी मतदारांकरीता  शासनाने True voter हे ॲप विकसित केले आहे. या ॲप्सच्या माध्यमातून मतदारांनी आपला बुथ क्रमांक आणि अन्य निवडणूक विषयक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहनही विभागीय आयुक्त यांनी यावेळी केले.
 जिल्हयात निवडणुकी दरम्यान अवैध मद्यविक्रीचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेवून नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सांगत ते म्हणाले,  महावितरणने  मतदानाच्या पहिल्या दिवशी व मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीचे दिवशी संबंधीत भागातील विद्युत पुरवठा खंडीत न होण्यासाठी कार्यवाही करावी. तसेच सध्या सायंकाळ लवकर होत असल्यामुळे मतदानाच्या दिवशी सायंकाळी प्रकाश व्यवस्था करावी. ऐनवेळी वीज पुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी वीज पुरवठ्याची व्यवस्था करावी. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही आता निवडणूकीचा भत्ता मिळणार आहे. त्यासाठी अशा पोलीस कर्मचाऱ्यांना नगर परिषद निवडणूकीचा भत्ता देण्यात यावा,  अशा सूचनाही विभागीय आयुक्त यांनी यावेळी दिल्या.
        ते पुढे म्हणाले, व्हिडीओग्राफी सर्व्हेलियन्स पथक, भरारी  पथक, चेक पोस्टसाठी पथक, तक्रार निवारण कक्ष यांनी मतदान व मतमोजणी दिवशी सज्ज रहावे. प्रभागनिहाय इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र राखीव स्थितीत ठेवावे. ज्यादा यंत्रांची व्यवस्था करून ठेवावी. ऐनवेळी मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्यास 15 मिनीटात दुसऱ्या ईव्हिएम उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून मतदान थांबणार नाही. मतदान केंद्रामध्ये यापूर्वी उमेदवार किंवा त्यांनी नेमलेले इलेक्शन एजंट, पोलींग एजंट कितीही वेळा जायचे. या निवडणूकीला मात्र उमेदवार किंवा त्यांनी नेमलेले एजंट तीनपेक्षा जास्त वेळ मतदान केंद्रात जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
  याप्रसंगी संविधान शपथ देण्यात आली. बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह संबंधीत यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  
डाव्या हाताच्या बोटांवर शाई असणाऱ्यांनी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे
डाव्या हाताच्या बोटांना  बँकेकडुन शाई लावली असेल, तर अशा मतदारांनी 26 नोव्हेंबर रोजी 5 वाजेपर्यंत आपल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जाऊन शाई लावलेले बोट दाखवुन त्यांच्या कडून प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. ते मतदानाकरीता आवश्यक आहे. बँकेमार्फत मतदारांच्या उजव्या हाताच्या बोटाला शाई लावली असल्यास काळजी नसावी.  असे मतदार थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदान करु शकतात.
*****
नगर परिषद निवडणूकीरिता जिल्ह्यात दारूबंदी जाहीर
·        26, 27 व 28 नोव्हेंबर रोजी दारूबंदी
बुलडाणा, दि. 25 :  जिल्हयात बुलडाणा, चिखली, मेहकर, मलकापूर, दे.राजा, लोणार, जळगांव जामोद, नांदुरा व खामगांव या नऊ नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. या निवडणूकीकरीता रविवार, 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान व 28 नोव्हेंबर 2016 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणकीदरम्यान संपूर्ण जिल्ह्यात मतदानाच्या आदल्या दिवशी 26 नोव्हेंबर, मतदान दिवशी 27 नोव्हेंबर आणि मतमोजणी दिवशी 28 नोव्हेंबर 2016 रोजी दारूबंदी जाहीर करण्यात आली आहे.
     मुंबई दारूबंदी कायदा, 1949 च्याय कलमान्वये जिल्ह्यातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, परवाना कक्ष व बिअर शॉपी अनुज्ञप्ती उपरोक्त दिवशी बंद राहतील. तरी सर्व संबंधी अनुज्ञप्तीधारकांनी आपल्या अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्यात. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरूद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
********
मलकापूर व नांदुरा नगर पालिका क्षेत्रात कलम 144 लागू
·        मतदान व मतमोजणी केंद्र परीसरात जमाव करण्यास बंदी
बुलडाणा,दि. 25 -  मलकापूर व नांदुरा नगर परिषद मतदार संघाकरिता 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होत असून  28 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.  या दोन्ही नगर परिषद क्षेत्रातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी आणि निवडणूका निर्भयपणे, निपक्षपातीतपणे पार पाडण्याच्यादृष्टीने मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र परीसरात  कलम 144 लागू करण्यात आली आहे.
  त्यामुळे मतदानाचे दिवशी मतदान केंद्र व परीसरात जमाव करण्यास, मतदारांना घाबरविण्यास, बळजबरीने मतदान करण्यास किंवा मतदान न करण्यास प्रवृत्त करणे, उमेदवाराच्या निवडणूक चिन्हाचे प्रदर्शन करणे, मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणे, वाहनांचा प्रवेश, मतदान केंद्रामध्ये अनधिकृत प्रवेश यावर बंदी घालण्यात येत आहे.  या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय दंड संहिता 1960 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असे मलकापूरचे उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.

*******



राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा
बुलडाणा,दि. 25 -  जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त  नुकताच राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अलकाताई खंडारे यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच सर्व कमचाऱ्यांना यावेळी प्रभारी शिक्षणाधिकारी ए. बी अकाळ यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. यावेळी शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
****
जिल्हा स्तर युवा महोत्सवाचे 2 डिसेंबर रोजी आयोजन
·              18 प्रकारचे स्पर्धा प्रकार
·              युवकांनी 30 नोव्हेंबर पर्यंत प्रवेश निश्चित करावा
बुलडाणा,दि.25 - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणेद्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन 2 डिसेंबर 2016 रोजी करण्यात येणार आहे. महोत्सव सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार असून जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरून रोड, बुलडाणा येथे होत आहे.
   या महोत्सवात 18 प्रकारच्या बाबींवर स्पर्धा होणार आहे. प्रत्येक स्पर्धेत कलाकारांची संख्या व वेळ मर्यादा दिलेली आहे. त्याप्रमाणे सादरीकरण करावयाचे आहे. महोत्सवात लोकनृत्यसाठी 20 कलाकारांना 15 मिनीटांचा वेळ दिलेला असून लोकगित प्रकारासाठी 6 कलाकारांना 7 मिनीट वेळ राहील. त्याचप्रमाणे एकांकिका (हिंदी व इंग्रजी) 12 कलाकारांना 45 मिनीटे, शास्त्रीय गायन 1 कलाकाराला 15 मिनीटे, शास्त्रीय नृत्य एका कलाकाराला 15 मिनीटे, सितार एका कलाकार व 15 मिनीट वेळ, बासरीकरीता एका कलाकाराला 15 मिनीट, तबलासाठी 1 कलाकाराला 10 मिनीटे, विणा प्रकारासाठी एका कलाकाराला 15 मिनीट, मृदुंगकरीता एक कलाकार 10 मिनीट, हार्मोनियम एक कलाकाराला 10 मिनीटे, गिटारसाठी एका कलाकाराला 10 मिनीट, मणिपुरी नृत्य, ओडीसी नृत्य, भरतनाट्यम व कुचीपुडी नृत्याकरीता एका कलाकाराला प्रति स्पर्धा 15 मिनीटे आणि हिंदी, इंग्रजी भाषेतील वक्तृत्व स्पर्धेसाठी एका स्पर्धकाला 4 मिनीटांचा वेळ दिल्या जाणार आहे.
    त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, युवा मंडळे, संगीत विद्यालय, स्वयंसेवी संस्थेतील 13 ते 35 वर्ष वयोगटातील युवक-युवतींनी जास्तीत जास्त संख्येने युवा महोत्सवात सहभाग घ्यावा. महोत्सवात आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत जन्मतारखेच्या दाखल्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात नोंदवावा. अधिक माहिती, नियम व अटीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी केले आहे.    

******

No comments:

Post a Comment